Site icon InMarathi

तो बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला आणि भारताला गुणी फुटबॉल स्टार मिळाला !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

फुटबॉल आणि भाईचुंग भुतिया हे समीकरण भारतीयांना नवीन नाही. भारतात फुटबॉल खेळाबद्दल आकर्षण आहे मात्र अजूनही या खेळात आपण मागे आहोत.

त्यामुळेच की काय फुटबॉलची चर्चा ही नेहमीच एक तर भाईचुंग भुतिया या नावाभोवती नाहीतर या खेळात आपण किती मागे आहोत इतकीच मर्यादित असते.

सिक्क्कीम मधील नामचि जिल्ह्यातील तिनकिताम या छोट्याशा गावात जन्म झालेला भाईचुंग भुतिया हा “सिक्किम्स स्नायपर” या टोपणनावाने ओळखला जातो.

त्याचे जन्मगाव हे मूळच्या तिबेटमधील लोकांच्या ‘भुतिया’ यांची वस्ती असलेलेच गाव आहे.

 

insunch.com

सिक्कीम मधील एका छोट्या गावातून भारतीय फुटबॉल संघाचा मुख्य खेळाडू हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. लहानपणापासूनच खेळाकडे ओढ असलेला भाईचुंग शाळेकडून मात्र बॅडमिंटन, बास्केटबाँल आणि अॅथलेटिक्स या खेळांमध्ये भाग घेत असे.

खेळामध्ये गती आणि अभ्यासाकडे लक्ष नसणे ही भारतीय आईबाबांच्या दृष्टीने असणारी चिंतेची लक्षणं त्याच्यात दिसत होती.

तशी चिंता त्याचे आईवडील वारंवार व्यक्तही करत. मात्र एक आशेचा किरण होता. तो म्हणजे त्याचे काका, कर्मा भुतिया! त्यांच्या प्रोत्साहनामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्याला फुटबॉल साठी शिष्यवृत्ती मिळाली आणि तो गंगटोकमधील ताशी नामग्याल अकादमीत दाखल झाला.

इथेही त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि साई (स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) येथे त्याचा प्रवेश सुकर झाला.

१९९२ मध्ये भाईचुंग भुतियाने सुब्रोतो चषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळवला आणि त्याची दखल फ़ुटबॉल मधील अनेक मोठ्या खेळाडूंनी घ्यायला सुरुवात केली.

 

northeast.com

यावेळी आणखी एक मोठा निर्णय भाईचुंग भुतियाने घेतला. यावेळेस त्याची १६ वर्षांखालील राष्ट्रीय संघात निवड झाली होती आणि त्याचवेळेस बारावी बोर्डाचे पेपर होते.

आता भाईचुंग भुतिया याने मात्र आपला निर्णय घेतला आणि बारावी बोर्डाचे पेपर बुडवून मैदानात उतरला.

मुळात त्याच्या आईवडिलांचा खेळात करिअर करण्याचा विरोध होता. मात्र भाईचुंग भुतिया आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि फुटबॉल या खेळात आपले समर्पण दाखवून दिले.

एवढेच नाही तर लवकरच त्याने शिक्षणाला रामराम ठोकला आणि ईस्ट बंगाल फ़ुटबॉल क्लब या नामवंत व्यावसायिक फुटबॉल क्लब मध्ये तो सामील झाला.

१९९५ मध्ये त्याने थायलंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. नेहरू चषकातील या स्पर्धेत उझबेकिस्तान विरुद्धच्या सामन्यात गोल करून त्याने संघाला यश मिळवून दिले शिवाय तो भारताकडून गोल करणारा सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला.

अवघ्या १९ व्या वर्षी हे यश त्याने मिळवून दाखवले. पुढे  तो इंडिया नॅशनल फुटबॉल लीग (आता आय लीग म्हणून ओळखली जाते.) साठी खेळला आणि १९९६-९७ मध्ये ती स्पर्धा जिंकून त्याने आपली जादू निर्माण केली.

 

sportskeeda.com

या स्पर्धेत त्याने एकूण १४ गोल केले आणि तो “गोल्डन बूट”चा मानकरी ठरला. इथून पुढे फुटबॉल मध्ये यश मिळविण्याचा सिलसिला चालूच होता.

महिंद्रा युनाइटेड विरुद्धच्या एका सामन्यात पाच गोल करून त्याने नॅशनल फुटबॉल लीग स्पर्धेतील एका सामन्यात सर्वात जास्त गोल करणारा खेळाडू ठरला.

 फुटबॉल मध्ये आता स्टार झालेला हा खेळाडू आपल्या सरस कामगिरीने अनेक विक्रम आपल्या नावावर नोंदवत होता.

१९९५ आणि २००८ अशा दोन वेळेस त्याने ‘इंडियन प्लेयर ऑफ द इयर” हा पुरस्कार मिळवला आहे. आय. एम विजयन या खेळाडूनंतर अशी कामगिरी करणारा भाईचुंग भुतिया हा केवळ दुसरा खेळाडू आहे.

१९९८ मध्ये क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले. त्याची लोकप्रियता ही सतत वाढतच होती.

 

Hixic.com

अनेक तरुणांचा तो आदर्श ठरला आहे. फुटबॉल क्लब च्या विश्वात ईस्ट बंगाल विरुद्ध मोहन बगान या दोन क्लब मध्ये नेहमीच चुरस पाहायला मिळते. एका सामन्यात भाईचुंग भुतियाने गोल ची हॅट्ट्रिक नोंदवत आपल्या खेळाला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले.

मोहम्मद सलीम नंतर तो दुसरा भारतीय फुटबॉलपटू आहे ज्याने यूरोपातील फुटबॉल क्लबकडून सामना खेळले आहेत. २००८ मध्ये पद्मश्री या पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले.

फुटबॉल मैदानाच्या बाहेर भाईचुंग भुतिया गाजला तो झलक दिखला जा या कार्यक्रमातील आपल्या नृत्याविष्कारामुळे! नृत्याच्या या कार्यक्रमात त्याने यश मिळवत ४० लाखांचे बक्षीसही मिळवले.

सिक्किममधून यासाठी त्याला मोठा पाठिंबा लाभला. अर्थात या यशाची त्याला किंमतही चुकवावी लागली.

 

thetimesofindia.com

या कार्यक्रमामुळे त्याला आपल्या मोहन बगान क्लबच्या सराव सत्राला उपस्थित राहता आले नाही त्यामुळे क्लबचे नाराजी त्याने ओढावून घेतली. त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली. हा वाद पण चांगलाच गाजला.

अजून एक वाद म्हणजे २००८ मध्ये ऑलिम्पिक स्पर्धेवेळी मशाल धरून पाळण्यास त्याने नकार दिला होता. याला कारण म्हणजे चीन मध्ये झालेल्या स्पर्धेत त्याने तिबेटच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देण्यासाठी ही कृती केली होती.

मैदानाबाहेर भाईचुंग भुतियाने राजकीय क्षेत्रातही आपला सहभाग नोंदवला. तृणमूल काँग्रेस या पक्षात सामील होत त्याने २०१४ मध्ये दार्जिलिंग मतदारसंघातून निवडणूक लढवली.

इथे मात्र त्याला यश मिळाले नाही. पुढे त्याने पक्षाचा राजीनामा दिला आणि स्वतंत्र पक्षाची स्थापना केली. तो पक्ष म्हणजे “हमरो सिक्कीम पार्टी”.

 

Prokerala.com

२०१२ मध्ये अखेरचा सामना खेळात भाईचुंग भुतियाने निवृत्ती स्वीकारली. २०१० मध्ये त्याने भाईचुंग भुतिया फुटबॉल स्कूल सुरु केले.

क्रीडा क्षेत्रातील आघाडीची नाइके कंपनी आणि प्रसिद्ध फुटबॉल व्यवस्थापक कार्लोस क्वेइरोझ यांच्यासोबत हे फुटबॉल स्कूल सुरु केले आहे.

अनेक मानसन्मान आणि यश मिळवून आपली फुटबॉल वरची निष्ठा कायम राखणारा हा खेळाडू आजही अनेक तरुणांचा रोल मॉडेल आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version