चित्रपटातला नव्हे तर खराखुरा “बजरंगी भाईजान” आपल्याला नक्कीच प्रेरणा देणारा आहे
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
सलमान खानच्या बजरंगी भाईजानची कथा तर जवळजवळ सगळ्यांनाच माहिती असेल. घरच्यांपासून ताटातूट होऊन हरवलेली एक लहान मूकबधिर मुलगी सलमान खानला भेटते. तिला ना तिचे नाव सांगता येत ना तिच्या घरचा पत्ता!
तरीही “मुन्नी”ला घरात ठेवून घेऊन तिला तिच्या घराच्यांपर्यंत पोचवण्याचे बजरंगी भाईजान ठरवतो.
मुन्नी पाकिस्तानी असल्याचे समजल्यावर बजरंगी भाईजान हर तऱ्हेचे प्रयत्न करून, प्रसंगी स्वत:ला संकटात टाकून मुन्नीला तिच्या घरी सुखरूप पोचवतो अशी ह्या चित्रपटाची कथा होती.
ही काल्पनिक कथा अनेकांच्या मनाला भिडली. परंतु प्रत्यक्षात सुद्धा ह्या कथेशी साधर्म्य असणारी घटना घडलेली आहे. ती ही हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या जवळजवळ दशकभर आधी!
आज आपण त्या खऱ्याखुऱ्या बजरंगी भाईजानची कथा जाणून घेणार आहोत.
हा खरा खुरा भाईजान मात्र भारतातला नसून परदेशातील आहे आणि ह्याने एका पाच वर्षांच्या मुलीला सीयेरा लिओनहुन अमेरिकेत सुखरूप पोचवले होते.
२००३ साली एका महिलेने एका अनोळखी व्यक्तीकडे मदत मागून तिच्या पाच वर्षांच्या मुलीला युद्धग्रस्त सिएरा लिओनमधून अमेरिकेत पोचवण्याची विनंती केली होती.
ही मुलगी आजारी असल्याने तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळणे गरजेचे होते.
झी सीसे तिच्या माया ह्यूग्स ह्या आजारी मुलीबरोबर २००३ साली अमेरिकेला जाऊ शकत नव्हती. मायाची प्रकृती इतकी ढासळली होती की ती जवळजवळ मृत्यूच्या दारात पोचली होती.
अश्या परिस्थितीत सुद्धा तिची आई तिच्याबरोबर जाऊ शकत नव्हती, तेव्हा तिने एयरपोर्टवरच्या एका अनोळखी व्यक्तीकडे मदत मागितली.
आज ती लहान मुलगी तरुणी झाली आहे आणि सध्या कॅलिफोर्नियामध्ये वास्तव्यास आहे. दोन वर्षांपुर्वी स्वतःची ही कथा ट्विटरवर शेअर केली.
हे ट्विटर थ्रेड लगेच व्हायरल झाले आणि ते तिला मदत करणाऱ्या त्या अनोळखी व्यक्तीने सुद्धा शेअर केले.
मायाला मदत करणाऱ्या व्यक्तीचे नाव टॉम पेरिलो असे असून तो व्हर्जिनियाचा आहे.
माया तिची कथा शेअर करताना लिहिते की ,”२००३ मध्ये मी पाच वर्षांची असताना मी आणि माझी आई आफ्रिकेत गेलो होतो आणि तिथे ६ महिने राहणार होतो.माझी आई मूळची सिएरा लिओनची आहे.
परंतु चारच महिन्यांत तिथे भयानक काहीतरी घडले आणि आम्हाला तिथून निघावे लागले.
तेव्हा अत्यंत घातक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माझ्या आईला मला तिथून बाहेर काढायचे होते परंतु ती माझ्याबरोबर येऊ शकत नव्हती. त्यामुळे मला सुखरूप अमेरिकेत पोचवणारे कुणीतरी शोधणे फार गरजेचे होते.
तिने एयरपोर्ट वरील आमच्याचप्रमाणे अमेरिकेला जाणाऱ्या कृष्णवर्णीय लोकांकडे मला अमेरिकेतपर्यंत सोबत करण्याची विनंती केली परंतु प्रत्येकाने मदत न करू शकण्याची करणे दिली.
तेव्हा माझ्या आईने तिकीट काउंटरवर असलेल्या महिलेकडे अमेरिकेला कोण जाणार आहे ह्याची चौकशी केली आणि तिने एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या गोऱ्या माणसाकडे बोट दाखवून सांगितले की ती व्यक्ती अमेरिकेला परत जात आहे.
माझ्या आईची त्या व्यक्तीशी ओळख नव्हती, तरी आईने त्या व्यक्तीकडे मदत मागितली परंतु त्या व्यक्तीने माझ्या आईला सांगितले की प्रवासादरम्यान एका लहान मुलीची जबाबदारी घेण्याची त्याची मानसिक अवस्था नाही.
कारण नुकतेच त्याच्या आजीचे निधन झाले आहे व तो त्याच्या आजीच्या अंत्यसंस्कारांसाठी अमेरिकेस जात आहे.
माझ्या आईने त्या व्यक्तीला सगळी परिस्थिती सांगितली आणि मेरीलँड येथील आमच्या नातेवाईकांकडे मला पोचवण्यास सांगितले. त्या व्यक्तीने मदत करण्यास होकार दिला.
त्या व्यक्तीने एका रडणाऱ्या ,आरडाओरड करणाऱ्या पाच वर्षांच्या अनोळखी मुलीस अमेरिकेत सुखरूप पोचवण्याची जबाबदारी घेतली व ती अगदी पूर्ण व्यवस्थित पार पाडली.
संपूर्ण प्रवासात मी रडत होते परंतु मला शांत करण्यासाठी त्या व्यक्तीने मला गाणी म्हणून दाखवली. माझे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी, मला शांत करण्यासाठी अनेक प्रयत्न केले.
माझी आई गेली १५ वर्षे ह्या व्यक्तीला शोधण्याचा प्रयत्न करते आहे. आम्हाला त्याचे नाव किंवा त्याच्याबद्दल इतर काहीच माहिती नव्हते.
परंतु काही दिवसांपूर्वी माझ्या आईला त्या व्यक्तीचा शोध लागला . आमचे एक नातेवाईक त्या व्यक्तीबरोबर काम करीत असल्यामुळे आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकलो.”
मायाच्या आईने सांगितले की,
“मी बाजूला उभी राहून विमान उडताना बघितले. तेव्हा माझ्या लक्षात आले नाही की मी माझ्या पाच वर्षांच्या लहान मुलीला एका अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात दिले आहे. परंतु ते सगळे ऍड्रिनॅलीन रश मध्ये घडले. तेव्हा माझी विचारशक्तीच खुंटली होती आणि मला काहीही सुचत नव्हते. मी तेव्हा तो निर्णय घेतला आणि परत कधीही त्या व्यक्तीशी माझी भेट झाली नाही.”
टॉम पेरिलो हे अमेरिकन काँग्रेसचे व्हर्जिनियाचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या प्रशासनात काम केले आहे.
आता सीसे आणि टॉम परत संपर्कात आले आहेत. आणि टॉम त्यांच्या सिएरा लिओन ते अमेरिका ह्या प्रवासाबद्दल तिला माहिती देत आहेत.
सध्या टॉम हे ओपन सोसायटी फाऊंडेशनचे एक्झेक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. ते म्हणतात की,
“हा अगदी विलक्षण अनुभव होता. जणू अगदी चित्रपटाची कथाच आहे. फक्त ह्या चित्रपटाचा शेवट गोड झाला की दु:खी हे इतके दिवस मला ठाऊक नव्हते. जेव्हा लहानश्या मायाने तिच्या आजीकडे धावत जाऊन तिला मिठी मारली तो क्षण माझ्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांपैकी एक क्षण होता.”
मायाची ही हृदयस्पर्शी गोष्ट थोड्याच वेळात व्हायरल झाली आणि त्या अनोळखी मिस्ट्री मॅनपर्यंत पोचली. टॉम पेरिलो ह्यांनी हा संपूर्ण थ्रेड रिट्विट केला आणि मायासाठी एक संदेश सुद्धा लिहिला.
टॉमने लिहिले की, “माझ्या आयुष्यातील सर्वात विलक्षण अनुभवांपैकी एक अनुभव आज एक ट्विटर थ्रेड झालाय! आणि माया, मला अत्यंत आनंद झालाय की तू आज सुखरूप व आनंदात आहेस.”
मायाची ही गोष्ट व्हायरल झाली आणि अनेक लोकांच्या मनाला भिडली. आणि लोकांनी त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिल्या. एक व्यक्ती असे लिहिते की,
“ओह माय गॉड! माया तुझी आई म्हणजे मला ठाऊक असलेल्या सर्वात धाडसी महिलांपैकी एक आहे. आणि टॉम? एखाद्या अनोळखी व्यक्तीला अशी मदत कोण करतं? ही माणसे खरंच अद्भुत आहेत.”
तर एका व्यक्तीने असे मत दिले की टॉम पेरिलो हे खरंच ग्रेट आहेत. आपल्या लाडक्या आजी आजोबांना गमावणे हा खरंच एक दु:खद अनुभव असतो. हायडी नावाच्या व्यक्तीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की,
” काय ग्रेट गोष्ट होती! माझ्याकडे सुद्धा अश्या अनेक कथा आहे. आपल्या आयुष्यात एका दिवसासाठी का होईना महत्वाची असलेली व्यक्ती आपल्याला अनेक वर्षांनंतर भेटणे हा अनुभव विलक्षण असतो.”
माया लिहिते की ,”ते नसते तर आज कदाचित मी कशी परत आले असते कुणास ठाऊक! आम्ही त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला कारण त्यांचे नीट आभार मानायचे राहूनच गेले होते. टॉम हे खरंच अतिशय चांगली व्यक्ती आहेत. आजकाल अशी माणसे दुर्मिळ आहेत.”
खरेच आहे! माणुसकी हरवत चाललेल्या ह्या जगात लोक स्वतःच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांना टाळतात, तर अनोळखी व्यक्तीला मदत करणे तर खरंच दुर्मिळ आहे.
परंतु आजही अशी देवमाणसे शिल्लक आहेत जी दुसऱ्याला मदत करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. ह्या परदेशी बजरंगी भाईजानला एक “स्टँडिंग ओवेशन” तर मिळायलाच हवे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.