आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सगळ्यांनाच रोजच्या त्याच त्याच धावपळीचा, कामाचा कंटाळा येतो. रोज रोज तेच काम, त्याच नेहमीच्या जागा, तीच तीच माणसं याने खूप वैतागायला होते. मग रोजच्या कामात बदल म्हणून सुट्टी घेतली जाते किंवा ती सगळ्यांनाच मिळते.
या सुट्टीत काय करायचे याचे प्रत्येकाचे वेगवेगळे नियोजन असते. काहींना घरातच राहून खूप दिवसांपासून राहिलेली कामे करायला आवडते. तर काहींना सुट्टीचा जराही वेळ वाया न घालवता लगेचच घराबाहेर पडायचे असते. पण प्रत्येकजण बदल म्हणून कुठेतरी जातोच जातो.
पुरेसे पैसे असणारे लोक नेहमीच नवीन कुठेतरी जाऊन सुट्टी आनंदात घालवण्याचा प्रयत्न करतात. याउलट काही लोकांना फिरण्यासाठी पुरेसे उत्पन्न नसेल तर ते वर्षानुवर्षे एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी पैसे जमवतात.
पण प्रत्येक जण आपापल्या परीने, आपल्या ऐपतीप्रमाणे बदल म्हणून कुठेतरी फिरायला जातोच जातो.
फिरायला जाण्याचा खरा उद्देश असतो तो नेहमीच्या चिंतांपासून, धावपळीपासून सुटका मिळवणे. तो थोडासा मिळालेला वेळ अधिकाधिक आनंदात कसा घालवता येईल याचाच प्रयत्न केला जातो. शिवाय इथे येऊन स्वतःला रिफ्रेश करून नव्या जोमाने परत काम करायचे असते.
त्यामुळे एक ट्रीप म्हणजे तन आणि मनाला आराम देऊन पुढील काही दिवसांसाठीचे एनर्जी ड्रिंक असते.
या सगळ्या सकारात्मक गोष्टी तेव्हाच साध्य होतात जेव्हा तुमची सहल व्यवस्थित आणि आरामदायक पार पडते. पण जर या नियोजनात काही गोंधळ झाला तर सगळ्यांचा हिरमोड होतो. पैसा आणि वेळ घालवून संकट विकत घेतल्याची भावना होते.
असे काही तुमच्या बाबतीत होऊ नये आणि तुम्ही जेव्हा फिरायला जाल तेव्हा तुम्हाला अधिकाधिक आनंद मिळावा म्हणून आम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत.
१. प्राधान्यक्रम ठरवून घ्या
तुम्हाला कशा ठिकाणी फिरायला जायला आवडेल, त्यासाठी तुमच्याकडे किती पैसा उपलब्ध आहे, तुमची सुट्टी किती दिवसांची आहे याचा आधी नीट विचार करा. त्यानुसार फिरण्याचे ठिकाण ठरवा. जर तुम्हाला फक्त आराम करण्यात रस असेल तर उगाच खूप लांब आणि पर्यटन स्थळी जाण्याला काही अर्थ नाही.
जर तुमची सुट्टी कमी असेल तर कमीत कमी प्रवासात जाता येण्यासारख्याच जागेला पसंती द्या. खूप लांब जाऊन कमी वेळ थांबून आले की सुट्टीचा आनंद कमी आणि प्रवासाचा शीण अधिक जाणवतो.
म्हणूनच तुमच्याकडे उपलब्ध पैसा, वेळ आणि तुमची आवड याची सांगड घालून तुम्हाला कुठे कुठे जायला आवडेल याचा नीट क्रम लावा.
२. व्यवस्थित माहिती घ्या
तुम्हाला वरील गोष्टींचा विचार करून कोणती ठिकाणे योग्य वाटतात अशी दोन तीन ठिकाणे ठरवा. मग तिथल्या हवामानाबद्दल व्यवस्थित माहिती घ्या.
तुम्ही जाताय तो काळ तिथे जाण्यास योग्य आहे का हे बघा. तसेच तिथल्या राहण्या खाण्याच्या सुविधांबद्दल व इतर सोयींबद्दलही माहिती घ्या. सगळ्या गोष्टी अनुकूल वाटतील अशा ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्या. नाहीतर तुमचा बराचसा वेळ ऐनवेळच्या नियोजनात वाया जाईल.
३. प्रवासाचे कपडे आणि साहित्य
जिथे जाताय तिथल्या हवामानानुसार कपडे तर घ्यावेतच पण तिथल्या संस्कृतीचाही विचार करावा. उगाच तिथे गेल्यावर आपण इतरांपेक्षा खूप वेगळे दिसतोय असा न्यूनगंड यायला नको.
कोणतेही कपडे घेताना ते जास्त तंग नसावेत कारण तिथे किती धावपळ होणार आहे याची आपल्याला कल्पना नसते.
प्रवासातील कपडे आणि इतर साहित्य जास्त महागडे घेण्याचे टाळावे. म्हणजे ते गहाळ झाले, खराब झाले तरी फारसे नुकसान होत नाही. खूप जास्त सामान घेण्याच्या फंदात पडू नये. कारण ते ओझे बाळगणे वैतागवाणे ठरू शकते.
४. विविध पर्याय
तुमच्याकडील पैसे वापरण्यासाठी जास्तीत जास्त पर्याय ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या खिशात जरी कितीही पैसे असले तरी सोबत ए.टी.एम. कार्ड, डेबिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग असे पर्याय असू द्या. कारण यातल्या कोणत्याही एका गोष्टीवर विसंबून राहून त्यात काही समस्या आली तर तुमची खूप फजिती होऊ शकते.
५. फक्त फिरण्यापेक्षा आस्वाद घेण्याला जास्त महत्त्व द्या
आलोच आहोत तर सगळेच बघून झाले पाहिजे असा दृष्टीकोन अनेकांचा असतो. अर्थातच पैसा आणि वेळ वसूल व्हावा असे सगळ्यांना वाटते. पण जर तुमच्याकडे कमी वेळ असेल आणि तरीही सगळेच बघण्याचा अट्टहास तुम्ही करत असाल तर तुम्ही आनंद गमावताय.
–
- कमी पैश्यात भारत बघायचा आहे, तर हे ‘बॅकपॅकर्स हॉस्टेल्स’ तुमच्यासाठीच आहेत
- पावसाळ्यात स्वतःच्या वाहनाने प्रवास करताना ह्या चुका आवर्जून टाळा..अन्यथा…!
–
याने तुम्हाला सहल आनंददायी तर नाहीच पण दगदगीची आणि नेहमीच्या नोकरीसारखी जबाबदारी वाटेल. त्यापेक्षा जो काही वेळ आहे त्यात आवडेल त्या जागा बघून, त्यांचा आस्वाद घेत तिथे रमण्यात , त्या अनुभवण्यात तुम्हाला निश्चितच अधिक चांगले वाटेल.
६. स्थानिक लोक
आपण जिथे फिरायला जातो तिथले लोक, त्यांचे वागणे बोलणे कधी थोडे तर कधी खूपच वेगळे असते. या वेगळेपणाची जाणीव ठेवून तुम्ही अगदीच परक्यासारखे वागलात तर त्यांनाही तुम्ही नवीन असल्याचे जाणवते. त्यामुळे ते तुमची मदत करण्यापेक्षा तुमच्याकडून जास्तीचा फायदा करून घेण्याचा विचार करू शकतात.
याउलट जर तुम्ही त्यांच्याशी मोकळेपणाने वागण्याचा प्रयत्न केलात तर ते तुम्हाला जास्त चांगली माहिती देतात. तुम्ही काय आवर्जून बघावे, खावे हे ही सांगतात. तुम्हाला परवडतील अशा गोष्टीही सांगतात.
७. खाद्यपदार्थ
ज्या ठिकाणी जाल तेथील स्थानिक किंवा प्रसिद्ध असणारे पदार्थ खाण्याला प्राधान्य द्या. कारण ती चव किंवा तो प्रकार तुम्हाला इतरत्र मिळेलच असे नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पदार्थ असल्याने ते चांगले असण्याची जास्त शक्यता असते. पण तुमचे नेहमीचे खाद्य जे तिथे स्थानिक नाही ते कदाचित बेचव आणि अस्वच्छ असू शकते.
८. खरेदी
हा तर सगळ्यांचा आवडता भाग. नवीन ठिकाणी बऱ्याच नवीन आकर्षक वस्तू बघायला मिळतात. शिवाय फिरायला आलोय तर पैशांचा विचार काय करायचा. आपण पुन्हा कधी येणार अशी समजूत घालून बरीच खरेदी केली जाते.
पण हे शक्यतो टाळाच. कारण हल्ली प्रत्येकच वस्तू सगळीकडे मिळते. नसेल मिळत तर ऑनलाईन खरेदीचा मार्ग असतोच. पण उगाच फिरण्याचा वेळ आणि पैसा खरेद्देत जातो. त्याने पुढचे नियोजन कोलमडण्याची शक्यता असते. त्यात तुम्ही तिथे नवखे असता त्यामुळे फसवणूकही होते. एवढे होऊन सबंध प्रवास ओझे बाळगावे लागते ते वेगळेच.
याशिवाय मोबाईल, कॅमेरा यामध्ये जास्त वेळ घालवू नका म्हणजे तुम्हाला अधिक आनंद घेता येईल. नेहमीपेक्षा जरा शांतही वाटेल.
लवकरात लवकर उठण्याचा प्रयत्न करा म्हणजे ज्या ठिकाणांवर नंतर गर्दी होते ती तुम्ही निवांतपणे बघून घेऊ शकत. शिवाय दुपारच्या उन्हात फिरण्यापेक्षा आराम करून संध्याकाळी पुन्हा बाहेर पडू शकता.
जर फिरण्याची आवड असेल तर राहण्याच्या सोयी सुविधांवर अधिक खर्च करू नका. रात्री झोपण्यापुरती सुरक्षित जागा पुरेशी असते.
वरील गोष्टींचा विचार करून एकदा तरी फिरायला जा. तुम्हाला नक्कीच नेहमीपेक्षा खूप निवांत आणि ताजेतवाने वाटेल.
–
- आता फिकर नॉट! रोड ट्रिप्ससाठी ही कंपनी देतेय महागड्या गाड्या अतिशय स्वस्त किंमतीमध्ये!
- या देशात सुट्टी घ्यायला नकार दिला तर दंड भरावा लागतो!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.