कोरेगाव भीमाचे “हिरो” (भाग १) : …आणि अशाप्रकारे “सर्व तयारी” करण्यात आली…!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
कोरेगाव भीमा हे नाव आज महाराष्ट्रभर चिरपरिचित आहे.
दोनशे वर्षांपूर्वी झालेल्या इंग्रज – मराठा युद्धात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचा नेतृत्वातील मराठा सैन्याशी ब्रिटिश सैनिकांचा मुकाबला झाला होता. ह्या युद्धात ब्रिटिश सैन्यात महार लोकांचे एकत्रिकरण करून तयार करण्यात आलेल्या महार रेजिमेंटने सहभाग नोंदवला होता.
महार रेजिमेंट ने दाखवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ ब्रिटिशांनी एक विजयस्तंभ कोरेगाव- भीमा ह्या ठिकाणी उभारला होता.
बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या स्मारकाला भेट देण्यासाठी जात असत.
पुढे जाऊन बाबासाहेबांचे अनुयायी ह्या स्मारकावर जाऊन अगदी शांततेत विजयस्तंभाला वंदन करत आणि महार रेजिमेंटच्या पहिल्या तुकडीतील जवानांना श्रद्धांजली वाहत होते.
सालाबादप्रमाणे हा कार्यक्रम चालू होता. परंतु मागच्या वर्षी १ जानेवारी २०१८ रोजी ह्या स्मारकाला वंदन करायल लोक गेले असता, एक भयंकर वाद उद्भवला. वातावरणाने पेट घेतला व दंगल उसळली.
बघता बघता ह्या घटनेचे पडसाद महाराष्ट्र भर उमटले. जाळपोळ झाली, दंगली झाल्या, प्रशासन व्यवस्थेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
ही दंगल पेटण्यामागची कारणे व सत्यशोधन समितीचा अहवाल आपण इनमराठीवर आधी वाचला असणारच. (वाचला नसल्यास इथे वाचू शकता.)
पुढे जाऊन या प्रकरणात काय कारवाई झाली, ह्या बाबत इनमराठीवर सातत्याने माहिती देण्यात आली आहे.
तर एकूण मागच्या वर्षी उदभवलेल्या ह्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र शासनाने व पोलीस प्रशासनाने ह्या वेळी अत्यंत सावध पावित्रा घेतला होता.
मागच्या वर्षी उदभवलेली परिस्थिती बघता आणि देशभर ढवळून निघालेलं वातावरण बघता, ह्या वर्षी कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासनावर होती. पोलीस प्रशासन प्रचंड सतर्कतेने आणि काटेकोरपणे काम करत होतं.
तब्बल १ महिनाभर आधीपासूनच कोरेगाव भीमाच्या परिसरात प्रशासनाने आपल्या नियोजनात्मक हालचाली सुरू केल्या होत्या. यावेळी प्रशासनासमोर अनेक आव्हानं होते. त्यात महत्वाचं आव्हान होतं ते स्मारकाला भेट द्यायला येणाऱ्या लोकांच्या संख्येचं!
मागच्या वर्षी झालेल्या एकूण घटनाक्रमाने कोरेगाव भीमा येथील स्मारकाची ख्याती देशभर पसरली होती.
त्यामुळे ह्यावर्षी स्मारकाला वंदन करायला मोठ्या प्रमाणावर लोक येणार होते. साधारणत: १० लाख लोकांच्या येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ह्या भागात चोख कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची कठीण जबाबदारी प्रशासनाला पार पाडायची होती.
ह्याबरोबरच प्रशासनावर स्थानिक लोकांचं रक्षण आणि विघातक प्रवृत्तीचा अटकाव करण्याची देखील जबाबदारी होती. पोलीस प्रशासनाने हे काम मोठ्या गांभीर्याने घेतले.
कोरेगाव भीम, वढू बुद्रुक , सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी ही प्रमुख गावे जी मागील वर्षीच्या दंगलीची प्रमुख “हॉट स्पॉट” म्हणजेच केंद्रे होती.
तसेच ह्यांच्या आसपासची गावे जातेगाव, मुखई, करंदी, केंदूर- पाबळ, धमारी, हिवरे, कान्हूर, आपटी, डिंग्रजवाडी, धानोरे ह्या ठिकाणी स्थानिक शिक्रापूर पोलीसांनी महिनाभर आधीपासूनच घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर आणि संशयास्पद कृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.
प्रत्येक गावात गस्त घालणे, गुप्त पाहणी करणे, वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची माहिती जिल्हा प्रशासनापर्यंत पोहचवण्याचे काम अगदी चोख पार पाडले.
महिनाभर आधीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलीस प्रशासनाने सुरुवात केली. ह्या भागात असलेल्या समाज विघातकी लोकांना वेळीच आळा घालायला सुरुवात केली. प्रत्येक संघटना, मंडळ, कार्यकर्ते यांची माहिती पोलिसांनि मिळवली.
महिनाभराच्या काळात ५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. २० जणांवर तडीपारीची कारवाई स्थानिक पोलीस प्रशासनाने केली.
इतकंच नव्हे तर सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर पोलीस यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून होती.
जर कुठला चुकीचा व समाज विघातक संदेश फिरताना दिसला तर त्यावर पोलीस कारवाई करत होते. जे लोक तसले मेसेज फॉरवर्ड करत होते त्यांचावर देखील कारवाईचा बडगा उगरण्यात आला होता.
हे सर्व काम अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रशासन करत होते. शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी अधीक्षक डॉ संदीप पाटील आणि कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, अतिरिक पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले यांच्याशी कायम संपर्क ठेवत होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक मुयर वैरागकर यांच्या समन्वयातून स्थानिक फौजदार, पाच पोलीस अधिकारी आणि शिपाई अशी ५२ जणांची टीम घेऊन महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या स्तरावर काम करण्यास सुरुवात केली होती.
हा कार्यक्रम कसा पार पडणार, कुठे कसा बंदोबस्त असणार, किती अतिरिक्त कुमुक लागणार, दंगा नियंत्रण पथक कश्याप्रकारे काम करणार याची चोख व्यवस्था प्रशासनाने २७ डिसेंबर पर्यंत लावून ठेवली होती.
सोबतच स्थानिक पत्रकार, नेते, नागरिक यांच्याशी रोजचा संपर्क ठेवला होता. कुठलाही “की पॉईंट” मिस होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली होती.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या सर्व गोष्टींचा आढावा वेळोवेळी प्रशासनाकडून घेत होते.
अश्याप्रकारे २७ डिसेंम्बर पर्यंत महिनाभरात प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. अगदी चिमणी उडाली तरी आपल्याला त्याची खबर कळेल अशी चोख व्यवस्था केलेली. परंतु ह्या सर्व व्यवस्थेची कसोटी ही २८ डिसेंबर ते १ जानेवारी ह्या काळात लागणार होती.
तो काळ सत्व परीक्षेचा ठरणार होता.
पुढील चार दिवसांत पोलिसांनी केलेलं नियोजन आणि कोरेगाव भीमा येथील कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी घेतलेली मेहनग याबद्दल आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.