आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
जगाला नेहमीच कुतूहल असणारा देश म्हणजे चीन. आज चीनची वाटचाल महासत्ता म्हणून वेगाने होत आहे. चीन या देशाबद्दल जगभरात विविध मतमतांतरे आहेत. त्यामुळे चीन बद्दल जाणून घेण्यास सारेच उत्सुक असतात.
चीनने अनेक क्षेत्रात आज जे काही यश मिळवले आहे त्यात विशेष नमूद करण्यासारखे एक कारण म्हणजे त्यांची प्रयोगशीलता!
क्षेत्र कुठलेही असो अगदी सुरुवातीपासून बघायचे झाल्यास शेती,लोकसंख्या, पायाभूत सुविधा ते आजचे तंत्रज्ञान, आपले लक्ष्य साध्य करताना त्यांनी जी पावले उचलली त्याची चर्चा नेहमीच होत आली आहे.
जगाचे उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणारा चीन आता जगभरात आपले स्थान निर्माण करत आहे.
जगातील अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प साकारण्यात चीन आपले योगदान देत आहे. अर्थात यामागे काही परोपकार ही भावना नाही. जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी केलेला हा पद्धतशीर प्रयत्न आहे.
गेल्या दशकभरापासून चीनने जगभरात आपले हातपाय पसरवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आहे. त्यामुळेच की काय जगातील एकमेव महासत्ता म्हणून बिरूद मिरवणारी अमेरिका या घडामोडींकडे बारीक लक्ष ठेवून आहे.
काही दिवसांपूर्वी द न्यूयॉर्क टाइम्स या अमेरिकेतील वृत्तपत्रात चीन जगाला कसं कवेत घेत आहे, याविषयी एक लेख आला होता. “द वर्ल्ड, बिल्ट बाय चायना” हे लेखाचं शिर्षकच बरंच काही सांगून जाणारं होतं.
अत्यंत अभ्यासपूर्ण आणि संशोधन करून डेरेक वॉटकिन्स, के के रेबेका लाय, केथ ब्रॅडशर यांनी चीनच्या वाढत्या प्रभावाविषयी लेख लिहिला होता. त्या लेखाचा सारांश हा पुढील प्रमाणे सांगता येईल.
जागतिक व्यापार, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रामध्ये चीन आज अग्रेसर आहे. यामुळे चीनचे इतर देशांशी असलेले आर्थिक आणि भू-राजकीय संबंध बीजिंगच्या जवळ जाणारे निर्माण झाले आहेत.
हा आधुनिक युगातला चीनचा मार्शल प्लान आहे जो चीनला अनुकूल असणाऱ्या सैनिकी आणि राजनैतिक आघाडी निर्माण करण्यासाठीचे एक साधन आहे.
चीनने यासाठी जे तंत्र वापरले आहे, ते आक्रमक, महाग आणि मोठी जोखीम पत्करणारे आहे. चीनचा विविध देशांमध्ये येणारा हा पैसा काही विशिष्ट नियमांना अनुसरून येत नाही.
अनुदान, कर्ज, गुंतवणूक अशा विविध मार्गांनी तो येत असतो, मात्र यामुळे संबंधित देशाचं सार्वभौमत्व कुठेतरी पणाला लागत असतं.
या लेखाच्या अनुषंगाने अभ्यासकांनी गेल्या दशकभरातील चिनी उभारलेल्या सहाशे प्रकल्पांचा अभ्यास केला. ज्यात चीनने विविध मार्गाने आपला सहभाग नोंदवला.
त्यातून निघालेला एकंदरीत निष्कर्ष म्हणजे हे प्रकल्प राबवण्यामागे चीनची प्रेरणा आणि चीनचे धोरण यात कमालीची पूरकता आहे.
जगभरात चीनने राबवलेले काही महत्त्वाचे प्रकल्प
चीनने सर्वप्रथम आजूबाजूंच्या देशांवर लक्ष केंद्रित करून गॅस आणि इंधन वाहून नेणाऱ्या ४१ पाईपलाईनचे काम हाती घेतले. एकप्रकारे त्यांनी यातून आपले इंधन स्त्रोत अधिक मजबूत केले.
जगभरात दळणवळणासाठी २०३ पूल, रस्ते आणि रेल्वेमार्गांची निर्मिती हा यातील दुसरा टप्पा सांगता येईल. यामुळे संबंधित देशांची पायाभूत सुविधा विकसित झाले असे भासत असले तरी चिनी उत्पादन जगभरात वाहून नेण्यासाठी ही यंत्रणा तितकीच आवश्यक होती.
जगभरातील विविध देशांमध्ये चीनने १९९ ऊर्जा प्रकल्प उभारले यात कोळशावर आधारित, नॅचरल गॅस, आण्विक आणि अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांचा समावेश होता.
यासाठी संबंधित देशाला कर्ज पुरवठा करणे, त्यानंतर चीन मधील तंत्रज्ञान वापरून चीन मधील कंपन्यांच्या सहाय्याने हे प्रकल्प उभारले जातात. यामुळे एक प्रकारे चीनच्या बाजारपेठेचा विस्तार होत असतो.
वन बेल्ट वन रोड हा चीनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तर सर्वांनाच ज्ञात आहे. यातून चीनच्या बाजारपेठेचा विस्तार आपल्या सीमेबाहेर अधिक सहज होणार आहे. चीनने पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे तंत्र आपल्या देशात विकसित करून, त्यावर हुकूमत गाजवत जगभर नेण्याचे ठरवले आहे आणि यात ते यशस्वी होतांना दिसत आहे.
कंबोडियामध्ये चींनने सात धरणांवर जलविद्युत प्रकल्प उभारले आहेत. शिवाय त्यासाठी अर्थपुरवठा देखील केला आहे. हे प्रकल्प किती मोठे आहे तर कंबोडियाची विजेची अर्धी गरज या प्रकल्पातून पूर्ण होते.
आफ्रिकेमध्ये चीनने मोठ्या प्रमाणात कोळशावर आधारित औष्णिक विद्युत प्रकल्पांची उभारणी केली आहे आणि त्यासाठी पैसाही पुरवला आहे.
जगभरात चीनने असे ६३ प्रकल्प उभारले आहेत. तुलना करायची झाल्यास, यातून निर्माण होणारे प्रदूषण हे स्पेन या देशातून निर्माण होणाऱ्या प्रदूषणापेक्षा अधिक आहे.
अजून एक उदाहरण घ्यायचे झाल्यास, झंबिया या देशामध्ये चीन पन्नास हजार आसन क्षमतेचे फुटबॉल मैदान उभारत आहे. यातून चीन नक्की काय साध्य करतो आहे तर ते म्हणजे नवीन मित्र मिळवणे आणि आपल्या बाजारपेठेचा विस्तार करणे.
चीनचे भू-राजकीय ध्येय
जगभरातील विविध क्षेत्रात चीनला मित्रांची गरज आहे. त्यासाठी चीन मोठे प्रयत्न करताना दिसतो. पाकिस्तान,श्रीलंका, मलेशिया येथे उभारलेले मोठी बंदरे ही त्याचीच उदाहरणे आहेत.
मध्य आशियातून येणारे तेल आणि आफ्रिकेत होणाऱ्या व्यापारासाठी तळ निर्माण करणे गरजेचे होते.ही त्यामागची रणनीती गुंतवणूक करून सहज साध्य होते आहे.
यामध्ये असणारे काही धोके
हे सर्व करत असताना चीन पतपुरवठा जरी करत असला तरी चीन आपल्या देशातील मजूर तिथे पाठवत असतो,यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीला वाव राहत नाही. शिवाय सुरक्षा मालकांकडे देखील दुर्लक्ष केले जाते.
प्रदूषण निर्माण करणारे कालबाह्य तंत्रज्ञान याला चीन मधील विरोध होताना दिसतो ते या देशांवर थोपवले जाते.
शिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर चीन भांडवल पुरवत असले तरी परतफेड न होण्याचा धोका आहेच. चीनच्या लोखंडी पडद्याआड या बाबी दिसत नसल्या तरी हा फुगा फुटला तर चीनच काय सारे जग यामुळे प्रभावित होईल.
महाकाय प्रकल्प आणि जोखीम
इतक्या मोठ्या प्रमाणावर हे प्रकल्प राबवले जात असले तरी संबंधित देशांना त्याची परतफेड करणे गरजेचे होऊन जाते. श्रीलंकेतील हरबनटोटा बंदराचे उदाहरण अलीकडचे आहे.
श्रीलंकन सरकार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरल्याने चीनने ९९ वर्षांचा करार करत हे बंदर आपल्या ताब्यात घेतले. याचे श्रीलंकेत आणि जगभरातील अभ्यासकांमध्ये मोठे पडसाद उमटले.
चीनने अवलंबलेल्या या नितीविरुद्ध जगभरातून टीकेचे सूर उमटत आहेत. अर्थात चीनला त्याची काही पर्वा नाही. न्यूयॉर्क टाइम्स मधील हा लेख अमेरिकेचा चीन प्रती असणारा दृष्टिकोनदेखील दर्शवतो.
अमेरिकेने देखील यापूर्वी हेच केले आहे, पण चीन हे सर्व अधिक आक्रमकपणे, महाकाय पद्धतीने आणि मोठ्या गतीने करताना दिसतो आहे.
ज्यावेळेस अमेरिका आपल्या हितसंबंधांसाठी अशा प्रकारची शिष्टाई करत असे त्याला “चेकबुक शिष्टाई” असे म्हणत.
चीन सध्या जगभर आपला प्रभाव वाढवण्यासाठी राजनैतिक सिद्धांताद्वारे जे साध्य होत नाही, त्या बाबी आर्थिक साह्य किंवा गुंतवणुकीच्या सहाय्याने साध्य करायचे, आपले प्रभाव क्षेत्र वाढवायचे हे धोरण राबवत आहे असा त्याचा अर्थ आहे.
भारतीय दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास हे भारतासाठी ही चिंताजनक आहे. भारतावर परकीय आक्रमणांचा मोठा इतिहास आहे. त्याची अनेक कारण आजवर सांगितली गेलीत.
त्यापैकी एक प्रमुख कारण म्हणजे आपल्याला विदेशी परिस्थितीचा व विदेशी राजकारणाचा पुरेसा अंदाज आला नाही.
इतिहासाकडून आपण जर काही शिकलो असलो तर चीनचे वाढते प्रभावक्षेत्र आपल्या केवळ चिंतेचा विषय नाही तर पर्यायी नीती विकसित करण्याच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय असला पाहिजे.
भारतावर मंदीचे सावट असताना तर हा धडा विशेष महत्वपूर्ण ठरणार आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.