आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
लेखक : स्वप्नील श्रोत्री
===
प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली तर भारत हा चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढण्यास सक्षम आहे हे भारतीय लष्करप्रमुखांचे विधान त्रिकालवादी सत्यच आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अमेरिकन लष्करात एक नवीन विभाग चालू करण्याचा निर्णय घेतला आहे जो अवकाशात युद्ध करेल. या विभागाचे काम दुसऱ्या देशांचे अवकाश कार्यक्रम खराब करणे असे असेल.
वास्तविक पाहता अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी व वायुसेनेने त्यावर तीव्र आक्षेप घेतला असला तरीही ट्रम्प यांचा हा निर्णय लष्करी बळाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे.
पाकिस्तानकडून दररोज होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताविरोधात सतत होणारा विखारी प्रचार, वेळोवेळी दिलेल्या युद्धाच्या धमक्या यामुळे भारताची पश्चिम सीमा कायमच धगधगत असते. दुसरीकडे चीनकडून भारताला आर्थिक व लष्करी वेढा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
हिंदी महासागरात चीनच्या लष्करी जहाजांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत आहे.
डोकलाम भागात चीनच्या लष्कराने पुन्हा एकदा लष्करी कवायती सुरू केल्याच्या बातम्या कानावर आल्या आहेत. त्यामुळे भारताचे पारंपारिक स्पर्धक असलेल्या चीन व पाकिस्तानशी भारत युद्धात तुल्यबळ लढत देऊ शकतो का ? याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताशी पाकिस्तानने ४ युद्धे लढली. त्यातील ३ घोषित होती तर १ अघोषित होते. या चारही युद्धात पाकिस्तानने सपाटून मार खाल्ला आहे. परंतु तरीही पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रांच्या बळावर गुरगुरत असतो. अण्विक युद्धाची धमकी देत असतो.
पाकिस्तानकडे असलेल्या अण्वस्त्रांच्या बदल्यात भारताकडेही अनेक तुल्यबळ अशी अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्रे आहेत.
त्याचाच घेतलेला हा तुलनात्मक आढावा…
१) गझनवी (पाकिस्तान) :
हे पाकिस्तानचे कमी पल्याचे जमिनीवरून – जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र असून याचा पल्ला साधारणपणे २९० किलोमीटर इतका आहे. यशस्वी चाचणी घेतल्यानंतर मार्च २००० पासून गझनवी पाक लष्कराच्या सेवेत आहे.
अग्नी-१ (भारत) :
भारतीय लष्कराच्या सेवेत असलेले अग्नी-१ हे क्षेपणास्त्र जमिनीवरून- जमिनीवर मारा करण्यासाठी बनविलेले आहे. ह्या क्षेपणास्त्राचा वेग ७.५ मॅक असून ७०० ते १२५० किलोमीटर पर्यंत हल्ला करण्याची ह्याची क्षमता आहे.
२) शाहिन-१ (पाकिस्तान) :
हे पाकिस्तानचे जमिनीवरून – जमिनीवर मारा करणारे दुसरे क्षेपणास्त्र असून ‘शाहिन’ तालिकेतील पहिले आहे. याचा पल्ला साधारणपणे ७५० किलोमीटर इतका आहे.
शाहिन-१ (पाकिस्तान) : हे ‘शाहिन’ तालिकेतील पुढचे क्षेपणास्त्र असून याचा पल्ला ९०० किलोमीटर पर्यंत आहे.
शाहीन-२ (पाकिस्तान) : ‘शाहिन’ तालिकेतील हे प्रगत क्षेपणास्त्र असून जमिनीवरून – जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. हे मध्यम पल्ल्याचे असून याचा पल्ला १५०० ते २००० किलोमीटर पर्यंत आहे.
अग्नी-२ (भारत) :
डी. आर. डी. ओ ने विकसित केलेले अग्नी-२ हे भारतीय बनावटीचे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून – जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेल्या अग्नी-२ पल्ला २००० ते ३००० किलोमीटर इतका आहे.
३)शाहिन-३ (पाकिस्तान) :
मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून शाहिन ह्या तालिकेतील शेवटचे क्षेपणास्त्र आहे. जमिनीवरून-जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेले शाहिन ३ चा पल्ला २७५० किलोमीटर इतका आहे.
अग्नी-३ (भारत) :
भारतीय लष्कराच्या सेवेत असलेले अग्नी-३ हे ‘शाहिन’ च्या तुलनेत सक्षम असे क्षेपणास्त्र आहे. ह्याचा पल्ला ३५०० ते ५००० किलोमीटर तर वेग ५ ते ६ मॅक इतका आहे.
४) घौरी-१ (पाकिस्तान) :
कमी पल्याचे घौरी-१ हे क्षेपणास्त्र १२ जानेवारी २००३ पासून पाकिस्तानच्या सेवेत आहे. ह्याचा पल्ला १५०० किलोमीटर इतका आहे.
घौरी-२ (पाकिस्तान) : ‘घौरी’ तालिकेतील हे प्रगत क्षेपणास्त्र असून ह्याचा पल्ला १५०० ते १८०० किलोमीटर इतका आहे.
शौर्य (भारत) :
डी. आर. डी. ओ ने विकसित केलेले शौर्य हे भारतीय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून जमिनीवरून-जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. मध्यम पल्ल्याच्या शौर्य चा वेग ७.५ मॅक तर पल्ला ७५० ते १९०० किलोमीटर इतका आहे.
ज्याप्रमाणे पाकिस्तान भारताचा परंपरागत शत्रू आहे त्याच प्रमाणे चीन हा सुद्धा भारताचा जुना स्पर्धक आहे. भारत आणि चीन ह्यांच्यात १९६२ ला १ युद्ध झाले असले तरीही आजची भारताची परिस्थिती ही १९६२ सारखी नाही याची चीनला पूर्ण जाणीव आहे.
चीनला लष्करी व आर्थिक महासत्ता बनविण्याचा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा मनोदय जगजाहीर असला तरीही त्यात सर्वात मोठा अडथळा हा भारताचा आहे.
भारत हासुद्धा एक लष्करी व आर्थिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे. भारताचा चीन हा परंपरागत स्पर्धक असल्यामुळे भारत व चीन यांच्या लष्करी सामर्थ्याचा आढावा घेणेही गरजेचे बनते.
१) जुलांग-१ किंवा जे. एल-१ (चीन) :
हे चीनचे पहिले अण्वस्त्रधारी पाणबुडीसाठी बनिवण्यात आलेलले क्षेपणास्त्र असून ह्याचा पल्ला १७५० किलोमीटर इतका आहे.
जुलांग-१ ऐ किंवा जे. एल-१ ऐ (चीन) : जुलांग-१ च्या पुढच्या पिढीचे हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून ह्याचा पल्ला २५०० किलोमीटर इतका आहे.
सागरिका किंवा के-१५ (भारत) : भारतीय नौदलाच्या भात्यात हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून ह्याचा पल्ला ७०० ते १९०० किलोमीटर इतका आहे.
२) डॉंगफेंग-३ ए किंवा डी. एफ-३ए (चीन) :
चिनी नौदलाच्या ताफ्यात असलेले हे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून ह्याचा पल्ला ४००० ते ५००० किलोमीटर इतका आहे.
के-४ (भारत) :
भारतीय नौदलाच्या ताफ्यात असलेले हे दुसरे अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून सागरिका प्रमाणेच पाण्यातून कोठेही हल्ला करण्यास सक्षम आहे. ह्याचा पल्ला ३५०० ते ५००० किलोमीटर इतका आहे.
३) जुलांग-२ किंवा जे. एल-२ (चीन) :
हे दुसऱ्या पिढीचे अंतरखंडीय अण्वस्त्रधारी चीनी क्षेपणास्त्र असून ह्याचा ७४०० ते ८००० किलोमीटर इतका आहे. जुलांग-२ हे २०१५ पासून चिनी नौदलाच्या सेवेत आहे.
के-५ (भारत) :
जगातील संहारक अस्त्रात गणना झालेले के-५ हे जुलांग-२ च्या बरोबरीचे भारतीय अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र आहे. के-५ चा पल्ला ६००० किलोमीटर तर वेग ४.५ मॅक इतका आहे.
४) डॉंगफेंग-४ किंवा डी. एफ-४ (चीन) :
चिनी लष्कराचे हे सर्वात जुने अण्वस्त्रधारी क्षेपणास्त्र असून हे १९७५ पासून चिनी लष्कराच्या सेवेत आहे. आंतरखंडीय असलेल्या डॉंगफेंग-४ चा पल्ला ५५०० ते ७००० किलोमीटर इतका आहे.
अग्नी-५ (भारत) :
भारताचे अत्यंत घातक असे अस्त्र म्हणून नावाजलेल्या अग्नी-५ चा पल्ला ५००० ते ८००० किलोमीटर इतका आहे. संपूर्ण चीन ह्याच्या कक्षेत येत असून डॉंगफेंग प्रमाणेच हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र आहे.
आज भारत, पाकिस्तान, चीन ही तीनही राष्ट्रे अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे तुलनात्मक आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते ती म्हणजे अण्वस्त्र युद्धाने कोणाचाच फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे.
फरक फक्त नुकसान कोणाचे जास्त व कोणाचे कमी होणार एवढाच आहे.
भारतावर प्रत्यक्ष जरी अण्वस्त्र युद्धाची वेळ आली नसली तरीही भारताची अण्वस्त्रे चीन व पाकिस्तान सारख्या राष्ट्रांना भारतावर हल्ला करण्याची विचार करण्यास निश्चित भाग पडू शकतात आणि जर प्रत्यक्ष युद्धाची वेळ आली तरी भारत हा चीन व पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्यास तितकाच सक्षम आहे हे भारतीय लष्करप्रमुखांचे विधानही त्रिकालवादी सत्यच आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.