२२०० वर्षांपूर्वी, दलितांच्या हक्कासाठी उभा ठाकलेला सम्राट! समजून घ्या, पुरातन भारतातील १४ राजाज्ञा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
लेखिका : विभावरी बिडवे
सध्या नागरिकत्व, संविधान या विषयावरून देशात बरीच चर्चा, आंदोलने चालू आहेत. खरं तर, या गोष्टी केवळ समाज आणि देश सुसूत्रपणे चालवता यावा याकरता तयार केलेले आहेत. संहिता, संविधान या काही आधुनिक भारतीय इतिहासाशीच निगडीत नाहीये; अगदी पुरातन काळापासून, समाजात, नियम, आणि एका माणसाने दुसऱ्याशी कसं वागावं, याकरिता तत्कालीन राजे, समाजसुधारकांनी यासाठी मोलाची मदत केलेली आहे
जुनागढ येथे गिरनारच्या पायथ्याशी अशोकाचे शिलालेख बघितले. इसवी सन पूर्व अडीचशे ते तीनशे वर्ष जुने. म्हणजे आजपासून तेवीसशे ते चोवीसशे वर्ष जुने. अशोकाचे असे स्तंभ लेख, शिलालेख नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि भारतात गुजरात, आंध्र-तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, उत्तराखंड, महाराष्ट्र, दिल्ली असे सर्वदूर म्हणजे भारताच्या चारी कोपऱ्यात आढळतात.
या शिला वा स्तंभांवर सर्वसाधारण १४ राजाज्ञा कोरल्या आहेत.
हे सगळे शिलालेख आणि स्तंभलेख हे वर्दळीच्या जागी म्हणजे वाटसरू, तीर्थस्थाने वा उद्योगांची ठिकाणे अशा आसपास वाचले जावेत या हेतूने कोरून ठेवले आहेत.
हे लेख वेगवेगळ्या लिपीमध्ये आहेत. प्रामुख्याने ब्राह्मी लिपीत असले तरी अफगाणिस्तान मधला लेख ग्रीक लिपीत आहे. आणखी एका प्राचीन खरोष्ठी लिपीतही त्याचे लेख आढळतात.
या लेखांच्या सर्वदूर असण्यावरून आणि त्यावरील एकसारख्या राजाज्ञांवरून, ग्रीक लिपीवरून त्याचं साम्राज्य हे आज ज्याला आपण अखंड भारत म्हणतो असं विशाल होतं आणि उलट अर्थाने ह्या अखंड भारतावर त्याचा एकछत्री अंमल होता.
मी ह्याची अभ्यासक नाही तरी काही तरंग मनात निर्माण झाले. अशोक राजा पुढे बुद्धमार्गी झाला. ‘धर्म’ हा शब्द मुद्दाम वापरला नाही कारण जैन, बौद्ध अशा मार्गांचं आज जसं institutionalization झालंय तसं झालं नव्हतं असं मला वाटतं. त्यामुळे धर्मांतर, conversion अशा परिभाषेत, संकल्पनेत तेव्हा या सगळ्याकडे बघत होते असं मला वाटत नाही.
एका घरात आपण चारजण राहतो. एखाद्या मंदिरात गेलो की एकजण साष्टांग नमस्कार घालेल, ध्यानधारणा करेल, एकजण दानपेटीत पुरेसे पैसे वाहून बाहेर येईल, एकजण खांबांवरची नक्षी बघत बसेल तर एकजण कळसाचं दर्शन घेऊन उभा राहील. इतकं साधं असावं!
तर अशोकाने कलिंगा जिंकलं होतं. आणि कलिंगा राज्यासाठी स्वतः केलेल्या हत्याकांडाने, मृत्युच्या तांडवाने त्याचं मन विषण्ण झालं होतं. कुठेतरी बुद्धाची तत्त्वे त्याच्या मनाला शांतवत असावीत आणि तो त्या वाटेवर मार्गस्थ झाला असावा.
हे शिलालेख त्याने त्याचा राज्याभिषेक झाल्याच्या १२व्या वर्षी कोरले असं दिसतं. तो तेव्हा पुरता बुद्धमार्गी झाला होता की नाही हे तसं कोणी खात्रीशीर सांगत नाही. मात्र इतर पुरावे आणि त्याचे हे स्तंभ आणि शिलालेख यावरून काही कल्पना येते.
काय म्हणतो तो ह्या राजाज्ञांमध्ये? खूप काही आहे मात्र इथे एका विशिष्ट गोष्टीसाठी त्यातला काही भाग घेते.
• कोणत्याही प्राणीमात्राचा वध करू नये. पूर्वी राजाच्या पाकशाळेत सार करण्यासाठी शेकडो प्राणी मारले जायचे आता फक्त दोन मोर आणि एक हरीण तेही मृगहत्या नियमित नाही. भविष्यात हे तीन प्राणीही मारले जाणार नाहीत.
• उत्सवात खूप दोष आहेत. उत्सव करू नयेत.
• राजाने दोन प्रकारच्या वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत – मनुष्य चिकित्सा आणि पशु चिकित्सा. त्यासाठी औषधी वनस्पती सगळीकडून आणून लावल्या. विहिरी खोदल्या, झाडे लावली.
• धर्मपंडितांनी दर पाच वर्षांनी दौरे काढावेत आणि धर्माचरण होत आहे ना ह्याच्या नोंदी कराव्यात. मातापित्यांची सेवा करावी, मित्र, परिचित, नातेवाईक, ब्राह्मण आणि श्रमण यांचा मान राखणे स्पृहणीय आहे. खर्च आणि संग्रह नेटका ठेवावा.
• धर्माचरण होत आहे ना हे बघण्यासाठी मी धर्ममहामात्रांची नियुक्ती केली. यापूर्वी ते पद नव्हते. सर्व धर्मसंप्रदायांमध्ये त्यांची नियुक्ती केली.
• लोककल्याण हे मी माझे कर्तव्य समजतो. अडचणींचे निवारण करणे माझे कर्तव्य.
• पूर्वी राजे मनोरंजनासाठी विहार करत. मात्र मी धर्मयात्रेस प्रारंभ करून ब्राह्मण, श्रमण यांचे दर्शन, त्यांन दानप्रदान, वयस्कर लोकांच्या पोषणाची व्यवस्था, धर्मविषयक विचारणा अशा गोष्टी केल्या.
• मंगलसमारंभ करणे आवश्यक आहे मात्र पुष्कळ प्रमाणात समारंभ करणे निष्फळ आहे. अशा प्रसंगी स्त्रिया, क्षुद्र निरर्थक आचार विधी करतात. दास, सेवक यांना योग्य वागणूक, वडीलधार्यांचा आदर, प्राणीमात्रांवर दया, ब्राह्मण आणि श्रमण यांना दान हे धर्माचरण.
• राजा सर्व संप्रदायांच्या तत्वप्रणालीच्या वाढीला महत्त्व देतो. वाक्संयम हे त्याचे मूळ आहे. स्वधर्मस्तुती आणि परधर्मनिंदा अप्रासंगिक असू नयेत आणि संयमित असाव्यात. दुसऱ्या संप्रदायांचा यथायोग्य सन्मान केला पाहिजे. त्यानेच आपल्या धर्माची वृद्धी आणि इतर धर्म उपकृत होतात.
आपला संप्रदाय उज्वल करण्याच्या इच्छेने आणि त्यावरील भक्तीने जो स्वधर्मस्तुती आणि परधर्मनिंदा करतो तो स्वधार्माचीच जास्त हानी करतो. म्हणून समन्वय योग्य आहे.
म्हणून परस्पर धर्मतत्त्वे ऐकावीत आणि त्यांचे पालन करावे. सर्वधर्मसंप्रदाय बहुश्रुत आणि कल्याणकारी सिद्धांताचे असावेत अशीच राजाची इच्छा आहे.
तो स्वतः तेव्हा बुद्ध संप्रदायाचा झाला असेल नसेल. तरी त्याच्या ह्या राजाज्ञान्मधून पुन्हा पुन्हा लोककल्याण, सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव ही तत्त्वे समोर येतात. तो बुद्ध संप्रदायातील श्रमणांचा आदर करा म्हणतो तसंच ब्राह्मणांचाही करा म्हणतो. इथे ब्राह्मणांचं कौतुक म्हणून लिहित नाही.
त्याला कदाचित वैदिकजनांचा म्हणायचं असावं किंवा ब्राह्मण खरोखर आदरणीय असावेत किंवा असंतोष, अनादर असावा म्हणूनही ही राजाज्ञा असावी.
कोणत्याही प्रकारात तो सर्व संप्रदायांना समान आदर द्यावा म्हणतो. स्वधर्माची स्तुती आणि परधर्माची निंदा अनाठायी करू नये, संयमित असावी म्हणतो. प्राणिमात्रांच्या हत्या कमी कराव्या सांगतो. दास, सेवक यांना योग्य वागणूक द्यावी म्हणतो. धर्माचरण होत आहे ना हे बघण्यासाठी ऑफिसर्स नेमतो.
नंतर जुनागढमध्येच उपरकोट येथे जाऊन काही बौद्ध गुंफा बघितल्या. त्यामध्ये अनेक मिथुनशिल्पे होती. म्हणजे बौद्धांनी कोरलेल्या नक्की नसणार.
मुळात त्या हिंदू स्थापत्यशैलीतल्या गुंफाच होत्या, नंतर बुद्धपंथीयांना दान दिल्या असाव्यात वा वापरण्यात आल्या असाव्यात. अशोकाचे आजोबा चंद्रगुप्ताने शेवटी जैन पंथ स्वीकारला होता, तर अशोकाने नंतर बौद्धमार्ग! ‘आजीविक’ म्हणून अजून एक मोठा संप्रदाय त्याकाळी अस्तित्वात होता.
अशोकाने बिहारमध्ये बाराबर येथे गुंफा बांधून आजीविकांना दिल्या होत्या, ज्यावर हिंदू, बुद्ध आणि जैन शिल्प आहेत. पंथनिरपेक्षता म्हणजे देशातून पंथ – संप्रदायांचे उच्चाटन नाही तर सर्व धर्मियांना समान वागणूक असे मानले.
लोककल्याण, सामाजिक न्याय, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव, राज्य करताना पंथनिरपेक्षता (secularism) ही तत्त्वे इथल्या मातीतली आहेत, प्राचीन काळापासून लिखितही आहेत. इतकंच!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.