' नगर मनपा निवडणूक : पडद्यामागचा थरार नि किचकट राजकारण समोर ठेवणारं उत्कृष्ट विवेचन – InMarathi

नगर मनपा निवडणूक : पडद्यामागचा थरार नि किचकट राजकारण समोर ठेवणारं उत्कृष्ट विवेचन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

नुकतीच झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक गाजली ती भाजप आणि राष्ट्रवादी कोन्ग्रेस यांनी केलेल्या अनैसर्गिक युतीमुळे. या हातमिळवणीची चर्चा सध्या सोशल मिडीयावर आणि इतरही अनेक माध्यमांत चांगलीच रंगते आहे.

एखादी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वरवर दिसते तेवढी सोपी सुटसुटीत नसते, त्यात अनेक स्थानिक घटक प्रभाव टाकत असतात हे या निमित्ताने पुन्हा दिसून आले.

ज्या गोष्टी माध्यमांत दिसत्यात त्यापेक्षाही खूप काही वेगळं पडद्यामागे घडत राहतं. हाच खरा निवडणुकीचा थरार असतो.

 

indian voters inmarathi
indiatoday.in

स्थानिक पातळीवर युती करताना बदलत जाणारी सत्तेची गणिते, स्थानिक पातळीवरील दोन पक्षांतील नेत्यांचे एकमेकांशी असलेले हितसंबंध, हाडवैर वगैरे गोष्टी या सर्व पटावर प्रभाव टाकत असतात.

या संख्येच्या गणिताची आणि पडद्यामागे खेळल्या जाणाऱ्या खेळींची जान असणाऱ्या चेतन शर्मा यांनी अहमदनगरच्या महापालिका निवडणुकीचे विश्लेषण करणारी पोस्ट लिहिली आहे. ती इनमराठीच्या वाचकांसाठी देत आहोत.

===

१४ जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकावर असून देखील भाजपाने नगर महानगरपालिकेवर महापौर पदावर दावा करत आपला झेंडा फडकवला.

 

bjp-inmarathi
thesouthasiantimes.info

शिवसेनेला २४ जागा जिंकून देखील त्यांना आकड्यांचा खेळ खेळता आला नाही असच म्हणावं लागेल, परंतु काही राजकीय तथ्य समजून घेऊनच आपण पुढे बोललेलं बरं!

१८ जागा जिंकत राष्ट्रवादी नगर महानगरपालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय, तरी देखील राष्ट्रवादीचे एक-दोन नव्हे तर सर्वच्या सर्व म्हणजे १८ ही उमेदवारांनी भाजपाचे महापौर पदाचे उमेदवार वाकळे यांना मतदान केलंय!

यामागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे. मुळात आज भाजपाच्या बाजूने मतदान करून राष्ट्रवादीने खूप मोठा डाव खेळलाय.

 

NCP-inmarathi
jagran.com

आजचा प्रकार घडल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रदेशअध्यक्षांकडून सांगितलं गेलय की हा प्रकार आम्हाला माहीत नव्हता, याची जरा सुद्धा पूर्व कल्पना आम्हाला नव्हती. आम्ही स्थानिक नेत्यांना कारणे दाखवा नोटीस दिलीये.

बरं हे आम्ही मान्य देखील करू पण सर्वच्या सर्व उमेदवार घोडेबाजारात सहभागी होतात, अन प्रदेश राष्ट्रवादीला कानोकान खबर नाही, साहेब हे उत्तर आम्हाला न रुचण्यासारखंच.!

राष्ट्रवादीचा मनसुबा भाजपा आणि शिवसेनेत फूट पाडण्याचा आहे. त्यांच्यातील मतभेद आणखी टोकाला जावेत असं काँग्रेस- राष्ट्रवादीला वाटतं म्हणूनच हा आजचा डाव खेळून बिनशर्थ पाठिंब्याचे नाटक राष्ट्रवादीने खेळलेय. आणि हे सर्वच जाणीवपूर्वक घडवलं जातंय.

पुढील काळात सेना-भाजपात आणखी खटके उडावेत हा यामागचा राष्ट्रवादीचा स्पष्ट उद्देश आपण सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे.

 

BJP-NCP-inmaratrhi
india.com

आगामी निवडणुकात भाजपा. आणि शिवसेना युती झाली तर ही निवडणूक त्यांना जड जाणार हे त्यांच्या लक्षात आलंय.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर असणारी ही युती त्यांना न परवडणारी आहे, म्हणून काही करून सेना-भाजपा एक होता कामा नये हाच डाव बारामतीतून खेळला जातोय.

प्रत्येक गोष्टीत आपला अधिकार दाखवणारे राष्ट्रवादीचे नेते आज बिनशर्थ पाठिंबा देताच कसे? आणि ते देखील प्रदेशात न कळू देता? हे गणित बुद्धीला न पटण्यासारखं आहे!

थोडं आकड्यांचं गणित समजून घेऊ-

राष्ट्रवादीचे १८, भाजपाचे १४, बसपाचे ०४, आणि अन्य ०१ असे एकूण ३७ मिळून, भाजपाने आपलं स्पष्ट बहुमत सिद्ध केलं, परंतु राष्ट्रवादीचे १८ उमेदवार असताना देखील त्यांनी चक्क उपमहापौर पदाची देखील मागणी केली नाही. यातून राष्ट्रवादीचा छुपा अजेंडा लक्षात येतो.

 

ncp-bjp-inmarathi
smartmaharashtra.com

जेव्हा शिवसेना २४ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला, मॅजिक फिगर गाठण्यासाठी सेनेला फक्त ११ जागा हव्या असताना, राष्ट्रवादीने तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपाला पुढे करत सत्तेवर बसवलं.

भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी, अश्या बिनशर्त मदती घेऊन सत्ता स्थापन करून मोकळं होण योग्य, की दूरगामी परिणाम लक्षात घेऊन उचललेलं पाऊल महत्वाचं? हे लक्षात घेऊनच आगामी निवडणुकांमध्ये आपली रणनीती आखणे गरजेचं बनलंय.

“पार्टी विथ डिफरन्स” चा नारा देणारी भाजपा आगामी निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर लढवतील की असाच घोडे बाजार करून फोडाफोडीच राजकारण करेल?

तिकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, इकडे भारिप बहुजन महासंघा सोबत AIMIM आणि काही स्थानिक आघाड्या सोबत येऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापन झाली, यांच्या समोर टिकून राहण्यासाठी सेना-भाजपा युती हाच एकमेव पर्याय समोर येतोय.

 

shivsena-bjp-marathipizza
freepressjournal.in

नगर निवडणुकीत सेनेला स्वबळाचा नारा नडला, आगामी निवडणुकांत सेना ह्याच स्वबळाच्या घोषणेवर ठाम राहील का? हा आगामी काळच ठरवेल.

राष्ट्रवादीची ही खेळी आगामी निवडणुकात त्यांच्या कामी येईल की भाजपा शिवसेना एकत्र येऊन निवडणुका लढवतील हे पुढील काळात स्पष्ट होईलच.

परंतु आगामी निवडणुका भाजपा शिवसेनेनी एकत्रित युती करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवल्या तर काँग्रेस- राष्ट्रवादीला या निवडणुका जड जाणार हाच निष्कर्ष आजच्या बिनशर्त पाठिंब्यावरून काढता येईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?