आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : त्रिकाल अडसड
===
एरवी क्षुल्लक गोष्टींना पार डोक्यावर नाचवून त्याचे कोडकौतुक करणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील रंगकर्मींच्या नजरेतून “तुंबाड” सारखा चित्रपट कसा काय सुटू शकतो, हेच मला कळत नाही.
स्वप्नील जोशीने आजवर किती भेजाफ्राय केला मराठी प्रेक्षकांचा!
सध्या त्या विक्रांत सरंजामे उर्फ सुबोध भावेला तर आपण पार मराठीतील अमिताभ बच्चन बनवून टाकले.
आजवर एकाही चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडू न शकणाऱ्या वैदेही परशुरामीवर निष्कारण किती स्तुतीसुमने उधळतो आपण? मग तुंबाडवर अन्याय का?
भयपटांना मराठी प्रेक्षक दाद देत नाही, हे तर सत्य नाही. आजवर अनेक भयपट व हॉरर मालिकांना आपण भरभरून दाद दिली. मग तुंबाडवर अन्याय का?
काय कमी आहे या चित्रपटात? भयपटाला साजेशे असे कथानक आहे, उत्कृष्ठ अशी मांडणी आहे, दर्जेदार अभिनय आहे, उत्तम लोकेशन आहे, कॅमेरा, बॅकग्राऊंड म्युजिक सार काही उत्तम! ड्रामा आहे, इंटेंसिटी आहे, थ्रील आहे.
विशेष म्हणजे कधी नव्हे ते चक्क हिंदी चित्रपट समीक्षकांचे चांगले रिव्ह्यू सुद्धा आहेत. पण तरीही तुंबाड चित्रपटाचे हवे तसे कोडकौतुक झाले नाही.
होय! हॉलीवूडच्या भयपटांच्या तुलनेत चित्रपट सैतानाला पोट्रेट करण्यात टेक्निकली आणि ग्राफीकली थोडा कच्चा होता. परंतु तरीही अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांपेक्षा तुंबाडचे सादरीकरण नक्कीच उजवे होते.
गरज नसताना गाऊन उचलून आपण फारच हटके अभिनेत्री आहोत हे दाखवण्यापेक्षा उदरनिर्वाह करण्यासाठी मरायला टेकलेल्या वृद्ध वाडा मालकाची शारीरिक भूक भागवणर्या विधवा निराधार महिलेची अपरिहार्यता,
अंगप्रदर्शन न करता किंवा कसलेही विकृत चाळे न करता दाखविणे हे एक अत्यंत धाडसी आणि नाविन्यपूर्ण पाऊल होते.
ज्याप्रमाणे अभय चित्रपटात कमल हसन व बँडिट क्वीनमध्ये सीमा विश्वासचा न्यूड सीन खरोखर कथानकाची गरज असल्याप्रमाणे भासते, त्याचप्रमाणे नको तिथे अंगप्रदर्शन करण्याची सुद्धा काहीच गरज नसते.
त्यामुळे फार खर्च न करता, भव्य सेट न उभारता, छोट्या छोट्या डिटेलिंग्जवर अत्यंत बारकाईने लक्ष दिल्याने १८-१९ व्या शतकातील महाराष्ट्राचा देखावा निर्माण करणे, व तो अपील होणे हे राही बर्वे, आनंद गांधी व आदेश प्रसाद या नवोदित दिगदर्शकांचे कौशल्य हे परिपक्व निर्मात्यांनाही लाजविणारे आहे.
फक्त त्यांचा ऍटीट्युड किंवा आत्मविश्वास कुठेतरी कमी पडल्याने उत्तम कथानक, उत्तम अभिनय असूनही चित्रपट भयपटापेक्षा आर्टमुव्ही असल्यासारखा जास्त भासतो.
चित्रपटातील हस्तर नावाच्या दानवास अत्यंत भयावह दाखविण्यास पुरेपूर वाव असताना त्याचा पार राजबाबू चित्रपटातील शक्ती कपूर करून टाकला, ही मात्र उणीव तुंबाडमध्ये राहून गेली.
यासाठी द कोंज्युरिंग सारख्या चित्रपटातून शिकायला हवे. पहिल्या कोंज्युरिंगमधील ती चेटकीण संपूर्ण चित्रपटात फक्त तीनदा व तेही एक सेकंदाहुनही कमी वेळासाठी दाखविण्यात आलेली आहे.
कारण तिचे मेकअप नीट बघितल्यावर त्यातील भय कमी होते, किंबहुना काही प्रमाणात ती हास्यास्पदही वाटते.
परंतु सैतान प्रत्यक्ष न दाखवता त्याच्या निव्वळ अस्तित्वाने प्रेक्षकांची घाबरगुंडी उडविणे ही सुद्धा एक विलक्षण कला आहे.
हा थ्रील निर्माण करण्याच्या बाबतीत कुठेतरी दिगदर्शक स्वतःच उदासीन होते की काय अशी शंका तुंबाड बघताना होते.
पण एवढा भाग वगळता ओव्हरऑल हा चित्रपट हॉलीवूडच्या भयपटांशी स्पर्धा करण्याइतपत नक्कीच दमदार आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.
तुंबाड चित्रपट हिंदीत असला तरीही सगळा मराठमोळा बाज असूनही कमर्शियली तो अत्यंत दर्जेदार बनलेला आहे व त्यासाठी संपूर्ण कास्ट आणि कृच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणे आवश्यक आहे. ब्राव्हो…!
तुम्ही बसा सरंजामेला मिठ्या मारत…!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.