आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारतीय क्रिकेटमध्ये संयम, चिकाटी, जिद्द आणि गुणवत्ता याचे प्रमाण म्हणून कुणाला आजही ओळखले जात असेल तर तो म्हणजे भारताचा ‘द वॉल’ राहुल द्रविड!
आज राहुल द्रविडचा वाढदिवस.. त्यानिमित्त ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिलेला लेख इनमराठीच्या वाचकांसाठी सादर करत आहोत.
===
एकेकाळची राहुल द्रविडरूपी मैदानावरची खंबीर भिंत, आता मैदानाबाहेरही कणखरतेचं दर्शन घडवतेय. खरं तर त्याच्या रूपाने १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघासाठी एक नैतिक अधिष्ठान निर्माण झालेलं आहे म्हणूनच त्याच्या हाताखाली तयार होणं अनेकांसाठी भाग्याचं लक्षणही आहे…
शेक्सपिअरचं एक मस्त वाक्य आहे.
‘One crowded hour of glorious life is worth an age without name.’
१९ वर्षांखालील भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये वर्ल्डकप जिंकल्यावर राहुल द्रविडच्या संदर्भात ते मला आठवलं. द्रविडच्या कारकीर्दीत एकच ‘क्राउडेड अवर’ आला असं नाही. पण बऱ्याचदा त्या ‘क्राउडेड अवर’मध्ये वाटेकरीसुद्धा होते.
पहिल्या कसोटीत त्याने ९५ धावा लॉर्ड््सवर केल्या. तेव्हा शतक ठोकलेला गांगुली हीरो झाला.
इतिहास बदलणाऱ्या कोलकाता कसोटीत त्याच्या आणि लक्ष्मणच्या भागीदारीत लक्ष्मण ‘टॉप’ ठरला. राज्याभिषेक त्याचा झाला…
महान फलंदाज असूनही करिअरमध्ये त्याला सतत सचिन तेंडुलकरच्या सावलीत राहावं लागलं.
द्रविड, आशा भोसले आणि नील आर्मस्ट्राँगपाठोपाठ चंद्रावर उतरलेल्या ऑल्ड्रिनची जातकुळी एकच. तिघेही नाबाद ९९!
सचिन, लता, आर्मस्ट्राँग शतक ठोकून गेले… पण हा ‘क्राउडेड अवर’ फक्त द्रविडचा होता. इथे तो महाभारतातल्या कृष्णासारखा होता. ‘न धरी कधी, शस्त्र हाती. गोष्टी सांगेन युक्तीच्या चार’.
पण तरीही पराक्रम गाजवणाऱ्या अर्जुन आणि शंभर कौरव मारणाऱ्या भीमापेक्षा श्रीकृष्ण भाव खाऊन गेला.
राहुल द्रविडच्या बाबतीत तेच झालंय. कारण राहुलची पुण्याई तशी आहे. राहुलने १९ वर्षांखालील मुलांचा कृष्ण होण्याचा निर्णय, अत्यंत विचारपूर्वक घेतला होता.
त्याच्या निवृत्तीनंतर त्याने हात वर करून ‘मला भारतीय संघाचा प्रशिक्षक व्हायचंय.’ म्हटलं असतं, तर त्याच्याकडे कुणी दुर्लक्ष केलं नसतं. पण निवृत्त झाल्यावर ज्यांच्याबरोबर खेळलोय, त्यांचा ‘बॉस’ होणं, त्यांना ‘शिकवणं’ सोपं नव्हतं.
अनिल कुंबळेची कुठे डाळ शिजली? रवी शास्त्रीने धूर्तपणे आपल्यासाठी तयार केलेल्या ताटावर कुंबळे बसला, तेव्हाच कुंबळेला जेवण पचणार नाही. हे ठरून गेलं होतं.
रवी शास्त्री असा डाव खेळला की सचिन, लक्ष्मण आणि विशेषत: गांगुलीलाही, विराट कोहलीच्या हाताला हात लावून मम म्हणावे लागले.
रवी शास्त्रीची खरी जागा भारताच्या पार्लमेंटमध्ये होती. तो उगाचच भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंगरूममध्ये सडतोय.
द्रविड बुद्धिमान असला तरी, रवीची राजकीय हुशारी त्याच्याकडे नाही. तो कर्णधार असताना आणि विशेषत: २००७च्या विश्वचषकात दारुण पराभव झाल्यावर त्याला कळून चुकलं होतं, की नेतृत्वाच्या मुकुटाला हिरे लावलेले असले, तरी त्याचं अस्तर बाभळीच्या झाडापासून तयार केलेलं असतं.
ते काटे रक्तबंबाळ करतात. त्यामुळे त्याने तृणमूल स्तरापासून सुरुवात करायची ठरवलं. एक पिढी गंभीरपणे घडवायची असेल तर तिथूनच सुरुवात करणं योग्य असतं.
‘वरच्या’ संघात खेळाडूचा ‘इगो’ सांभाळत फाइन ट्यूनिंग करावं लागतं. इथे तो प्रश्न नसतो.
कोवळ्या डोळ्यांत मोठी स्वप्न घेऊन फिरणाऱ्या मुलांना ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत, तांत्रिक सुदृढता, शिस्त वगैरे शिकवण द्यावी लागते. आणि त्यासाठी राहुल द्रविडपेक्षा मोठं रोल मॉडेल कुठे सापडणार?
त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दरारा असा की, मुलांना तर त्याचा प्रत्येक शब्द देववाणी वाटावा.
राहुल सचिनप्रमाणे असामान्य प्रतिभा घेऊन जन्माला आला नव्हता. पण चिकाटी, अभ्यास, मेहनत, घोटलेलं तंत्र, अफाट मानसिक ताकद यामुळे तो अशा खेळी खेळून गेला की, त्यावरची यशाची मोहर पाहून सचिनलाही ते आपल्या खजिन्यात असावेत, असं वाटत असावं.
काही गुण त्याने आईकडून घेतले. त्याची आई एकदा मला सांगत होती, की फाइन आर्ट््समध्ये डिप्लोमा घेतल्यावर तिला त्या विषयात डॉक्टरेट करावीशी वाटली. पण पुढे मुलं झाली. त्यांचं संगोपन, यात आयुष्य निघून गेलं.
निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना वाटलं आता आपल्याला वेळ आहे. मुलं मोठी झाली आहेत. करूया का आता डॉक्टरेट? हा प्रश्न त्यांनी स्वत:ला ५६-५७ व्या वर्षी विचारला आणि डॉक्टरेट घेतली.
राहुलमध्ये सहजासहजी न हरण्याची जिद्द कुठून आली, हे मी सांगायची गरज नाही. वनडेचा फलंदाज नसल्याचा शिक्का, ना पुजाराला पुसता येतोय ना, मुरली विजयला!
द्रविडच्या कपाळावरही कुणी तरी ‘टॅटू’ काढला होता, हा वनडेचा खेळाडू नाही. त्याने तो पुसला. स्वत:ची जागा तयार केली. आणि दहा हजारच्या वर धावा काढल्या.
अरे, कुमारवयातल्या खेळाडूंसाठी असाच तर प्रशिक्षक हवा! जो डोक्यावर बर्फाची अख्खी लादी ठेवून, निखाऱ्यावरून चालला, आगीशी खेळला, आणि मग स्वत:च ज्वाळा बनून त्याने प्रतिस्पर्ध्याला भाजून काढलं. आणि हे करताना ना डोक्यावरचा बर्फ वितळला, ना चेहऱ्यावरचे भाव बदलले.
एकदा मी आपल्या अजिंक्य रहाणेला, निरोप पाठवला होता. तू राहुल द्रविडच्या पावलावर पाऊल टाकतोयस ही चांगली गोष्ट आहे. पण शतक झाल्यावर हसायला हरकत नाही. राहुल द्रविडची त्या बाबतीत कॉपी करायची गरज नाही.’
प्रशिक्षकासाठी अलीकडे मॅनेजमेंटचा अनुभव महत्त्वाचा असतो. राहुलचा मोठा भाऊ आणि वहिनी त्यांनी आयएएममधून मॅनेजमेंटची पदवी घेतलीय.
राहुलनेही मॅनेजमेंटचा अभ्यास केलाय. त्याला ग्रीसमध्ये मागे एकदा मॅनेजमेंटवर लेक्चर घ्यायला बोलावलं होतं.
२००४च्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर लाहोरला काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर राहुल बोलला होता. ज्या पद्धतीने त्याने त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिलं तेव्हाच जाणवलं. राहुलमध्ये एक चांगला शिक्षक दडलाय. त्या शिक्षकाला क्रिकेट नियामक मंडळाने योग्य वर्गाचा वर्गशिक्षक केलं आहे.
हे ‘कुमार’ वयातले खेळाडू. यौवनाच्या अशा टप्प्यावर असतात, जिथे सर्व रस्ते निसरडे असतात.
क्रिकेटमधून येणारा पैसा खुणावत असतो. उंची गाड्या, उंची रहाणीमान डोळा मारत असते. सुंदर मुली फुलपाखराप्रमाणे अवतीभोवती भिरभिरत असतात.
अशा रस्त्यावर न घसरता कसं चालायचं, हे सांगायला राहुल द्रविडसारखा वाटाड्या नाही.
एक जुनी आठवण आहे. विराट कोहली तेव्हा भारतीय संघात रांगत होता. ‘विराट उभा राहिला आम्ही नाही पाहिला’ असं कौतुकाने म्हणायचे ते दिवस होते. त्या वेळी एका बुजुर्ग क्रिकेटपटूशी श्रीलंकेला ‘ताज समुद्र’ हॉटेलात गप्पा मारताना अचानक विराट दिसला. तो क्रिकेटपटू मला म्हणाला,
‘या पोरात महान फलंदाज व्हायची गुणवत्ता आहे.’ पण मैदानाबाहेरच्या एक्स्ट्रॉ करिक्युलर अॅक्टिव्हिटीजमध्ये तो सध्या फार रमतोय.’
पुढे कुणी तरी विराटला घसरत असताना सावरलं. म्हणून आज विराटचं विराटरूप दिसतंय.
मुलांचा संघ ते पुरुषांचा संघ. ही वाटते, तशी एक पायरी नाही. तो कडा आहे. तो कसा चढायचा हे दाखवायला एक तेनसिंग नोर्गे लागतो. द्रविड तो तेनसिंग नक्की आहे.
विविध आकर्षणांच्या उर्वशी-अप्सरेंच्या गर्दीतून, दुसऱ्याला जाणवेल, इतका धक्का न लागता, तो बाहेर पडलाय.
तो खूपच साधा रहातो. बंगलोरला मॅच किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी दोन-तीनदा राहुल द्रविडच्या आई-वडिलांकडे राहिलोय. ते घर एका महान खेळाडूचं आहे. याची साक्ष फक्त त्याचं ट्रॉफीजने भरलेलं कपाट द्यायचं.
एरवी राहुलच्या आईची कलात्मक सजावट सोडली, तर श्रीमंतीचा भपका कुठे दिसलाच नाही. घर सात्त्विक, बोलणं सात्त्विक, जेवणं सात्विक!
राहुलच्या वडलांबरोबर गप्पा मारताना एखादा व्हिस्कीचा प्याला आम्ही भरला की, तेवढ्यापुरती घराची सात्त्विकता भंग व्हायची.
राहुलला एकदा मी स्टेजवरून विचारलं, ‘अजून होंडा सिटीने फिरतोयस, मर्सिडीझ नाही घ्यावीशी वाटली?’
तो पटकन म्हणाला, ‘बंगळुरूमध्ये फिरायला कशाला हवीय मर्सिडीझ? खरं तर रिक्षाच बरी वाटते.’
आज त्याने मर्सिडीझ घेतलीय की नाही, मला ठाऊक नाही. पण आयपीएलचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यावर विमानातून ९२ लाखाची गाडी बुक करणारे आजचे खेळाडू पाहिले की राहुल द्रविड, समाजवादी मुलायमसिंगसमोर समाजवादी मधू लिमये वाटायला लागतो.
या वयात मुलांना कुणीतरी सांगणारा हवा असतो, की बाबांनो, या आकर्षणांच्या सिंड्रेलाच्या मागे जायची गरज नसते. धावा करा, विकेट्स घ्या. सर्व पायाशी येऊन पडतं.’
कुमार वयातल्या मुलांना मैदानावर मार्गदर्शन लागते. नेटमध्ये लागते. आणि बाहेरच्या जगात वावरताना लागते.
त्यासाठी गरज असते, मित्राची, वडील भावाची, आणि वेळप्रसंगी कान उपटणाऱ्या शिक्षकाची.
तिन्ही भूमिका राहुल द्रविड उत्तम पार पाडतोय, असं दिसतंय. त्याचबरोबर जास्त मोठं बक्षीस मिळत असूनही सर्वांना सारखं बक्षीस द्या.’ हे राहुलने बोर्डाला सांगून या मुलांसमोर एक आदर्श ठेवलाय.
यापुढे राहुल द्रविड त्यांच्याबरोबर असेल नसेल. पण त्याने दाखवून दिलेल्या रस्त्यावरून ही मुलं चालली, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या १९ वर्षांखालील संघातली मुलं खेळताना दिसतील.
त्या प्रत्येक खेळाडूच यश हा राहुल द्रविडचा ‘क्राउडेड अवर’ असेल आणि हो अजून पाच वर्षांनी जो राजकीय पक्ष सरकारात असेल, त्याच्या वतीने रवी शास्त्री लोकसभेत असेल. त्या वेळी राहुलने रवीची जागा घ्यायचा, विचार करायला हरकत नाही…
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.