महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाची बदनामी – व्यापक कटाचा भाग!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
गेली अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या कारणावरून महाराष्ट्रात नेहमीच महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाला टार्गेट केले जाते. डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या गटांचा नेहमीच शिक्षण विभागावर विशेष रोख असतो.
शाळा-कॉलेजात शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाबद्दलतर गेल्या अनेक वर्षात घडलेले वादंग पाहता, इतिहास विषय अभ्यासक्रमातून काढून टाकावा की काय? असं वाटायला लागलं आहे.
जो इतिहास शिकायचाय तो आपापल्या प्रिय फेसबुक/whatsapp पोस्टकर्त्यांकडून किंवा संघटनेकडून शिकून घ्यायला काय हरकत आहे?
आत्ताही असेच एक प्रकरण गाजते आहे. बातमी बघा :
ई-सकाळ – राष्ट्रमाता जिजाऊंचा पुस्तकात उल्लेख शिवाजी महाराजांच्या पत्नी म्हणून. (सकाळ च्या लिंकवरील बातमी काढून टाकण्यात आली आहे)
लोकसत्ता – ‘जिजाबाई शिवाजी महाराजांच्या पत्नी’ संस्कृत सारिका पुस्तकात तोडले तारे
सर्व प्रथम अशी चुकीची माहिती जाणून बुजून/खोडसाळपणे/अनवधानाने छापली गेली आहे त्याकरता संबंधित प्रकाशनाचा आणि लेखकाचा कडक शब्दात निषेध.
परंतु ही बातमी देताना या सर्व पोर्टल्सने किती अभ्यास किंवा संशोधन केले होते? शून्य!
Whatsapp वर मेसेज फिरू लागले आणि छत्रपतींचा अपमान केला म्हणून शिक्षण विभागाला शिवीगाळ सुरु झाली, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना टार्गेट करायला सुरुवात झाली. यात सद्य सरकारला झोडायची आयती संधी विरोधक, त्यांचे समर्थक सोडत नाहीत.
संस्कृतच्या सध्याच्या पाठयपुस्तकाचं सर्वच अभ्यासकांनी कौतुक केलेलं असून पुस्तकातील विविध पाठ, संस्कृत भाषेवर असलेला देवघरातली भाषा हा शिक्का पुसून टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अशी सुंदर भाषा शिकण्याची प्रेरणा देतात.
परंतु अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे शिक्षण विभागाला टार्गेट करणे, त्याआडून सरकारवर हल्ला करणे पूर्णतः चुकीचे आहे यातून भाषेबद्दल मनात कायमची अढि निर्माण होऊ शकते.
सत्य काय आहे?
१) संस्कृत सारिका(प्रथम आवृत्ती – २०१२) हे अकरावीच्या पाठ्यपुस्तकाचे आणि संस्कृत सारिका कृतीपुस्तिका या ११ वीच्या खाजगी प्रकाशनाच्या संस्कृत गाईडचे नाव आहे. हे गाईड याच वर्षी बाजारात आलेले आहे.
मूळ पुस्तकात कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ दिलेली नाही, हे पुस्तक गेली ७ वर्षे बाजारात आहे. परंतु हा मुद्दा कोणत्याही बातमीत आलेला नाही.
२) खाजगी प्रकाशनाच्या गाईडमध्ये काय लिहिले जाते याला महाराष्ट्राचा शिक्षण विभाग जबाबदार असत नाही. जी काही तक्रार असेल ती संबंधित प्रकाशनाकडे करून आपल्याला हवे ते बदल करून घेता येतील किंवा त्या प्रकाशनाविरुद्ध तक्रार करता येईल.
३) मुळात या प्रकरणाशी महाराष्ट्र शिक्षण विभाग किंवा राज्याच्या शिक्षण मंत्र्यांचा काडीचाही संबंध नसताना, त्यांना शिवीगाळ करणे, यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरणे अशा गोष्टी स्वीकारार्ह नाहीत.
जे लोक खरोखर छत्रपतींचा अपमान करतात त्यांना या राज्यात निवडून दिले जाते आणि शिक्षण विभाग, शाळा, शाळेतले शिक्षक, प्राध्यापक अशांवर सतत पाळत ठेवून लहान मोठ्या न घडलेल्या चुकांसाठीदेखील यांना धारेवर धरले जाते हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे वर्तन नाही, असो!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.