शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा उर्मट उतावळेपणा – प्रत्यक्षदर्शीचा धक्कादायक लेख
===
लेखक : शुभम बानुबाकोडे
===
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे सध्या चांगलेच चर्चेत आहेत त्याला कारण म्हणजे त्यांनी अमरावती येथे एका महाविद्यालयात केलेल वक्तव्य.
विनोद तावडेंच्या बाबतीत बोलायचं झाल्यास ते नेहमीच आपल्या बेताल वक्तव्याने कायम चर्चेत असतात. पण या वेळी जरा अतीच झालं. आता नेमकं झाल काय ते सविस्तर बघू या.
४ जानेवारी रोजी अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात स्व. माणिकराव घवळे स्मृतीप्रित्यर्थ वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले होते. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सकाळी महाविद्यालयात जेव्हा त्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांनी पाहिले बाहेर उभे असलेल्या विद्यार्थ्यांनसोबत सेल्फी ही घेतला.
सभागृहात प्रवेश करताच खुर्चीवरही न बसता अँकरला म्हणतात “चल सरक बाजूला!” आणि माईक घेऊन बोलायला सुरुवात करतात.
एका सार्वजनिक ठिकाणी एका शिक्षणमंत्र्याने अस वागणं शोभतं का? भरगच्च भरलेल्या सभागृहात विद्यार्थ्यांन समोर शिक्षण मंत्रीच असं वागत असतील तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श घ्यावा?
तावडे साहेब, तुम्ही अश्या कुठल्या घाईत होतात की तुम्हाला खुर्चीवर बसायलाही वेळ नव्हता? जनतेच्या कार्यक्रमासाठीच जर जनप्रतिनिधीना वेळ नसेल तर मग ह्यांना निवडून का द्या हा सर्वात मोठा प्रश्न पडतो.
विनोद तावडे एवढ्यावरच थांबले नाही. बोलताना त्यांनी अनेक नं पटणारी वक्तव्यं केली. त्यातला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो – तो म्हणजे आचरेकर सरांच्या अंत्यसंस्काराचा!
नियमानुसार पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा अंत्यसंस्कार हा शासकीय इतमामत करतात. पण ज्या खात्याअंतर्गत हे करतात ते खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
म्हणजेच सरकार ने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला असं म्हणावं लागेल. एवढी मोठी चुक केली असताना विनोद तावडे म्हणतात की
“लोक कश्यावरून ही चर्चा करतात. श्रीदेवी चा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात केला मग आचरेकर सरांचा का नाही केला, हा काही चर्चे चा मुद्दा आहे का ?”
ज्या प्रकारे त्यांनी हे वाक्य म्हटलं ते खरंच नं पटणारं होतं.
मुळात ज्या गोष्टीची सरकारला लाज वाटायला हवी, त्याबद्दल सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माफी मागण्याचं, दिलगिरी व्यक्त करण्याचं सौजन्यही विनोद तावडे यांनी दाखवलं नाही.
त्यानंतर शाल श्रीफळ घेऊन साहेब जायला निघाले तेव्हा माझ्या शेजारी बसलेल्या प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांने जोरात “सर” म्हणून आवाज दिला. तो सभागृतात बसलेल्या सर्वाना ऐकू गेला पण विनोद तावडे यांनी त्याकडे कानाडोळा केला.
पण आपल्या प्रश्नाची उत्तरं नं घेता मंत्र्याला जाऊ देईल ते पत्रकारितेचे विद्यार्थी कसले…?!
प्रशांत ने त्यांना गाडीजवळ गाठले. तिथे त्यांना साधा प्रश्न विचारला –
“गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असतांनाही ते त्यांना घेता येत नाही; यासाठी सरकार काही सोय करेल काय?”
एवढ्या साध्या प्रश्नावर कोणत्याही मंत्र्याने “सरकार यावर विचार करेल…” असं विनम्रपणे उत्तर दिलं असतं. पण विनोद तावडे यांनी
“तुला झेपत नसेल तर शिकू नको!” असं उर्मट उत्तर दिलं.
एका संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीला असं बोलणं शोभत नाही.
शिक्षण मंत्र्याने शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करायला हवं. तेच शिक्षण मंत्री जर “झेपत नसेल तर शिकू नको” असं म्हणत असतील तर ते अशोभनीय आहे.
त्यावेळी या सर्व घटनेचं चित्रीकरण काही विद्यार्थी आपल्या मोबाइलवर करत होते. महाविद्यालयात किंवा बाहेर ठिकाणी कोणताही कार्यक्रम असेल, तर पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना ते assignment म्हणून दिली जातात. त्यावर त्यांना बातमी बनवून सादर करावी लागते.
प्रशांत ज्यावेळी प्रश्न विचारत होता त्यावेळी युवराज दाभाडे प्रात्यक्षिक म्हणून त्या प्रसंगाचं चित्रीकरण करत होता.
प्रशांतने विचारलेल्या प्रश्नावर आपण उलट सुलट उत्तर दिल आहे हे लक्षात येताच त्यांनी मोबाईल बंद करायला सांगितले. पण युवराज ने तसं नं करता “तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्या, मी चित्रीकरण बंद करतो!” असं उत्तर दिलं.
यावर चिडलेल्या तावडेंनी “हा माझी प्रायव्हसी हर्ट करतो आहे. याला अटक करा!” असा आदेशच देऊन टाकला.
त्यानंतर मंत्र्याच्या ताफ्यातील पोलिसांनी युवराजचा मोबाईल हिसकावून त्याला पोलीस व्हॅनमध्ये कोंबले. त्यावर उपस्थित विद्यार्थीनी आक्षेप घेतल्यावर युवराजला सोडले.
पण त्याचा फोन परत केला नाही. मोबाईल परत घेण्यासाठी त्याला बरीच धडपड करावी लागली. जेव्हा त्याला रात्री ८ च्या सुमारास मोबाईल परत देण्यात आला त्यावेळी “मंत्र्याच्या आदेशानुसार मोबाईल मधील सर्व चित्रीकरण डिलीट केलंय” असं सांगण्यात आलं.
कोणत्याही विद्यार्थ्याला फक्त एका मंत्र्याच्या सांगण्यावरून महाविद्यालयाच्या परिसरातुन अटक करणे, त्याचा मोबाईल अश्याप्रकारे जप्त करणे,त्यातील मजकूर डिलीट करणे – हे सर्व कितपत योग्य आहे?
तावडे साहेब मोफत शिक्षणावर प्रश्न विचारल्यावर तुमची प्रायव्हसी हर्ट होते. मग विद्यार्थ्याच्या मोबाईल मधुन विनापरवानगी तुम्ही जेव्हा व्हिडीओ डिलीट करायचे आदेश देता तेव्हा विद्यार्थ्यांनच्या प्रायव्हसीचं काय?
दुःख तर तेव्हा होतं जेव्हा तुम्ही केलेल्या चुकांवर माफी मागायची सोडून “मी असं म्हटल्याचा एक तरी पुरावा द्या!” असा प्रतिप्रश्न करता!
तुमचे पंतप्रधान “भारत हा युवकांचा देश आहे” असं जगभर सांगत असतात. आणि तुम्ही त्याच युवकांना “झेपत नसेल तर शिकू नको!” असं उत्तर देत असाल तर या देशाचा युवक तुम्हाला फक्त मतदानासाठीच आणि सेल्फी काढायसाठीच हवा असतो का असा प्रश्न पडतो.
एकंदरीत तुमची वागणूक बघता, “यालाच सत्तेचा माज म्हणायचं का?” हा प्रश्न पडतोय.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.