पर्रिकरांचं हे रूप पाहून एकीकडे कंठ दाटतो, दुसरीकडे अंगावर रोमांच उभे रहातात…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
राजकारणी आणि राजकारणाबद्दल आपल्या मनात नेहमी तिरस्कार असतो. राजकारणी पाच वर्षातून एकदा मत मागायला येतात आणि त्यानंतर गायब होतात अशी आपली धारणा बनून राहिलेली आहे.
अर्थात त्याला वस्तुस्थितीही काही प्रमाणात जबाबदार आहे हे नाकारून चालणार नाही.
असे असूनही काही नेते, काही राजकारणी असे असतात जे सामान्य माणसाची ही धारणा साफ चुकीची ठरवतात.
गोव्याचे मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रीकर आपल्या प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि कार्यतत्परतेसाठी ओळखले जातात. आपल्या कर्तव्याच्या आड ते कुणालाही येऊ देत नाहीत.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी लढा देत असूनही ते कॅन्सरला आपल्या कामाच्या आड येऊ नाहीत ह्याचे उदाहरण नुकतेच बघायला मिळाले.
पर्रीकर गेले काही महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी आहेत.
त्यांनी परदेशात उपचार सुद्धा घेतले आणि त्यानंतर परत प्रकृती अस्वास्थ्यामुळे सप्टेंबर मध्ये त्यांना नवी दिल्लीच्या AIIMS मध्ये दाखल करावे लागले होते.
कर्करोग म्हटला की सर्वसामान्य माणूस हात पाय गाळून सगळी आशा सोडून साहजिकपणे निराश अवस्थेत उपचार घेतो आणि एक एक दिवस ढकलतो.
कर्करोग हा काही साधा आजार नव्हे. ह्या आजारात शरीर आतून पोखरले जाते, माणसाला भयंकर अशक्तपणा येतो. वेदना होतात. आणि ह्याचे उपचार सुद्धा साधे नाहीत. उपचारांदरम्यान सुद्धा अत्यंत अशक्तपणा, वेदना, थकवा जाणवतो. माणसाचे जणू आयुष्यच थांबते.
साध्या रोजच्या आवश्यक क्रिया करणे सुद्धा कठीण होऊन बसते तर काम करणे तर सामान्य माणसाला अशक्य आहे.
पण जो माणूस मनाने खंबीर असतो, तो ह्या सगळ्यातून बाहेर पडून आपले रोजचे काम सुरूच ठेवतो. कॅन्सरपुढे हार मानत नाही. हेच पर्रीकर करीत आहेत. त्यांच्या कामाच्या आड त्यांनी कॅन्सरला सुद्धा येऊ दिले नाही.
फोटोत बघितले तर असे लक्षात येते की पर्रीकरांची प्रकृती फारशी बरी नाही. त्यांचे वजन घटले आहे. आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे आणि मुख्य म्हणजे चक्क नाकात एक नळी घातलेली असूनही ते कामात सक्रिय असल्याचे दिसत आहे.
सहकाऱ्यांबरोबर पुलाच्या कामाविषयी चर्चा करताना ते दिसत आहेत.
रविवारी गोव्याचे मुख्यमंत्री गोव्यात बांधल्या जाणाऱ्या जुआरी ब्रिज आणि तिसऱ्या मांडवी ब्रिजचे काम कुठवर आले आहे ह्याची पाहणी करण्यासाठी गेले.
ही पाहणी करत असतानाचे त्यांचे फोटो एएनआय ह्या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले.
फोटोत मनोहर पर्रीकर गोव्याच्या पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांशी ह्या कामाबद्दल चर्चा करत आहेत असे दिसते.
त्यांच्या नाकातून एक औषधाची नळी बाहेर आलेली दिसते आहे. कर्करोगावर उपचार घेत असताना, अशक्तपणा आलेला असूनही ते त्यांच्या कर्तव्यात कुठेही कसूर करत नसल्याचे दिसते. रविवारी त्यांनी पुलावर जाऊन तेथील पाहणी केली.
ह्या आधी सुद्धा पर्रीकरांचे उपचारादरम्यान काढलेले फोटो प्रसिद्ध झाले आहेत.
ते फोटो एकतर त्यांच्या घरातील किंवा दवाखान्यातील होते. परंतु आता मात्र त्यांनी बाहेर पडून नव्या दमाने पुन्हा काम सुरु केले आहे असे ह्या फोटोंवरून दिसते.
शनिवारी सुद्धा ते केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर ह्यांच्याबरोबर गोव्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॅम्पसच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.
तेथे त्यांनी शिलान्यास केल्याचे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केले होते.
त्यांनी पोस्ट केले होते की NIT गोव्यामुळे येथे तांत्रिक उच्चशिक्षणाला शिक्षणाला आणखी वाव मिळेल कारण ४० टक्के जागा गोव्यातील विद्यार्थ्यांसाठीच आहेत.
पर्रीकरांचे कामात सक्रिय असल्याचे फोटो पाहून गोवेकरांना तर त्यांच्या मुख्यमंत्र्याबद्दल अभिमान वाटला असेलच शिवाय ते आता कामात सक्रिय आहेत म्हटल्यावर त्यांची प्रकृती सुद्धा सुधारते आहे अशी आशा ठेवायला हरकत नाही.
यापूर्वीही पर्रीकर यांच्या कार्यतत्पर नेतृत्वाची प्रचीती लोकांना आली आहे.
मुख्यमंत्री या राज्यातील सर्वोच्च पदावर असूनही त्यांचे राहणीमान, कार्यकर्त्यांशी, अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी वागण्या बोलण्याची पद्धत या गोष्टींनी सामान्य लोकांच्या मनात त्यांचे स्थान पक्के केले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री असताना तर त्यांनी शपथ घेतल्यानंतर शासकीय निवास नाकारून स्वतःच्या मालकीचा घरात ते राहिले.
फक्त मुख्यमंत्री असतानाच नव्हे, तर भारताचे संरक्षणमंत्री असताना देखील त्यांचे राहणीमान एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे होते.
अजूनही पर्रीकर फक्त इकोनॉमी क्लासने प्रवास करतात. राहत असलेल्या ठिकाणापासून मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी सकाळ वापरणारा मुख्यमत्री भारताने क्वचितच पाहिला असेल, पर्रीकर त्यापैकी एक आहेत.
राजकारणी आणि त्यानंतर मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून मिळणाऱ्या सर्व सुविधांना बाजूला सारत सामान्य माणसाचे जीवन जगणाऱ्या पर्रीकर यांच्यासारख्या नेत्यांची भारतात वानवा आहे.
त्यामुळे भारताला अश्या कार्यतत्पर आणि कर्तव्यनिष्ठ लोकांची गरज आहे.
पर्रीकरांनी प्रकृतीची काळजी घ्यावी व ठणठणीत होऊन परत त्यांच्या कामात पूर्वीसारखे सक्रिय व्हावे अशी कामना लोक करत आहेत. पर्रीकर सर – लवकर बरे व्हा! देशाला तुमची गरज आहे.
–
- साधेपणा आणि शिस्तीचे परफेक्ट संयोजन : मनोहर पर्रीकर
- लोकसत्ताचा पर्रीकर द्वेष: संपादक गृहपाठ करतात का?
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.