‘नाळ’ – नात्यांची वीण किती घट्ट असते हे अधोरेखित करणारी सर्वांगसुंदर कलाकृती!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
नात्यांची मजा ही ती हळुवारपणे उलगडत जाण्यात असते. त्यात धसमुसळेपणा आला किंवा अचानक सोसाट्याचा वारा नात्यांमध्ये वाहू लागला तर तो रौद्र वादळाचं रूप धारण करतो आणि नात्यांची घट्ट वीण उसवायला वेळ लागत नाही. मग ते नातं आई मुलाचं असलेलं जगातील सगळ्यात सुंदर नातं देखील का असेनात!!
जगातल्या ह्याच सगळ्यात सुंदर नात्याची नाळ आणि तुमच्या बालपणीच्या आठवणींची वीण किती घट्ट आहे हे तपासायचे असेल तर ही नाळ एकदा तरी अनुभवायला हवी.
नागराज पोपटराव मंजुळे हा माणुस हात लावेल त्याला सोनं कसं करतो हे प्रत्यक्ष बघायचं असेल तर नाळ बघायलाच हवा.
अगदी खरं सांगतो “जाऊ दे न व” हे गाणं मी बघितलं आणि तेंव्हाच ठरवलं होतं की नाळ नागराज मंजुळे ह्या जादूगारासाठी नव्हे तर फक्त आणि फक्त त्या गोड श्रीनिवास पोकळे ह्या बाल कलाकारासाठी आणि चित्रपट गृहाच्या मोठ्या पडद्यावर येणाऱ्या अस्सल वऱ्हाडीसाठी बघायचाच.
पण चित्रपटाच्या पहिल्या १५ मि नंतर ह्या चित्रपटाने आई मुलाच्या नात्यांमधले जे हेलकावे दाखविले आहेत ते कमाल आहेत, आणि सबंध २ तास भावनेच्या वादळात हेलकावे खाणारी नात्यांची ही नाव चित्रपट संपताना जी बंदराला लागते तेंव्हा जो पुनर्जन्माचा अनुभव येतो तो दिव्य असतो.
गोष्ट सुरु होते पूर्व विदर्भातल्या (चित्रपटाचं शूटिंग हे भंडारा जिल्ह्यातील मुंढरी खुर्द आणि ढोरवडा ह्या वैनगंगा नदीतीरावरच्या गावामध्ये झालं आहे.) एका छोट्याश्या खेडेगावांतून. वैनगंगा नदीचं विस्तीर्ण पात्र, आणि त्या पात्राच्या काठावर वसलेलं टुमदार गावं. कुठल्याही गावात असलेलं वातावरण.
दंगा करणारी पोरं आणि ह्याचं पोरांमध्ये आपल्या आईला अगदी काकुळतीला येऊन “मला खेलायले जाऊ दे न व” असा हट्ट करणारा गोड आणि तितकाच निरागस चैत्या!!
चैत्याचं आयुष्य किती सुंदर सहज असावं. रोज उठायचं, घरच्या कोबड्यांना त्यांच्या घरातुन बाहेर काढायचं, घरच्या रेडकुवर प्रेमाने हात फिरवायचा, आई कडुन आंघोळ करून तेल पावडर लावुन भांग पाडुन घ्यायचा, शाळेत जायचं, मित्रांबरोबर धमाल दंगा मस्ती करायची घरी येऊन आईच्या हातचं खाऊन झोपून जायचं.
आजही अगदी कुणालाही विचारलं तर कोण नाही म्हणेल हो इतक्या निरागस आयुष्याला?
चित्रपटाची पहिली १५ मि धमाल आहेत. माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेने वाट लावलेल्या चुकीच्या वऱ्हाडी भाषेवर उतारा म्हणुन कानाला प्रचंड गोड वाटणारी नागपुर, अमरावती, भंडारा, गोंदिया भागातील अस्सल वऱ्हाडी भाषा तुम्हाला त्याच्या प्रेमातच पाडेल.
प्रेक्षक एव्हाना त्या भाषेच्या आणि चैत्याच्या गोडव्यात विरघळत असतात की एक धक्का तंत्र येतं.
चैत्याचा मामा त्याला कानात एक सिक्रेट सांगुन जातो आणि चैत्याच्या त्या निरागसतेवर लेप बसतो तो एका शोधाचा, त्याच्या अस्तित्वाच्या शोधाचा, जन्माला येताना आईच्या पोटातून बाहेर येतांना नाळ कापल्यावर ज्या कोहम चा साद घालतो त्याचा प्रतिसाद ऐकण्याच्या प्रयत्नांचा, बाल वय ह्या अल्लड वयात मनांत उमटणाऱ्या असंख्य प्रश्नांचा.
ह्या सगळ्या शोधरुपी लेपाचा प्रभाव चैत्याच्या आणि त्याच्या घरच्यांच्या आयुष्यात काय बदल घडवुन आणतो हे बघायला मात्र तुम्हाला चित्रपट गृहात जावं लागेल.
चित्रपटाबद्दल बोलायचं तर, नागराज ने लिहिलेले संवाद इतके सहज आहेत की तुम्हाला कुठेही तुम्ही चित्रपट बघताय असं वाटणार नाही. तुमच्या समोर काही माणसं आहेत आणि त्यांच्या संवादात तुम्ही देखील आहात इतके सहज ते आहेत.
अर्थात नागराजचा तो USP आहे, ज्या कथेला तो हातात घेतो त्याला इतकं जीवंत करून सोडतो की चित्रपट संपल्यावर तुम्हाला वास्तवात यायला दोन मिनिट लागतात. पण तरीही हा टिपिकल नागराज चित्रपट नाहीय. हा चित्रपट आहे सिनेमॅटोग्राफर कम दिग्दर्शन हाताळणाऱ्या सुधाकर येड्डी यंकट्टीचा!!
दिग्दर्शकाला फ्रेम आणि सिनेमॅटोग्राफी ह्याचं तांत्रिक ज्ञान असेल तर काय रसायन तयार होतं हे चित्रपटातील सुकलेल्या वैनगंगेच्या विस्तीर्ण शुस्क रेतीवरच्या पात्रात घेतलेल्या काही रूपक शॉटचे, चैत्याच्या मनातील घालमेलीच्या लो अँगलचे अफलातून शॉटस बघायला हवे. त्यासाठी मी दिग्दर्शकाला Standing Ovation देईल.
देविका दफ्तरदार, दीप्ती श्रीकांत, मुळशी पॅटर्न फेम ओम भुतकर ह्यांनी आपापल्या भूमिका छान निभावल्या आहेत.
लक्षात ठेवण्यासारख्या भूमिका चैत्याची आजी (सेवा चव्हाण) आणि चैत्याचा मित्र बच्चन ह्यांच्या आहेत.
पण पण ह्या सगळ्या लोकांवर आणि नागराज वर ज्याने अभिनयात बाजी मारली आहे तो चैत्या म्हणजे श्रीनिवास पोकळे!! शब्द अपुरे पडावेत इतका दृष्ट लागण्यासारखा अभिनय श्रीनिवास नावाच्या ह्या पोराने केला आहे.
मी त्याला अभिनय नाही म्हणणार तो त्याच्या नैसर्गिक निरागसतेतून चैत्याच कॅरेक्टर शब्दश: जगलाय!!
इतक्या लहान वयात त्याने त्याने उभा केलेला चैत्या तुम्हाला नुसतं हसवत किंवा रडवत नाही तर आपल्या मनाची घालमेल करतो ह्यासाठी जितकं श्रीनिवास पोकळेचं अभिनंदन करायला हवं त्याहुन जास्त त्याच्याकडून हे कसब पडद्यावर उतरवून घेणाऱ्या सुधाकर यंकट्टी आणि नागराजचं करायला हवं.
आणि काशिनाथ घाणेकर ह्या चित्रपटानंतर दुसऱ्याच आठवड्यात नाळ आला ह्याहुन उत्तम दुग्धशर्करा योग कुठला असेल?
एकूण काय तर माय एक लो कॅटयेगिरी वाला VFX सोडला न बाव्वा तर चित्रपट एकदमच झ्याक बनला व्हय.
त्यामुळं म्याटा सारखं पेपरात आलेले रिव्ह्यू आन त्ये मंजुळे आन देशपांडे ह्या जातीच्या बैताड पोष्टी वाचुन नका आन फकाले न झामल झामल न करता तो पायले जावा, पन मंग त्यो संपन का नाय तेंव्हा त्या नागराज ले इचारो नसान का आता मले घरी जाऊ दे न व!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.