तैमूरच्या ‘बाललीला’, दीपिका-रणवीरचं लग्न, ह्यातच अडकलेल्या मीडियाचं करावं तरी काय?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
शाळेत असताना आपण सगळेच नागरिकशास्त्रात शिकलो की न्यायपालिका, अधिकारी वर्ग (कार्यकारी मंडळ), विधिमंडळ व प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत.
पण सध्या हा लोकशाहीचा शेवटचा स्तंभ कुठेतरी ढासळत चालला आहे असं वाटतंय, कारण नको त्या बाबतीत प्रसारमाध्यमांची ढवळाढवळ सध्या खूप खटकायला लागलंय!
प्रत्येकाला स्वतःचे अधिकारक्षेत्र नेमून दिलेले आहे आणि दुसऱ्याच्या अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ करू नये असे अपेक्षित आहे. परंतु ह्या अधिकारक्षेत्रातही सीमारेषा स्पष्ट नसल्याने ह्यांचे सहजरित्या उल्लंघन झालेले आपल्याला दिसून येते.
प्रसारमाध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. म्हणजेच लोकशाहीची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर सुद्धा आहे.
पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱ्यांना काय शिकवलं जातं? पत्रकाराने फक्त जे घडलं ते सगळं खरं नेमक्या शब्दांत जनतेपर्यंत पोचवायचे. प्रसंगी जनतेचे प्रबोधन सुद्धा करायचे. समाजात,राजकारणात जे काही चुकीचे सुरु आहे त्याबद्दल जनजागृती करायची.
कुठलीही बातमी पक्षपातीपणाने जनतेसमोर आणून जनतेची दिशाभूल करू नये. अशी आदर्श शिकवण पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना दिली जाते.
परंतु प्रत्यक्ष ह्या क्षेत्रात काम करताना असे दिसून येते की प्रत्येक माध्यम हे कुठेतरी पक्षपातीपणाने काम करीत आहे.
जनजागृती करण्यात फार कुणालाही रस नाही. जे चुकीचे सुरु आहे त्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपली व्यूअरशिप किंवा सब्स्क्रिप्शन कसे वाढेल, आपला बिझनेस कसा वाढेल ह्याकडे मीडिया हाउसेसचे लक्ष असते.
सध्या बातम्या बघू म्हटले किंवा सोशल मीडियाच्या खास करून हिंदी व इंग्लिश मीडियाचे न्यूज पेजेस बघितले तर काय दिसून येते?
तैमूरने फोटोग्राफर्सना कसे बाय बाय केले, तैमुर कसा हसतो, तैमूरने शाळेतल्या स्पर्धेत काय जिंकले, त्याच्या एका फोटोची किती किंमत आहे…
कुठली हिरोईन एअरपोर्टवर काय घालून गेली? दीपिका रणवीरच्या लग्नाचे/रिसेप्शनचे फोटो , प्रियांका -निकच्या लग्नाचे फोटो, त्यांनी कुठल्या कार्यक्रमाला कोणी डिझाईन केलेले कुठल्या रंगाचे कुठल्या मापाचे कपडे घातले होते, कुणाच्या लग्नाला कुठल्या सेलिब्रटीने हजेरी लावली होती?
नवीन कुठला स्मार्टफोन लाँच होणार आहे, त्यात काय फीचर्स आहेत, कुठल्या हिरोचा कुठला नवा सिनेमा प्रदर्शित होणार आहे, त्याचे फर्स्ट, सेकण्ड लुक्स,
त्यासाठी त्या सेलेब्रिटीने काय स्पेशल लूक ठेवलाय, बॉलिवूड इव्हेंट्स, ह्या अभिनेत्रीचे बोल्ड फोटो, त्या अभिनेत्रीचा ट्रॅडिशनल लूक, ह्या सेलेब्रिटीच्या लग्नाचे प्लॅनिंग, त्या सेलिब्रिटीच्या मुलांचे फोटो अश्याच बातम्या हल्ली ट्रेंडिंग असतात.
ह्या बातम्या बघितल्या, वाचल्या तर असे वाटते की देशात बाकी काही घडतच नाहीये. फक्त सेलिब्रिटींचे लग्न, त्यांच्या मुलांचे कार्यक्रम, त्यासाठीची तयारी, नवीन फोन लाँच इतकेच महत्वाचे इश्यू आहेत.
श्रीदेवी या प्रख्यात अभिनेत्रीच्या मृत्यूच्या वेळेस देखील याच माध्यमांनी नुसता हैदोस घातला होता, तिच्या मृत्यूचे कारण, तिने आत्महत्या केली असल्याची अफवा या अशाच प्रसार माध्यमांतून पसरली आणि गैरसमज प्रचंड वाढले!
त्यावर श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर यांना मीडियामध्ये एक जाहीर पात्र सुद्धा लिहावे लागले, पण प्रसारमाध्यमांना सध्या कसलेच भान राहिलेले नाही हे त्यांच्या बेजवाबदार वागणुकीवरून दिसून येते!
तसेच एखादा सेलिब्रिटी कुठल्या जिम मध्ये कधी, किती वाजता जातो, जाताना कोणत्या रस्त्याने जातो, कोणत्या गाडीने जातो, जिम ला जाताना काय कपडे घालतो, त्या कपड्यांचं ब्रॅण्डिंग या सगळ्यात खरतर प्रसारमाध्यमांना लुडबुड करायची काहीच गरज नाही!
तरी लोकांची आवड या नावाखाली या माध्यमांचा हा आचरटपणा चालू आहे आणि हे सेलिब्रिटी सुद्धा त्यांना चांगलीच साथ देतात आणि हा सगळा प्रकार बघून या माध्यमांवर विश्वास ठेवावा का हा प्रश्न आपल्याला भेडसावतो!
“जनतेला जे हवे असते ,तेच आम्ही दाखवतो. लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडते हीच उत्सुकता असते. आज आम्ही नाही दाखवले तर दुसरे कोणीतरी दाखवेल.
ये सब टीआरपी का खेल है. हा शुद्ध बिझनेस आहे आणि ज्यात फायदा आहे तेच आम्ही करणार आणि आम्ही नाही केले तर दुसरे कुणीतरी करणार आणि आम्ही स्पर्धेतून बाहेर फेकले जाणार! त्यामुळे आम्हाला हे करण्यावाचून पर्याय नाही!”
असा युक्तिवाद मीडिया कडून केला जातो. परंतु हा युक्तिवाद करताना हे लोक सपशेल विसरतात की मीडियावर कुठली जबाबदारी सोपवलेली आहे आणि आजच्या मीडियाचे काय चालले आहे?
आजच्या मीडियाला भ्रष्टाचार, महागाई, निवडणूक, घोटाळे, अर्थव्यवस्था, आजच्या शिक्षणपद्धतीमधील समस्या , आरोग्य, स्त्रियांचे-लहान मुलांचे प्रश्न हे आणि असे इतर सगळे महत्वाचे विषय सोडून तैमूरने शाळेत जाताना कुठले कपडे घातले हे महत्वाचे आहे?
सध्या भारतीय मीडियाचे स्टॅंडर्ड हे अत्यंत घसरलेले आहे. हा व्हायरस खरंतर ग्लोबल आहे आणि जगातील इतर भागात सुद्धा पसरलेला आहे.
जगात चर्चा करण्यासारखे ग्लोबल वॉर्मिंग, स्त्रियांची सुरक्षितता, पसरत चाललेले आजार, प्रदूषण असे असंख्य विषय असून देखील आपल्याकडे न्यूज चॅनेल्सवर कुठल्यातरी निरर्थक विषयांवरचे डिबेट्स चालतात .
निवेदकासकट बोलावलेली सगळी “मान्यवर” मंडळी तावातावाने नळावर भांडणं करावीत तसे आरडाओरड करत असतात आणि त्या चर्चेतून शून्य निष्पन्न निघतं.
न्यूज चॅनेल लावावे तरी तेच, आणि सोशल मीडियावर बातम्यांसाठी सबस्क्राईब केलेल्या न्यूज पेजेसवर बघितलं तर काय दिसतं? नव्या सिरियलचे प्रोमो, बिग बॉसमध्ये काय सुरु आहे, सिरीयलमध्ये कुठला नवा ट्विस्ट येणार? कुठल्या नव्या स्मार्टफोन मध्ये काय नवीन फिचर दिले आहे!
विश्वास नसेल बसत तर आत्ता असल्या पेजेसना भेट द्या आणि कुठल्या “महत्वाच्या” बातम्या वाचकांच्या/दर्शकांच्या माथी मारल्या जात आहेत हे बघा!
भारतीय इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि नव्याने उदयाला आलेल्या डिजिटल मीडियाचा सध्याचा फोकस बघता असे दिसते की त्यांना हे कळून चुकले आहे की भारतीय प्रेक्षक/वाचक दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे.
आणि ह्या प्रेक्षकांचा अटेन्शन स्पॅन हा अगदी कमी आहे. त्यांतील बहुसंख्य लोकांना गंभीर मुद्दे, समस्या ह्यांच्याशी देणेघेणे नसून त्यांना फक्त मनोरंजन हवे आहे आणि न्यूज चॅनेल्स ,न्यूज पेजेस ह्यांना एन्टरटेनमेन्ट चॅनेल्स आणि पेजेस बरोबर स्पर्धा करावी लागते आहे.
ह्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर क्वालिटी गयी भाड़ में असे म्हणत “निक -प्रियांकाच्या लग्नातील कपड्यांची माहिती” किंवा “तैमूरने उच्चारलेले नवीन शब्द” हे “ब्रेकिंग न्यूज” म्हणून आपल्याला बघायला मिळत आहेत.
प्रेक्षकांना मनोरंजनच हवे म्हणत हा लोकशाहीचा कमकुवत झालेला चौथा स्तंभ प्रेक्षकांना “खऱ्या महत्वाच्या बातम्या” सोडून केवळ मनोरंजन होईल असेच साहित्य लोकांपुढे ठेवत आहेत.
अरे पण ज्यांना मनोरंजन हवे असेल त्यासाठी वेगळे चॅनेल्स, पेजेस आणि साहित्य आहे! मीडियाकडून फक्त आणि फक्त खऱ्या बातम्या आणि घडामोडी समजणे, पक्षपात न करता खरी माहिती समोर आणणे, प्रसंगी जनजागृती करणे हे आणि इतकेच अपेक्षित आहे.
लोकांनाच हे आवडते असे म्हणून मीडिया स्वतःची जबाबदारी झटकून वाचक/दर्शकांवर सगळा दोष टाकून मोकळे होत आहेत. कारण त्यांना त्यांचा बिझनेस करायचा आहे.
लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे सगळ्या गोष्टी फक्त पुस्तकातच छान वाटतात म्हणून सपशेल धाब्यावर बसवून कालबाह्य करून टाकल्या आहेत.
आणि ह्या सगळ्यात महत्वाच्या बातम्या, समस्या मात्र दुर्लक्षित राहून हिप्नोटाईज झाल्यासारखे आपण प्रेक्षक/वाचक केवळ “तैमूरचे फोटो बघण्यात, दीपिकाच्या लग्नाच्या बातमीत, सेलिब्रिटीजच्या जिम च्या लूक्समध्ये आणि नव्या फोनच्या फिचर्समध्येच” रमलो आहोत नव्हे रमवले गेलो आहोत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.