Site icon InMarathi

आता वायफाय पेक्षा १०० पट जलद इंटरनेट! तेही एका भारतीय उद्योजकाच्या शक्कलमुळे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आपल्याकडे पहिल्यांदा आल्यानंतरचे दिवस आठवा ! एक फाईल डाउनलोड करण्यासाठी खूप वेळ थांबावं लागायचं! एखादा व्हिडीओ बघायचा झाला तर बफरिंग मध्येच कितीतरी वेळ जायचा. तरीही पेशन्स ठेवून आपण ते बफरिंग सुद्धा शांतपणे सहन करत असू. नंतर टू जी आलं आणि इंटरनेटचा स्पीड वाढला, मग थ्री जी आणि फोर जी आलं!

घराघरात हाय स्पीड इंटरनेट देणारं वाय फाय आलं. त्यामुळे आता जर का वाय फायचा स्पीड थोड्या वेळासाठी सुद्धा कमी झाला आणि फाईल शून्य मिनिटात डाउनलोड झाली नाही किंवा व्हिडीओ लोड झाला नाही तर आपली लगेच चिडचिड होते.

म्हणूनच जास्तीत जास्त फास्ट स्पीडचे इंटरनेट ऑप्शन आपण शोधत असतो. आता तर वाय फाय पेक्षाही १०० पट जलद स्पीडचे वाय फाय एका भारतीय स्टार्ट अप कंपनीने आणले आहे.

दीपक सोळंकी हे वेलमेन्नी रिसर्च अँड डेव्हलमेंट प्रायव्हेट लिमिटेड ह्या स्टार्ट अप कंपनीचे सह-संस्थापक आहेत आणि आजच्या दिवसेंदिवस प्रगत होत जाणाऱ्या लाईट फिडिलिटी तंत्रज्ञानाचे भारतातील पायोनियर आहेत.

 

youtube.com

लाईट फिडिलिटी तंत्रज्ञान म्हणजेच लाय-फाय होय. लाय फाय म्हणजे आजचे अत्याधुनिक वायरलेस तंत्रज्ञान होय. ह्या तंत्रज्ञानांद्वारे वीजेवरची उपकरणे उदाहरणार्थ एलईडी बल्ब ह्यांच्यात डेटा वायरलेस ट्रान्फसर होऊ शकतो.

असे मानले जाते की लाय फाय तंत्रज्ञान हे सामान्य वाय फाय पेक्षा १०० पट जास्त इंटरनेटचा स्पीड देऊ शकते. सोळंकी ह्यांचे असे म्हणणे आहे की लाय फाय हे १० गिगाबाईट्स पर सेकंड्स इतका स्पीड देऊ शकते.

डायल अप, ब्रॉडबँड नंतर आता वाय फाय असे दिवसेंदिवस तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होत आहे.

माहितीचा प्रचंड स्रोत आता निर्माण झाला आहे आणि तो क्षणात एका क्लिकवर ऑनलाईन बघणे आता शक्य झाले आहे. तंत्रज्ञान असे विकसित होत आले आहे. सिस्कोच्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की,

“२०२१ पर्यंत संपूर्ण आयपी ट्रॅफिकपैकी ६३% ट्रॅफिक हे वायरलेस आणि मोबाईल डिव्हायसेसचेच असेल.”

भविष्यात आपल्यापैकी प्रत्येकाकडची उपकरणे इंटरनेटला जोडलेली असतील. गाड्या रस्त्यावरच्या ट्रॅफिकची स्थितीची माहिती पाठवतील तर शेतामधील सेन्सर्स मातीच्या दर्जाविषयी सांगतील. माणसाच्या आयुष्यावरील इंटरनेटचा प्रभाव हा असा दिवसेंदिवस वाढतच राहील.

 

hindi.satiitv.com

परंतु हे इतके महाप्रचंड ट्रॅफिक हाताळण्याइतके आजचे वाय फाय तंत्रज्ञान सक्षम आहे का? थोडक्यात सांगायचे झाले तर ह्या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे आहे. आजचे वाय फाय रेडियो लहरींचा उपयोग करून वायरलेस डेटा ट्रान्सफर करण्याचे काम करतात. दिवसेंदिवस लॅपटॉप, स्मार्ट फोन्स, विविध प्रकारचे सेन्सर्स अश्या वायरलेस उपकरणांची संख्या वाढतेच आहे.

परंतु हे सगळे हाताळण्यासाठी जे स्पेक्ट्रम आज उपलब्ध आहे ते अतिशय थोडे आहे. तसेच इंटरनेटची सुरक्षितता हा सध्याचा मोठा व चिंतेचा विषय आहे.

तसेच मर्यादित बॅण्डविड्थ हा ह्याहीपेक्षा मोठा प्रश्न आज उभा राहिला आहे. म्हणूनच कम्युनिकेशनचे दुसरे सक्षम माध्यम निर्माण करणे ही आज काळाची गरज आहे. हीच गरज दीपक सोळंकी ह्यांनी ओळखून हा उपक्रम तयार केला.

सत्तावीस वर्षीय दीपक सोळंकी ह्यांचा जन्म हरियाणातील जिंद ह्या गावी झाला. त्यांचे वडील सरकारी शाळेत शिक्षक होते तर आई गृहिणी होती. त्यांना लहानपणापासूनच विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड होती. त्यांना रोबोटिक्समध्ये खूप रस होता.

जिंद येथे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पंजाब येथील जालंधर मधल्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मधून इंजिनीयरींग केले.

त्यानंतर त्यांनी आयआयटी हैद्राबाद येथे रोबोटिक्स रिसर्च लॅब मध्ये इंटर्नशिप केली. त्यामुळे त्यांचा रोबोटिक्स मधील रस आणखी वाढला. त्यांनी तेथे रिसर्च इंटर्न म्हणून काम केले. ते म्हणतात की, “ह्या इंटर्नशिपमुळे मला सायंटिफिक रिसर्च ह्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.”

 

hansindia.com

त्यांनी नंतर २०११ साली आयआयटी बॉम्बेच्या रोबोटिक्स स्टार्ट अपमध्ये काम केले. मार्च २०१२ ला ते दिल्लीला गेले. सप्टेंबर २०१२ पर्यंत त्यांनी वेलमेन्नी रिसर्च डेव्हलपमेंट ह्या त्यांच्या एकमात्र-मालकी व्यवसायाची कायदेशीर नोंदणी केली होती. त्यांच्या कंपनीबद्दल बोलताना सोळंकी म्हणतात की,

“मला हे कळले होते की एखादे प्रॉडक्ट तयार करायचे असेल तर त्याला भरपूर वेळ लागतो. म्हणून मला माझे स्वतःचे काहीतरी सुरु करायचे होते. मला खरे खुरे प्रॉडक्ट्स तयार करायचे होते.

मला वायरलेस कम्युनिकेशनमध्ये खूप रस होता. मी रेडिओ फ्रिक्वेन्सीज वर काम केले आहे आणि मी HAM ऑपरेटर सुद्धा आहे. माझ्याकडे रेडिओ लायसन्स सुद्धा आहे. म्हणूनच माझी कंपनी सुरु केल्यानंतर माझा पहिला इंटरेस्ट वायरलेस तंत्रज्ञान हा होता. ह्यावर काम करता करता माझी लाय फाय किंवा व्हिजिबल लाईट कम्युनिकेश ह्या तंत्रज्ञानाशी ओळख झाली आणि मी ह्या तंत्रज्ञानाकडे आकर्षित झालो. ”

आपल्या देशात प्रचंड प्रमाणात इंजिनियर्स असून आणि आपल्या देशाला तंत्रज्ञानाचे वावडे नसून देखील सोळंकी ह्यांना लाय फाय तंत्रज्ञानात रस असलेले फार कुणी मिळाले नाही.

सगळ्यांना फक्त आकर्षक वाटणाऱ्या इ कॉमर्स बूम मध्येच रस होता. त्यांना अनेक इन्व्हेस्टर्सने सल्ला दिला की त्यांनी सुद्धा इ कॉमर्सच्याच क्षेत्रात उतरावे.

 

loksatta.com

त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना दीपक सोळंकी सांगतात की, “वेलमेन्नीची पहिली दोन वर्षे अत्यंत खडतर गेली. निधी जमवणे अत्यंत कठीण होते.” कंपनी चालवण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रॉनिक कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम केले.

त्यानंतर त्याच्या स्टार्ट अपला इस्टोनियाच्या थ्री मंथ बिल्डइट हार्डवेअर ऍक्सेलरेटर प्रोग्राममध्ये मान्यता मिळाली.

त्यांनी सोळंकींच्या कंपनीसाठी थोडा निधी मंजूर कला आणि तिथे दुकान सुरु करण्याची विनंती केली. ऑक्टोबर २०१४ मध्ये ते इस्टोनिया ह्या पूर्व युरोपियन देशातील Tartu ह्या लहानश्या शहरात स्थायिक झाले.

इस्टोनिया हा देश डिजिटल तंत्रज्ञानातील ग्लोबल लीडर मानला जातो. ह्या देशात व्यवसायाभिमुख वातावरण आहे.

२०१५ पर्यंत वेलमेन्नी कंपनीने लायटिंगच्या क्षेत्रात असलेल्या एका एस्टोनियन उद्योजकांशी व्यवहार केला. त्यांच्या एलईडी लाईट्स मध्ये लाय फाय तंत्रज्ञान इंटिग्रेट करण्याविषयी हा व्यवहार होता. सोळंकी सांगत की त्यांनी अशी एक सिस्टीम तयार केली जी प्रयोगशाळेबाहेर सुद्धा चालू शकेल.

त्यांनंतर त्यांनी जगातील सर्वात मोठ्या स्टार्ट अप इव्हेंट पैकी एक असणाऱ्या स्लश ह्या हेलसिंकी, फिनलंड मध्ये होणाऱ्या इव्हेंट मध्ये भाग घेण्याचे ठरवले.

ह्या इव्हेन्टमध्ये मोठं मोठ्या कंपन्या भाग घेतात व स्टार्ट अप बरोबर भागीदारी करतात किंवा स्टार अप्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. त्यांनी नोव्हेम्बर २०१५ मध्ये जरी ही स्पर्धा जिंकली नसली तरीही त्यांचे प्रेझेंटेशन एयरबस ह्या एव्हिएशन क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीच्या टीमला खूप आवडले. आणि सोळंकी ह्यांच्या कंपनीला एयरबसचे जर्मनीतून निमंत्रण आले.

 

wikimedia.com

हा सहा महिन्यांचा प्रोग्रॅम होता. २०१६ जानेवारी मध्ये सुरु झालेल्या ह्या प्रोजेक्ट साठी फक्त ५ स्टार्ट अप निवडण्यात आल्या होत्या त्यापैकी एक सोळंकींची वेलमेन्नी कंपनी होती. ह्या कामामुळे सोळंकींच्या कंपनीच्या कामाला दिशा मिळाली.

त्यांनी लाय फाय वापरून वायरलेस इन फ्लाईट एंटरटेनमेंट सिस्टीम तयार केली. आणि त्याचे प्रेझेंटेशन जुलै २०१६ मध्ये डेमो डे च्या दिवशी केले.

त्यांनी ह्या सिस्टीमचे टेस्टिंग केले आणि तो त्यांच्या टीमसाठी एक मोठा अनुभव होता. त्यांना त्यातून खूप काही शिकायला मिळाले असे सोळंकी सांगतात.

एयरबस कडून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या लाय फाय व्हेंचरसाठी अनेक इन्व्हेस्टमेंट येऊ लागल्या. सहा महिन्यांचा प्रोग्रॅम जुलै २०१६ रोजी पूर्ण झाल्यानंतर सोळंकी परत भारतात आले आणि त्यांनी दिल्ली मध्ये एक रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रयोगशाळा सुरु केली.

सोळंकी ह्यांच्यापासून सुरु झालेल्या ह्या स्टार्ट अप मध्ये आज १८ लोक काम करतात.

लाय फाय कसे काम करते?

लाय फाय साठी लाय फाय ऍक्सेस पॉईंट आणि लाय फाय डॉंगल! ह्या दोन हार्डवेअर उपकरणांची गरज असते. ह्या उपकरणांद्वारे लाय फाय नेटवर्क घरात व घराबाहेर सुद्धा सेट करता येते. लाय फाय ऍक्सेस पॉईंट हा आपल्या वायफायच्या राउटर प्रमाणेच असतो. लाय फाय ऍक्सेस पॉईंट हा लाईट सोर्सशी म्हणजेच एलईडीशी जोडला जातो.

 

 

india.com

एलईडी आणि एलईडी ड्रायव्हर यांच्या मध्ये राउटर बसवला जातो आणि यूएसबी डॉंगल लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा स्मार्ट डिव्हायसेसला कनेक्ट करता येते. हे नेटवर्क आयएसपी प्रोव्हायडरच्या इथरनेट केबलद्वारे डेटा घेतं आणि नंतर ते लाईट सोर्सला विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर मॉड्युलेट करतं.

लायफाय डाँगलमध्ये एक फोटो डिटेक्टर बसवलेला असतो जो लाईट सिग्नलचे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये करतो. व नंतर तो डेटा लॅपटॉपला यूएसबी किंवा इथरनेट द्वारे ट्रान्सफर करतो. असे घरात किंवा बिल्डिंगमध्ये लाय फाय चालते.

बाहेरच्यासाठी वेलमेन्नीने वेगळी उपकरणे तयार केली आहेत. ह्यासाठी ऑप्टिकल केबल लागत नाहीत. जर आपल्याला दोन जागांमध्ये कनेक्टिव्हिटी हवी असेल तर अ उपकरण एका पॉइंटला आणि ब उपकरण दुसऱ्या पॉइंटला ठेवून ह्या दोन्ही उपकरणांमध्ये लाईटच्या माध्यमाने डेटा ट्रान्सफर होऊ शकतो.

ही उपकरणे रस्त्यावरचे दिवे, खांब आणि लाईट सोर्स असलेल्या कशातही बसवू शकतो. वायफाय साठी सगळीकडे केबलचे नेटवर्क असावे लागते. पण लायफाय साठी आधीपासूनच उपलब्ध असलेले लाईट बेस्ड इन्फ्रास्ट्रक्चर वापरता येते.

गेल्या तीन वर्षांपासून लायफाय मध्ये अनेक संशोधन झाले. हे तंत्रज्ञान विकसित होत गेले आणि देशाच्या फाईव्ह जी च्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ह्या तंत्रज्ञानाचा मोठा सहभाग आहे. आता सध्या ह्यात एकच मोठी समस्या आहे ती म्हणजे कमी प्रकाश असेल तर हाय स्पीड इंटरनेट कसे चालवायचे?

सध्या ह्यावरही मोठे संशोधन सुरु आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठो अतिशय हाय सेन्सिटिव्ह रिसिव्हर्स तयार करण्याचे काम सुरु आहे असे सोळंकी ह्यांनी सांगितले.

 

whsgoldenarrow.com

ह्यात येणारी दुसरी समस्या म्हणजे खर्च! हे तंत्रज्ञान सगळीकडे उपलब्ध नाही आणि लाय फाय चालणारी उपकरणे तेवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत आणि हे तंत्रज्ञान वाय फाय पेक्षा महाग आहे.

जेव्हा मोठ्या प्रमाणावर हे तंत्रज्ञान वापरले जाईल तेव्हा ह्याची व वायफायची किंमत सारखीच असेल.

जिथे वायफाय उपलब्ध नाही किंवा वापरण्याची परवानगी नाही किंवा चालणार नाही अश्या ठिकाणी म्हणजेच एव्हिएशन, आरोग्य सुविधा आणि अंतर्गत भागात लाय फाय वापरता येऊ शकते. केबलशिवाय उडत्या विमानात कॉकपिट मध्ये बसूनही लाय फाय वापरता येऊ शकते.

लाय फाय चा मोठा फायदा हा आहे की ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक सेन्सिटिव्ह भागांत सुद्धा वापरता येऊ शकते.

वाय फाय हॅक करता येऊ शकते त्यामुळे ते फारसे सुरक्षित नाही. पण लाय फाय संपूर्णपणे सुरक्षित आहे असे सोळंकी सांगतात. लाय फाय हे भविष्यातील तंत्रज्ञान आहे आणि भारतात ही तंत्रज्ञान क्रांती घडवून आणण्यासाठी वेलमेन्नी आघाडीवर आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version