आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
भारतीय सैन्याला पराक्रमाचा मोठा इतिहास आहे. आजपर्यंत अनेक युद्ध आणि शांतता काळातही सैन्याने बजावलेली कामगिरी पाहता कुठल्याही भारतीयाला त्यांचा अभिमान वाटेल.
जेव्हा सैनिक शौर्य गाजवतो तेव्हा त्यांचा यथोचित सन्मान केला जात असतो. असाच एक सन्मान म्हणजे परमवीर चक्र!
परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार असून युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी बाबत हा पुरस्कार देण्यात येतो. आतापर्यंत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत.
यापैकी हा पुरस्कार मिळवणारे एक वीर आहेत सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे.
त्यांनी १९४८ च्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा पुरस्कार मिळाला.
२१ पैकी केवळ ७ जणांनाच हा पुरस्कार जिवंतपणी घेण्याचे भाग्य लाभले, यावरूनच कुठल्या खडतर परिस्थितीत हा पराक्रम सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांनी गाजवला असेल हे लक्षात येते.
भारत स्वतंत्र झाला पण फाळणीची जखम उरावर होतीच, इतकं पुरेसं नव्हतं म्हणून की काय पाकिस्तानने काश्मीर चा भूभाग बळकवायला सुरुवात केली आणि युद्ध सुरु झाले.
पाकिस्तानने दोन बाजूने आक्रमण सुरु केले होते. एक बाजू होती श्रीनगरची तर दुसरी बाजू होती जम्मू.
याबाजूने पाकिस्तानी सैन्य अखनूर – नौशेरा पर्यंत आले होते.सुरुवातीला भारतीय सैन्याने माघार घेतली होती. इकडे सैन्याला आगेकूच करावी म्हणून आदेश आपले आणि भारताने गमावलेले झंगर गाव भारतीय सैन्याने १८ मार्च, १९४८ रोजी परत मिळविले.
पाकिस्तानी सैन्य इथून पळाले मात्र त्यांनी राजौरी ते पूंछ हा राष्ट्रीय महामार्ग नष्ट केला.
पर्यायी मार्ग तयार करून पुढे जावे असा आदेश होता. १२ एप्रिल रोजी राजौरी काबीज केले गेले. त्याठिकाणी स्थानिकांवर पाकिस्तानी सैनिक अत्याचार करत असल्याने भीतीने लोक गावात नव्हते. पण भारतीय सैन्य पोहोचले आणि लोकं परतू लागली.
ही झाली एकंदरीत लढाईची रूपरेषा, यावरून ही एक साधी लढाई वाटते. पण हे इतकं सोपं नव्हतं. जो भूभाग पाकिस्तानने बळकावला होता तेव्हा भारतीय सैन्याकडून प्रतिकार होईल हे पाहून तेथील मार्गांवर भूसुरुंग पेरून ठेवले होते.
आता भारतीय सैन्याला पुढे जाणं अशक्यच होतं. एक तर भूसुरुंग होते आणि दुसरं म्हणजे हा सर्व टप्पा उखळी तोफा आणि यंत्रचलित बंदुकीच्या आवाक्यात येत होता.
अशावेळी भारतीय सैन्य पुढे सरकणार तरी कसं? त्यावेळेस रस्ता मोकळा करण्याची जबाबदारी रामा राघोबा राणे यांच्या इंजिनीअर युनिट कडे होती.
तेव्हा रामा राघोबा राणे यांनी पुढे जाण्यासाठी एक योजना आखली. त्यावेळेस असणाऱ्या स्टुअर्ट टँक्स च्या खाली सरपटत पुढे जायचं जेणेकरून बंदूक, उखळी तोफा यांच्या माऱ्यापासून बचाव होईल आणि भूसुरुंग शोधायचे, ते नष्ट करायचे आणि टॅंक पुढे न्यायचा.
यात खूप मोठी जोखीम होती. टॅंकच्या खाली सापडून चिरडण्याचा मोठा धोका होता शिवाय भूसुरंगाचा स्फोट होऊ शकत होता आणि शत्रूच्या माऱ्यापासून पूर्ण बचाव होईलच असं नाही.
पण अशा पद्धतीने पुढे जाण्याचा निर्णय झाला.
आता प्रत्यक्ष पुढे जाण्याची तयारी सुरु झाली. सर्वात महत्वाचं म्हणजे टॅंक आणि खाली सरपटत जाण्याचा वेग एकसारखा असणं महत्वाचं होतं. मग भूसुरुंग शोधले जायचे.
नसतील तर टॅंक पुढे जावा यासाठी टँकला दोन दोर बांधण्यात आले होते. एक डाव्या बाजूला तर दुसरा उजव्या बाजूला.
डाव्या बाजूचा दोर ओढून सिग्नल दिला जायचा की टॅंक पुढे न्या आणि उजव्या हाताचा दोर ओढला म्हणजे सिग्नल होता की टॅंक थांबवा. शिवाय हे सर्व वेगाने केलं तरी त्याला एक मर्यादा होतीच.
तेव्हा कुठलीही विश्रांती न घेता हे काम सलग ७२ तास चालू ठेवलं होतं.
हे सर्व करतांना हात पाय सोलले जात होते, भूसुरुंग पेरून ठेवले ती जमीन एकसारखी नव्हती. न जाणो अशा किती समस्या होत्या. पण जखमा, थकवा आणि इतर अडचणी बाजूला सारत हे युनिट आपलं कर्तव्य पार पाडत होतं.
झंगर गाव ते चिंगास असा रस्ता नष्ट झाल्याने पर्यायी जुना मुघल रस्ता वापरावा लागणार होता.
यादरम्यान बारवाली पर्वतरांगा जवळ आल्यावर पाकिस्तानकडून पुन्हा मोठा उखळी तोफांचा मारा झाला ज्यात स्वतः रामा राघोबा राणे जखमी झाले शिवाय त्यांच्या चार सहकाऱ्याना हौतात्म्य पत्करावं लागलं आणि काही जण जखमी झाले.
हौतात्म्य पत्करणारे हे वीर जवान आपले मराठी बांधव होते. आबाजी मोरे, रघुनाथ मोरे, सीताराम सुतार, केशव आंब्रे जखमी झालेले एम.के.जाधव.
भूसुरुंगाव्यतिरिक्त अनेक अडथळे होते ज्याचा सामना करावा लागत होता मात्र रात्री शत्रू पक्षाचा मारा लक्षात घेऊन केवळ तेवढा वेळ विश्रांती घेऊन सतत पुढे जाण्याचे काम सुरूच होते. रात्री चर खोदून टॅंक खाली विश्रांती घेतली जात असे. पुन्हा पहाटे पासून पुढचा रस्ता तयार करणे सुरु होत असे.
भीषण गोळीबार होत असताना रणगाड्याची आस घेउन त्यांनी अडथळ्यास सुरुंग लावून फोडून काढले व चौथ्या डोगरा बटालियनची वाट मोकळी केली.
चिंगास पासून महामार्ग होता मात्र तिथे पोहोचल्यावर लक्षात आलं की तो अजून खराब आहे.
तेव्हा नदीच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला. इथेही सत्वपरीक्षा सुरूच होती. दगडधोंडे, चिखल, पाणी सर्व काही अडथळे होते. ११ एप्रिल रोजी राणे पुन्हा एकदा युद्धभूमीवर पोचले आणि सतत सतरा तास काम करीत त्यांनी नौशेरा-राजौरी मार्ग बांधून काढण्याचे काम केले.
राणेंच्या या अथक परिश्रमामुळे राजौरी आणि चिंगासमधील असंख्य नागरिकांचे प्राण वाचले.
या चढाईमध्ये भारतीय सैन्याने ५०० पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले आणि अधिक शेकडो जखमी केले. मात्र शेवटी टॅंक १२ एप्रिल रोजी राजौरी येथे संध्याकाळी सहा वाजता पोहोचले. या युनिट वर असलेली जबाबदारी त्यांनी पार पाडली होती.
या पराक्रमाबद्दल त्यांच्या ३७ फिल्ड कंपनीला सन्मान मिळाले आणि सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे यांना परमवीरचक्र प्रदान करण्यात आले. हा पराक्रम गाजवला तेव्हा ते ३० वर्षांचे होते.
१९५० पर्यंत ते आपल्या ३७ फिल्ड कंपनीत कायम होते पुढे बॉम्बे इंजिनीअर ग्रुप सेंटर मध्ये त्यांनी आपली सेवा दिली. त्यांना परमवीरचक्र १९५१ मध्ये मिळाले.
ते मेजर म्हणून १९६८ मध्ये निवृत्त झाले मात्र १९७१ पर्यंत पुन्हा सेवा देऊन त्यांनी आपले देशाप्रती असणारी निष्ठा व्यक्त केली.
निवृत्तीनंतर ते पुण्यातच स्थायिक झाले. त्यांचे ११ एप्रिल १९९४ रोजी पुण्यातील सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
परमवीरचक्र विजेते सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे हे फक्त याच पराक्रमासाठी ओळखले जात नाही तर ब्रिटिश भारतात म्यानमार येथे जापान्यांविरुद्ध पराक्रम गाजवला होता.
१९६२ च्या हिंदू – मुस्लिम दंगलीला देखील निर्भयपणे सामोरे गेले होते. अशा या वीराला आपण आपल्या स्मृतीमध्ये कायमच जपून ठेवू.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले १५ तेलवाहू जहाजांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे दिली आहेत.
एम.टी. राम राघोबा राणे, पीव्हीसी हे जहाज ८ ऑगस्ट, १९८४पासून २५ वर्षे सेवेत होते. कारवार येथे आयएनएस. चपळ युद्ध संग्रहालयाजवळ राणे यांचा पुतळा आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.