Site icon InMarathi

आपल्या आईवडिलांच्या तारुण्यातील हे १० चित्रपट आपल्या कल्पनेपेक्षा कितीतरी “मॉडर्न” होते…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

घरातल्यांबरोबर सिनेमे बघताना सगळे खुश होतील असे सिनेमे कमीच असतात. काही सिनेमे फक्त घरातल्या मोठ्यांना आवडतात आणि ते बघताना आजच्या तरुण मंडळींची चिडचिड होते, आणि जर सिनेमा तरुण प्रेक्षक डोळ्यापुढे ठेवून बनवला असेल तर मग आई बाबांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात.

“काय रे हे तुमचे हे सिनेमे, काय तो धांगडधिंगा, काय ते कथानक. काय हे विषय! आमच्यावेळचे सिनेमे बघा जरा. काय एक से एक विषय असायचे!”

आणि बहुतांश तरुण मंडळींच्या मनात येते,

“काय ते संथ सिनेमे आहेत! कोण बघेल तो फॅमिली ड्रॅमा ?”

अशी ही “जनरेशन गॅप” घराघरांत आढळते. पण मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे का की मागच्या पिढीच्या तरुणपणी असे काही सिनेमे येउन गेले ज्यांचा विषय किंवा मांडणी आजच्यापेक्षाही मॉडर्न होती.

ते विषय आजही आपल्या कल्पनेत नाहीत. आज ह्याच काही सिनेमांबद्दल जाणून घेऊया.

१. अंकुर

अंकुर ह्या शब्दाचा अर्थ सर्वांनाच माहिती आहे. अंकुर म्हणजे नव्याने रुजलेले बी! प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल ह्यांचा हा चित्रपट आहे. समांतर चित्रपटांची जेव्हा नुकतीच सुरुवात झाली तेव्हाचा म्हणजे ७० ते ८० च्या दशकातला हा चित्रपट आहे.

 

youtube.com

श्याम बेनेगल म्हटले की काहीतरी वेगळा आणि अर्थपूर्ण विषय असणार हे आजच्या तरुण मंडळीलाही ठाऊक आहे. त्या श्याम बेनेगलांचा हा पहिला चित्रपट आहे.

ह्या चित्रपटात शबाना आझमी, प्रिया तेंडुलकर व अनंत नाग ह्यांची प्रमुख भूमिका आहे.

ह्या चित्रपटाचा विषय अत्यंत गुंतागुंतीचा आहे. एका गावात लक्ष्मी व किष्टय्या हे दलित जोडपं सुखाने संसार करीत असतं. किष्टय्या हा मूकबधिर असतो. हे जोडपं गावातील श्रीमंत जमीनदाराकडे काम करीत असतं.

जमीनदारांचा मुलगा सूर्या ह्याचा बालविवाह झालेला असतो. एकदा शेतातून चोरी करताना किष्टय्या पकडल्या जातो आणि त्याला खूप मारहाण होते.

तो गाव सोडून ,बायकोला एकटीला सोडून निघून जातो. सूर्याला लक्ष्मी आवडू लागते आणि त्या दोघांचे अनैतिक संबंध सुरु होतात. ह्याला अर्थातच त्याच्या घरातल्यांचा विरोध असतो. जेव्हा मोठी झाल्यानंतर सूर्याची बायको त्याच्या बरोबर राहायला येते तेव्हा सूर्याला सरोज की त्याच्यामुळे गर्भार राहिलेली लक्ष्मी ह्या दोघींतून एकीला निवडण्याची वेळ येते. अशी ह्या चित्रपटाची कथा आहे.

२. त्रिकाल

ह्या चित्रपटात सुद्धा मानवी वर्तनाची कथा आहे. एक पोर्तुगीज कुटुंब नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या गोव्यात राहत असते. ह्या चित्रपटात लग्नापूर्वीची गर्भधारणा, लग्नाआधीची घुसमट, भूतकाळातील निर्णयांचा वर्तमानात त्रास होणे ह्या सर्व गोष्टी उपरोधिकदृष्ट्या मांडलेल्या आहेत.

 

naukrinama.com

हा सुद्धा १९८५ सालचा श्याम बेनेगलांचाच चित्रपट आहे.

ह्या चित्रपटात लीला नायडू, नीना गुप्ता, अनिता कंवर, सोनी राझदान, दलिप ताहिल आणि नासिरुद्दीन शाह ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा म्हणजे एक अंडररेटेड सटायर आहे.

३.इजाझत

१९८७ सालचा हा चित्रपट गुलझार ह्यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट सुबोध घोष ह्यांच्या जातुग्रिहा ह्या बंगाली कथेवर आधारित आहे. ह्या चित्रपटात रेखा, नासिरुद्दीन शाह आणि अनुराधा पटेल ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

ScoopWhoop.com

ह्या चित्रपटात एका विभक्त झालेल्या जोडप्याची कथा मांडण्यात आली आहे.

ह्या विभक्त झालेल्या जोडप्याची अचानक एका रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूममध्ये भेट होते आणि त्यांना आपल्या आयुष्याविषयी काही गोष्टी कळतात. फेमिनिझम हा शब्द आत्ता ट्रेंडिंग झाला आहे परंतु ह्या सिनेमात फेमिनिझम आणि मध्यमवर्गीय कुटुंबांत असलेली पितृसत्ताक पद्धती ह्याची झलक बघायला मिळते.

४. मंडी

श्याम बेनेगलांची ही आणखी एक अप्रतिम कलाकृती आहे. १९८३ साली आलेल्या ह्या चित्रपटात स्मिता पाटील, नासिरुद्दीन शाह, आणि शबाना आझमी ह्यांची प्रमुख भूमिका आहे.

 

youtube.com

ह्या चित्रपटात एका कुंटणखान्यात घडणारी कथा दाखवण्यात आली आहे.

हा कुंटणखाना शहराच्या मध्यभागी आहे आणि मध्यवर्ती जागेवर असल्याने काही राजकारणी लोकांना ही जागा बळकावायची आहे.

वेश्यांचे जीवन, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी, एकमेकांत असलेली स्पर्था, बाहेरच्या जगाची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी ह्या सगळ्याचे चित्रण ह्या चित्रपटात आहे.

५. निशांत

१९७५ सालच्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत श्याम बेनेगल व कथा विजय तेंडुलकरांची आहे. ह्या चित्रपटात गिरीश कर्नाड, अमरीश पुरी, शबाना आझमी, स्मिता पाटील, अनंत नाग आणि नासिरुद्दीन शाह आहेत.

 

midia.com

नासिरुद्दीन शाहांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ग्रामीण भागात श्रीमंत व प्रबळ लोकांकडून होणारे स्त्रियांचे लैंगिक शोषण हा ह्या चित्रपटाचा विषय आहे. भारतात अस्तित्वात असलेल्या सामंतवादावर हा चित्रपट भाष्य करतो.

६. अर्थ

असे म्हणतात म्हणतात की हा चित्रपट महेश भट ह्यांच्या आयुष्यावर आधारित आहे.

 

Alchetron.com

ह्या १९८२ साली आलेल्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट ह्यांचे आहे आणि स्मिता पाटील, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा , राज किरण आणि रोहिणी हट्टंगडी ह्यांच्या ह्यात प्रमुख भूमिका आहेत.

विवाहबाह्य संबंध हा ह्या चित्रपटाचा विषय आहे.

ह्यात कुठलेही पात्र खलनायक म्हणून दाखवलेले नाही. परिस्थिती व माणसाचे स्वाभाविक गुण-दोष ह्यामुळे त्याच्या आयुष्यात कशी वादळे येतात हे ह्या चित्रपटात उत्तमरीत्या दाखवण्यात आले आहे.

७. सारांश

सारांश हा सिनेमा अनुपम खेर ह्यांच्या उत्तम भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. हा अनुपम खेर ह्यांनी ह्या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

 

Spuul.com

महेश भट दिग्दर्शित हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला. अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी, निळू फुले, सोनी राझदान ह्यांच्या भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात एका मराठी कुटुंबाची कथा दाखविण्यात आली आहे.

एक वयस्क जोडपे मुंबईत राहत असते आणि त्यांच्या एकुलत्या एक तरुण मुलाच्या मृत्यूचे दु:ख ते पचविण्याचा प्रयत्न करीत असतात. ते त्यांच्या घरात एका स्ट्रगलिंग अभिनेत्रीला भाडेकरू म्हणून जागा देतात. तिचे एका नेत्याच्या मुलावर प्रेम असते परंतु मुलाकडे त्याच्या वडिलांना सांगण्याची हिंमत नसल्याने तो तिच्याशी लग्न करण्याचे टाळत असतो.

मुलाच्या मृत्यूमुळे जगण्याची इच्छा न उरलेले हे वयस्क जोडपे आत्महत्या करायचे ठरवतात. तेव्हा त्यांना कळते की त्यांच्या घरात राहत असलेली मुलगी लग्नाआधीच गर्भवती आहे.

अनुपम खेर त्या नेत्याशी तिच्या लग्नाबद्दल बोलायला जातात परंतु तो मुलगा त्या मुलीशी आपले संबंध नसल्याचे सांगतो. नेता अनुपम खेर व त्या मुलीला धमकी देतो आणि मुलीला गर्भपात करण्यास सांगतो. अनुपम खेर ह्यांना आयुष्य जगण्यास नवे कारण मिळते व ते त्या मुलीचे बाळ व त्या मुलींसाठी लढा देण्याचे ठरवतात अशी थोडक्यात ह्या चित्रपटाची कथा आहे.

८. मंथन

१९७६ साली श्याम बेनेगल ह्यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात भारताच्या दुग्धक्रांतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली कथा दाखवलेली आहे.

 

YouTube.com

ही कथा श्याम बेनेगल व विजय तेंडुलकर ह्या दोघांनी मिळून लिहिलेली आहे. “एकीचे बळ” हा संदेश ह्या चित्रपटातून मिळतो.

स्मिता पाटील व विजय कर्नाड ह्यांची ह्यात प्रमुख भूमिका आहे. गावातील जातीभेदापलीकडे जाऊन संपूर्ण गावाच्या व समाज्याच्या भल्यासाठी दूरदृष्टीने प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींचे ह्यात चित्रण करण्यात आले आहे.

९. मासूम

शेखर कपूर ह्यांचे दिग्दर्शन असलेला हा १९८३ सालचा चित्रपट आहे. ह्यात नासिरुद्दीन शाह व शबाना आझमी ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एका मध्यमवर्गीय घरात घडणारी ही कथा आहे.

 

fundabook.com

नवऱ्याचे अनैतिक संबंधातून जन्माला आलेले मूल स्वीकारण्याची पाळी जेव्हा एखाद्या स्त्रीवर येते ,तेव्हा तिची काय स्वाभाविक प्रतिक्रिया असते हे ह्यात दाखविण्यात आले आहे.

गुलझार ह्यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहिली आहे जी “मॅन ,वुमन अँड चाईल्ड ह्या एरिक सीगल ह्यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

स्त्रीला आलेली फसवणुकीची भावना, बसलेला धक्का, ते मूल सतत डोळ्यापुढे असल्याने तिची होणारी घुसमट, त्या निष्पाप मुलाची ह्यात काहीही चूक नाही हे कळत असून देखील त्याच्याशी नीट वागू न शकणे, ह्या सगळ्यामुळे मनात उठणारे वादळ हे उत्तम प्रकारे ह्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. विवाहबाह्य संबंधाचा कुटुंबावर होणार परिणाम ह्यात सुंदर प्रकारे दाखवलेला आहे.

१०. जूली

भारतात सामान्य घरांत आंतरजातीय -आंतरधर्मीय विवाह आजही मान्य होत नाहीत तर १९७५ साली आलेल्या ह्या चित्रपटाने खळबळ उडवून दिली असणारच!

 

zoom.com

आजही समाजात कुमारी मातेला सन्मान मिळत नाही उलट टीकेलाच सामोरे जावे लागते. ह्या चित्रपटात नायिकेचे व दुसऱ्या धर्माच्या नायकाचे एकमेकांवर प्रेम जडते. विवाहाच्या आधीच त्यांच्यात शारीरिक संबंध येऊन नायिका गर्भवती राहते आणि मुलाला जन्म देते.

आंतरधर्मीय विवाह व कुमारी माता हे दोन विषय ह्या चित्रपटात दाखविण्यात आले आहेत. के. एस. सेथुमाधवन ह्यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

तर असे हे काळाच्या पुढे असणारे मॉडर्न चित्रपट मागच्या काळात आले जे आजही बघण्यासारखे आहेत.

===

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

Exit mobile version