शेर ए म्हैसुर टिपू सुलतानः वादाचा नक्की खरा मुद्दा काय? जाणून घ्या
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
लेखक : प्रा. बालाजी चिरडे
===
भारत हा एक विकसनशील देश आहे हे वाक्य जसे आर्थिक क्षेत्राला लागू आहे तसेच ते वैचारिक क्षेत्रालाही लागू होईल. इतिहास हा विषयही त्याला अपवाद नाही.
संघ व संघप्रणित संघटनांच्या इतिहासाच्या मोडतोडीवरून वाद चालू असताना नव्यानव्या वादाचे भर टाकत काँग्रेस पक्ष आपणही संघाच्याच बिरादरीतील आहोत हे दाखवत आहे.
भाजपाकडून गांधीच्या हातात झाडू देऊन गांधींना राष्ट्रीय स्वच्छता दूत बनविणे, बांडुंग परिषदेच्या सुवर्णवर्षी समारंभात पंडीत नेहरुचा अनुल्लेख करणे इ. बाबी समोर आल्यातच.
दोन वर्षांपूर्वी कर्नाटकातील मुख्यमंत्री श्री. सिद्धारामय्या यांनी टिपु सुलतानांच्या २७५व्या जयंती सोहळ्याला शासकीय पातळीवर साजरा करण्याचा निर्णय घेऊन नव्या वादाला तोंड फोडले होते!
टिपू सुलतान हे स्वातंत्र्ययोद्धे होते, ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी तीन युद्धे लढली व ते धारातीर्थी पडले त्यामुळे अशा सच्च्या देशभक्ताची जयंती साजरी झालीच पाहिजे ही मुख्यमंत्र्यांची भूमिका होती!
तर संघ, भाजपा यांनी टिपू हा धर्मवेडा सुलतान असून त्याने अनेक मंदिरे फोडली, अनेकांचे धर्मांतर केले, त्याची तलवार काफिरांच्या विरोधातच होती, त्यामुळे टिपूची जयंती साजरी केली जावू नये.
या वादात आता युनायटेड ख्रिश्चन असोसिएशन या कॅथोलिक संघटनेनेही उडी घेऊन टिपूने मंगलोरचे एक चर्चही १७८४ साली उध्वस्त केले होते म्हणून शासनाच्या जयंतीनिर्णयाचा निषेध केलेला आहे.
अशी परस्पर विरोधी मते दोन्ही पक्ष मांडत असल्याने हा वाद नीट समजून घेतला पाहिजे.
टिपू सुलतान (१७४०-१७९९) १७८२ साली गादीवर आला. ८०,००० चौ. किमीचा प्रांत, ८८,००० फौजेचा वारसा त्याला त्याचे वालिद (वडील) हैदर अलींकडून मिळालेला होता.
भारतातील सगळ्या महत्वाच्या शक्तींची मर्यादा तोपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या लक्षात आली होती.
बंगालचा नवाब (१७५७), अयोध्येचा नवाब (१७६४), मराठ्य़ांचे पानिपत (१७६१), मराठ्यांशी तह (१७८२) या पार्श्वभूमीवर कंपनीचे वावटळ भारताला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही,
याची पुरती जाणिव टिपू सुलतानांना झाली. त्यामुळेच ते अखेरच्या श्वासापर्यंत लढले व शहीद झाले.
त्यांच्या श्रीरंगपटणम् येथील कबरीवर कोरलेले आहे, “टिपू सुलतानने पवित्र जिहाद केला व अल्लाने त्याला हुतात्म्याचा दर्जा प्रदान केला”.
त्यांचा लढा ब्रिटिशांच्या विरोधात कशासाठी होता? ते विजयी झाले असते तर कोणत्या स्वरुपाचे राज्य येणार होते हे समजून घेणे आजच्या वादाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे ठरेल.
टिपू सुलतानने आपल्या राज्याचे नाव ‘सल्तनत-इ-खुदादत’ (अल्लाने प्रदान केलेले राज्य) होते, लष्कराला ‘लष्कर-ए-मुजाहिदीन’ (धर्मयोद्ध्यांचे लष्कर) म्हणत, त्याच्या नाण्याचे नाव ‘इमानी’(श्रद्धावान) असे ठेवलेले होते.
अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ मुस्लिम विचारवंत शाहवलिउल्लाह(१७०३-१७६२) यांच्या विचारांचा जबरदस्त प्रभाव टिपूवर पडलेला होता.
धर्मांतर करून शेकडो वर्ष झाली तरी अनेक इस्लामबाह्य विधी व परंपरा भारतीय मुसलमानांमध्ये होत्या.
त्या सर्व गैरइस्लामी प्रथांपासून मुसलमानांना मुक्त करण्याचा प्रयत्न टिपुने केला. इस्लामला मान्य नसल्यामुळे दारूबंदीही केली.
शेकडो शहरांची, स्थलांची, गावांची नावे बदलून इस्लामी केली, कुर्गमधील ७०,००० हिंदुंना इस्लामची दिक्षा दिली.
इस्लामच्या उत्कर्षासाठी, इस्लामची पताका उंच ठेवण्यासाठी टिपुने हैदराबादचा निजाम, दिल्लीचा नामधारी बादशाह शाह आलम यांच्याशी पत्रव्यवहारही केला.
टिपुच्या दृष्टिने ब्रिटिशांच्या विरोधातील हा लढा इस्लाम विरूद्ध काफीर असाच होता. मराठ्याची बाजू घेणा-या निजामाला ते ‘काफरांचा पक्ष’ धरल्याचा आरोप करतात.
तत्कालीन दिल्लीच्या शाह आलमला लिहिलेल्या पत्रात
‘हा इस्लामचा नम्र सेवक सध्या ख्रिश्चनांचे बंड नष्ट मोडून टाकण्यात गुंतलेला आहे… अल्लावर दृढ श्रद्धा ठेवून हा इस्लामचा सेवक गैर-इस्लामी शक्तींविरुद्ध लढा देऊन त्या पूर्णतः नष्ट करण्याच्या विचारांत आहे’ असे टिपू नोंदवतात.
मध्ययुगीन रूढीप्रमाणे त्याकाळात जगमान्य खलिफाकडून सुलतान म्हणून खिल्लत आणावी लागायची.
टिपू सुलतानांनीही १७६६ साली ९०० लोकांचे जंगी शिष्टमंडळ यासाठी तुर्कस्तानला पाठवले. हिरे, जडजवाहीर, १० लक्ष रुपये, चार हत्ती भेट देऊन एक पत्रही त्यासोबत लिहिले होते.
त्या पत्रात ‘या देशातील ख्रिश्चनांशी आमचा लढा चालू आहे. या सर्वोच्च कामात आम्ही आपले सहाय्य मागत आहोत…
ब्रिटिशांच्या कारवायांविरुद्ध भारतीय मुस्लिमांच्या वतीने संघर्ष करणे माझे कर्तव्य आहेच, परंतु मला वाटते की, संपुर्ण इस्लामी जगतासाठी जिहाद अतिअनिवार्य झाला आहे, केवळ आमच्या देशाचे संरक्षण करणे हे नव्हे.’
या पत्रासोबतच एक द्विपक्षीय करारही पाठविण्यात आलेला होता.
आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे खलिफाला लष्करी मदत करता आली नाही पण त्याने राजवस्त्रे पाठवून दिली, खुतब्यात नाव घालण्याचे, स्वतःच्या (टिपुच्या) नावाने नाणी पाडण्याचे अधिकार देण्यात आले.
यामुळे दिल्लीच्या बादशाहापेक्षाही टिपू सुलतानाचे महत्व भारतीय मुसलमानांमध्ये वाढले. अशाच प्रकारचे आवाहन त्यांनी त्याकाळचे भारताचे सख्खे शेजारी अफगाणिस्तानचे अमीर झमानशाह यांनाही त्यांनी केलेले होते.
ख्रिश्चनाविरुद्धच्या या लढाईत २०,००० लष्कराच्या मदतीची अपेक्षा करून या धर्मयुद्धात सहकार्याची विनंती केली. अशाच प्रकारचे पत्र टिपुने इराणच्या शाह करीम खानाकडेही पाठवलेले होते.
या विविध पत्रांचा प्रत्यक्षात कोणताही फायदा टिपुंना झाला नाही. पण ब्रिटिश भारतातील जनतेला टिपुच्या इस्लामिक राज्यात येऊन राहण्याची आवाहन त्यांनी केली.
–
- क्रांतिकारी की धर्मांध अहंकारी? म्हैसूरचा वाघ – टिपू सुलतान!
- राहुल गांधींकडून सावरकरांचा अपमान : तक्रार दाखल!
–
हे आवाहन करताना ते म्हणतात,
“मुस्लिमांनी श्रद्धाहिनांच्या देशातून निघून गेले पाहिजे, आणि जोपर्यंत सुलतान तेथील बदमाश श्रद्धाहिनांना इस्लाममध्ये आणणार नाही दिंवा त्यांना जिझिया देण्यास भाग पाडणार नाही तोपर्यंत देशाबाहेरच थांबले पाहिजे…आमचा हेतू श्रद्धाहिनांविरूद्ध जिहाद करणे हा आहे”.
मुसलमानांमध्ये जिहादची प्रेरणा निर्माण व्हावी म्हणून त्यांनी ‘फतह-अल-मुजाहिदिन’ (धर्मयोद्ध्यांचा विजय) नावाची पुस्तिकाच प्रकाशित केली होती.
त्याचे वितरण म्हैसुर शिवाय हैदराबाद, बंगाल, दिल्ली येथे करण्यात आले.
पण या सर्व प्रयत्नांना कोणतेही फळ आले नाही. शेवटी ब्रिटिशांच्या विरोधात लढतानाच त्यांचा शेवट ४ मे १७९९ रोजी झाला.
त्यांच्या इस्लामिक विचार संघर्षामुळेच प्रसिद्ध उर्दू महाकवी डॉ. अलामा इक्बाल लिहितात,
“धर्म आणि पाखंड (इस्लाम आणि कुफ्र) यांच्यातील प्रचंड संघर्षात आमच्या भात्यातील शेवटचा बाण म्हणजे टिपू” असा गौरवपूर्ण उल्लेख करतात तर अनेक मुस्लिम विचारवंत टिपुला १८व्या शतकातील ‘इस्लामची तलवार’ संबोधतात.
टिपू सुलतान ब्रिटिशांच्या विरोधात लढले यासाठी त्यांना स्वातंत्र्ययोद्धा म्हणून गौरविले जाते.
‘ब्रिटिशांच्या ऐवजी मुस्लिमांचे इस्लामी राज्य भारतात आले तर ते मुस्लिमांच्या दृष्टिने स्वातंत्र्य ठरत असले तरी हिंदुंच्या दृष्टिने काय?’
हा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून टिपुने किती मंदिरे पाडली, किती मंदिरांना अनुदान दिले, किती लोकांचे धर्मांतर केली किंवा त्यांचा पंतप्रधान(पुर्णय्या), त्याचा सेनापती (कृष्ण राव) एक हिंदू होता,
हे मुद्दे महत्वाचे नसून टिपूला धर्माधारित इस्लामिक सत्ता आणावयाची होती हा मुद्दा मूलभूत व गंभीर आहे यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.
हा इतिहासातला संघर्ष नसून भूतकाळातील घटनांचा आजच्या राजकीय अस्तित्वासाठी वापराचा प्रश्न आहे.
या संघर्षात आता न्या. मार्कंडेय काटजूसारखे वाचाळवीर पडलेलेच आहेत,
गिरीश कर्नाडसारखी ‘तुघलक’कार ज्ञानपीठ विजेती व्यक्तीही यात पडली असून ‘टिपू हिंदू राहिला असता तर त्यालाही शिवाजीचा दर्जा मिळाला असता’ अशी मुक्ताफळे उधळलेली आहेत.
एवढच नव्हे तर बंगळुरू विमानतळाला टिपुचे नाव देण्याची सूचनाही त्यांनी कर्नाटक सरकारला केली. आता हळूहळू पुरोगाम्यांची फौज टिपू सुलतान हा कसा स्वातंत्र्ययोद्धा होता हे पटवून देईल.
लोकांच्या मनातील जातीच्या व धर्माच्या भावना उखडून फेकण्यापेक्षा ते गोंजारून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची प्रवृती सर्वच पक्षांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाहायला मिळते, पण त्याची लागण सगळीकडच्या सुमार बोलघेवड्यांना झालेली आहे.
संघ काय म्हणतो किंवा विश्व हिंदू परिषद काय म्हणते यापेक्षा मुसमानांना टिपू सुलतान यांचे प्रेम ते ब्रिटिश विरोधी इस्लामचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लढले म्हणून आहे का
ते काफिरां(सर्व)विरुद्ध लढले म्हणून आहे, टिपुने मंदिरांना मदत केली म्हणून आहे का मंदिरे पाडली म्हणून आहे हा प्रश्न महत्वाचा आहे.
बाकी सिद्धरामय्यासारख्या मुख्यमंत्र्यांना ऐतिहासिक अंगाने सेक्युलर शासक पण मुसलमानांच्या दृष्टिने इमानी हुकुमत आणणारा टिपू सुलतान सारखा शासक सापडणे अशक्य.
त्यामुळे काँग्रेसला राजकीय लाभ व चर्चेत राहाण्याची आयतीच संधी मिळणार आहे. पण शतकोत्तर सुवर्ण महोत्सव पार केलेला जबाबदार राजकीय पक्ष म्हणून आपण काय वाद निर्माण करीत आहोत याची जाणीव का्ँग्रेसने ठेवायला हवी.
–
- टिपू सुल्तानशी लढाई ते राष्ट्रपतींची सुरक्षा : एका दुर्लक्षित आर्मी तुकडीचा रोमांचक प्रवास
- भाजपवाले पोथ्या-पुराणांतून कधी बाहेर येणार?
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.