' कट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट – InMarathi

कट्टर धार्मिकांना न जुमानता, भारतात पुरोगामीत्वाची मुहुर्तमेढ रुजवणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्याची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतभूमी म्हणजे हजारो लाखो वर्षांचे सांस्कृतिक संचित आहे असे म्हणतात. अनेक परकीय आक्रमणे, स्थित्यंतरे, संक्रमणाचे काळ या सर्वातून जात भारत आज जिथे आहे तिथे पोहोचला आहे. स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून जगाच्या नकाशावर भारत आपले अनन्यसाधारण महत्व राखून आहे.

या देशात अनेक आक्रमणे झाली. अगदी सुरुवातीपासून ते इंग्रज आक्रमणापर्यंत. हे सर्व आक्रमक आपला काही एक ठसा भारतावर उमटवून गेले. आणि भारताने ते ठसे ‘अवघे विश्वची माझे घर’ या उक्तीनुसार स्वतःच्या अंगाखांद्यावर वागवले.

त्यातल्या चांगल्या वाईट अनुभवांची, प्रसंगांची शिदोरी प्रत्येक भारतीय नागरिकाला प्रेरणा, प्रसंगी धडे देत राहील अशी आहे. या एवढ्या वर्षांच्या सांस्कृतिक संचितात काही चुकीच्या प्रथा, परंपरा भारताने जपल्या.

माणसानेच माणसाला अमानवी आणि अमानुष वागणूक द्यायला शिकवणाऱ्या या प्रथा आणि त्या पाळल्या जाण्याचा संपूर्ण काळ म्हणजे भारताच्या इतिहासातील काळा अध्याय आहे असे म्हणावे लागेल.

अशा प्रथांपैकीच एक म्हणजे सतीप्रथा. विवाहित स्त्रीच्या पतीचे निधन झाल्यास त्या स्त्रीनेही पतीबरोबर चितेत उडी घेऊन आत्मदहन करून घेण्याची ही अमानुष प्रथा भारतात अस्तित्वात होती.

 

sati-inmarathi
cdn.spell-hub.com

ती समाजाच्या सर्व स्तरांत पाळली जात असे. स्त्री ही दुय्यम असून तिचे अस्तित्व पुरुषाच्या अस्तित्वाला बांधलेले आहे, आणि पुरुष तिच्यासोबत नसेल तर तिचे जगणे निरर्थक आहे हा असमानतेचा संदेश देणाऱ्या या प्रथेबद्दल भारतीय समाज कमालीचा कट्टर होता.

ही प्रथा बंद करण्याची गरज त्या काळच्या काही समाजसेवकांनी जाणली आणि भारतियांचा कट्टर विरोध पत्करून या प्रथेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचे धाडस दाखवले. राजा राममोहन रॉय हे या मोहिमेत सगळ्यात महत्वाचे नाव होते.

पण या मोहिमेचे यश कायद्यावर अवलंबून असल्याने प्रबोधनासह सती प्रथेच्या विरोधात ठोस कायदा होणे आणि ही प्रथा पाळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रत्येकाला त्या कायद्यातून कठोर शिक्षेची तरतूद होणे गरजेचे होते. हे काम केले बंगाल प्रांताचा प्रेसिडेंट असणारा इंग्रज अधिकारी लॉर्ड बेंटिक याने!

भारतावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य असताना इसवीसन १८१२ च्या पुढेमागे समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेला विरोध करत ती प्रथा बंद व्हायला हवी यासाठी चळवळ सुरू केली.

 

RajaRamMohan-roy-inmarathi
thehindu.com

कित्येक वर्षे चालत आलेल्या या प्रथेला आपल्याच समाजातील एक माणूस उठून विरोध करतो म्हटल्यावर लोकांच्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागणार हे तर स्पष्टच होते. आणि तसेच झाले. समाजाच्या सर्व स्तरांतून त्यांना प्रचंड विरोध झाला.

उदारमतवादी धोरण अवलंबत राजा राममोहन रॉय यांनी सुरुवातीला ही प्रथा बंद होण्यासाठी थेट कायदा करण्याच्या ऐवजी सामाजिक प्रबोधनातून लोकांशी चर्चा करत त्यांचे परिवर्तन घडवत ही प्रथा हळूहळू कमी करत नेण्याचे आणि शेवटी पूर्णपणे बंद करण्यासाठी आग्रह धरण्याचे ठरवले. हे करणे वरवर सोपे वाटत असले तरी खूप अवघड होते.

१८१८ साली राजा राममोहन रॉय यांनी या संबंधातील आपला पहिला प्रबंध ‘A Conference Between An Advocate For and An Opponent of the Practice of Burning Widows Alive’, हा प्रकाशित केला. तो बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित झाला.

सती प्रथेवर कोरडे ओढणाऱ्या या प्रबंधाने मुख्यतः उच्चभ्रू हिंदू समाजात खळबळ माजवून दिली. यावर झालेल्या चर्चेनंतर त्यांना आणखी एक प्रबंध याच विषयावर प्रकाशित करावा लागला. तो आला १८२० साली  ‘A Second Conference’ या नावाने.

सती प्रथेला पाठिंबा देणारा समाजातील सनातनी घटक आणि त्यांच्या कच्छपी लागून या प्रथेचे समर्थन करणारे लोक या सर्वांचा सामना राजा रामोहन रॉय यांना करावा लागला. पण हा संघर्ष अटळ होता. ते सतीविरोधात बोलत राहिले. “संवाद कौमुदी” या त्यांनी बंगाली भाषेत चालवलेल्या वृत्तपत्रातून सतीला विरोध करणारे अनेक संपादकीय अग्रलेख त्यांनी लिहिले.

पण हा लढा अजून निर्णायक म्हणावा इथपर्यंत पोहोचला नव्हता.

या संघर्षाला यश मिळवून द्यायचे असेल तर कायदा करण्याशिवाय पर्याय नाही हे राजा राममोहन रॉय यांनी जाणले. त्यांनीच स्थापन केलेल्या ब्राह्मो समाजाच्या वतीने ब्रिटिश प्रशासनाला ही प्रथा बंद व्हावी यासाठी कायदा करण्याची विनंती करण्यात आली.

इंग्रज राज्यकर्ते एतद्देशीय लोकांच्या धार्मिक श्रद्धांना धक्का लावून त्यांचा रोष पत्करण्याच्या तयारीत नव्हतेच. पण राजा राममोहन रॉय यांनी ही प्रथा बंद होण्याची गरज तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्याना समजावून सांगितली.

यादरम्यान लॉर्ड बेंटिंग हे बंगाल प्रशासकीय प्रांताचे गव्हर्नर होते. ही अमानुष प्रथा बंद होण्यासाठी कायदा करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

 

LordWilliamBentinck-inmarathi
www.victorian-era.org

शेवटी पंधरा वीस वर्षांच्या दीर्घ संघर्षानंतर ४ डिसेंबर १८२९ या दिवशी सती प्रथा विरोधी कायदा संमत करण्यात आला. या कायद्यानुसार सती प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली आणि आत्महत्येचा प्रयत्न या गुन्ह्यासाठी ज्या शिक्षेच्या तरतुदी होत्या त्या सतीप्रथेविरोधात लागू करण्यात आल्या.

सुरुवातीला हा कायदा फक्त बंगाल प्रांतात लागू करण्यात आला, पण एक वर्षाने म्हणजे १८३० साली ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतातील सर्व प्रांतात हा कायदा लागू करण्यात आला.

धार्मिक स्वातंत्र्याला बाधा येऊ नये हा नियम ब्रिटिश कटाक्षाने पाळत. कारण भारतावर राज्य करायचे आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करायचा असेल तर स्थानिकांच्या श्रद्धांना धक्का न लावता त्यांच्याशी सामंजस्याने वागून आपला कार्यभाग साधून घेणे ही ब्रिटिश नीती होती.

या ब्रिटिश नीतीच्या विपरीत वागत लॉर्ड बेटिंग यांने हा कायदा केला आणि अमलात आणला ही सर्वात विशेष बाब होती. राममोहन रॉय यांनी या कायद्याला सार्वजनिक मंचावरून पाठिंबा जाहीर केला.

धार्मिक स्वातंत्र्यावर बाधा येते म्हणून अनेक याचिका या दरम्यान सरकारदरबारी दाखल होण्याची शक्यता होती. या याचिकांना कसे उत्तर द्यायचे याबाबत लॉर्ड बेंटिक आणि राजा राममोहन रॉय यांनी संयुक्त चर्चा केली. या चर्चेतुन त्यांनी आणखी एक प्रबंध लिहिला. ‘Abstract of the Arguments regarding the Burning of Widows Considered as a Religious Rite’ (1830).

या महत्त्वाच्या प्रबंधात त्यांनी सती प्रथा म्हणजे धर्माच्या नावाखाली खून करण्याची अमानुष प्रथा असल्याचे ठासून सांगितले.

 

SatiandBritishPolicies-inmarathi
www.victorian-era.org

कायदा झाला असला तरी समाजाने तो स्वीकारणे आणि मान्य करण्यासाठी बराच काळ जावा लागणार होता. यानंतरही त्यांनी आपली मोहीम चालू ठेवली. प्रबोधनाच्या मार्गाने लोकांचे मतपरिवर्तन करत हळूहळू ही प्रथा पूर्णपणे बंद करण्यासाठीची चळवळ त्यांनी चालूच ठेवली.

या सगळ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली ती गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिक यांनी. ब्रिटिश सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाऊन त्यांनी हा कायदा संमत केला आणि राजा राममोहन रॉय यांच्या सतीप्रथेविरोधातील चळवळीला कायदेशीर दिशा मिळाली ती लॉर्ड बेंटिक यांच्यामुळेच.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?