कोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने ताब्यात घेणारा ‘भारतीय मेजर’
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
१३ डिसेंबर १९७१ चा दिवस होता. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील युद्ध अगदी टोकाला पोहोचले होते. या युद्धाची खरी झळ पोहोचत होती ती भारत-पाक सीमेवरच्या गावांना. टूरटुक हे पाकिस्तानच्या अधिपत्याखाली असलेलं गाव.
त्या दिवशी त्यांना बातमी कळाली की, शेजारचे चालुंगका गाव हे भारतीय सैन्याने ताब्यात घेतले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण टूरटुक गावात भीतीचे वातावरण पसरले. गावाच्या सर्वात प्रतिष्ठीत व्यक्ति मौलवी अब्दुला कर्मापा यांना आता गावाबद्दल योग्य तो निर्णय घ्यायचा होता.
गोंधळलेल्या मौलवींची द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी गुलाम हुसेन हा माणूस पुढे आला. त्यांच्या विद्वतेमुळे त्यांना गावात अतिशय मान होता. चालुंगका गावाची बातमी समजताच त्यांनी गावकऱ्यांना शांत राहायला सांगितले.
गाव सोडून जाण्याची भाषा करणाऱ्यांना त्यांनी गप्प केले. त्यांनी गावकऱ्यांना पटवून दिले की, आज आपण पळालो तर आपल्याला आयुष्यभर पळतच राहावे लागेल.
अल्लाहवर विश्वास ठेवा, तो आपल्याला आपल्या घरातून बेघर करणार नाही…!
गुलाम हुसेन यांच्या बोलण्याने गावकऱ्यांना थोडा धीर आला. गावकऱ्यांचा त्यांच्यावर सर्वात जास्त विश्वास होता, कारण या माणसाने मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला होता आणि सर्वात प्रथम आपल्याच मुलीला शाळेत शिकायला पाठवले होते.
त्यामुळे त्यांच्या हिंमतीवर आणि दूरदृष्टीवर सगळ्यांचाचं विश्वास होता. याचवेळेस पाकिस्तानचे सर्व सैन्य पूर्व पाकिस्तानामधील युद्धामध्ये व्यस्त होतं, त्यामुळे सीमेवर पाकिस्तानी सैन्याचा मागमूसही दिसत नव्हता.
याचा फायदा घेऊन एलओसी ओलांडून भारतीय लष्कराच्या लडाख स्काऊटचे मेजर चेवांग रीन्चेन यांनी त्या रात्री अचानक टूरटुक गावात प्रवेश केला…!
आपल्या तुकडीला त्यांनी सकाळपर्यंत गावाला वेढा घालण्याचे आदेश दिले होते. कोणतीही घाई न करता सकाळी सैन्य येण्याची वाट बघायची असे त्यांनी ठरवले. तोवर त्यांनी शत्रूच्या गोटातच राहण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी गावातील गुलाम हुसेन यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आणि आसरा देण्याची विनंती केली.
एवढ्या रात्री मदत मागणाऱ्या मेजरला गुलाम हुसेन यांनी माणुसकीच्या नात्याने आत घेतले आणि थंडीने शहारून गेलेल्या त्यांच्या शरीराला ऊब मिळावी म्हणून त्यांना चहा देखील करून दिला.
त्यांनी मेजरची चौकशी केली. मेजर चेवांग रीन्चेन मुळचे लडाखचे होते. गुलाम हुसेन हे देखील फाळणीपूर्वी व्यापारानिमित्त लडाखला जायचे. त्यामुळे मेजर चेवांग रीन्चेन ज्या गावचे होते, त्या गावातील व्यक्ति देखील त्यांच्या ओळखीच्या होत्या.
त्यांनी त्या गावातील खूनझँग या आपल्या अतिशय घनिष्ठ मित्राची चौकशी केली, ज्यांना दोन मुले होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मेजर चेवांग रीन्चेन हे त्या दोन मुलांपैकीचं एक होते.
आपल्या मित्राच्या मुलाशी अचानक भेट झाल्याने गुलाम हुसेन यांना अतिशय आनंद झाला.
अजूनही पाकिस्तानी सैन्य गावात हजर झाले नव्हते. मुळात त्यांना भारतीय सैन्य घुसल्याची कल्पनाच नव्हती. तोवर भारतीय सैन्याने गाव ताब्यात घेतले होते.
दुसऱ्या दिवशी १४ डिसेंबर १९७१ चा दिवस उजाडला आणि त्या दिवशी भारतीय सैन्याची एक तुकडी गावामध्ये दत्त म्हणून हजर झाली.
अचानक आलेल्या भारतीय सैन्याला पाहून सर्वांचीच तारांबळ उडाली.
गुलाम हुसेन हे देखील कावरेबावरे झाले होते. आता भारतीय सैन्य काय करणार याचा विचार करून सर्वजण गर्भगळीत झाले असताना मेजर चेवांग रीन्चेन पुढे आले आणि हसत हसत म्हणाले, “वेलकम टू इंडिया” !
त्यांचे उद्गार ऐकताच गावकऱ्यांच्या लक्षात आले की, रात्रीच्या रात्रीच गावावर भारतीय सैन्याने ताबा मिळवलेला आहे. कालपर्यंत पाकिस्तानामध्ये मोडणारे गाव आज अचानक भारताच्या हद्दीत विराजमान झाले.
एका रात्रीत एलओसी १२ किमी एवढ्या मोठ्या अंतराने सरकली. भारताचे अधिकृत नागरिक या नात्याने गावकऱ्यांना कोणतीही इजा पोहोचवली जाणार नाही.
तसेच त्यांच्या रक्षणासाठीचं भारतीय सैन्य येथे तैनात करण्यात आले आहे अशी ग्वाही मेजर चेवांग रीन्चेन यांनी दिली. त्यांचे बोल ऐकताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि हसत हसत त्यांनी हा अमुलाग्र बदल स्वीकारला.
भारतीय युद्ध इतिहासातील ही एकमेव घटना आहे जेथे एका मेजरने कोणत्याही मनुष्यबळाविना, शस्त्रांचा वापर केल्याविना आणि भारतीय लष्कराच्या सहाय्याविना केवळ ५ तासांमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून त्यांचे गाव काबीज केले.
हे एकच गाव नाही तर त्यासोबत तयाक्षी आणि थांग ही दोन गावे देखील भारतीय सैन्याने ताब्यात घेतली.
हा पराक्रम इथेच संपत नाही. या अविश्वसनीय कामगिरीनंतर देखील मेजर चेवांग रीन्चेन यांच्या नेतृत्त्वाखाली अगाध शौर्य दाखवत भारतीय सैन्याने आझाद काश्मीर मधील ८०० स्केअर किमीचा भाग भारताच्या अधिपत्याखाली आणला.
१९७१ च्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानकडून काबीज केलेला हा सर्वात मोठा भाग ठरला.
कोणत्याही मदतीविना पाकिस्तानमधील गाव एकट्याने काबीज करणारा भारतीय मेजर म्हणून भारत सरकारने महावीर चक्र प्रदान करून त्यांचा यथोचित सन्मान केला.
आज टूरटुक हे लडाखमधील स्वर्ग म्हणून ओळखले जाते. जगभरातील पर्यटक केवळ टूरटुक पाहण्यासाठी म्हणून लडाखला भेट देतात.
भारतीय सैन्याच्या अतुल्य शौर्यगाथांपैकी ही अशी एक अविस्मरणीय शौर्यगाथा !!!
===
वाचा अजून एका वीराची शौर्यगाथा : काश्मीरला पाकिस्तानच्या तावडीतून वाचवणाऱ्या राजेंद्रसिंहांची अव्यक्त कथा!
===
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.