Site icon InMarathi

चीनचा एक “असाही” पराभव, भारतीय रिक्षांकडून!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

चीन जगात महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. भल्या भल्यांच्या आर्थिक नाड्या चीनच्या हातात आहे. असा हा आपला पक्का शेजारी कायम भारतावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतो. एका गोष्टीत मात्र आपण चीनला मागे टाकले आहे ते म्हणजे रिक्षांच्या बाबतीत!

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे असलेल्या संपूर्ण चीनमध्येही इतक्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्या नाहीत जितक्या भारतात ई रिक्षा आहेत!

भारतात विजेवर चालणाऱ्या गाड्या क्रांती करू बघत आहेत. पण ह्या गाड्या म्हणजे चारचाकी कार नसून भारतातील सर्वांना परवडणारे प्रवासाचे वाहन “रिक्षा” आहे आहे. आपल्या देशात अंदाजे १५ लाख बॅटरीवर चालणाऱ्या तीन चाकी रिक्षा आहेत.

हा आकडा चीनमध्ये २०११ पासून विकल्या गेलेल्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांच्या आकड्यापेक्षा जास्त आहे.

जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मार्केटने म्हणजे चीनने ह्या बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या खरेदीला चालना मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली. परंतु भारतातील ई -मुव्हमेंटला मात्र सरकार कडून फारशी मदत मिळाली नाही.

 

megatruckcollection.com

परंतु भारतातील धुराने कोंडलेल्या गर्दीच्या रस्त्यांवरून रिक्षा चालवताना रिक्षाचालकांच्या हे लक्षात आले की ई-रिक्षा ह्या साध्या रिक्षांपेक्षा कमी आवाज करतात, वेगाने चालतात, त्यांचा मेंटेनन्स कमी असतो, शिवाय ह्या रिक्षा प्रदूषण करीत नाहीत.

तसेच सायकल रिक्षांसारखे ह्या रिक्षांना श्रम लागत नाहीत. सायकलरिक्षा चालवण्यासाठी दिवसभर ताकदीने पायंडल मारावे लागते तसे ई-रिक्षा चालवण्यासाठी लागत नाही.

ह्या रिक्षा चालवण्यास सोप्या आहेत व म्हणूनच रिक्षाचालक जास्त प्रवाश्यांची ने आण करू शकतात. म्हणूनच रिक्षाचालक ह्या ई-रिक्षांकडे वळत आहेत.

भारतात दर महिन्यात ११ हजार नव्या ई-रिक्षा रस्त्यांवर उतरतात. २०२१ पर्यंत ह्या ई-रिक्षांचा खप नऊ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता ए. टी . किरनी ह्या कन्सल्टिंग फर्म येथे सल्लागार असणाऱ्या राहुल मिश्रा ह्यांनी वर्तवली आहे. तीन चाकी रिक्षांचे मार्केट १५० कोटींचे आहे.

ह्या गाड्यांची निर्मिती महिंद्रा अँड महिंद्र लिमिटेड, कायनेटिक इंजिनियरिंग ह्यासारख्या ऑटोमोबाईल कंपन्या करतात तसेच ह्या रिक्षांचे काही पार्टस चीनहून आयात केले जातात व ते भारतात असेम्बल केले जातात.

विजेवर चालणाऱ्या ह्या रिक्षा पेट्रोलवर चालणाऱ्या रिक्षांपेक्षा कमी खर्चात चालतात.

 

india.com

स्मार्ट-ई हे नवी दिल्ली येथे सेवा देणारे उबर सारखे ई-रिक्षासाठीचे ऍप आहे. ह्या ऍप द्वारे ८०० ई-रिक्षा नवी दिल्ली येथे सेवा देतात. ह्या ऍपचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक गोल्डी श्रीवास्तव म्हणतात की,

“ही परिवर्तन करण्याची लाईफटाईम संधी आहे. जेव्हा आपण ईलेक्ट्रिक मोबिलिटीविषयी बोलतो तेव्हा सरकार म्हणून तुम्ही भविष्यात उपयोगी पडणाऱ्या उत्पादनांना सक्षम बनवण्यासाठी काही प्रयत्न करीत आहात का ह्यावर लक्ष केंद्रित करायला हवे!”

जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील काही शहरे आहेत. ती शहरे म्हणजे नवी दिल्ली, वाराणसी, आग्रा, पतियाळा, श्रीनगर ही आहेत. भारतातील प्रमुख टॅक्सी सेवा देणाऱ्यांपैकी एक म्हणजे “ओला” ह्यांनी पुढच्या एप्रिल पर्यंत दहा हजार ई-रिक्षा आणण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑटोमोबाईल मार्केटमध्ये भारत चवथ्या स्थानावर आहे. म्हणजेच भारतात ऑटोमोबाईल मार्केट फार मोठे आहे. परंतु ह्या आधी ईलेक्ट्रिक कार ओनरशिपचे काही प्रयत्न केले गेले ते सगळे अयशस्वी ठरले. .

जिथे चीन मध्ये १. ३५ मिलियन ईलेक्ट्रिक कार विकल्या गेल्या आहेत तिथे भारतात मात्र फक्त सहा हजार ईलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली आहे असा BNEF चे आकडे सांगतात.

चीनमध्ये मात्र ऑटोमोबाईल कंपन्या केवळ तीन दिवसात इतक्या गाड्या विकतात. भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड २०२० मध्येच त्यांची पहिली ईलेक्ट्रिक गाडी आणणार आहेत.

 

DriveSpark.com

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शासनात मात्र ईलेक्ट्रिक गाड्यांना चालना मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. ईलेक्ट्रिक टॅक्सी व बसेस तसेच दुचाकी गाड्यांचा प्रयोग भारतात सुरु आहे. देशाचे अर्थ मंत्रालय येत्या पाच वर्षांत ४० बिलियन रुपये ह्या ईलेक्ट्रिक गाड्यांच्या चार्जिंग ईन्फ्रास्ट्रक्चर साठी खर्च करणार आहे तसेच ई बसेसना सबसिडी देण्याची सुद्धा शासनाची योजना आहे.

शासनाच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कान्त ह्यांचे म्हणणे आहे की,

“भारताने दुचाकी व तीनचाकी गाड्यांच्या विद्युतीकरणावर लक्ष केंद्रित करायला हवे.”

पूर्व दिल्लीच्या मेट्रो स्टेशनबाहेर ह्या ओपन एयर वाहनांची रांग आहे. ह्या वाहनांनी प्रवासी, शाळेचे विद्यार्थी , सामानसुमान व कधी कधी प्राण्यांची सुद्धा वाहतूक होते.

बत्तीस वर्षीय अनिल चौधरी ह्यांनी सायकलरिक्षा सोडून दोन वर्षांपूर्वी ई-रिक्षा घेतली. ह्यामुळे त्यांची मिळकत वाढली. आता थोडा काळ सुटी घेणे त्यांना परवडू शकते आणि पैसे साठवून ते बिहारमध्ये राहणाऱ्या त्यांच्या पत्नी व तीन मुलांना ते पैसे पाठवू शकतात.

त्यांनी आता दुसरी ई-रिक्षा घेतली आहे. ते सांगतात की,”दोन वर्षांपूर्वी मी माझ्या भावालाही येथेच बोलवून घेतले व त्याला माझी जुनी रिक्षा चालवायला देऊन टाकली. आणि मी दुसरी नवी रिक्षा घेतली.”

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी काही शहरे भारतात आहेत. ह्या प्रदूषित हवेमध्ये ह्या ई-रिक्षांमुळे सुधारणा होते आहे.

 

fastread.in

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सनुसार भारतात गेल्या वर्षात ६३५,६९८ इतक्या रिक्षांची विक्री झाली आहे. मागच्या वर्षाच्या विक्रीपेक्षा ही विक्री २४ टक्क्यांनी जास्त आहे. ईलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीला चालना मिळण्यात देशभरात चार्जिंग स्टेशन्सची कमतरता आणि बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्सची कमतरता हे दोन मोठे अडथळे आहेत.

भारतात केवळ ४२५ चार्जिंग स्टेशन्स लोकांच्या वापरासाठी उपलब्ध आहेत.BNEF च्या मते २०२२ पर्यंत सरकार आणि प्रायव्हेट कंपन्यांच्या प्रयत्नातून देशभरात एकूण २८०० चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध होतील.

सरकारच्या प्रयत्नांसाठी न थांबता काही कंपन्यांनी आपले खाजगी ईन्फ्रास्ट्रक्चर उभारणे सुरु केले आहे.

स्मार्ट ई व दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ह्यांनी भागीदारी करून १० स्टेशन्सवर चार्जिंगची व्यवस्था तयार केली आहे. २०२० पर्यंत त्यांना अशी २१४ चार्जिंग स्टेशन्स उभी करायची आहेत.

रिक्षाचालक मोठ्या प्रमाणावर ह्या ई-रिक्षांची खरेदी करू शकत नाहीत कारण त्यांना बँकांकडून कर्ज मिळणे कठीण जाते. त्यांची मिळकत कमी असल्याने त्यांना कर्ज देण्यात अडचणी येतात. असे शीगॅन ई वोल्ट्झ लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर शिशिर अग्रवाल ह्यांचे मत आहे.

 

 

ही कंपनी गुरगावला आहे व दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये ई -रिक्षांची विक्री करते. जर रिक्षाचालकांचा हा कर्जाचा प्रश्न सुटला तर ही कंपनी आपले ई -रिक्षांचे उत्पादन तिप्पट करू शकेल व ते दर महिन्याला किमान १००० रिक्षा तयार करू शकतील.

शिशिर अग्रवालांच्या मते ई-रिक्षांचे मार्केट हे प्रत्येक वर्षी २० दशलक्ष गाड्यांची विक्री इतके वाढू शकते. ते म्हणतात की “जर रिक्षाचालकांना चांगली सबसिडी मिळाली आणि कर्जाचे चांगले पर्याय उपलब्ध झाले तर ह्या मार्केटची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकेल.”

ई-रिक्षा जर प्रदूषणमुक्त तसेच स्वस्त असतील तर त्यांचा वाहतुकीसाठी जास्तीत जास्त वापर होणे ही काळाची तसेच आपलीही गरज आहे. ह्याने स्वस्तात चांगला पर्याय उपलब्ध होईल व पर्यावरणाचेही नुकसान कमी होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version