Site icon InMarathi

मानवी तस्करीच्या दुनियेचं, डोकं सुन्न करून सोडणारं वास्तव…

Pragya trafficing IM

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

मानवी तस्करी किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. आज सर्व जगापुढेच ही समस्या गंभीरपणे उभी ठाकली आहे. परंतु भारतासारख्या अमाप लोकसंख्येच्या विकसनशील देशांना तर ह्या समस्येची धग जास्तच प्रमाणात जाणवते आहे.

लहान मुले, अल्पवयीन मुली, स्त्रिया तसेच स्वस्तात राबणारे कामगार ह्यांची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.

परदेशात कमी पगारावर राबणारे कामगार मिळत नाहीत म्हणून इतर देशातून बेकायदेशीर रित्या कामगार आणण्याचे प्रमाण फार मोठे आहे.

पण ह्याही पेक्षा मोठा आणि गंभीर आहे सेक्स ट्रॅफिकिंगचा प्रश्न! व अजूनही ह्या गंभीर प्रश्नावर उपाय आपल्याला सापडलेला नाही.

फराख अली गायेन हा एक सामान्य दिसणारा बावीस वर्षीय युवक पश्चिम बंगालच्या अतिशय दुर्गम भागात राहतो. एका चहाविक्रेत्याचा हा सामान्य मुलगा वरकरणी सामान्यच दिसतो परंतु त्याने पैसे कमावण्याचा त्याच्यापुरता एक मार्ग शोधून काढून तब्बल १३ लाख जमवले.

ह्या दुर्गम भागात राहणाऱ्या केवळ बावीस वर्षाच्या युवकाकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली असेल? त्याने हे १३ लाख रुपये अनेक मुलींची विक्री करून मिळवले आहेत.

 


त्याने विकलेल्या मुलींपैकी बहुतांश अल्पवयीन मुली होत्या. ह्या बाजारात अल्पवयीन मुलींना सर्वात जास्त किंमत आहे.

असा एक फराख सध्या पकडला गेला. परंतु असे कितीतरी फराख आपल्या देशात मोकाट फिरून रोज नवे नवे सावज हेरत आहेत व अनेक अल्पवयीन तसेच सज्ञान मुलींचीही आयुष्ये बरबाद करत आहेत. पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा ह्या भागातून १६००० मुली २०१४ पासून बेपत्ता झाल्या.

 

 

स्त्रियांसाठी काम करणारी शक्ती वाहिनी ह्या NGO ने मागील १८ महिन्यात ३०० मुलींची ह्या नरकातून सुटका केली आहे व ५० तस्करांना गजाआड पाठवले आहे. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी हे बाल अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी ह्या समस्येविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ३५ दिवसांचे भारतभ्रमण केले.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यांच्या मते लहान मुलांवर हे अत्याचार म्हणजे एक प्रकारचा आजारच आहे जो आज जगभर पसरला आहे. ह्या आजाराबाबातीत सामान्य माणसाचे मौन व निष्क्रीयतेमुळेच ह्या आजाराचे स्वरूप अधिकाधिक गंभीर होत आहे.

 

 

फराख सारखे सामान्य तरूण ‘इझी मनीच्या’ लालसेपोटी ह्या गुन्ह्याच्या आहारी जात आहेत.

त्याने दिल्ली येथे राहणाऱ्या बहिणीचे मोठे घर, महागडे कपडे आणि भरपूर पैसा बघितल्यावर त्याच्याही मनात पैश्याविषयी लालसा निर्माण झाली. आणि म्हणूनच पैसे कमावण्यासाठी त्याने हा मार्ग निवडला.

तो गावातील अल्पवयीन मुलींना त्याच्या हिरो करिझ्मा ह्या बाईकवरून सांगितलेल्या पत्यावर फसवून नेऊन सोडत असे.

प्रत्येक मुलीमागे त्याला वीस ते पन्नास हजार मिळत असत. अल्पवयीन मुली त्याच्याकडील महागडी गाडी, मोबाईल व त्याच्याकडील महागड्या वस्तू पाहून भुलत असत व हा त्यांना फसवून विकून टाकत असे. ह्या मुली अत्यंत गरीब व दुर्गम भागातील असल्याने व त्यांना शहराचे, तेथील राहणीमानाचे आकर्षण वाटत असल्याने ह्याचाच गैरफायदा घेतला जाऊन त्या फसवल्या गेल्या आहेत.

 

ह्या सेक्स ट्रॅफिकिंगची एक दुर्दैवी बळी बबिता (नाव बदलले आहे) फक्त सोळा वर्षांची आहे. फराखने तिचा मोबाईल नंबर एका रिचार्जच्या दुकानातून मिळवला.

हे तस्कर दुकानदाराला फक्त १०० रुपये देऊन मुलींचे नंबर मिळवतात. हे त्यांचे अगदी रुटीन काम आहे. त्याने बबिताला जवळजवळ १५ फोन केले व तिला मथुरापुर रेल्वे स्थानकाजवळ भेटण्यासाठी राजी केले. तिथून तिला अन्य मुलींप्रमाणेच खाण्यातून किंवा सरबतातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून दिल्ली येथे आणले.

त्यानंतर फराखने बबिताला त्याच्या बहिणीकडे सोपवले व तिथून त्याच्या बहिणीने बबिताला आग्रा येथील एका कुंटणखान्यात विकून टाकले. स्वतःवर ओढवलेल्या ह्या परिस्थितीबद्दल बोलताना बबिता सांगते की,

“मला एका खिडक्या नसलेल्या व लहान लहान खोल्या असलेल्या इमारतीत कैद करून ठेवले होते. आम्हाला दिवसेंदिवस कैद करून ठेवत असत व फक्त गिऱ्हाईक आले की त्याला सेवा देण्यासाठी बाहेर सोडत असत. कधी कधी तर एका दिवशी पंधरा किंवा वीस गिऱ्हाईक सुद्धा यायचे.


 

आणि आमच्यापैकी कोणी विरोध करायचा प्रयत्न केला तर आम्हाला अमानुषपणे मारहाण करत असत. मी एका गिऱ्हाईकाच्याच फोन वरून घरच्यांना मी आग्र्यात असल्याचे कळवले.”

तिच्या घरच्यांनी हे शक्ती वाहिनीच्या लोकांना सांगितले व त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जेव्हा ह्या लोकांना बबिता सापडली तेव्हा तिची अवस्था अतिशय भयंकर होती. ती ओळखू सुद्धा येत नव्हती.

बबिताप्रमाणेच तिच्या गावाजवळील आणखी सहा मुलींचीही सुटका करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये मानवी तस्करीचे प्रमाण इतके जास्त आहे की दहापैकी सहा सुटका केलेल्या मुली ह्या पश्चिम बंगालच्या असतात. लहान मुला मुलींचे अपहरण करून त्यांना कुंटणखान्यात विकणे हा प्रकार इझी मनीसाठी अनेक लोक ह्या राज्यात करत आहेत.

 

 

शक्ती वाहिनीसाठी काम करणारे रिशी कांत हे गेली वीस वर्षे मुलींना ह्या नरकातून सोडवण्याचे काम करीत आहेत. ते म्हणतात की,

तस्करी करून आणलेल्या अल्पवयीन मुलामुलींना अनेकदा ड्रग्स दिले जातात व शरीराची वेळे आधीच व अनैसर्गिक वाढ होण्यासाठी हॉर्मोन्सची इंजेक्शने दिली जातात. ह्यामुळे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यांचे वजन वाढते व ती वयापेक्षा मोठी दिसायला लागतात.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मते दर वर्षी जवळजवळ १,००,००० अल्पवयीन मुले बेपत्ता होतात.

 

 

सत्यार्थी ह्यांच्या स्वयंसेवी संस्थेने दिलेल्या व्यावसायिक लैंगिक शोषणाबद्दलच्या अहवालात असे लिहिले आहे की, भारतातील व्यावसायिक लैंगिक शोषणाच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल ३५ बिलियन डॉलर इतकी आहे. हा आकडा अत्यंत भयावह आहे, कारण ३५ बिलियन डॉलर म्हणजे GDP च्या जवळजवळ दोन टक्के आहे.

हाच काळा पैसा लहान मुले व स्त्रिया त्यांच्यावरील अश्या प्रकारच्या लैंगिक अत्याचाराला कारणीभूत आहे.

ह्या सेक्स ट्रॅफिकिंगच्या बळी असणाऱ्या मुली गरीब घरांतून येतात. आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश ह्या राज्यांतून येणाऱ्या मुलींची संख्या जास्त आहे. गेल्या काही वर्षांत सेक्स ट्रेडिंगचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. शहराच्या मधोमध छुप्या पद्धतीने अनेक कुंटणखाने चालविण्यात येतात.

Global March Against Child Labor ह्या संस्थेच्या रिपोर्टप्रमाणे ह्या सेक्स ट्रॅफिकिंग मध्ये ९० टक्के बळी ह्या स्त्रियाच असतात.

 

 

भारतात सेक्स ट्रॅफिकिंगसाठी बाहेरून आणल्या जाणाऱ्या मुलींचेही प्रमाण जास्त आहे तसेच भारतातून बाहेरच्या देशात सुद्धा अनेक मुलींची विक्री होते. भारतातून १८ देशांत मुलींची विक्री होते. परंतु देशांतर्गत चालणाऱ्या ट्रॅफिकिंगचे प्रमाण ९० टक्के आहे. ह्यातील बहुसंख्य मुली गरीब घरांतून फसवून आणलेल्या असतात.

HAQ Centre for Child Rights ह्यांच्या रिपोर्टच्या मते संपर्काची मुबलक साधने, वेगवान दळणवळण आणि शहरांची वाढ ह्यामुळे राज्यांतर्गत तस्करी करणे हल्ली ह्या तस्करांसाठी सोपे झाले आहे.

 

 

अनेक “एजंट” जे खरं तर दलाल किंवा अपहरणकर्ते असतात, ते ह्या मुलींना शहरात नोकरी देण्याचे कबुल करतात व नंतर त्यांची रवानगी कुंटणखान्यात होते. तर पंजाब किंवा हरयाणासारख्या राज्यांत लग्नाचे खोटेच आश्वासन देऊन मुलींचे अपहरण करून त्यांना कुंटणखान्यात विकले जाते.

अनेकदा गरीब कुटुंबातील लोकांना खोटी माहिती सांगून त्यांच्या मुलींना मागणी घातली जाते. भोळीभाबडी माणसे मुलीचे तरी भले होईल म्हणून फार चौकशी न करता साधेपणाने लग्न करून देतात व त्या मुलींना नंतर त्यांचेच “नवरे” कुंटणखान्याचा रस्ता दाखवतात किंवा नोकर म्हणून त्यांची रवानगी एका कुटुंबात होते.

ह्या मुली एकतर घरात फुकट नोकर म्हणून तरी राबत असतात नाहीतर कुंटणखान्यात नरकयातना भोगतात.

टेक्नॉलॉजीच्या प्रगतीमुळे ह्या तस्करांना सावज हेरणे अतिशय सोपे झाले आहे. हल्ली सोशल मिडियावरून सुद्धा मुलींच्या फसवणुकीचे प्रकार घडत आहेत.

शक्ती वाहिनीचे कांत सांगतात की त्यांनी नुकतीच एका नागालँडच्या मुलीची सुटका केली. ती मुलगी आधीच विमानात बसलेली होती व एका दलालाच्या खोट्या फेसबुक प्रोफाईलवर विश्वास ठेवून त्याला भेटण्यास निघाली होती.

परंतु वेळीच कांत ह्यांनी तिची सुटका केली. कांत सांगतात की, एकट्या झारखंडमध्ये सेक्स स्लेव्हरीसाठी ३०० व्हाट्सअँप गृप आहेत.

 

तस्करांसाठी झारखंड म्हणजे सावजांचे माहेरघर. ह्या राज्यात शिक्षणाचे प्रमाण कमी तर गरीबीचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी मुलींना फसवून विकणे ह्या तस्करांना तुलनेने सोपे जाते. दहा वर्षांच्या मुलींनाही हे लोक कुंटणखान्यात विकतात. रांची जवळच्या खुन्ती जिल्ह्यात ७९ तस्करांना काही महिन्यांपुर्वी अटक करण्यात आली. हा भाग नक्षलवादी लोकांचा भाग म्हणून ओळखला जातो.

Global March Against Child Labour ह्यांच्या रिपोर्टच्या मते भारतीय मुलींची विक्री १६ ते १८ ह्या वयात होते. त्यानंतर ह्या मुलींना जवळजवळ दीड वर्ष कैदेत ठेवले जाते. म्हणूनच त्यांचे पुनर्वसन करणे अतिशय अवघड जाते. अनेक मुलींना तर त्यांच्या घरचेच लोक पैश्यांसाठी विकून टाकतात.

चार वर्षांपूर्वी दिल्लीतील एक दलाल पन्ना लाल व त्याची बायको ह्यांना पोलिसांनी अटक केली. ह्या दलालाची संपत्ती ६६ कोटी इतकी निघाली व हा पैसा त्याने तस्करी करून मिळवला होता.

झारखंड, पश्चिम बंगाल व छत्तिसगढ येथून दहा हजार मुलींना कामासाठी आणून त्यांची विक्री करणे ह्यातून त्याने इतका पैसा मिळवला. एका अहवालाच्या मते ह्या कुंटणखान्यांची वार्षिक उलाढाल दीड ते चौदा कोटी इतकी असते व ह्या इंडस्ट्रीची एकूण उलाढाल दोन लाख कोटींपेक्षाही जास्त असते. हा सगळा काळा पैसा आहे.

ह्या कुंटणखान्यात ज्या मुली असतात त्यातील वीस टक्के ह्या अल्पवयीन मुली असतात. ही आकडेवारी वाचून भल्याभल्यांच्या पायाखालची जमीन सरकली नाही तर नवल!

 

आपल्या आसपासची लहान मुले, मुली ह्यांना ह्या तस्करांपासून प्रचंड मोठा धोका आहे. तरीही हे रोखण्यासाठी हवी ती उपाययोजना केली जात नाही हे जास्त भयंकर आहे. जे ह्या क्षेत्रात मुला मुलींची सुटका करण्याचे किंवा त्यांचे पुनर्वसन करण्याचे काम करीत आहेत ते म्हणतात आता की हळूहळू परिस्थिती बदलते आहे.

सरकार व पोलीस आपल्या परीने काम करत आहेत तरीही अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हा सेक्स ट्रॅफिकिंगचा अमानुष प्रकार थांबायलाच हवा! त्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version