Site icon InMarathi

लॉकडाऊनच्या सरत्या वर्षाला निरोप देत घरातल्या घरात असे करा नववर्षाचे सेलिब्रेशन!

family time inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काय मंडळी? झाली का ३१ डिसेंबरच्या पार्टीची जय्यत तयारी? दरवर्षी हमखास विचारला जाणारा हा प्रश्न यंदा मात्र काहीसा दबक्या आवाजात ऐकू येतोय.

ऐरवी एखादं रेस्टॉरन्ट, पब, किंवा पिकनिक स्पॉटवर मित्रांसोबत धम्माल करत ३१ डिसेंबर रात्री आपण सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत अगदी धुमधडाक्यात करतो.

मात्र २०२० ने ज्या खूपसा-या गोष्टी बदलल्या त्यातील एक म्हणजे आपल्या गेटटुगेदरवर आणलेली बंदी. या वर्षभरात कोरोनाच्या संकटामुळे अनेक कुटुंब होरपळली. शासनाची धावाधाव झाली. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावले, काही बेरोजगार झाले तर काही तब्बल १० महिन्यांनतरही आपल्या कुटुंबापासून दूर अडकले आहेत.

 

एकंदरित हे वर्ष संपुर्ण जगासाठीच एक अवघड अशी परिक्षा ठरली. हे संकट दूर करण्यासाठी हरएक देशात लस उत्पादनाचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र तरिही कोरोनाचं सावट अद्याप दूर झालेलं नाही.

२०२० हे वर्ष कधी एकदा संपतंय ही भावना सर्वांच्याच मनात असल्याने त्याला निरोप देण्याची आतुरता दिसून येतीय. येणारं नवं वर्ष कोरोनाचं संकट दूर करेल, पुन्हा एकदा सारं सुरळीत होईल या आशेवर सर्वांनी नविन वर्षाचं स्वागत करण्याची तयारी केली असली तरी यंदा मात्र घरातच हे सेलिब्रेशन करण्यावर भर दिला जात आहे.


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कठोर नियम, पोलिसांची करडी नजर, कोरोनाचा फैलाव यांमुळे घरात सुरक्षितपणे, कुटुंबियांसह वेळ घालवून सेलिब्रेशन करण्याचा तुमचाही मानस असेल तर मग हा लेख तुम्ही वाचायलाच हवा.

कारण यंदा घरात मजा येणार नाही, दरवर्षीप्रमाणे एन्जॉय करता येणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर असे नाही. नीट योजना केली तर तुम्ही कुटुंबाबरोबर किंवा मित्रमंडळींबरोबर न्यू इयर्स ईव्ह घरातच छान सेलिब्रेट करू शकता.

१. आठवणींना द्या उजाळा

 

आपण आपल्या सुंदर आठवणी कायम आपल्याबरोबर राहाव्यात म्हणून खास क्षणांचे फोटो काढून ठेवतो. असंख्य आठवणी कॅमेऱ्यात कैद करून ठेवतो आणि नंतर विसरून जातो.

३१ डिसेेंबरच्या रात्री आपल्या कुटुंबाबरोबर जुने फोटो, व्हिडीओज, घरातील मुलांचे लहानपणीचे फोटो, आजी आजोबांचे तारुण्यातले फोटो बघून काही क्षण छान जुन्या आठवणींत रमू शकतो.

 

सिलेक्टेड फोटोंचा स्लाईड शो बनवून, तो टीव्ही वर लावून आवडत्या खाऊ आणि गप्पा ह्यांसह जगाच्या गोंगाटापासून लांब फक्त आपल्या कुटुंबाबरोबर असे निवांत सेलिब्रेशन करू शकतो.

२. गेट टुगेदर

महिलांना एरवी घरातल्या कामातून स्वत:साठी वेळच मिळत नाही. ह्या वेळी मात्र तुम्ही आपापल्या घरांतल्या महिलावर्गाला थोडा ब्रेक देऊन त्यांनाही मज्जा करता यावी म्हणून घरातल्या महिला वर्गासाठी एक गेट टुगेदर ठरवू शकता अर्थात यावेळी घरात गर्दी होणार नाही याची काळजी घ्या.

 

 

मैत्रिणींनो तुम्ही आपल्या एखाद्या मैत्रिणीच्या घरी भेटून तिथेच जेवून खाऊन रात्री कॉफी, गप्पा आणि आवडते संगीत किंवा आवडते चित्रपट ह्याचा आनंद लुटू शकता. काही खेळ खेळू शकता.

रात्रभर मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा आणि मज्जा करून सकाळी परत आपापल्या रुटीनला लागू शकता.

३. शेकोटी

 

तुमच्या नशिबाने जर तुमच्या घरी अंगण असेल तर तुम्ही कडाक्याच्या थंडीत शेकोटीचा आनंद लुटू शकता.

अंगण मोठे नसेल मित्रमंडळींना बोलावून घरातल्या गच्चीवर सुद्धा शेकोटी भोवती गप्पांचा फड रंगवू शकता.

शेकोटीबरोबर हुरडा पार्टी, किंवा कोळश्याच्या शेगडीवर घरातल्या घरात बार्बेक्यू तयार करून चमचमीत चटपटीत पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

घरातले पुरुष हे करून एक दिवस का होईना स्वतः मास्टरशेफ बनून घरातील महिला वर्गाला एक दिवस आराम देऊन स्वतःची पाककला आजमावू शकता.

३१ डिसेंबरच्या रात्री शेकोटीची उब, चटपटीत जेवण आणि गप्पा किंवा संगीत हे उत्तम सेलिब्रेशन होऊ शकते.

४. संगीत संध्या

तुमच्या कुटुंबातील कुणी गायक असेल किंवा वादक असेल तर घरातच मित्रमंडळी किंवा नातेवाईकांना बोलावून संगीताची मैफिल जमवू शकता.

हल्ली तर कराओकेमुळे घरातील सगळेच गायनाचा आनंद घेऊ शकतात. आपले आवडते गाणे सिलेक्ट करून ते म्हणू शकता.

 

 

लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच संगीताचा आनंद लुटू शकता. किंवा घरातील गायक, वादक कलाकार मंडळी आपली कला घरातल्या मंडळींपुढे सादर करून ३१ डिसेंबरची संध्याकाळ संगीतमय करून आनंद घेऊ शकतात.

५. थीम पार्टी

 

तुमच्या घरात किंवा कुटुंबात लहान मुले असतील तर त्यांच्यासाठी एक थीम पार्टी करू शकता. मोठ्यांसाठी सुद्धा एक थीम पार्टी आयोजित करता येऊ शकते.

ह्यात तुम्ही सिक्सटीज थीम, एखाद्या रंगाची थीम वगैरे वेगवेगळ्या थीम ठेवू शकता. त्याप्रमाणे पार्टीमधील जेवणाचे पदार्थ सुद्धा ठरवू शकता.

म्हणजे जर पांढऱ्या रंगाची थीम असेल तर सगळे पदार्थ पांढऱ्या रंगाचे, सगळ्यांनी पांढऱ्या रंगाचे पण क्रिएटिव्ह कॉश्यूम घालायचे असे काहीतरी ठरवू शकता.

रोजच्या धावपळीतून असेच मज्जा म्हणून किड्स थीम ठेवून परत लहान मूल होणे अनुभवू शकता.

ह्याशिवाय फटाके उडवण्यास परवानगी असेल तर फटाके उडवू शकता. डान्स आवडत असेल तर घरातच आवडीची गाणी लावून डान्स नाईट एन्जॉय करू शकता. (ज्याला नाचणे आवडत नाही त्याला डीजे बनवून कामाला लावू शकता).

 

 

आवडीचे जुने सिनेमे बॅक टू बॅक बघू शकता. त्याबरोबर आवडीचे खाणेपिणे करू शकता.

तुम्हाला बुद्धीबळ किंवा कॅरमची आवड असेल तर घरातल्यांबरोबर ते खेळू शकता किंवा ज्यांना हे आवडत नाही ते घरातल्यांबरोबर पत्त्यांचा डाव टाकू शकतात.

 

याप्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत ३१ डिसेंबरला बाहेर थंडीत, गर्दीत न जाता घरातच निवांत सेलिब्रेट करू शकता. मुख्यतः या सेलिब्रेशनमध्ये कोणाताही धोका नाही की गर्दीमुळे कोरोनाची बाधा होण्याची भिती नाही शिवाय भन्नाट कल्पना असल्याने कंटाळा येण्याचा प्रश्नच नाही.

अर्थात घरातल्या या छोटेखानी सेलिब्रेशनमध्येही जर बाहेरील मित्र, नातेवाईक यांना आमंत्रण देत असाल तर काळजी घ्या. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करा. घरात बाहेरून येणा-या व्यक्तींमुळे घरातील ज्येष्ठ, लहान मुले यांना धोका नाही ना याचा विचार करा आणि मगच इतरांना बोलवा.

नाहीतर एखादी संध्याकाळ फक्त आपल्या कुटुंबियांसोबत धमाल करायला काहीच हरकत नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version