नेहरू विरोधी “कुजबुज मोहिमेचं” सत्य : “मी अपघाताने हिंदू आहे” असं नेहरू कधीच म्हटले नव्हते!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
सध्याच्या वैचारिक आणि राजकीय चर्चांमध्ये भूतकाळातील राष्ट्रीय नेत्यांपैकी सर्वात जास्त चर्चिला जाणारा नेता म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांच्या विरोधक आणि समर्थकांची कडवी फौज चर्चेच्या मैदानात उतरली की बराच काळ न थांबणारा कलगीतुरा रंगतो. अनेकदा खोटे आरोप, तथ्यहीन, अनैतिहासिक गोष्टीही या चर्चेत दोन्ही बाजूंनी पसरवल्या जातात.
हाच प्रचार खरा इतिहास मानून चालणाऱ्या लोकांची संख्याही आपल्याकडे कमी नाही. एका बाजूला कट्टर विरोधकांनी पसरवलेल्या अर्धवट खऱ्या, प्रसंगी धादांत खोट्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला कट्टर समर्थकांनी देव्हाऱ्यात बसवल्यासारखी केलेली नेहरूंची स्तुती..
या सगळ्या गदारोळात खरी ऐतिहासिक तथ्ये कोणती? हे बहुसंख्य लोकांच्या ध्यानीमनी नसते.
यामुळे होते असे की ऐकायला, वाचायला खमंग वाटतील अशा चर्चा तर रंगतात, पण चुकीच्या गोष्टी ऐतिहासिक सत्य म्हणून प्रस्थापित होतात.
नेहरूंवर झालेला असाच एक आरोप म्हणजे त्यांनी एके ठिकाणी “मी दुर्दैवाने हिंदू आहे” असे म्हटले. भाजपच्या सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष यांनी केलेलेया ट्विट मध्ये म्हटल्या प्रमाणे,
“मी शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लीम, आणि अपघाताने हिंदू आहे.” असं नेहरू म्हणतात.
अमित मालवीय यांचे हे ट्विट दोन वर्षांपूर्वीचे आहे.
By education I am an Englishman, by views an internationalist, by culture a Muslim and a Hindu only by accident of birth. – #Nehru
— Amit Malviya (@amitmalviya) November 14, 2015
काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्ही या एका वाहिनीवरील चर्चेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी नेहरूंच्या याच म्हणण्याचा उल्लेख केला होता.
सोशल मीडियावर हेच वाक्य वेगवेगळ्या प्रकारे मोडतोड करून फिरवले जात आहे. दलित अभ्यासक कांचा इलय्या यांनी शशी थरूर यांच्या एका पुस्तकाचे परीक्षण लिहिताना नेहरूंचे हे वाक्य उद्धृत केले आहे.
हे वाक्य पहिल्यांदा कुणी वापरले, त्याचा प्रचार कुणी केला याचा, शोध घेण्याचा प्रयत्न Alt news या वेबसाईटने केला.
त्यात असे दिसून आले की फेक न्यूज प्रसारित करण्याचे आरोप असलेली ‘पोस्टकार्ड न्यूज’ या वेबसाईटने हे वाक्य थेट आपल्या एका लेखाच्या शीर्षकातच वापरले आहे.
भारतातील राजकीय वातावरण पाहता काँग्रेसच्या विरोधात बोलताना या वाक्याचा पुरेपूर फायदा घेतला जाणार हे नक्की. पण पंडित नेहरूंनी नक्की असं म्हंटल आहे का? म्हटलं असेल तर ते कोणत्या संदर्भात हे मुळातून पाहणं गरजेचं आहे.
प्राथमिक साधनांचा धांडोळा घेतक्यावर असे दिसून येते की महात्मा गांधी यांचे चरित्रकार बी. आर. नंदा यांनी ‘The Neharus, Motilal and Javaharlal’ या त्यांच्या पुस्तकात नेहरूंच्या त्या वाक्याचा उल्लेख केला आहे.
नंदा यांच्या मते, हिंदू महासभेचे नेते एन. बी. खरे यांनी नेहरूंचे वर्णन ‘शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लिम आणि अपघाताने हिंदू’ असे केले आहे.
याव्यतिरिक्त ‘मोतीलाल’ नावाच्या आणखी एक महत्वाचा पुस्तकात नंदा यांनी या वाक्याचा उल्लेख केला आहे.
अगदी अलीकडेच शशी थरूर यांच्या Neharu : Invention of India या पुस्तकातही त्यांनी या वाक्याचा उल्लेख केला आहे. इथेही थरूर यांनी हिंदू महासभेच्या खरे यांचा संदर्भ देत त्यांनी हा प्रचार करून नेहरूंच्या बद्दल चुकीची माहिती पसरवल्याचे म्हटले आहे.
द क्विंट या एका इंग्रजी पोर्टलशी बोलताना तर भाजपचे सध्याचे राज्यसभा खासदार एम जे अकबर जे म्हटले त्यानंतर हे प्रकरण नेमके काय आहे ते स्पष्टपणे लक्षात येते. ते म्हणतात,
“१९५० च्या दरम्यान हिंदू महासभेचे अध्यक्ष असलेले एन बी खरे नेहरूंच्या विरोधात बोलताना कितीदातरी नेहरू अपघाताने हिंदू असल्याची तीच तीच कथा सांगत होते.”
वर उल्लेख केलेल्या आणि इतरही उपलब्ध स्रोतांत पाहिल्यावर असे दिसून येते की हे वाक्य नेहरूंनी नाही तर हिंदू महासभेचे तत्कालीन अध्यक्ष एन बी खरे यांनी वापरलेले आहे. हे वाक्य चुकीच्या पद्धतीने नेहरूंच्या नावावर खपवण्यात आले आहे. आता हे एन बी खरे म्हणजे नक्की कोण? तर खरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात खुद्द काँग्रेस पक्षातून केली.
तत्कालीन व्हाइसरॉयच्या विशेष सल्लागार मंडळातही खरे यांनी काम केले. संविधान तयार करण्यासाठी जी संविधान समिती भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापित करण्यात आली त्या समितीचेही खरे हे एक सदस्य होते. १९४९ साली त्यांनी काँग्रेस सोडून हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले आणि पुढचे दोन वर्षे म्हणजे १९५१ पर्यंत हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
ही खोटी माहिती पसरवण्याची सुरुवात नेमकी कुठून झाली हे पाहिले तर यामागचा खरा उद्देश लक्षात येतो.
Alt news ने या अफवेच्या मुळाशी जाताना खोटी माहिती पहिल्यांदा कुठे उधृत करण्यात आली आहे त्याचा शोध घेतला. रफिक झकेरीया यांच्या १९५९ साली आलेल्या A study of Nehru या पुस्तकात नेहरूवर केल्या गेलेल्या टिकांचा आणि त्यांच्या कार्यावर तत्कालीन नेते, विचारवंत यांनी केलेल्या समीक्षेचा धांडोळा घेण्यात आला आहे.
काही महत्वाच्या टीका या पुस्तकात जशाच्या तशा कोट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक टीकाकार म्हणजे एन. बी. खरे!
त्या पुस्तकात पान क्र. 215 वर खरे यांचा A Young Aristocrat हा नेहरूंच्या कार्यावर टीका करणारा लेख आहे. या लेखात खरे यांनी असा दावा केला आहे की नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात आपण शिक्षणाने इंग्रज, संस्कृतीने मुस्लिम आणि अपघाताने हिंदू असल्याचे म्हटले आहे.
खरे यांच्या दाव्यावर विश्वास ठेवून नेहरूंच्या चरित्रात या वाक्याचा शोध घ्यायला गेल्यास लक्षात येईल की नेहरूंनी पूर्ण आत्मचरित्रात असे एकदाही म्हटलेले नाही.
मुस्लिम संस्कृतीबद्दल नेहरूंनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेला उतारा म्हणजे भारतीय मुस्लिम जगतात सांस्कृतिक सरमिसळ कशी झाली, इतर भाषांचा प्रभाव मुस्लिम संस्कृतीवर कसा झाला याबद्दल केलेले टिपण आहे.
त्यातही नेहरू आपण ‘संस्कृतीने मुस्लिम’ असल्याचे म्हणत नाहीत. ही सर्व तथ्ये लक्षात घेता असा निष्कर्ष काढता येईल की हे जे वाक्य नेहरूंचे असल्याचे सांगितले जाते ते नेहरूंनी नाही तर त्यांचे विरोधक आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष एन. बी. खरे यांनी लिहिलेले आहे.
समकालीन आणि नंतरच्याही अभ्यासकांनी ही अफवा पसरवण्यासाठी खरे यांना थेट जबाबदार धरले आहे.
खरे पाहता, नेहरू यांचे हिंदू धर्माबद्दल, आपण हिंदू म्हणून जन्माला आलो त्यांबद्दल काय मत होते हे त्यांच्या १९२९ सालच्या एका भाषणातून स्पष्टपणे लक्षात येते. १९२९ च्या दरम्यान ते काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि याच वर्षी काँग्रेसने ‘पूर्ण स्वराज’ ही घोषणा करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिपत्याखालून भारताला पूर्णपणे स्वतंत्र्य करण्याची घोषणा केली होती.
अध्यक्षपदावरून केलेल्या भाषणात नेहरू म्हणतात,
“माझा हिंदू म्हणून जन्म झाला असला तरी सकल हिंदूंचा प्रवक्ता म्हणून मी बोलू शकेन की नाही हा वादाचा मुद्दा आहे. पण भारतात जन्माने मिळालेल्या धर्माला अनन्यसाधारण महत्व आहे हे नाकारता येत नाही. आणि याच जन्माने हिंदू असण्याच्या अधिकाराने मी हिंदू धर्मगुरूंना एक विनंती करीन की त्यांनी आता उदारमतवादाचा पुरस्कार करावा.”
–
“उदारमतवाद हे केवळ एक नैतिक मूल्य नसून राजकारण आणि समाजकारण करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यातच हिंदू लोकांचे हित आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या या देशात हिंदू लोक कधीही सत्तेबाहेर जाणार नाहीत हे उघडच आहे. त्यामुळे तो बागुलबुवा न दाखवता हिंदू नेतृत्वाने उदारमतवादाचा अवलंब करावा.”
नेहरूंची ही मते पाहिल्यानंतर जन्माने हिंदू असण्याबद्दल त्यांच्या काय भावना होत्या हे लक्षात येते.
सध्याच्या राजकीय परिप्रेक्षात नेहरूंचे हे मत समोर आले तर काँग्रेसच्या विरोधकांना त्याचा तोटा होणे शक्य आहे. ते समोर न येऊ देता, ‘हिंदू म्हणून जन्माला येणे नेहरूंना दुर्दैव वाटायचे” हा नरेटिव्ह पसरवणे नेहरूंच्या आणि काँग्रेसच्या विरोधकांसाठी राजकीय दृष्ट्या फायद्याचे आहे.
खोटी माहिती पसरवण्याचा हा कुटील डाव का खेळला जातो त्याचे कारण नेमके येथे आहे.
हिंदू धर्मात रूढ असलेल्या अनिष्ठ प्रथांना तिलांजली देऊन हिंदूंनी उदारमतवादी, आधुनिक व्हावे यासाठी नेहरूंनी हिंदू कोड बिल आणण्यात महत्वाची भूमिका घेतली.
ती भूमिका तत्कालीन सनातनी, कट्टर धार्मिक गटांसाठी गैरसोयीची होती. हिंदू जनमत नेहरूंच्या विरोधात वळवण्यासाठी त्यांनी तेव्हाही अशा अफवांचा आधार घेतला, नव्हे आजही त्यांचे राजकीय वारस त्याच अफवांचा आधार घेत आहेत. पण या अफवेच्या मुळाशी गेल्यास नेहरूंची ‘हिंदू असण्याबद्दलची’ खरी मते त्याच्या अगदी विरुद्ध असल्याचे दिसून येते.
डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या सुरुवातीलाच ऋग्वेदातल्या नासदीय सुक्तातील श्लोक उद्धृत करत भारतीय संस्कृतीचा पाया म्हणून वेदातील श्लोकाचा दाखला देणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल पसरवली जाणारी ही चुकीची माहिती किती गांभीर्याने घ्यायची याचा निर्णय घेण्यास सामान्य जनता समर्थ आहेच. पण हे फुटीचे राजकारण यशस्वी झाले तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नसेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.