अटलजींच्या स्मृतींना आगळी सलामी देणारं १०० रुपयांचं नाणं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
१६ ऑगस्ट २०१८ हा दिवस भारतीय राजकारणासाठी एक अतिशय दुखद असा दिवस ठरला. कारण ह्या दिवशी भारतीय राजकारणाचे ‘भीष्म पितामह’ मानले जाणारे अटल बिहारी वाजपेयी ह्यांनी जगाचा निरोप घेतला.
ह्या बातमीने राजकारणच नाही तर संपूर्ण देशच हादरला. भारतीय राजकारणाला एक वळण, एक वेगळी दिशा अटलजींनी दिली.
जेव्हा भविष्यात भारताला घडवणाऱ्या महान नेत्यांचं नाव घेतलं जाईल, त्यात अटलजींचं नाव नक्कीच असेल यात तिळमात्र शंका नाही.
अटलजी एक भारतरत्न, राजकीय धुरंदर, उत्कृष्ट संसदपटू तर होतेच पण एक प्रतिभाशाली कवी आणि प्रेमळ स्वभाव असलेले दिव्य व्यक्तीमत्व होते. त्यांचा जाण्याने एक न भरून निघणारे नुकसान देशाला झाले आहे.
एक कुशाग्र विद्यार्थी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, एक स्वातंत्र्य सेनानी ते एक अजरामर कारकीर्द असलेले प्रधानमंत्री, अटलजींचा प्रवास हा एक विविध रंगी व दिव्य प्रेरणेने भरलेला आहे.
अटल बिहारी वाजपेयी हे भारतातील सर्वात श्रेष्ठ पंतप्रधान होते हा मुद्दा जरी वादाचा असला तरी अटल बिहारी वाजपेयी जी भारताच्या आजवर झालेल्या सर्वश्रेष्ठ पंतप्रधानांपैकी एक होते.
जेव्हा भविष्यात भारताला घडवणाऱ्या महान नेत्यांचं नाव घेतलं जाईल, त्यात अटलजींचं नाव नक्कीच असेल यात तिळमात्र शंका नाही.
२५ डिसेंम्बर हा भारतरत्न कै.अटलबिहारी वाजपेयी ह्यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या ९४व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या जन्मदिनाच्या आदल्या दिवशी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शंभर रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
ह्या नाण्याच्या एका बाजूला अटलबिहारी वाजपेयींचे चित्र तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय प्रतीक आहे. अटल बिहारी वाजपेयी ह्यांचा भारतीय राजकारणात सर्वच लोक आदर करत होते आणि अजूनही त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांचा सगळे भारतीय सन्मान करतात.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी आज हे नाणे प्रसिद्ध केले. ह्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,
“अटलजी आज आपल्यात नाहीत ह्यावर आजही मन विश्वास ठेवायला तयार नाही. ते एक प्रसिद्ध व आदरणीय व्यक्तिमत्व होते आणि समाजातील सर्वच लोक त्यांचा आदर करतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. ते एक प्रभावी व अत्युत्तम वक्ते होते तसेच मृदुभाषी सुद्धा होते.”
–
“आपल्या देशातील सर्वोत्तम वक्त्यांपैकी ते एक होते. जो पक्ष अटलजींनी स्थापन केला आज तो भारतातील सर्वात मोठ्या राजकिय पक्षांपैकी एक आहे. कार्यकर्त्यांच्या अनेक पिढ्या त्यांनी घडवल्या. अनेक भाग्यवंतांना त्यांचे मार्गदर्शन मिळाले.”
असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारतरत्न कै. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या ह्या शंभर रुपयाच्या नाण्याच्या उद्घाटनप्रसंगी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन, अर्थमंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री व मंत्री महेश शर्मा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित अमित शाह व भाजपचे ज्येष्ठ नेते व वाजपेयींचे निकटचे सहकारी लालकृष्ण अडवाणी हे उपस्थित होते.
ह्या नाण्याच्या पुढच्या बाजूस भारताचे राष्ट्रीय प्रतीक आहे. अशोक स्तंभावर असलेल्या सिंहचतुर्मुखाच्या खाली देवनागरी लिपीत “सत्यमेव जयते”असे लिहिलेले आहे.
नाण्यावर देवनागरी लिपीत भारत तर रोमन लिपीत इंडीया असे लिहिलेले आहे. तसेच भारतीय प्रतिकाच्या खाली नाण्याची किंमत शंभर रुपये सुद्धा नाण्यावर कोरलेली आहे.
नाण्याच्या मागच्या बाजूस अटलबिहारी वाजपेयी ह्यांचे चित्र आहे. तसेच त्यांचे नाव देवनागरी व रोमन लिपीत कोरलेले आहे. वाजपेयींच्या चित्राखाली १९२४ व २०१८ हे त्यांच्या जन्माचे व मृत्यूचे साल सुद्धा लिहिलेले आहे.
२४ डिसेंम्बर रोजी सकाळी झालेल्या ह्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी वाजपेयींच्या स्मृतींना उजाळा दिला.त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाविषयी व त्यांच्या भारतीय जनता पक्षासाठी असलेल्या निष्ठा व योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,
“वाजपेयी ह्यांचे वक्तृत्व अतुलनीय होते. आणि ते भारतात आजवर झालेल्या सर्वोत्तम वक्त्यांपैकी एक होते. ते कधीही सत्तेसाठी हपापलेले नव्हते आणि सत्तेसाठी त्यांनी कधीही त्यांच्या तत्वांबाबत व पक्षाच्या विचारधारेबाबत तडजोड केली नाही.
काही लोकांसाठी सत्ता ही प्राणवायूसारखी जीवनावश्यक गोष्ट असते. ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत.
अटलजींच्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक वर्षे विरोधी पक्षात घालवली. परंतु ते कायम राष्ट्रहिताच्या गोष्टींबद्दलच बोलत असत. त्यांनी कधीही पक्षाच्या तत्वांबाबत तडजोड केली नाही.
त्यांनी जनसंघ निर्माण केला पण जेव्हा लोकशाहीचे रक्षण करण्याची वेळ आली आणि कठीण परिस्थिती आली तेव्हा ते व इतर लोक जनता पक्षात सामील झाले.
तसेच जेव्हा तत्वे की सत्ता हे निवडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी जनता पक्ष सोडून भाजपची निर्मिती केली. “
अटलजी हे एकमेवाद्वितीय होते. त्यांची कमतरता कायम जाणवत राहील. उद्या म्हणजे २५ डिसेंम्बर ला त्यांचा जन्मदिन आहे. अटलजींच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.