Site icon InMarathi

भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने नवीन वर्षाचे हे ७ संकल्प केले तर भारताचं चित्र वेगळं असेल!

Indian-flag-inmarathi

freepressjournal.in

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

दर वर्षी डिसेम्बर महिना आला की प्रत्येकाला नव्या वर्षाचे वेध लागतात.

सरत्या वर्षाला धुमधडाक्यात निरोप देऊन नव्या वर्षाचे जंगी स्वागत करण्याचे, लक्षात राहील अशी पार्टी करण्याचे प्रत्येकाचे प्लॅनिंग सुरु होते.

 

TravelTriangle.com

नव्या वर्षात प्रवेश करताना जुने नको असलेले सगळे मागे टाकून नव्याने सुरुवात करण्याचा अनेक लोक विचार करतात.

पावसाळ्यात ज्याप्रमाणे ठिकठिकाणी कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्याप्रमाणे नव्या वर्षात प्रवेश करताना बहुतांश लोक काही ना काही संकल्प करतात.

नव्या वर्षात मी हे करेन, ते करणार नाही, व्यायाम करेन, डाएटवर नियंत्रण ठेवेन, रागावर नियंत्रण मिळवेन, रोज नेमाने अभ्यास करेन, उठसूट ऑनलाईन शॉपिंग करणार नाही असे संकल्प दर वर्षी होतात.

अनेकांचे नव्याचे नऊ दिवस संकल्प जोमात चालल्यानंतर दहाव्या दिवशी ढेपाळतात आणि कुठेतरी माळ्यावर जाऊन बसतात.

संकल्प करतानाच असे करावे की जे पूर्ण करणे आपल्याला शक्य होईल. त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल.

नवे वर्ष आपल्या मनात नवा उत्साह, नवी अशा घेऊन येतो.

 

theodysseyonline.com

अशा वेळी आपण आपल्यासाठी काही संकल्प करतानाच देशासाठी सुद्धा काही संकल्प केला तर येणाऱ्या काळात भारताचे नवे चित्र आपल्याला दिसेल.

आपल्याला अभिमान वाटावा अश्या अनेक गोष्टींचा वारसा आपल्याला लाभला आहे. मानव संसाधनाच्या दृष्टीने तरुण असलेल्या आपल्या देशाला महासत्ता होण्याच्या दृष्टीने अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.

त्यासाठी आपण म्हणजे भारताच्या सामान्य नागरिकांनी काही संकल्प घेऊन ते तडीस न्यायला हवेत.

१. मी मतदान करेन

आज सोशल मीडियाच्या व डिजिटल मीडियाच्या उदयामुळे मतदानाच्या कर्तव्याबाबत आजचे तरुण बरेच जागरूक झाले आहेत.

मतदान न करता केवळ राजकारण व नेत्यांना नावे ठेवणे सोपे आहे. मतदान न करणे म्हणजे चुकीचा माणूस सत्तेवर आणून बसवणे होय.

लोकशाहीचा अधिकार मागताना आपण मतदानाचे कर्तव्य बजावणे अत्यंत आवश्यक आहे. मतदानाचा दिवस म्हणजे हक्काची सुटी नसून एक महत्वाचा दिवस आहे.

आपल्या देशाची प्रगती मतदार म्हणून आपल्याच हातात आहे. राजकारण आवडत नसले, त्यात रस नसला तरीही मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे.

 

connectedtoindia.com

येत्या वर्षात निवडणूका होणार आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुटीचे औचित्य साधून फिरायला वगैरे न जाता कुटुंबातील प्रत्येकाने मतदान करण्याचा संकल्प सोडूया.

नवीन वर्षातील हा सर्वात महत्वाचा संकल्प आहे.

२. मी स्वच्छ व प्रदूषणमुक्त आयुष्य जगेन

तुम्हाला जर सांगितलं की भारतात अशी काही पर्यटनस्थळे आहेत जिथे भारतीय पर्यटकांनाच जाण्यास बंदी आहे तर तुम्हाला कसे वाटेल?

जगात भारतीय लोकांची प्रतिमा म्हणजे बेशिस्त, अस्वच्छ लोक अशी आहे. ह्याला कारणही आपणच आहोत.

आपल्यापैकी अनेक लोक जिथे जाऊ तिथे कचरा टाकून ती जागा घाण करण्यात, त्या जागेचे विद्रुपीकरण करण्यात पटाईत आहेत.

जागतिक स्तरावर आपल्याबद्दल असलेला हा समज आपणच खोडून काढायला हवा. तरुणांची संख्या जास्त असलेल्या आपल्या देशाला हे करणे अशक्य निश्चितच नाही.

फक्त आपल्यापैकी सगळ्यांनीच हा संकल्प केला पाहिजे की मी कचरा करणार नाही आणि इतर कुणी कचरा करत असेल तर करू देणार नाही.

 

sulekha.com

प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करेन. जिथे शक्य असेल तिथे वृक्षलागवड करेन. मी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त आयुष्य जगेन.

३. मी माझ्या सभोवतालचा परिसर, शहर आणि देश स्त्रियांसाठी सुरक्षित बनवेन

सध्या स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गर्भातल्या स्त्रीभ्रूणापासून तर नव्वद वर्षांच्या आजीपर्यंत कुठलीही स्त्री सुरक्षित व मोकळे आयुष्य जगू शकत नाही.

स्त्रीभ्रूणहत्या, लहान मुलींचे अपहरण करून त्यांची विक्री, तरुण मुलींवर एकतर्फी प्रेमातून हल्ले, वासनांध पुरुषांकडून सर्व वयाच्या स्त्रियांवर होणारे अत्याचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ.

शिवाय सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या शेरेबाजीपासून तर सोशल मीडियावर होणारे स्टॉकिंग, गलिच्छ कमेंट्स, अश्लील शेरेबाजी, हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, ऑनर किलिंग ह्या सगळ्यामुळे आज स्त्रियांना मोकळा श्वास घेता येत नाही.

त्यांना मनमोकळे आयुष्य जगता येत नाही.

 

 

आपण सर्वानी असा संकल्प करायला हवा की मी माझ्या आसपासच्या कुठल्याही स्त्रीवर अत्याचार करणार नाही आणि होऊ देणार नाही.

माझ्या आसपासचा परिसर, माझे शहर, माझा देश हा सर्व वयोगटांतील स्त्रियांसाठी सुरक्षित असेल ह्याची काळजी घेईन. कुणावर अत्याचार होत असेल तर त्या अत्याचारित स्त्रीची मी मदत करेन.

माझ्या घरातील लहान मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे म्हणून स्वसंरक्षणाचे धडे देईन. मी माझ्या आसपासच्या कुठल्याही स्त्रीवर अन्याय करणार नाही आणि अन्याय होऊ देणार नाही.

असे जर प्रत्येक स्त्री पुरुषाने ठरवले तर स्त्रियांवरील होणारे अत्याचार कमी होतील. स्त्रियांना सुरक्षित, शांत व मोकळे आयुष्य जगता येईल.

४. मी रस्त्यावर एक जबाबदार नागरिक म्हणून वर्तन करेन

सर्वात प्रथम आपण हे मान्य केले पाहिजे की ट्रॅफिकच्या नियमांबाबत आपण अगदी बेफिकीर आहोत.

आपल्याला ट्रॅफिकची शिस्त पाळायला आवडत नाही. नियम पाळण्याबाबतीत आपण अत्यंत उदासीन आहोत आणि संधी मिळेल तेव्हा आपण नियम मोडतो.

 

thestar.com

म्हणूनच किरकोळ अपघातांपासून ते अगदी जीवघेणे अपघात होतात आणि विनाकारण माणसांचे जीव जातात.

रस्त्यावर जर आपण ट्रॅफिकचे नियम मोडले तर आपण स्वतःबरोबर अनेकांचे आयुष्य पणाला लावत असतो.

दुचाकीवर हेल्मेट न घालणे, पीयूसी करून न घेणे, लेन न पाळणे, स्पीड लिमिट न पाळणे, सिग्नल तोडणे, वाटेल तसे रस्ते क्रॉस करणे, अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणे.

तसेच मद्यपान करून गाडी चालवणे, मोबाईल फोनवर बोलत बोलत गाडी चालवणे, कानात हेडफोन लावून गाणी ऐकत गाडी चालवणे, गाडी चालवत असताना सेल्फी काढणे ह्या सगळ्या गोष्टी करून आपण स्वतःचा तसेच इतरांचा जीव सुद्धा पणाला लावत असतो.

ह्या वर्षीपासून आपण संकल्प करूया की मी जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीचे सगळे नियम पाळेन.

रस्त्यावर पायी चालत असताना किंवा गाडी चालवत असताना मी स्वतःचा व माझ्याबरोबर इतरांचाही जीव धोक्यात येईल असे वर्तन करणार नाही.

मी काळजी घेईन की रस्ते हे चालक, प्रवासी व पादचारी ह्या सर्वांसाठी सुरक्षित असतील.

५. मी दुसऱ्याच्या मतांचा आदर करेन

आपल्या देशात अनेक धर्मांची, अनेक पंथांची, अनेक विचारांची व अनेक स्वभावांची माणसे राहतात.

 

 

प्रत्येकाची जडणघडण, विचार व प्रवृत्ती वेगवेगळ्या आहेत आणि म्हणून साहजिकच प्रत्येकाची मते एकमेकांना आवडतीलच व जुळतीलच असे नाही.

हे सगळे ध्यानात ठेवून ह्या नव्या वर्षात आपण हा संकल्प करायला हवा की मी समोरच्याच्या मतांचा आदर करेन.

मला पटले नाही तरी मी समोरच्याचा त्याच्या मतांसाठी अपमान करणार नाही.

समोरच्याचे मत माझ्या मताच्या विरुद्ध असले तरीही मी त्या व्यक्तीविषयी वाईट मत करून घेऊन त्याला आपला शत्रू मानणार नाही.

असे झाले तर अनेक तंटे कमी होतील. भांडणे कमी होतील आणि मतभेदांपायी माणसांचे जीव जाणार नाहीत.

६. मी माणसांना आहे तसे स्वीकारेन

ह्या जगात अनेक प्रकारची माणसे राहतात. अनेक वंशांची, जाती-धर्माची, रंगांची माणसे आहेत. प्रत्येक माणूस हा सारखा आहे.

हा श्रेष्ठ, तो कनिष्ठ हा भेदभाव त्या निसर्गानेच निर्माण केला नाही तर आपण माणसांनी का स्वतःला श्रेष्ठ व दुसऱ्याला कमी लेखून भेदभाव करायचा?

प्रत्येकात काही ना काही कला – गुण असतातच आणि आपण एकमेकांकडून चांगले तेवढे घेतले पाहिजे. माणूस आहे तसा स्वीकारला पाहिजे.

मग तेथे त्यांचे लिंग, जात, धर्म, वंश, भाषा मध्ये येता कामा नये.

एखाद्याचे सेक्शुअल ओरिएन्टेशन जर आपल्याहून वेगळे असेल तर ते आपण मोकळेपणाने स्वीकारून त्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करायला हवा.

 

quora.com

ह्या नव्या वर्षात आपण असा संकल्प करूया की मी माणसामाणसांत भेदभाव करणार नाही. माणसांच्या चॉईसचा व त्यांच्या भावनांचा आदर करेन. मोकळेपणाने माणसाला माणूस म्हणूनच स्वीकारेन.

७. मी सोशल मीडियावर असंवेदनशील स्टेट्स अपडेट व कमेंट्स टाकणार नाही

हल्ली डिजिटल मीडिया व सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून प्रत्येकालाच आपल्या भावना सर्वांसमक्ष जाहीर करण्यासाठी एक सोपे व सहज उपलब्ध असलेले व्यासपीठ लाभले आहे.

त्यामुळे जे आवडले नाही, पटले नाही किंवा एखाद्या समाजाविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी किंवा घटनेविषयीच्या चांगल्या -वाईट भावना लगेच स्टेट्स किंवा कमेंट्स टाकून प्रसिद्ध करता येतात व सर्वांपर्यंत पोचवता येतात.

आपण जर रागाच्या भरात किंवा बदल्याची भावना मनात ठेवून असंवेदनशील पोस्ट किंवा कमेंट टाकल्या तर त्यामुळे लोकांच्या भावना दुखावू शकतात.

काहीतरी भलतीच मोठी अनुचित घटना घडू शकते. समाजातील लोकांची माथी भडकतील असे काहीही पोस्ट करणे चुकीचे आहे, त्यामुळे व्यक्ती व मालमत्तेचेही मोठे नुकसान होऊ शकते.

म्हणूनच सोशल मीडियावर काहीही लिहिताना मी डोके थंड ठेवून अगदी जबाबदारीने योग्य शब्दांतच कमेंट करेन असे प्रत्येकाने ठरवायला हवे.

 

onlinelpntorn.org

प्रत्येकाने जबाबदार नेटीझन म्हणून वागायला हवे. काहीही वाचून माथी भडकून नुकसान होणार नाही ह्याची काळजी घ्यावी.

आपल्या अतिसंवेदनशील मनाचा काही समाजविघातक प्रवृत्ती गैरफायदा घेतात. त्यांना हा गैरफायदा घेऊ देणार नाही हा संकल्प प्रत्येकाने करायला हवा.

हे सात संकल्प आपण केले आणि ते तडीस नेले तर भारताचे आजचे चित्र नक्कीच पालटेल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version