Site icon InMarathi

धूम्रपान सोडायचंय, पण जमत नाहीये? या ८ गोष्टी तुम्हाला नक्की फायद्याच्या ठरतील

quit smoking inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘धुम्रपान करणे आरोग्यास घातक आहे’, ‘तंबाखूने कर्करोग होतो’ हे आपल्याला जागोजागी वाचायला मिळते. खरंतर हे अशी व्यसनं करणाऱ्या लोकांना वेळीच सावध करण्यासाठी लिहीलेले असते. पण त्याचा कितीसा फायदा होतो?

उलट अशा ठिकाणीही काय लिहिलेय याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून तिथेच सिगारेटचे झुरके मारणारे, पिचकाऱ्या मारणारे कित्येक बहाद्दर असतात.

त्यांना बघून इतरांनाच प्रश्न पडतो, की एवढे सावधगिरीचे इशारे मिळत असतानाही हे लोक कसे काय व्यसन करू शकतात. यांना स्वतःची काळजी वाटत नसावी का?

स्वतःची काळजी सर्वांनाच वाटते, पण एकदा लागलेली सवय मोडणे महाकठीण असते.

तरुणपणात एकदा चाखायला काय हरकत आहे? दु:खात असताना घ्यायला काय हरकत आहे? सगळेच घेतात म्हणून मीही ओकेजनली घेतल्याने काय फरक पडतो? असे म्हणत सुरु केलेल्या गोष्टी कालांतराने अगदीच सवयीच्या होतात.

थोडे थोडे म्हणत त्यांचे व्यसनांत कधी रुपांतर होते हे घेणाऱ्याला कळतही नाही. मग मात्र व्यसन करायचे नाही असे कितीही ठरवले तरी ते सुटता सुटत नाही. आज शेवटचे असे रोज म्हणत म्हणत तो शेवट होतच नाही.

 

 

व्यसन अचानक न केल्यानेही त्रास होतो. आणि मग वाटते त्रास सहन करण्यापेक्षा व्यसन केलेलेच काय वाईट?

तुमच्या शरीराला त्याची एवढी सवय झालेली असते, की तुम्ही कितीही ठरवले तरी ठराविक वेळांना ते तुम्हाला व्यसन करायची आठवण करून देतेच. आणि तुम्ही शरीराची इच्छा पूर्ण केली नाही की ते तुम्हाला त्रास द्यायला लागते.

कधी अचानक डोके दुखते, काहीच सुचत नाही, अशक्त वाटते, चिडचिड होते, कशात लक्ष लागत नाही.

एकदा का हा त्रास सुरु झाला की व्यसन करणे भागच असते. जर तुम्हीही अशा व्यसन सोडण्याच्या प्रयत्नात सतत अयशस्वी होत असाल, तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही उपाय आहेत.

या लेखात आम्ही सिगारेट सोडताना उपयोगी असणाऱ्या काही गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टी निश्चितच तुमची सिगारेट सोडवण्यास मदत करतील.

 

१. स्वतःच्या व्यसनाचा नीट अभ्यास करा

तुम्हाला कोणत्या वेळी, कोणत्या ठिकाणी सिगारेट घ्यावीशी वाटते याचे नीट निरीक्षण करा. कारण बरेचदा ठराविक ठिकाणी, ठराविक लोकांसोबत असताना जास्त इच्छा होते.

 

 

याशिवाय तुम्हाला दिवसातून कितीदा इच्छा होते? एका दिवसात कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती सिगारेट घेता याचाही अंदाज घ्या.

प्रत्येक वेळी सिगारेट घेण्याची इच्छा झाली की वेळ, जागा, संगत, भावनिक स्थिती या सगळ्यावर लक्ष द्या. याचा उपयोग तुम्हाला सिगारेट कशी सोडायची याचे नियोजन करण्यासाठी नक्कीच होतो.

 

२. पर्याय शोधा

जेव्हा जेव्हा व्यसन करायची इच्छा होईल तेव्हासाठी काहीतरी पर्यायी गोष्टी शोधा. एखादे चोकलेट, चुइन्गम, बडीशेप असे काहीतरी तोंडात टाका. त्यामुळे त्यावेळची इच्छा मारली जाईल.

 

graceadams.com

 

हे पर्याय स्वस्त तर असतातच पण घातकही नसतात. पण ते तोंडात टाकल्याने मोठा फायदा होतो.

 

३. हे टाळाच

व्यसनाचा अभ्यास केल्यावर तुमच्या लक्षात येते, की कोणत्या व्यक्तींसोबत असताना, कोणत्या जागेवर गेल्यावर सिगारेट घ्यायची इच्छा होते.

त्या जागा आणि व्यक्ती टाळाच. याने तुमचे सिगारेट घेण्याचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

 

independent.co.uk

 

४. आहार

तसे तर नेहमीच चांगला आणि आरोग्यदायी आहार घेणे आवश्यक असते. पण जर तुम्ही एखादे व्यसन सोडताय, तर आहाराकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे.

आरोग्यदायी आहार तुम्हाला टवटवीत ठेवण्यास मदत करेलच. पण सिगारेट घेण्याची इच्छा झाल्यावर, जर तुम्ही तुमच्या आवडीचे चांगले पदार्थ खाल्ले तर त्या इच्छेला आळा घालता येतो.

 

foodmatters.com

 

५. जवळच्या लोकांचा आधार

तुम्ही असे काहीतरी प्रयत्न करताय याची पूर्वकल्पना जवळच्या लोकांना देऊन ठेवा. म्हणजे ते वेळोवेळी तुम्हाला सिगारेट घेण्यास मज्जाव करतील.

 

 

शिवाय न घेतल्याने होणारा जो त्रास आहे त्याने बदललेले तुमचे वागणे ते नीट सांभाळू शकतील. ते तुमची अधिकाधिक काळजी घेतील.

६. व्यायाम

या काळात व्यायाम, योग, ध्यान करण्यास सुरु करा. जेणेकरून तुमचे तुमच्या विचारांवर आणि मनावर नियंत्रण येईल.

या काळातील जो काही त्रास असेल, तो सहन करण्याचा विश्वास तुमच्यात येईल.

 

patrika.com

 

एकदा का तुमच्या शरीरावर तुमचे नियंत्रण यायला लागले की तुम्ही लवकरात लवकर सिगारेट सोडू शकाल.

 

७. स्वतःला व्यस्त ठेवणे

 

shutterstock.com

 

तुम्ही जेवढे जास्त रिकामटेकडे असाल, तेवढी जास्त सिगारेट घेण्याची इच्छा होते. त्यामुळे आपले मन कामात रमवणे कधीही उत्तम.

सिगारेटची इच्छा झाल्यावरही जर तुम्ही स्वतःला कामात गुंतवले, तर त्या इच्छेवर नियंत्रण मिळवणे अधिक सोपे होईल.

 

 

८. योग्य सल्ला आणि उपचार

कितीही प्रयत्न करून जर तुम्हाला सिगारेट सोडणे शक्य होत नसेल तर व्यसनमुक्तीसाठी जरूर सल्ला घ्या. त्यासाठी बरेचसे डॉक्टर्स, सामाजिक संस्था, कौन्सिलर्स, दवाखाने उपचार देतात. त्यांची मदत घ्या.

त्यांना यातील अनुभव असल्याने ते जास्त योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. तुम्ही स्वतः तर प्रयत्न करायला हवेतच. पण जर ते शक्य होत नसेल तर इतर मदत जरूर घ्या.

 

yourhealth.net.au

 

कारण वेळीच जर व्यसन आटोक्यात आले नाही, तर त्याचे अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात.

सुरुवातीच्या काळात जास्त काही जाणवत नाही पण कालांतराने आरोग्य खूप बिघडते. त्यावेळी पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

त्यामुळे वरील गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version