आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
लेखक : नित्तेंन गोखले, पत्रकार, पुणे
===
या वर्षी जुलै महिन्यामध्ये भारतीय (उत्तर) रेल्वेच्या लखनऊ विभागातील ट्रेकमन धर्मेंद्र कुमार यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्राद्वारे भारतीय रेल्वेच्या कामकाजाबद्दल काही धक्कादायक बाबी समोर आल्या. यातून, भारतातील रेल्वे अपघातांच्या संभाव्य प्राथमिक कारणांपैकी एक कारण देखील उघड झाले आहे.
ट्रेकमनच्या दररोजच्या कर्तव्यात रेल्वे रुळ तसेच ट्रॅक बॅलस्ट, फिशप्लेट तपासणे, रुळांची साफसफाई व तपासणी करणे, सिग्नल व इतर यंत्रणेची पाहणी करणे, त्याच बरोबर, ट्रॅक कुठे ब्लॉक केला गेला नाही हे सुनिश्चित करणे, ही कामे असतात. परंतु, ही महत्वाची कामे करायचे सोडून ट्रेकमनना वरिष्ठ अधिकारी आपल्या घरगुती कामाला लावत असल्याचे धक्कादायक सत्य नुकतेच लोकांसमोर आले आहे.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये रेल्वे मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर पियुष गोयल यांनी प्रथम सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कनिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच ट्रेकमनचा वैयक्तिक कामे करूनघेण्यासाठी वापर करू नये असा आदेश जारी केला होता. आदेशाचे पालन न केल्यास अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असे देखील बजावण्यात आले होते.
या चेतावनीनंतर ‘ग्रुप डी’ मधील ३०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना (ट्रेकमन/गँगमन) पुन्हा एकदा देखभाल व सुरक्षेशी संबंधित कामात रुजू करण्यात आले, असे भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, धर्मेंद्र कुमार यांचे पत्र आणि रेल्वेच्या होणाऱ्या अपघातांची संख्या असे दर्शविते की परिस्थिति अजुन देखील खराबच आहे.
कुमार यांनी स्वतःच्या तक्रारी सोबत पुरावा म्हणून एक व्हिडिओ देखील गोयल यांना पाठवला
दिलेल्या माहिती प्रमाणे, या व्हिडिओमध्ये विभागीय अभियंता राजकुमार वर्मा यांच्या बाराबंकी जिल्हा स्थित निवासस्थानी एकूण पाच ट्रेकमन ‘बांधकाम कामगार’ म्हणून काम करताना दिसतात.
“माझ्यासारख्या श्रेणी-४ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी घरकाम करणाऱ्या मजुरासारखे वागवतात व तसेच काम करून घेतात. याला विरोध केल्यास नोकरीतुन काढून टाकण्याची धमकी दिली जाते. आम्ही नोकरी रेल्वे सुरक्षाची कामे करायला स्वीकारली आहे, कोणाची खासगी किंवा घरगुती कामे करण्यासाठी नव्हे,”
– असे धर्मेंद्र कुमार पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहिती प्रमाणे रेल्वे सुरक्षेसाठी नेमलेले ३०,००० ट्रेकमन रेल्वेची दिलेली कामे करण्याऐवजी वरिष्ठ अधिकाऱ्यांची घरकामे करताना आढळली होती. आता प्रश्न असा पडतो की जर रेल्वे खात्याकडे ही माहिती आधीपासून होती, तर मग सुरेश प्रभू आणि त्यांच्या आधी कारभार सांभाळणाऱ्या इतर रेल्वे मंत्र्यांनी या समस्येचे निराकरण का नाही केले?
गोयल यांनी आदेश जारी केल्यावर देखील वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा गैरवापर करत असतील तर मग गोयल किंवा मोदी सरकारचा या भ्रष्ट रेल्वे खात्यावर काही नियंत्रण उरले आहे का?
सुरेश प्रभू यांची हकालपट्टी
भाजपचे समर्थक आणि पक्षाचे समीक्षक असो; सर्वजणच सुरेश प्रभू यांना रेल्वे मंत्रिपदावरून काढून टाकल्यावर आश्चर्यचकीत झाले होते.
रेल्वे मंत्रालयाचे व्यवस्थापन करण्याच्या बाबतीत प्रभु नेहमी अतुलनीय मानले जायचे. त्यांच्या जागी गोयल यांना का आणण्यात आले याचे उत्तर कदाचित नियंत्रक व महालेखा परीक्षकच्या (सी.ए.जी) जुलै २०१७ मध्ये मांडण्यात आलेल्या रेल्वे संबंधित अहवालात सापडते.
प्रभू अनेक बाबतीत अयशस्वी ठरले होते.
प्रचार यंत्रणेचा वापर करून भारतीय रेल्वे खाते खूप सुधारले आहे. देशातील रेल्वे गाड्या एक्दम युरोपियन स्तराच्या झाल्या आहेत. देशातील सर्व रेल्वे स्टेशन विमानतळांसारखे साफ असतात – अशा अफवा पसरविण्यात आल्या. परंतु, नियंत्रक व महालेखा परीक्षक त्यांचे अहवाल वस्तुस्थिति प्रमाणे बनवतात, अफवांवर किंवा पेड न्युज वर विश्वास ठेवून नव्हे.
रेल्वे अपघातांमागे आय.एस.आय किंवा ‘परदेशी दहशतवादी’ असतील असा अंदाज सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे लोक नेहमीच मांडतात. जुन्या झालेल्या सिग्नलिंग सिस्टम आणि ट्रॅकचा पण उल्लेख केला जातो. दुर्दैवाने, या खात्यातील अभियंते व्यवस्थितपणे आपली कर्तव्ये पार पाडत आहेत कि नाही, याची तपासणी करण्याबाबत कोणीच फारसे बोलत नाही.
प्रवासी जीव गमावतात, पण भ्रष्ट अभियंते आपल्या नोकरीत टिकून राहतात. चौकशी झाली तरी त्यांना काही दिवसात क्लीन-चिट मिळून जाते.
भ्रष्ट अभियंते रेल्वे दुर्घटनांची संख्या वाढवण्यास जबाबदार
सन २०१२ ते २०१७ दरम्यान एकूण ५८६ रेल्वे अपघात झाले. यातील ५३ टक्के अपघात रेल्वेरुळांशी संबंधित कारणांमुळे झाले होते. त्यामुळे, एकूणच, वरिष्ठ अधिकारी ट्रेकमनचा घरगुती कामांसाठी वैयक्तिक कर्मचाऱ्यांसारखा वापर करून, त्यांना महत्वाच्या कामांपासून दूर ठेवून, प्रवाशांचा जीव धोक्यात टाकत आहेत.
रेल्वे खात्यातील वरिष्ठ अधिकारी तसेच फील्ड ऑपरेशन्समधील अधिकारी यांना रेल्वेच्या होणाऱ्या नुकसानीसाठी जबाबदार ठरवून त्यांच्या पगारातून नुकसान भरूनघेणे आवश्यक झाले आहे. नाहीतर, अपघात होणे कदाचित चालूच राहील, आणि अपघातात निष्पाप लोकांचे बळी जात राहतील.
(हा लेख प्रथम साप्ताहिक ‘चपराक’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता)
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.