Site icon InMarathi

एका अयशस्वी लेखकांच्या आयुष्यातला रक्ताळलेला अनपेक्षित थरार… “तिसरी घंटा”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : निलेश बामणे 

===

तिसरी घंटा हे जयेश शत्रूघ्न मेस्त्री यांच्या लेखणीतून जन्माला आलेले व त्यांनीच दिग्दर्शित केलेले आणि बिंग बँग थिएटर्स फाऊंडेशन प्रस्तुत दोन अंकी गूढ, थरारक आणि रोमांचकारी नाटक आहे.

या नाटकाची कथा फक्त चार पात्रांभोवती गुंफलेली आहे. एक लेखक, त्याची पत्नी, त्याचा मित्र आणि एक प्रेषित…

या नाटकाची कथा एका अयशस्वी लेखकाच्या आयुष्यावर बेतलेली आहे. खरं म्हणजे हे नाटक एका लेखकाची व्यथा, त्याची खंत, त्याची होणारी घालमेल, अवेहलना आणि तो समाजाला निस्वार्थीपणे इतकं काही देत असतानाही समाजात त्याचा होणारा शाब्दिक अपमान मांडताना दिसते.

नाटकाच्या सुरुवातीला लेखकाच्या पत्नीची त्याचा संसार चालविण्यासाठी होणारी धडपड दिसते आणि खरा लेखक नवरा म्हणून कसा नालायक ठरतो याचे वास्तववादी चित्र उभे केले आहे.

लेखकाची आर्थिक परिस्थिती कशी बेताची असते यावर भाष्य करण्यात आले आहे.

प्रत्येक लेखकाचे मोठा लेखक होण्याचे आणि आपल्या लिखाणाच्या जीवावर नाव, प्रसिद्धी आणि पैसा मिळविण्याचे स्वप्न असते पण हे स्वप्न फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लेखकांचेच पूर्ण होते.

 

 

काही लेखक माध्यमात लेखन करूनही प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचतात हे कोठेतरी खऱ्या लेखकाला मानसिक त्रास देत असतं. प्रत्येक लेखकाच्या मनाच्या गाभाऱ्यात अनेक कथा, त्या कथेतील पात्र लपलेली असतात.

अभिमन्यू हा एक लेखक आहे. पण अजूनही तो प्रसिद्धी झोतात आलेला नाही.

मुळात दैनंदिन आयुष्यातही त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्याला असे वाटते की तो एक महान लेखक आहे. परंतु त्याने लिहिलेल्या कथा अनेकांना पटत नाही आणि इतरांच्या मनाप्रमाणे त्याला लिहायचं नाही.

तो खाष्ट आहे, अजूनही आर्थिक अडचणींना तोंड देतोय. पण तरीही त्याची पत्नी मनीषा त्याला साथ देते. ती त्याच्याशी भांडते, वैतागते पण त्याला सोडून जात नाही. तिचं त्याच्यावर खुप प्रेम आहे.

आपल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकदा अभिमन्यू एक वेगळं नाटक लिहिण्याचं ठरवतो. हे नाटक रियॅलिस्टिक असेल असं त्याचं म्हणणं आहे आणि या नाटकामुळे त्याचं नशीब बदलेल असंही त्याला वाटतं.

मग तो “तिसरी घंटा” हे नाटक लिहायला घेतो आणि सुरु होतो एक रक्ताळलेला अनपेक्षित थरार…

 

 

सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी हे नाटक पाहायला हवेच पण लेखक असणाऱ्या प्रत्येकाने, लेखक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या आणि लिखाणाची आवड असणाऱ्या नव्हे तर वाचनाची आवड असणाऱ्या प्रत्येकाने हे नाटक पाहायलाच हवे!

या नाटकातील सर्वच कलाकारांचा म्हणजे नायकाच्या भूमिकेत असणारे गणेश घाडी, नायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या रेशमा मेस्त्री, मित्राच्या भूमिकेत असणारे अतुल कदम आणि प्रेषिताच्या भूमिकेत असणारे निनाद आरोंदेकर या सर्व कलाकारांचा अभिनय जिवंत वाटतो.

गणेश घाडी हे कसलेले कलाकार आहेत. “Zee युवा”वर गाजलेल्या रुद्रम मालिकेतील “जगताप” ही त्यांची भूमिक खूप गाजली.

या भूमिकेमुळे त्यांना ओळख मिळाली आहे. अभिमन्यू या लेखकाच्या भूमिकेत ते साजेसे वाटतात. रेशमा मेस्त्री या अभिनेत्रीचा अभिनय जीवंत वाटतो. त्यांची भूमिकेशी एकरुप होण्याची कला दिसून येते.

अतुल कदम हा नवतरुण अभिनेता आपली छाप पाडून जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेषिताच्या भूमिकेत असणारे निनाद आरोंदेकर यांच्या सहज सुंदर अभिनयाने तर कमालच केली आहे. तरुण, सुंदर व्हिलनची भूमिका त्यांनी उत्तमरित्या साकारली आहे.

 

 

या नाटकाची प्रकाश योजना आणि नेपथ्य अप्रतिम आहे. उन्मेष वीरकर यांनी ही जबाबदारी पेलली आहे. उन्मेष हे गेली २० वर्ष रंगभूमिची सेवा करीत आहेत आणि त्यांना प्रकाशयोजनेसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

हर्षद माने यांनी नाटकाला संगीत दिले आहे. संगीत हे सुद्धा नाटकातलेच एक पात्र वाटावे इतकी महत्वाची भूमिका संगीत पार पाडते.

बिग बॅंग थिएटर फाऊंडेशनने या नाटकाची निर्मिती केली आहे आणि निर्माते आहेत हिंदी सिने, नाट्य व मालिका जगतातले सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आकाशादित्य लामा…

नाटकातील प्रत्येक संवाद हृदयाला भिडणारा आहे. हे नाटक पाहताना दोन तास कधी सपंतात हे कळतही नाही म्हणजे नाटक मनोरंजन म्हणूनही उत्तम आहे याची ही पावती आहे.

जयेस मेस्त्रीने नाटकाने लेखन व दिग्दर्शनही केले आहे. या दोन्ही गोष्टीला त्याने न्याय दिलेला आहे.

 

 

जयेशच्या लिखाणातील सहजता आणि त्याला साजेल असे दिग्दर्शन आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. या नाटकाचा शेवट हे नाटक पाहणाऱ्या प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके चुकविणारा आहे…

त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषेवर, मराठी नाटकांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येकाने वेळ काढून हे नाटक पाहिल्यास एक उत्तम नाटक पाहिल्याचे समाधान हे नाटक पाहणाऱ्या प्रत्येकाला नक्की मिळेल.

पण हे नाटक पाहताना प्रत्येकाने ते लेखकाच्या भूमिकेत शिरूनच पहावे ही नम्र विनंती.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version