' कोयना धरणाच्या इंजिनिअर्सनी, प्रतिकूल परिस्थितीत केलेलं हे नेत्रदीपक काम खूप अभिमानास्पद आहे… – InMarathi

कोयना धरणाच्या इंजिनिअर्सनी, प्रतिकूल परिस्थितीत केलेलं हे नेत्रदीपक काम खूप अभिमानास्पद आहे…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखक : आनंद बावणे

===

महाराष्ट्रातील कोयना धरणास सेंट्रल बोर्ड ऑफ इरिगेशन अँड पॉवर (सीबीआयपी), नवी दिल्ली या केंद्र शासनाच्या सर्वोच्च यंत्रणेने ‘उत्कृष्ट देखभाल बक्षीस’ अर्थात ‘दि बेस्ट मेंटेनन्स अवॉर्ड’ जाहीर केला व कोयनेच्या व्यवस्थापनाला हस्तांतर देखील केला.

यासाठी कोयना धरणावर कार्यरत सर्व अभियंते व त्यांना मदत करणारे कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत!

धरणाच्या व्यवस्थापणासाठीचा हा उत्कृष्ट पुरस्कार खरे म्हणजे खूप आधी मिळावयास हवा होता.

परंतु ‘देर आये मगर दुरुस्त आये’ या न्यायाने हा पुरस्कार योग्य आणि बहुमूल्य आहे! या धरणातील पाण्याचे व्यवस्थापन हा गुंतागुंतीचा विषय आहे. कारण एकाच वेळी…

१) सरासरी ६५० मी. उंचीवरील पाणी वीजनिर्मितीसाठी कोकणात २०० मी. ते २० मी. पर्यंत दररोज द्यायचे असते.

२) त्याचवेळी सातारा, सांगली जिल्ह्यासाठी शेतीला पाणी सोडण्याची मागणी असते .

३) वीजनिर्मितीसाठीच्या राखीव पाण्याला हात न लावता ही कसरत करायची असते. यासाठी नेत्यांचे दडपण प्रचंड असते .

४) खरी कसोटी पावसाळ्यात असते. कारण धरणाचे पावसाचे जलक्षेत्र (कॅचमेंट) धरणापासून महाबळेश्वर पर्यंत म्हणजे ८० किमी लांब पसरलेले आहे.

 

reservoir-inmarathi
theindianexpress.com

 

या क्षेत्रात पावसाळ्यात पडणारा पाऊस, धरणात पावसाच्या तीव्रतेनुसार जमा होणारे पाणी, या पाण्याला धरणाच्या भिंतीपर्यंत येण्यासाठीचा कालावधी, वीजेसाठी सोडवायचे पाणी आणि धरण पूर्ण भरण्यासाठी करावयाची मॅनेजमेंट हा एक पूर्ण अभ्यासाचा व चोवीस तास पाऊस आणि पाण्यावरील निगराणीचा किचकट विषय आहे.

५) धरण पूर्ण भरल्यानंतरची नदीमध्ये द्वारे उघडी करून पाणी सोडणे, ते सोडतेवेळी नदीकाठच्या सजीव व निर्जीव मालमत्तेची काळजी घेणे, याचवेळी कृष्णा नदीमधीन तिच्या धोम, कण्हेर किंवा वारणा धरणातून येणारा विसर्ग तपासणे आणि कर्नाटकच्या हिस्स्याचे पाणी कर्नाटकला मिळतेय हे पाहणे हाही या व्यवस्थापनाचा भाग आहे.

दिवसाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम केले तरच हे शक्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

६) सर्वात महत्वाचे म्हणजे इथली भूकंपाची वारंवारता ! छोटे-मोठे ३ रिस्चर स्केलपर्यंतचे भूकंप इथे नित्याची बाब आहे.

धरणातील पाणी वाढेल तसे भूकंपाच्या तीव्रतेमध्ये जरी वाढ होत नसली तरी सर्वसामान्य जनता मनात भीती बाळगून जीवन जगते.

‘ऑल इज वेल’ हा संदेश देणे ही या व्यवस्थापनातील प्रशासनाची एक मोठी जबाबदारी आहे.

या सर्व किचकट पार्श्वभूमीवर हा अवॉर्ड घोषित झालेला आहे . म्हणून त्याचे महत्व इथे काम केलेल्या व करीत असलेल्या सर्वांसाठी खूप मोलाचे आहे.

 

koyna-inmarathi
dnaindia.com

 

मुळात ही देखभालीची पद्धत मागील साठ वर्षांपासून कार्यरत आहे.

१९६७ च्या भूकंपानंतर त्यामध्ये आणखी काटेकोरपणा (प्रिसीजन) आला व धरणातील पाण्याच्या नियोजनामध्ये, पडणाऱ्या पावसाच्या वारंवारितेतील मोजमापामध्ये, इन्फ्लो (आवक) मध्ये अचूक मोजमापाची पद्धत अंगिकारण्यात आली.

यावर्षी मिळालेले अवार्ड हे वरील अनेक वर्षांच्या खडतर कामाचे बक्षीस आहे असे म्हटले तर चुकीचे नव्हे.

या अवार्डच्या पार्श्वभूमीवर कांही महत्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधणे चुकीचे होणार नाही.

१) आता धरणाने पन्नाशी ओलांडली आहे. २००० मेगॅवॅट हायडल विजनिर्मितीची यंत्रणा इथल्या पाणीसाठ्यासाठी कार्यरत आहे. या धरणाचे जरी मजबुतीकरण झालेले असले तरी १०५ टीएमसी पाणी म्हणजे भूकंपप्रवण क्षेत्रात एक निद्रिस्त राक्षस होय.

या पाण्याचे धरणातच कसे विभाजन करता येईल व त्यासाठी धरणाच्या वरच्या बाजूस पाण्यामध्ये आठ ते दहा किमी अंतरावर एक रोलर कॅम्पाक्टेड सबमर्जड काँक्रीट डॅम बांधता येईल.

आताच्या धरणाच्या भिंतीवरील प्रेशर कमी कसे करता येईल याचा प्रशासनाने गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे असे सुचवावेसे वाटतेय.

 

koyna-dam-inmarathi
esakal.com

 

२) असे सबमर्ज धरण बांधल्यास जलाशयाचे दोन भाग होतील.

पहिला भाग मुख्य धरण ते सबमर्जड धरण (१० ते १५ टीएमसी) व दुसरा भाग साठ ते सत्तर किमी लांबीचा सबमर्ज धरणाचा जलाशय (८५ ते ९० टीएमसी) ज्यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीमागील पाण्याचा संचय व दबाव कमी असेल.

त्यामुळे पाटण तालुक्यातील धरणाच्या खालील बाजूची पाटण, नवा रस्ता, मल्हारपेठ, कराड ही शहरे व इतर सर्व खेडी सुरक्षित होतील व धरणफुटीची शक्यता अंधुक होईल.

३) महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात घाटघर प्रकल्पावर वरचे व खालचे अशी दोन धरणे रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट पद्धतीने बांधलेली आहेत.

त्यामुळे अशा धरणाच्या बांधकामाचा अनुभव जलसंपदा विभागाच्या प्रशासन यंत्रणेला आहे. कोयना हे भूकंपप्रवण क्षेत्र असल्याने ही पद्धत भूकंपाच्या धक्क्यांना सहन करण्यास सक्षम असू शकते.

४) सन १९५४ च्या दरम्यान आताच्या धरणाच्या वरील बाजूस आठ ते दहा किमी अंतरावर धरणाच्या अल्टरनेटिव्ह साईट साठी जिओलॉजीकल इन्वेस्टीगेशन झालेली आहेत. त्यामुळे इन्वेस्टीगेशनच खर्च वाचू शकतो.

 

dam-inmarathi
loksatta.com

 

५) आताच्या धरणाच्या महत्तम जल पातळीच्या वर अंदाजे पाच ( किंवा पंधरा ) मीटर पर्यंत भूसंपादन झालेले आहे. त्यामुळे भूसंपादन व पुनर्वसन खर्च नगण्य आहे.

६) कॉलनी व कार्यालयांच्या इमारती कोयनेत बांधलेल्या आहेत. हाही खर्च नगण्य आहे.

७) जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यालयांना कामे नगण्य आहेत. पगाराचा खर्च अतिरिक्त होतोय. या पगाराच्या परताव्याची शक्यता या प्रकल्पाने वाढणार आहे.

८) अर्थात असा निर्णय घेताना तज्ज्ञांनी सर्व बाजूनी विचार करून धरणाच्या खालील असंख्य गावांतील नागरिकांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे. कारण मुख्य धरणाच्या भिंतीला पंचावन्न वर्षे पूर्ण झालेली आहेत.

दररोजच्या मायक्रो व मेजर भूकंपाच्या थरथरण्यामुळे धरणाच्या मुख्य भिंतीचे आयुष्य त्या प्रमाणात कमी कमी होत जात आहे.

९) धरणतज्ञ व डिझ्यास्टर मॅनेजमेंट तज्ञ व आताचे धरणाचे व्यवस्थापन तज्ञ इकडे लक्ष देतील अशी अपेक्षा धरणाच्या पुररेषेतील व डिझ्यास्टर रेषेतील राहिवास्यानी धरावी का ?

सीबीआयपी चे ‘बेस्ट मेंटेनन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?