“मोदींना फोटो काढायची हौस फार!” : ह्या मागचं सत्य जाणून घ्यायचंय? वाचा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक आरोपांची आगपाखड सतत करत असतात. त्यापैकी काही आरोपांत तथ्य असते तर काही विरोध करण्याच्या एकाच उद्देशाने केलेले असतात.
त्यापैकी एक नेहमी होणारा आरोप म्हणजे मोदींना पब्लिसिटी म्हणून कुठेही गेल्यावर भरपूर फोटो काढायचे असतात.
त्यांचे लक्ष सतत कॅमेराकडे असते. संधी मिळेल तिथे फोटो काढून तो लगेच सोशल मिडीयावर अपलोड करत पब्लिसिटी करणे मोदींचे नेहमीचे काम आहे असे विरोधक म्हणतात.
मोदींवर सतत होणार्या या आरोपामागे काय तथ्य आहे हे सांगणारा लेख सुचिकांत वनारसे यांनी लिहिला आहे. तो इनमराठीच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.
===
मोदींवर गेली ४ वर्षे नेहमी होणारा आरोप –
“या माणसाला नुसते फोटो काढायला लागतात, नुसती पब्लिसिटी पाहिजे !!!”
याचं नुकतंच प्रत्यंतर अंदमान कारागृहाच्या भेटीच्यावेळी पुन्हा एकदा आलं.
आता थोड्या फॅक्टस जाणून घेऊ!
केंद्र सरकारचे अनेक विभाग असतात तसाच छायाचित्रण विभागदेखील असतो (Photodivision). मोदी पंतप्रधान झाल्यावर या विभागाने कात टाकली. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्याअंतर्गत छायाचित्रण विभाग कार्य करतो.
एनडीए सरकार आल्यापासून या विभागाचं काम मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.
चांगले फोटो, छायाचित्रे काढली जावीत यासाठी प्रत्येक त्रैमासिकात सरकारी छायाचित्रकारांची प्रशिक्षणे घेण्याची सरकारची योजना होती, असं २०१५ च्या इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीत म्हटलं आहे.
एकूण ४० छायाचित्रकार असलेल्या विभागात एनडीए सरकार आल्यावर काम वाढल्याने अजून कर्मचारी रुजू करून घेण्याची चर्चा सुरू असल्याचेदेखील या बातमीत आपल्याला दिसून येईल.
बिमल जुलका म्हणतात – छायाचित्र विभागामार्फत अधिक चांगले फोटो काढले जावेत, कामाचा दर्जा सुधारावा यासाठी अजून कशा सुधारणा करता येतील हा विचार मोदींचाच होता.
आम्ही छायाचित्र विभाग अद्ययावत करतो आहोत जेणेकरून छायाचित्रकारांना नवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करण्याची संधी मिळेल.
या अपग्रेडेशन प्रक्रियेत २ प्रशिक्षित छायाचित्रकार पंतप्रधानांसोबत दिले गेले तर बाकी छायाचित्रकारांना इतर मंत्री, कार्यक्रम इतकंच नाही तर प्रेक्षकांचे, श्रोत्यांचे हावभाव टिपण्यासाठी नेमले गेले.
युपीएच्या काळात ही प्रक्रिया अतिशय साधी होती. फोटो काढा आणि फाईल करा! पण आता तसे नाही.
फोटो काढा पीएम ऑफिसला पाठवा आणि तिथे मंजुरी मिळाली की लगेच अपलोड करा. अगोदर फक्त २ फोटोत काम भागायचं आता २० फोटो द्यावे लागतात.
केंद्र सरकारने प्रथमच आपल्या सर्व छायाचित्रकारांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केला. प्रसिद्ध छायाचित्रकार राजेश बेदी आणि संतोष सिवन यांनी ट्रेनिंग सेशन घेतला होता.
तिथे राजेश बेदींनी सरकारी छायाचित्रकारांना छायाचित्रणाचं पॅशन डेव्हलप करण्याचा संदेश दिला.
इतकंच नाही तर छायाचित्रण विभाग पूर्वीचे जुने फोटोदेखील डिजिटल स्वरूपात आणून त्याची ऑनलाईन अर्काईव लायब्ररी बनवण्याच्या प्रयत्नात आहे असं देखील जुलका यांनी नमूद केलं होतं.
आज सोशल मीडिया, विविध संकेतस्थळे यांमार्फत आपण जगभरातील लोकांशी, देशांशी, उद्योजकांशी, कंपन्यांशी जोडलेलो आहोत.
त्यांच्यासमोर देशाची प्रतिमा जाताना अधिक प्रभावीपणे जाण्यासाठी खरोखरच छायाचित्रण विभाग अपग्रेड होणे गरजेचेच होते. तुम्ही इंटरव्यु देताना विस्कटलेले केस, इस्त्री न केलेले कपडे, आंघोळ न करता जाता का? काय फरक पडतो?
पण चांगले टापटीपीत राहता, आयकार्डसाठी फोटो काढताना आवरून जाता हे काय असतं? हे एक प्रकारचं ब्रँडिंगच आहे. अगदी आमचेदेखील ब्रँडिंगवर मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनातून वेगळे सेशन्स घेतले जातात.
शिवाय एखाद्या विभागाचे अपग्रेडेशन झाले नाही, तर काय तोटे होऊ शकतात हे वेगळं सांगायला नको.
कोणत्या गोष्टींचा किती बाऊ करायचा, किती विरोध करायचा, टीका करायच्या त्याला काही मर्यादा असतात.
एकजणतर म्हणाला अंदमानच्या जेलला भेट देताना मोदी शेकडो छायाचित्रकार सोबत घेऊन गेले…पण मोदींच्यासोबत कारागृहामध्ये इन मिन दोन छायाचित्रकार होते.
लक्षात घ्या, हे छायाचित्रकार मोदींना चित्रित करत नसून देशाच्या पंतप्रधानांना चित्रित करत आहेत.
===
हे आहे मोदींनी सतत फोटो कोन्शियस असण्यामागचे कारण. माहिती प्रसारण विभागाच्या अंतर्गत काम करणारा केंद्र सरकारचा छायाचित्रण विभाग स्वतःचं काम करतो आहे.
मोदींच्या जागी आणखी कुणी पंतप्रधान असतील तरी या विभागाने हेच काम करणे अपेक्षित आहे.
आता त्या जागी मोदी आहेत म्हणून आगपाखड करायची की छायाचित्रण विभाग चोख काम करतो त्याची दाखल घ्यायची हा ज्याचा त्याच प्रश्न. तो निर्णय आपल्या वैचारिक, राजकीय बांधिलकीवरून प्रत्येकाने घ्यायचा असतो.
पण या टीकेच्या निमित्ताने का होईना, केंद्र सरकारच्या छायाचित्रण विभागाचे काम लोकांसमोर येते आहे, हे ही नसे थोडके!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.