' स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले – InMarathi

स्वा. सावरकर आणि हेडगेवार-गोळवलकरांचा हिंदुत्व-विचार एकच : डॉ. श्रीरंग गोडबोले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक : डॉ. श्रीरंग गोडबोले

लेखक सावरकर आणि संघ-इतिहासाचे अभ्यासक आहेत.

===

“संघ परिवार: एक मायाजाल” (लोकरंग ११ नोव्हेंबर) या लेखात दिलीप देवधर यांनी स्वा. सावरकरांची ‘हिंदू’ संकल्पना हेडगेवारांनी मनोमन नाकारली; हेडगेवार-गोळवलकर-देवरस यांनी संघाला आणि सावरकरांच्या हिंदुमहासभेला सदैव दूर ठेवले अशी विधाने केली आहेत. ही विधाने निराधार असल्यामुळेच बहुधा देवधर त्यांना कोणताही संदर्भ देत नाहीत.

सावरकर-हेडगेवारांचे वैचारिक तादात्म्य

नारायण हरी पालकर यांनी परिश्रमपूर्वक लिहिलेले डॉ. हेडगेवार यांचे चरित्र (प्रथम प्रकाशन १९६१) अधिकृत समजले जाते. त्याला गोळवलकरांची प्रस्तावना आहे, किंबहुना ते चरित्र ‘समाजासमोर आणण्याचे सुईणीचे काम’ (हे गोळवलकरांचे शब्द) गोळवलकरांनीच केले. त्या चरित्राचे सावरकरांनी कौतुक केले होते.

सावरकर लिखित ‘हिंदुत्व’ ग्रंथाचे हस्तलिखित रत्नागिरी कारागृहातून नागपूरच्या विश्वनाथ केळकर विधिज्ञ ह्यांच्याकडे आले आणि त्यांनीच ते प्रसिद्ध केले. केळकर सावरकरांचे नातलग, ‘अभिनव भारत’ चे सदस्य आणि हेडगेवारांचे जिवलग मित्र होते. सावरकरांचे हस्तलिखित प्रथम वाचणाऱ्यांमध्ये हेडगेवार होते असे पालकर लिहितात.

“आपल्या (हेडगेवारांच्या) मनातील , हिंदुत्वाच्या आणि हिंदू राष्ट्रीयत्वाच्या कल्पना आणि त्या ग्रंथातील तर्कशुद्ध, रेखीव व ठाम हिंदुत्वाचे प्रतिपादन यांतील साधर्म्य डॉक्टरांचा आत्मविश्वास वाढविणारेच ठरले… डॉक्टरांना तो ग्रंथ अतिशय आवडला व त्यांनी त्या काळात व त्यानंतरही त्या पुस्तकाचा सर्वत्र प्रसार सुरू केला”

असे पालकर लिहितात (२०१४ आवृत्ती, पृ. १४८).

“सावरकरांच्या ग्रंथातील ‘हिंदू’ कल्पना ‘रिलीजस’ शैलीने मांडली गेली, डॉ.हेडगेवारांनी ‘हिंदू’ कल्पना सभ्यतेची होती” हे देवधरांचे विधान अर्थहीन आहे. ‘हिंदुत्व’ ग्रंथाच्या प्रारंभीच सावरकर ‘हिंदुत्व हिंदुधर्माहून निराळे आहे’ हे सूत्र विस्ताराने मांडतात. त्यामुळे देवधरांनी सावरकरांचा ग्रंथ काळजीपूर्वक वाचला आहे की नाही अशी शंका येणे भाग आहे.

 

vd-savarkar-inmarathi
theweek.in

हेडगेवारांनी ‘हिंदू’ शब्दाची कुठेही विस्तृत तात्त्विक चर्चा केलेली नाही, त्यांच्या भाषणांतून ती त्रोटकपणे प्रकट होताना दिसते. नागपुरकर राहिलेल्या देवधरांना ‘सभ्यता’ हा शब्द त्याच्या ‘संस्कृती’ या हिंदी अर्थाने वापरायचा आहे असे वाटते. मराठीत ‘सभ्यता’ हा शब्द ‘भद्रता’ या अर्थी वापरला जातो.

हेडगेवार संपादित ‘स्वातंत्र्य’ दैनिकाच्या एकमेव उपलब्ध अंकाच्या मुखपृष्ठावर ‘एकोज फ्रॉम अंदमान्स’ आणि शेवटच्या पृष्ठावर ‘हिंदुत्व’ पुस्तकांची प्रकटने आढळतात असेही पालकर लिहितात (पृ. १५०).

संघस्थापनेपूर्वी हेडगेवारांनी रत्नागिरीत स्थलबद्ध असलेल्या सावरकरांची भेट घेतली होती. दोन दिवस चाललेल्या या भेटीत हेडगेवारांनी संकल्पित संघटनेची कल्पना दिली व सावरकरांचा त्यावरील अभिप्रायही समजून घेतला असे पालकर लिहितात (पृ. १५९).

संघस्थापनेनंतर हेडगेवार पुनः सावरकर-भेटीला जेव्हा रत्नागिरीला आले तेव्हा डॉ. म.ग. शिंदे यांच्या घरी उतरले होते. तिथे झालेल्या सावरकर-हेडगेवार भेटीची आठवण शिंदे यांचे चिरंजीव वि.म. शिंदे यांनी लिहून ठेवली आहे (आठवणींची बकुळ फुले, नवचैतन्य प्रकाशन, मुंबई, पृ. ५१).

ही चळवळ नागपूर प्रांतापुरती मर्यादित न ठेवता देशभर त्याची व्याप्ती वाढवा, तरच त्याचा उपयोग होईल असा अभिप्राय सावरकरांनी हेडगेवारांना दिला होता. सावरकर रत्नागिरी जिल्ह्याबाहेर जाऊ शकत नाहीत म्हणून त्यांचे प्रतिनिधी या नात्याने हेडगेवारांनी डॉ. शिंदे यांना नागपूरला बोलावून संघस्वयंसेवकांकडून त्यांना मानवंदना देववली होती.

 

dr-hedgewar-inmarathi03
wikipedia.org

सावरकरांनी स्थापित केलेल्या पतितपावन मंदिरातच रत्नागिरीतील पहिल्या संघ – शाखेची स्थापना झाली होती.

रत्नागिरीतून सावरकर बंधमुक्त झाल्यावर त्यांचे व हेडगेवारांचे संघवाढीसाठी एकत्रित दौरे होणे, सावरकरांनी संघ-शाखांना, शिबिरांना आणि प्रशिक्षण वर्गांना भेटी देऊन मार्गदर्शन करणे नित्याचेच झाले. महाराष्ट्रातील पहिल्या पिढीचे जवळजवळ सर्व प्रमुख संघ- पदाधिकारी हे मुळात सावरकरांचे अनुयायी होते ही वस्तुस्थिती आहे.

दि. ११ नोव्हेंबर १९२३ ला नागपूर हिंदुसभेची स्थापना झाली तेव्हा हेडगेवार तिचे पहिले कार्यवाह आणि प्रचारक मंडळ सदस्य झाले. हेडगेवार अखेरपर्यंत नागपूर हिंदुसभेचे उपाध्यक्ष होते. हेडगेवार-गोळवलकर दोघेही सावरकरांना अगदी सार्वजनिक ठिकाणीसुद्धा साष्टांग दंडवत घालत.

सावरकर- गोळवलकर संबंध

अनेक हिंदूसभा नेत्यांना संघाने हिंदुसभेचे स्वयंसेवक दल म्हणून काम करावे असे वाटत असे. अशा नेत्यांमध्ये सावरकर-बंधू नव्हते हे नमूद केले पाहिजे. संघाची पाठराखण करण्यात बाबाराव सावरकर सर्वांच्यापुढे असत.

हेडगेवारांच्या निधनानंतर सावरकरांनी गोळवलकरांना दि. १३ जुलै १९४० ला सांत्वनपर पत्र लिहिले. त्यात संघाच्या बाबतीत हेडगेवारांचा शब्द अंतिम असे, त्यांच्या विवेकबुद्धीवर आपल्याला पूर्ण विश्वास होता असे सावरकर लिहितात.

 

golwalkar-guruji-marathipizza-com

 

सैनिकीकरणाबाबत सावरकरांच्या भूमिकेचे गोळवलकरांना आकलन झाले नाही हे मान्य केले पाहिजे. पुढे जनसंघ स्थापनेमुळे संघ-हिंदुसभा यांच्यात दुरावा वाढला हेही मान्य. पण सावरकर-गोळवलकरांच्या हिंदुत्व-विचारात कुठे भेद दिसत नाही.

सावरकरांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त दि. १५ मे १९६३ ला मुंबईत दिलेल्या भाषणात गोळवलकर म्हणाले,

“सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या महान ग्रंथात विशुद्ध राष्ट्रवादाची तत्त्वे शास्त्रशुद्ध पद्धतीने विशद केलेली मला आढळली. माझ्या दृष्टीने तो एक पाठ्यग्रंथ आहे, शास्त्रग्रंथ आहे”

(स्वातंत्र्यवीर सावरकर, धनंजय कीर, मराठी अनुवाद, पृ. ५६१-५६२).

सावरकर जन्मशताब्दी वर्षात सुधीर फडके यांचे १९८३ साली जबलपुरला संघ-स्वयंसेवकांसमोर बौद्धिक झाले. ‘सावरकर संघाचे कुलदैवत आहे’ हे त्यांचे वाक्य काही संघ-स्वयंसेवकांना खटकले. तेव्हा बाळासाहेब देवरसांनी ‘सुधीर काहीच चूक बोललेला नाही’ असा निर्वाळा दिला (मी पाहिलेले बाळासाहेब, दीपक मुंजे, सांस्कृतिक वार्तापत्र, २०१५, पृ. २७७).

हिंदू महासभा-संघ

डॉ. हेडगेवार हे हिंदुसभेचे शेवटपर्यंत पदाधिकारी होते. पण एकेकाळी गोळवलकर हिंदुसभेत सक्रिय होते हे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे. कलकत्ता येथे १९३९ साली सावरकरांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. हिंदुमहासभेचे अधिवेशन झाले. त्यावेळी झालेल्या कार्यवाहपदाच्या निवडणुकीला गोळवलकर उभे राहिले. बाबाराव सावरकरांचा पाठिंबा असूनही ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यानंतर ते हिंदुसभेत कधीही आले नाहीत (स्वा. वीर सावरकर चरित्र, हिंदुमहासभा पर्व -१, बाळाराव सावरकर, १९७५, पृ. २९९).

सावरकर हिंदुमहासभेचे अध्यक्ष असलेल्या बहुतेक सर्व अधिवेशनांमध्ये संघ-स्वयंसेवक गणवेषात व्यवस्थेमध्ये अथवा मिरवणुकीत सहभागी होत असत. किंबहुना १९४९ साली कलकत्त्यात झालेल्या आणि सावरकर अध्यक्ष नसलेल्या अ.भा. हिंदुमहासभेच्या अधिवेशनाची व्यवस्था एकनाथजी रानडे ह्यांनी सांभाळली होती.

गांधीहत्येनंतर हिंदुमहासभा क्षीण झाली आणि पुढे जनसंघाची स्थापना झाली. त्यामुळे संघ-हिंदुसभा संबंध एका अर्थी राहिले नाहीत. काही ज्येष्ठ संघ-स्वयंसेवकांचे सांगणे अमान्य करून देवरस विक्रम सावरकरांच्या नागपुर येथील षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते.

हेडगेवार-गोळवलकर-देवरस यांचा विचार सावरकर-विचारापेक्षा भिन्न होता याला कोणताही पुरावा नाही. याउलट तिघांवर सावरकर-विचाराचा प्रभाव होता याला भरपूर पुरावा आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?