आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
शालेय अभ्यासक्रमात आपल्याला जो इतिहास शिकवला जातो त्या इतिहासात आपल्याला असे शिकवले गेले होते की इंग्रजांनी भारतवर्षात सत्ता मुघलांकडून घेतली. पानिपतच्या लढाईनंतर मराठे त्या पराभवातून सावरू शकले नाहीत – आणि –
मुघल व ब्रिटिशांच्या बक्सरच्या युद्धानंतर चारच वर्षात ब्रिटिशांनी संपूर्ण भारत आपल्या ताब्यात घेतला.
असाच इतिहास आपल्या मनावर शाळेत बिंबवला जातो.
ब्रिटिश व्यापारी बनून भारतात आले, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली आणि मुघलांच्या ताब्यातून हळूहळू सगळा भारत ब्रिटिशांनी गिळंकृत केला. हे सगळं ब्रिटिशांनी अगदी सहज साध्य केले.
मुघल आणि ब्रिटिशांमधील एक बक्सरच्या लढाईशिवाय दुसऱ्या कुठल्याही भीषण लढाई बद्दल आपल्याला शिकवले जात नाही.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
—
ह्या बक्सरच्या लढाईमध्ये मुघल बादशहा मारला गेला नाही आणि पकडल्याही गेला नाही. तसेच मुघलांनी ब्रिटिशांना विरोध केला असेल तर आपल्याला त्याचे पुरावे का सापडत नाहीत?
शोधले तरी सापडणार नाहित! कारण ब्रिटिशांनी भारतात सत्ता मुघलांकडून नाही तर मराठ्यांकडून हस्तगत केली.
मराठ्यांनी इंग्रजांना देशाबाहेर घालवण्यासाठी प्रयत्न केले परंतु इंग्रज भारतावर ताबा मिळवण्यात यशस्वी झाले.
मराठ्यांनी सतत ५० वर्ष चिकाटीने इंग्रजांविरुद्ध लढा दिला. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर मात्र ब्रिटिश वरचढ ठरले. तोवर संपूर्ण भारतावर ब्रिटिश ताबा मिळवू शकले नव्हते.
“बक्सरच्या युद्धानंतर भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला” हा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला जातो.
हा मराठ्यांचा अपमान आहे.
खरे तर भारतातले इतिहासकार आधीपासूनच मराठ्यांच्या इतिहासाबाबत पक्षपात करत आले आहेत. ह्या बाबतीत सुद्धा असेच घडले आहे.
खरा इतिहास आपल्यापासून लांब ठेवण्यात आला आहे.
मुघलांचा इतिहास सांगणारे मराठ्यांचा इतिहास मात्र सांगताना कुचराई करतात.
आपल्याला शिकवले जाते की १७६५ साली इंग्रजांच्या शासनाला प्रारंभ झाला. परंतु १७६१ ते १७९५ ह्या कालखंडात माधवराव पेशवे,नाना फडणवीस, महादजी शिंदे आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांचे शासन होते व त्यांचा भारताच्या राजकारणात सक्रिय सहभाग होता.
भारतीय भूमीवर ह्यांचे नियंत्रण होते. परंतु दुर्दैवाने ह्यांच्या योगदानाला इतिहासात स्थान दिले नाहीये.
१७९१ च्या सुमारास नाना फडणवीसांनी महादजी शिंदेंना एक पत्र लिहिले होते. त्यात असे लिहिले होते की
“साताराप्रमाणेच दिल्ली सुद्धा आपल्या साम्राज्याचा एक भाग आहे.”
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी ह्या काळात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला, नवीन देवळे बांधली, अनेक घाट बांधले. अहिल्याबाईंना हे करणे शक्य झाले कारण ह्या काळात भारतावर मराठ्यांची सत्ता होती.
मंदिरे फोडणाऱ्या मुघलांच्या काळात असे होणे शक्यच नाही. तसेच १७९५ साली मराठ्यांनी निजामाच्या नाकी नऊ आणले.
मराठ्यांचे साम्राज्य पुणे, इंदौर,बडोदा, ग्वाल्हेर ,नागपूर ह्या साम्राज्यांची एकजूट असलेले मोठे सैन्य होते. ग्वाल्हेरला महादजी शिंदे यांचे राज्य होते.
महादजी शिंदे ह्यांनी १७६५ नंतर ३० युद्धांमध्ये भाग घेतला. महादजींनी अलाहाबादला पळून गेलेल्या अंध व वृद्ध शाह आलमला दिल्लीत आणले.
महादजी शिंदे हे करू शकले कारण त्या काळात उत्तर भारतावर मराठ्यांचे नियंत्रण होते.
तसेच १७६१ ते १७७२ ह्या काळात माधवराव पेशव्यांनी हैदरअलीसारख्यांना हरवून दक्षिण भारतात साम्राज्य स्थापित केले होते.
१७७० पर्यंत शिंदेंशी एकजूट करून माधवराव पेशव्यांनी रोहिलखंड प्रदेशापर्यंत मराठा साम्राज्याचा विस्तार केला होता. १७७२ साली दुर्दैवाने वयाच्या केवळ २७व्या वर्षी राजयक्ष्मा ह्या रोगाने माधवराव पेशव्यांचे निधन झाले.
ह्याने मराठा साम्राज्याचे फार मोठे नुकसान झाले.
ब्रिटिश व मराठा ह्यांच्यात १७६० च्या दशकापासूनच शत्रुत्व निर्माण झाले होते. नंतरच्या ५० वर्षात मराठे व ब्रिटिश ३ मोठ्या लढाया लढल्या गेल्या. ह्या लढाया दिल्लीपासून ते कटक, गुजरात, सोलापूर ह्याठिकाणी लढल्या गेल्या.
ह्या काळात उडीसाचा भाग सुद्धा मराठा साम्राज्यात येत होता.
१७५१ साल पासून उडीसामधील हा भाग नागपूरचे भोसले सांभाळत होते. मात्र १८०३ नंतर देवगावच्या तहानंतर उडीसा भोसल्यांच्या ताब्यातून इंग्रजांच्या ताब्यात गेला.
मराठ्यांकडून देश ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिशांना ३ युद्धे लढावी लागली.
पहिले अँग्लो -मराठा युद्ध रघुनाथराव पेशवे इंग्रजांना जाऊन मिळाल्याने झाले.
रघुनाथराव पेशवे ब्रिटिश लोकांसह नाना फडणवीसांविरुद्ध उभे राहिले.
ईस्ट इंडिया कम्पनीने ह्या आधी सुद्धा पुण्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते.परंतु नाना फडणवीस व महादजी शिंदेंनी इंग्रजांचे प्रयत्न हाणून पाडले.
इंग्रजांनी अनेक लहान मोठी युद्ध केली. त्यातील सर्वात मोठे युद्ध १७७९ साली वडगाव येथे झाले. ह्यात मराठ्यांनी विजय मिळवला. ह्या विजयाचे स्मारक आजही पुण्याजवळील वडगाव येथे आहे.
१७८२ साली सालबाईच्या तहानंतर ह्या लढाया थांबल्या. परंतु मुंबई व काही प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात गेला.
हे युद्ध महादजी शिंदे व नाना फडणवीस ह्यांनी मोठ्या हुषारीने जिंकले व ब्रिटिशांना पाणी पाजले.
१७८९ साली नाना फडणवीस ह्यांनी एक योजना तयार केली होती.
नागपूरचे भोसले, हैदर अली व निजाम ह्यांच्यासह मुंबई व कोलकाता वर चढाई करून हा भाग आपल्या ताब्यात घेण्याची ही योजना होती जी दुर्दैवाने यशस्वी होऊ शकली नाही.
इंग्रज व मराठे ह्यांच्यात कल्याण, पनवेल,वसई ह्या ठिकाणी चकमकी झाल्या. परंतु निर्णायक युद्ध झाले ते पुण्याजवळ!
ह्या युद्धात मराठे जिंकले आणि ब्रिटिशांचे ह्यात फार मोठे नुकसान झाले.
त्यानंतर वीस वर्षांत महादजी शिंदेंनी लाल किल्ल्यावर भगवा फडकवला. मराठ्यांनी रोहिलखंडापर्यंत साम्राज्याचा विस्तार केला आणि एकजूट होऊन खर्डा येथे निजामाचा पराभव केला.
ह्याच काळात अहिल्याबाई होळकर ह्यांनी आपली संस्कृती व आपला धर्म जतन करण्याचे फार मोठे कार्य केले.
१८०३ सालापर्यंत अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस, सवाई माधवराव तसेच महादजी शिंदे ह्यांचे निधन झाले व आधीसारखी मराठा साम्राज्यात एकजूट राहिली नाही. मराठा सरदारांमध्ये मतभेद निर्माण झाले.
वसईचा तह झाला. पण बाजीराव दुसरे ह्यांना हा तह मान्य नव्हता. ह्याच दरम्यान उत्तर व दक्षिण भारतात अन्यायकारक ब्रिटिशांविरुद्ध असंतोष निर्माण झाला होता.
दौलतराव शिंदे ब्रिटिशांविरुद्ध युद्धात उतरले. ही लढाई अजंताजवळच्या आस्ये ह्या ठिकाणी झाली. ह्यात ब्रिटिश जनरल आर्थर वेस्ले ह्याचा विजय झाला.
ही लढाई जरी इंग्रजांनी जिंकली असली तरी ह्यात मराठ्यांनी ब्रिटिशांच्या नाकी नऊ आणले होते. तिकडे उत्तर भारतात मुघल बादशहा शाह आलम ने ब्रिटिशांना मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी आमंत्रित केले.
दिल्लीपासून जवळ असलेल्या प्रतापगंज येथे ही ब्रिटिश विरुद्ध मराठे ही लढाई झाली.
ह्यात दौलतराव शिंदेंच्या सेनेचे मोठे नुकसान झाले. ह्यानंतर ब्रिटिश व मराठे अलिगढ आणि आग्रा येथे परत समोरासमोर उभे ठाकले.
१८०३ साली दौलतराव शिंदेंनी आपले उरलेले सैन्य एकत्र करून परत लसवारी येथे इंग्रजांना आव्हान दिले. ह्या लढाईत शिंदेंच्या बाजूने नागपूरचे भोसले सुद्धा सहभागी होते. ही लढाई राजस्थानच्या अलवर गावाच्या जवळ झाली.
इतिहासातली ही एक महत्वाची लढाई आहे. परंतु आपल्याला ह्याबाबतीत काहीच शिकवले जात नाही.
ह्या लढाईत ब्रिटिशांच्या बाजूने अलवरचे सैन्य देखील होते. ही लढाई भीषण झाली.
मराठ्यांनी ब्रिटिशांना निकराचा लढा दिला व मराठ्यांच्या सेनेचे अपिरिमित नुकसान झाले.
लसवारीच्या युद्धानंतर १७ डिसेंबर १८०३ साली नागपूरच्या रघुजी भोसलेंनी इंग्रजांशी देवगावचा तह केला व कटकचा प्रांत तसेच उडीसाचे बालेश्वर सुद्धा ब्रिटिशांनी ताब्यात घेतले.
ह्या लढाईनंतर शिंदेनी अंजनगाव येथे ब्रिटिशांशी तह केला व बुंदेलखंड सुद्धा आपल्या हातून गेले.
ह्यानंतर यशवंतराव होळकरांनी १८११ पर्यंत म्हणजेच मृत्यूपर्यंत ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला. त्यांनी शिंदे व भोसले ह्यांच्यासह एकत्र येऊन ब्रिटिशांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न विफल ठरला.
ग्वाल्हेर व नागपूरच्या शासकांनी ब्रिटिशांशी तह केले तेव्हा यशवंतराव होळकर एकटेच इंग्रजांविरुद्ध मैदानात उतरले. त्यांनी चंबळ नदी व रामपुरापर्यंत नियंत्रण मिळवले.
नंतर त्यांनी दिल्लीवर सुद्धा आक्रमण केले. परंतु नंतर त्यांना नाईलाजाने ब्रिटिशांशी १८०५ साली राजघाटचा तह करावा लागला.
तरीही अजूनही संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवणे ब्रिटिशांना अजूनही शक्य झाले नव्हते. वसईच्या तहानंतर मराठा साम्राज्य पुणे व आसपासच्या गावांपुरतेच उरले होते.
१८१६ साली बाजीराव दुसरे ह्यांनी परत ब्रिटिशांविरुद्ध उभे राहण्याचे ठरवले. त्यांनी एक मोठे सैन्य उभारणे सुरू केले.
ह्या सेनेचे नेतृत्व बापू गोखले ह्यांच्याकडे होते. ह्याशिवाय बाजीरावांनी नेपाळ तसेच ब्रह्मदेशातील शासकांना एकजूट होण्यासाठी पत्र पाठवली.
आज जिथे पुणे विद्यापीठ आहे त्याच ठिकाणी ब्रिटिश व मराठे ह्यांच्यात लढाई झाली. ह्या लढाईत ब्रिटिश जिंकले आणि शनिवारवाडयावर युनियन जॅक फडकला.
१८१८ मध्ये परत कोरेगाव भीमा येथे युद्ध झाले परंतु ह्या युद्धाचा काहीच निकाल लागला नाही. ब्रिटिश लोक बाजीरावांना कैद करण्यासाठी जंग पछाडत होते. परंतु बाजीराव त्यांच्या हाती लागले नाहीत.
अखेर सोलापूर जवळ बापू गोखल्यांच्या नेतृत्वाखाली मराठे परत ब्रिटिशांविरुद्ध मैदानात उतरले.
मराठा सैन्याने इंग्रजांचा कडवा प्रतिकार केला परन्तु युद्धात बापू गोखल्यांना वीरमरण आले आणि नंतर मराठी साम्राज्याचा अस्त झाला.
ह्या सगळ्यातून हेच सिद्ध होते की ब्रिटिश मुघलांशी नाही तर सत्तेसाठी मराठ्यांशी लढले. आणि मराठ्यांनी कट्टर झुंज देऊन ब्रिटिशांच्या हाती सहजासहजी आपला देश येऊ दिला नाही.
अनेक वर्ष जमेल तसा प्रतिकार केला पण अखेर मराठ्यांची सेना कमजोर होत गेली अनेक ब्रिटिश काही स्थानिकांच्या मदतीने अधिकाधिक बलाढ्य होत गेले व अखेर त्यांनी भारतावर राज्य मिळवलेच!
परंतु ते राज्य त्यांनी मुघलांकडून मिळवले नाही, तर मराठ्यांकडून मिळवले – हे आपल्याला इतिहासात शिकवले जात नाही.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.