आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
इतिहासाचा अभ्यास करून अनेक संशोधक विविध निष्कर्ष काढत असतात. नुकतेच BBC ने आपल्या डॉक्युमेंटमध्ये असा निष्कर्ष काढला आहे की “येशू ख्रिस्त हे भारतात राहून गेलेले गौतम बुद्धांचे भिख्खू होते.” येशू ख्रिस्त हे समस्त ख्रिस्ती लोकांचे श्रद्धास्थान आहेत.
त्यांच्याविषयी अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. येशू ख्रिस्तांनी जगाला प्रेमाचा, करुणेचा संदेश दिला असे ख्रिस्ती लोक मानतात.
जीजस ऑफ नाझरेथ म्हणून प्रसिद्ध असलेल्या येशू ख्रिस्तांचा जन्म पॅलेस्टाईनच्या बेथलेहेम येथे झाला होता.
त्यांच्या वयाच्या तेराव्या वर्षांपासून तर एकोणतिसाव्या वर्षापर्यंत ते कुठे होते ह्याचा बायबल मध्ये किंवा पाश्चिमात्य किंवा मिडल ईस्टर्न इतिहासात कुठेही रेकॉर्ड मिळत नाही.
येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील ह्या सोळा वर्षांना “द लॉस्ट इयर्स” असे म्हटले जाते. ह्या सोळा वर्षांत येशू ख्रिस्त कुठे होते किंवा काय कार्य करीत होते हे १८८७ पर्यंत एक रहस्यच होते. १८८७ साली ह्या लॉस्ट इयर्सबाबत एक सिद्धांत मांडला गेला.
एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी निकोलस नोतोविच ह्या रशियन डॉक्टरांनी संपूर्ण भारत, तिबेट आणि अफगाणिस्तानचा दौरा केला.
त्या प्रवासाबद्दल आणि त्या प्रवासादरम्यान त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल त्यांनी द अननोन लाइफ ऑफ ख्राईस्ट ह्या पुस्तकात लिहिले आहे हे पुस्तक १८९४ साली प्रसिद्ध झाले.
हा प्रवास करीत असताना १८८७ साली नोतोविच ह्यांच्या पायाला जबर दुखापत झाली.तेव्हा ते लेह येथील एका हेमिस बुद्ध मठात राहिले होते. ह्याच मठात त्यांना बौद्ध भिक्खुंनी कागदपत्रांचा गठ्ठा दाखवला.
ही कागदपत्रे तिबेटियन भाषेत होती आणि त्यावर शीर्षक होते – “संत इसा ह्यांची जीवनगाथा”!
नोतोविच जेव्हा ह्या मठात राहिले होते तेव्हा त्यांनी ह्या कागदपत्रांचे भाषांतर केले. ह्या कागदपत्रांमध्ये जीजस (म्हणजेच परमपित्याचा पुत्र- इसा) नावाच्या लहान मुलाची गोष्ट सांगितली आहे. हा मुलगा पहिल्या शतकात इस्राएल मधील एका गरीब कुटुंबात जन्मला होता.
येशू ख्रिस्तांना त्यांच्या वयाच्या १३व्या वर्षांपासून ते २९व्या वर्षापर्यंत वैदिक पंडितांनी प्राचीन पवित्र बौद्ध ग्रंथांतून ज्ञान दिले होते व त्यांनी येशू ख्रिस्तांना परमपिता देवाचा पुत्र असे संबोधले होते असे नोतोविच ह्यांना आढळले.
त्यांनी त्या ग्रंथातील २२४ श्लोकांपैकी २०० श्लोकांचे भाषांतर केले.
१८८७ साली जेव्हा नोतोविच त्या मठात होते तेव्हा एका लामांनी नोतोविच ह्यांना जीजस ह्यांना प्राप्त झालेल्या परमज्ञानाविषयी सांगितले. लामा नोतोविच ह्यांना म्हणाले की,
“इसा हे महान प्रेषित होते. बावीस बुद्धांपैकी ते एक होते. ते दलाई लामांपेक्षाही मोठे आहेत कारण त्यांच्यात ईश्वराचा अंश आहे.
त्यांनीच तुम्हालाही ज्ञान दिले आहे आणि त्यांनीच प्रत्येक मनुष्याला चांगल्या वाईटातला फरक करण्यास शिकवले आहे.
त्यांचे नाव आणि त्यांच्या कार्याविषयी आमच्या पवित्र ग्रंथांत वर्णन केले आहे.
त्यांच्या कार्याविषयी वाचताना आम्ही बंडखोर आणि विचलित करणाऱ्या लोकांत जाऊन पोचलो.
पेगन लोकांनी जे त्यांना त्रास देऊन त्यांना मृत्यूदण्ड देण्याचे महाभयंकर पाप केले आहे ते वाचून आम्ही रडलो.”
नोतोविच ह्यांच्या सिद्धांतानुसार,
येशू ख्रिस्त ह्यांचा भारतातील वास्तव्याविषयीचा शोध हा द लॉस्ट इयर्सशी तंतोतंत जुळतो. तसेच त्यांना मिडल ईस्ट मध्येच जन्म का झाला ह्याचेही कारण आपल्याला ह्यावरून लक्षात येते.
जेव्हा एक महान बुद्ध किंवा लामांसारखा पवित्र मनुष्य जीवनयात्रा संपवतो तेव्हा हुषार माणसे ग्रह, तारे आणि इतर संकेत ओळखून लामांचा पुनर्जन्म झालेल्या शिशुच्या शोधार्थ एका मोठ्या प्रवासाला निघतात.
जेव्हा ते बाळ मोठे होते तेव्हा त्याला त्याच्या आईवडिलांपासून लांब नेऊन बौद्ध धर्माविषयी ज्ञान दिले जाते.
संशोधकांच्या मते हाच द थ्री वाईज मेन ह्या कथेचा पाया आहे. असे मानले जाते की येशू ख्रिस्त १३ वर्षांचे झाल्यावर त्यांना भारतात आणले गेले आणि बौद्ध म्हणून त्यांना शिकवले गेले, त्यांना बौद्ध धर्माचे ज्ञान देण्यात आले.
ह्या कालखंडात बौद्ध धर्म हा ५०० वर्षे जुना होता तर ख्रिश्चन धर्माची सुरुवात देखील झाली नव्हती.
IANS ह्या न्यूज एजन्सीला एका ज्येष्ठ लामांनी सांगितले की,
“असे म्हणतात की येशू ख्रिस्त आपल्या भारत देशात आले आणि काश्मीर मध्ये त्यांना बौद्ध धर्माचे ज्ञान देण्यात आले. बुद्धांचे ज्ञान व नियम ह्यांपासून येशू ख्रिस्तांना प्रेरणा मिळाली होती.”
ह्या कथेची पुष्टी द्रुकपा बुद्धिस्ट सेक्टचे प्रमुख तसेच हेमिस मठाचे प्रमुख ग्वाल्यान्ग द्रुकपा हे सुद्धा करतात. ह्या २२४ श्लोकांचे दस्तऐवजीकरण इतर लोकांनी सुद्धा केले आहे.
रशियन तत्ववेत्ता आणि शास्त्रज्ञ निकोलस रोरिच ह्यांनी १९५२ साली ह्या मठात येशू ख्रिस्त वास्तव्याला होते अशी नोंद केली आहे. ते लिहितात की,
“येशू ख्रिस्तांनी वाराणसी सारख्या भारताच्या अनेक प्राचीन शहरांत वास्तव्य केले. सर्व लोक त्यांच्यावर प्रेम करीत असत कारण ते वैश्य व शूद्र ह्यांच्याशी करुणेने वागत असत. तसेच त्यांना येशूंनी मार्गदर्शन केले तसेच प्रसंगी मदत देखील केली.”
येशू ख्रिस्तांनी भारताच्या जगन्नाथ पुरी, वाराणसी, राजगृह ह्या शहरांत शिकवण्याचे देखील कार्य केले. ह्यामुळे त्यांना उच्च्वर्णीयांचा रोष पत्करावा लागला.
म्हणूनच ते त्यानंतर हिमालयात गेले व तेथे त्यांनी सहा वर्षांचा काळ बुद्धधर्माचे ज्ञान मिळवण्यात व्यतीत केला.
हॉलजर केर्स्टन ह्या जर्मन संशोधकांनीसुद्धा ह्या सिद्धांताची पुष्टी केली आहे. त्याच्या जीजस लीव्ह्ड इन इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे. ह्यात त्यांनी येशू ख्रिस्तांच्या भारतातील सुरूवातीच्या काळाबाबत लिहिलेले आहे. ते लिहितात की,
“हा मुलगा व्यापारी लोकांबरोबर सिंधू नदीच्या खोऱ्याजवळच्या सिंध प्रांतात आला. तेथे त्याने आर्य लोकांबरोबर वास्तव्य केले कारण त्याला स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणायची होती.
तसेच महान बुद्धांनी सांगितलेल्या नियमांविषयी जाणून घ्यायचे होते. ज्ञान प्राप्त करायचे होते. त्याने पाच नद्यांच्या प्रदेशात म्हणजेच पंजाबमध्ये प्रवास केला, आणि जगन्नाथ येथे जाण्यापूर्वी काही काळ जैनांबरोबर व्यतीत केला.”
तसेच BBC ने ह्यावर “जीजस वॉज या बुद्धिस्ट मॉंक ” नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे.
ह्यात संशोधकांनी असा सिद्धांत मांडला आहे की येशू ख्रिस्तांनी क्रुसिफिक्शनच्या शिक्षेतून सुटका करून घेतल्यानंतर ते तिशी नंतर परत भारतात आले. कारण त्यांना हा प्रदेश अतिशय प्रिय होता. ते मृत्यूला हुलकावणी देऊन अफगाणिस्तानमध्ये स्थायिक झालेल्या ज्यू लोकांना भेटले.
हे ज्यू लोक सुद्धा असेच नेब्युकॅडनेझर ह्या ज्यू राजाच्या शिक्षेच्या कचाट्यातून सुटून अफगाणिस्तानात निघून आले होते.
ह्याशिवाय काश्मीर खोऱ्यातील स्थानिक लोक सुद्धा असे सांगतात की तिशीनंतर भारतात परत आलेल्या येशू ख्रिस्तांनी त्यांचे नंतरचे आयुष्य काश्मीर खोऱ्यात अतिशय आनंदात व शांततेत व्यतीत केले.
त्यानंतर वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. हा सिद्धांत खरा मानल्यास तारुण्यातील सोळा वर्षे व नंतर क्रुसिफिक्शनच्या शिक्षेतून सुटल्यानंतरची जवळजवळ ४५ वर्षे असा ६० ते ६५ वर्षांचा काळ येशू ख्रिस्तांनी भारतात तिबेट व आसपासच्या प्रदेशात व्यतीत केला असे म्हणता येईल.
अनेक लोकांचे असे मानणे आहे की मृत्यूपश्चात त्यांची समाधी श्रीनगर येथील रोझाबाल मंदिरात बांधण्यात आली आहे.
BBC ने ह्या मंदिरास भेट दिली तेव्हा त्यांना असे आढळले की हे अतिशय साधे देवस्थान आहे. ह्याचे बांधकाम पारंपरिक काश्मिरी पद्धतीचे आहे व येथे एक समाधी आहे. अनेक लोक असे मानतात की की हीच येशू ख्रिस्तांची समाधी आहे.
कागदोपत्री मात्र ह्या समाधीला याऊझा असफ ह्या मुसलमान धर्मोपदेशकाची समाधी म्हटले जाते. एका फॉरेनर व्यक्तीने ही समाधी तोडून त्याचे अवशेष आपल्या बरोबर नेले तेव्हापासून ही समाधी पर्यटकांसाठी बंद केलेली आहे असे BBC च्या वार्ताहरास आढळून आले.
येशू ख्रिस्त भारतात आले की नाही हा एक वादाचा मुद्दा आहे. मात्र अनेक लोक ह्या सिद्धांतास खरे मानू लागले आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.