आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : शरदमणी मराठे
===
एखाद्या सिनेमात असं होतं की मुख्य स्टोरी राहते बाजूला आणि एखादी साईड स्टोरीच लक्षात राहते आणि त्या स्टोरी चे सह-नायक/ सह-नायिकाच ‘भाव खाऊन जातात’.
एकीकडे साहित्य परिषद रचित आणि स्थानिक आयोजक ‘एक्झिक्युटित’ सहगल बाईंना ‘बोलवावे – की बोलावणे वापस घ्यावे?’ असे हॅम्लेटी नाट्य साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुरु होते आणि लोक त्यावर भरभरून बोलत लिहित होते, सोशल मीडियात पोस्टी टाकत होते तितक्यात (सगळ्यांचा डोळा चुकवून) प्रसिद्ध लेखक व सिने दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी साहित्य संमेलन विषयक पोस्ट फेसबुक वर टाकली आणि ती पोस्ट, काना मागून येत तिखट झाली.
मूळ सहगल बाईंच्या बोलावण्यावरून सुरु झालेल्या धुमश्चक्रीतून ‘टाईम प्लीज’ घेत अनेक जण कुंडलकरांच्या पोस्ट वरच तुटून पडले. (ती पोस्ट सोबत शेअर केली आहे ती अवश्य वाचावी)
असे काय लिहिले कुंडलकर यांनी ज्याच्यामुळे इतके वादळ उठावे.
मला त्यांच्या पोस्टवरून समजलेला आशय असा आहे…
१. कुंडलकर यांना जेथे साहित्य संमेलन होणार आहे ते यवतमाळ हे गाव कुठे आहे हे माहीत नव्हते. ते त्यांना त्यांच्या मित्राकडून समजले.
२. कुंडलकर यांना असे वाटते की अशा ‘अननोन’ ठिकाणी संमेलन भरवण्यापेक्षा सहभागी साहित्यिकांच्या सोयीने मुंबई-पुण्याच्या जवळ वा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी, छोट्या गेट-टुगेदर च्या स्वरुपात ही संमेलने व्हावीत.
३. ज्यांना चर्चा करायची आहे, ज्यांना लिहायचे आहे वा वाचायचे आहे ते अशा छोट्या फोरम मध्येही होऊ शकते. त्यासाठी अशी लाखो लोकांची गर्दी करायची काय गरज आहे.
४. आपल्या पूर्वजांच्या वेळी संपर्काची – संवादाची साधने कमी होती. त्यावेळी असे मोठ्या संख्येने एकत्र येणे समजू शकतो पण आता संवाद-संपर्क सहज शक्य आहे. त्यामुळे आता अशा मोठ्या संमेलनांची गरज नाही.
५. त्यामुळे गर्दीने जमून “गोंधळ घालण्याच्या ह्या कार्यक्रमाचा पुनर्विचार करावा”
सोशल मिडीयावर बहुसंख्य लोकांनी कुंडलकर यांना झोडायला सुरुवात केली. लोकांचे मुख्य आक्षेप होते की…
१. महाराष्ट्रातील सांस्कृतिक वर्तुळात वावरणाऱ्या कुंडलकर यांना यवतमाळ माहीत नाही हे योग्य नाही.
२. शाळेत ३-४ इयत्तेच्या भूगोलातच हे शिकवलेले असते वगैरे.
३. लोकांना ह्यात कुंडलकर यांचा उद्दामपणा दिसला जो ही टिकेचा सूर होता.
४. काही जणांनी “मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होणाऱ्या हा जिल्हा माहीत नसणे” ही असंवेदनशीलता आहे असेही म्हणणे नोंदवले.
५. काहींनी हा विषय “मुंबई-पुण्याकडील लोकांना तशीही मराठवाडा – विदर्भाची काही पडलेली नसते” अशा विस्तृत परीघाशी जोडला.
मला ह्या सगळ्या चर्चेत खालील मते नोंदवावीशी वाटतात. त्यातील काही कुंडलकर यांच्या पोस्ट शी व त्या बद्दल झालेल्या चर्चेशी संबंधित आहेत तर काही एकंदर साहित्य संमेलन प्रकारासंबंधी आहेत.
कुंडलकर यांच्या बाबतीत अनेकांची प्रतिक्रिया ही अकारण कठोर होती असे वाटते. ते लेखक आहेत, सिनेमा दिग्दर्शक आहेत म्हणून त्यांना यवतमाळ माहीत हवे (शाळेत काय शिकले? वगैरे!) ही अपेक्षा मला अवास्तव वाटते.
जसे महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना अनेक जिल्ह्यांच्या बद्दल माहिती नसते तसेच काही प्रमाण कलावंत मंडळींच्यात देखील असू शकते. त्यात टची होण्यासारखे काही नाही.
कोणाला यवतमाळ माहीत असेल पण कुंडलकर माहीत नसतील, तर कुणाला कुंडलकर माहीत असतील पण यवतमाळ माहीत नसेल तर एखादा असाही असू शकतो की ज्याला ना यवतमाळ माहीत असेल ना कुंडलकर!
अशा गोष्टीत ‘इट्स ओके’ म्हणून पुढे जायला हवी. बाकी शाळेत शिकलेला भूगोल लक्षात राहावा ही अपेक्षा तशी थोरच. शाळेत शिकलेले ‘नागरिक शास्त्र’ कोणाच्या किती लक्षात राहते हे कुठल्याही शहरात/ गावांत वावरताना कळतेच कळते!
दुसरा मुद्दा जवळपास संमेलन करण्याचा. व्यक्तिश: मला असे वाटते की अशी संमेलने विविध ठिकाणी होण्याने ठीकठिकाणी राहणाऱ्या रसिकांना लेखक, प्रकाशक, पुस्तके यांच्या साहचर्याची संधी मिळते.
पण दुसऱ्या बाजूने कुंडलकर म्हणतात तशा संवाद-संपर्काच्या साधनांच्या क्रांतीमुळे पूर्वी होते तितक्या लेखक, प्रकाशक यांच्याशी कनेक्ट होणे तितके अवघडही राहिले नाही.
त्यामुळे परंपरेने चालत आलेले संमेलन भरवण्यात औचित्य आहे असे म्हणणे जसे योग्य आहे तितकेच सामाजिक – तंत्रज्ञान विषयक बदल झपाट्याने घडणाऱ्या काळात नव्या कालानुरूप बदल झाले पाहिजेत असे म्हणणे काही अगदीच चुकीचे नाही.
गेल्या पाच दहा वर्षात इन्टरनेट – फोन ही साधने मराठीचा लिखित मजकूर वाचण्याची व ऐकण्याचीही साधने झाली आहेतच.
व्यक्तिगत अनुभव सांगायचा तर कविता महाजन, संजय भास्कर जोशी, सुबोध जावडेकर, चंद्रमोहन कुलकर्णी वगैरे लेखकांशी/ कलाकारांशी ह्या साधनांच्या मुळे सहज संपर्क होऊ शकला हे खरेच आहे.
त्यात त्यांनी सुचवलेली शहरे वा निसर्गरम्य वगैरे ठिकाणे हा त्यांच्या choice चा भाग झाला. त्याला त्यांचा उद्दामपणा म्हणण्याचे कारण नाही.
महाराष्ट्रात हल्ली कुठलाही गोष्ट ‘शेतकरी’ विषयाची इतकी जोडली जाते की त्याचेही गांभीर्यच संपून जाईल. दिग्दर्शक आहे, कलावंत आहे म्हणून ‘यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांचा एपिसेन्टर आहे’ हे त्याने समजले पाहिजे ही अपेक्षा म्हणूनच अवास्तव ठरते.
सामाजिक प्रश्नांच्या बद्दल संवेदनशीलता असावी ही अपेक्षा योग्यच आहे. पण ती अपेक्षा सर्वच समाज घटकांच्या कडून आहे.
पण अनुभव काय आहे? तशी संवेदनशीलता सार्वत्रिक दिसत नाही. जे समाजात सर्वसाधारण पणे संवेदनशील असण्याचे प्रमाण दिसते ते कलावंतांच्या मध्ये निराळे असेल असे नाही.
आपण बघितले तर महाराष्ट्रातील शेतकरी/ पाणी अशा विषयात काही ठराविक कलावंतच कार्यरत असताना दिसत आहेत. हे वास्तव स्वीकारायला हवे.
शिवाय संवेदनशीलता आहे पण विशिष्ट गाव/ जिल्हा ह्याची त्यासंबंधीची माहिती नाही असेही असू शकते. कुठलीही गोष्ट अति ताणणे त्यामुळे योग्य नाही असेही वाटते.
पुण्या-मुंबईच्या लोकांना सामान्यतः मराठवाडा, विदर्भच काय पण खानदेश, पश्चिम महाराष्ट्र ह्या बद्दलही जेमतेम माहिती असते. मुंबईमध्ये अख्खे आयुष्य काढून हार्बर लाईन (मुंबईत पूर्व किनाऱ्या लगतच्या भागातून जाणारी लोकल ट्रेन) वरील एकाही स्टेशनवर उतरले नाहीत असे व ह्याचा अभिमान असणारे कितीतरी लोक आहेत.
ती संवादाची दरी कमी करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत हे खरे आहे. पण त्यासाठी सर्वंकष व सर्वबाजूने प्रयत्न करायला हवे.
केवळ पुण्या-मुंबईचा आहे म्हणून कुंडलकर वा त्यासारखे जबाबदार आहेत असे म्हणणे हे अती Generalisation आहे.
शिवाय हे देखील लक्षात घेतले पाहिजे की मुंबईचा क्षेत्रविकास परिसर (MMRDA), पुण्याचा क्षेत्रविकास परिसर, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा नासिक जिल्हा वगैरे मुंबई पुण्या जवळचा भाग घेतला तर तो भाग मिळून चार कोटींच्या पेक्षा अधिक लोकसंख्या असलेला परिसर आहे. ही देखील प्रचंड संख्या आहे.
केवळ ह्या परिसरात साहित्य विषयक कार्यक्रम करायचे झाले तरी कोणी पुरे पडणार नाही इतकी ही संख्या प्रचंड आहे.
अगदी सुरुवातीपासून शहरीकरण झालेला हा भाग आहे. त्यामुळे त्याची म्हणून एक रिजनल आयडेंटीटी आहे. त्या परिसरात कार्यक्रम होणे वा करावेसे वाटणे हा त्या वेगळेपणामुळेच येणारा स्वाभाविक रिस्पॉन्स आहे.
त्यात ‘महाराष्ट्र विरोधी’ स्पिरीट शोधण्याचा आटापिटा करू नये असेही वाटते. शिवाय हे त्यांनी सोशल मिडिया वरील फेसबुकवर अत्यंत अनौपचारिकपणे लिहिलेले आहे.
मला शेवटचा मुद्दा लिहायचा आहे तो मात्र केवळ कुंडलकरांच्या पोस्टशी जोडलेला नाही तर साहित्य संमेलनाच्या आत्ताच्या स्वरूपाशी संबंधित आहे.
गेली काही वर्षे त्यात आलेला राजकीय पक्षबाजीचा प्रभाव हा अनेकांना तिटकारा वाटायला लावणारा आहे.
अनेक साहित्य रसिकांनी वारंवार आग्रह धरूनही अध्यक्ष निवडीची प्रक्रियेची इतकी अशास्त्रीय पद्धत आत्ता आत्ता पर्यंत रूढ होती. “लोकशाहीने निवडण्यात काय हरकत आहे?” असे जरी वारंवार मांडले गेले तरी ती पद्धत लोकशाहीचा आभास निर्माण करणारी मात्र होती.
त्यामुळे कंपूबाजी, राजकीय हुजरेगिरी ह्याच्या भांडवलावर त्या सर्वोच्च मानाच्या ठिकाणी ‘चढून बसण्याची’ ‘चतुराई’ हाच अध्यक्षपद मिळवण्याचा निकष आहे की काय असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
निखळ साहित्यिक आणि वाड़्मयविषयक कंटेंट सोडून राजकीय – विचारधारांच्या हमरीतुमरी करण्याचे ठिकाण आहे असेही संमेलनाचे चित्र वारंवार समोर आले आहे जे अनेकांना खटकत आहे. त्यामुळे अनेक वाचकांनी, रसिकांनी साहित्य संमेलनाकडे गेल्या काही वर्षात पाठ फिरवली आहे हे सत्य आहे.
दुसऱ्या बाजूने अनेक लहान मोठ्या शहरात अनेक लहान लहान साहित्य संमेलने, विषयवार साहित्य संमेलने जसे महिला, कामगार, विद्यार्थी, विद्रोही, ख्रिस्ती साहित्य संमेलन वगैरे अनेक संमेलने नियमित पणे, कुठलाही वादंग न होता पार पडत आहेत.दर वर्षी होत आहेत.
मग केवळ ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ वालेच कोण लागून गेले ज्यांचे वादंग दरवर्षी मराठी साहित्य रसिकांनी निमूटपणे बघत राहायचे? त्याबद्दलची नापसंती जाहीरपणे व्यक्त होऊ लागली हे चांगलेच झाले.
१९९० नंतर जन्म झालेले व आज विशी-तिशी मधले मराठी लिहिणारे, वाचणारे तरुण जर मराठी लेखन, साहित्य व सांस्कृतिक विश्वाशी जोडले जावे असे आपल्याला वाटत असेल तर विविध कल्पनांच्या बद्दल आपल्याला स्वागतशील राहायला हवे.
परंपरेने चालत आलेल्या गोष्टी साचेबंद पद्धतीने ह्या पिढीनेही स्वीकाराव्या अशी अपेक्षा करणे चुकीचे राहील. आणि गेल्या अनेक वर्षांपासून होत आलेली साहित्य संमेलने ही त्या साचेबंद पणाचीच उदाहरणे होती.
झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञानाचे, माध्यमांचे व प्रकाशन प्रक्रियांचे विश्व समोर असताना साहित्य संस्थांनी, साहित्य विषयक उपक्रमांनी आणि साहित्यप्रेमी समाजाने आपला साचेबंदपणा सोडायला हवा आणि नव्या कल्पनांच्या बद्दल, त्या कल्पना मांडण्याच्या पद्धतीबद्दलही स्वागतशील राहायला हवे असे वाटते.
यंदा पासून अध्यक्ष निवडीची पद्धत बदलली आहे. यंदा ज्येष्ठ साहित्यिक व संशोधक अरुणाताई ढेरे अध्यक्ष लाभल्या आहेत ही देखील आनंदची बाब आहे. ह्या निमित्ताने मराठी साहित्य विश्व हे बदलत्या काळाला अधिक वेगाने सामोरे जाईल आणि साहित्यविश्व अधिक प्रवाही होईल अशी आशा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.