भारताचा पहिला, अस्सल “ठग”- ज्याने भारताला “इंटेलिजन्स ब्युरो” सुरु करायला भाग पाडले…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम
===
प्रस्तुत लेखा बरोबर जोडलेले छायाचित्र आहे ते कुख्यात ठग बेहराम याचे. असे म्हणतात कि भारतीय गुप्तहेर संगठना IB (ईंटेलिजन्स ब्युरो)चा पाया या प्रकरणाने घातला .
भारतात साहेबी राज्य नुकतेच सुरु झाले होते आणि साहेबाने भारतीय लोकांच्या धार्मिक कृत्यात ढवळाढवळ न करण्याचे धोरण अवलंबलेले होते.
त्या काळात ठळक असणाऱ्या भारतीय परंपरेनुसार कित्येक गावांतून लोकांचे तांडेच्या तांडे काशी आणि अमुक तमुक यात्रेला जात असे. त्याप्रसंगी संपुर्ण गाव त्यांना शेवटचा निरोप द्यायला जमा होई कारण यात्रेसाठी गेलेले बहुतांश लोक पुन्हा परतत नसत.
लग्नाच्या वराती, व्यापारांचे काफिले,यात्रेकरू असे कित्येक लोक कराची ते जबलपुर परिसरात गायब होत, अगदी त्यांची प्रेतं सुद्धा सापडत नसत.
आणि अशा पार्श्वभूमीवर विलीयम स्लीमन नामक इंग्रजी अधिकाऱ्याचे पगार घेऊन गेलेल्या भारतीय सैनिकांची एक टोळी रहस्यमयरित्या गायब झाली. या घटनेचा छडा लावण्यासाठी स्लिमनचीच नियुक्ती वरीष्ठ अधिकाऱ्यांनी केली.
काही स्थानिक हेरांच्या मदतीने तपास करताना स्लिमनला ठगांच्या टोळीबद्दल सुगावा लागला. परंतु फक्त तेवढ्यानेच भागणार न्हवते कारण हे ठग अत्यंत विचित्र जमात होती. त्यांची रामोशी भाषा आणि चालीरीती ते कुणाशी वाटुन घेत न्हवते. त्यामुळे त्यांच्यात काय शिजते आहे याचा अंदाज कुणालाच लागत नसे.
त्यांच्या सांकेतिक भाषेचे उदाहरण पुढील प्रमाणे :
१. सराईत ठगाला म्हणत बोरा अथवा औला
२. ठगांच्या टोळी प्रमुखाला म्हणत जमादार
३. नाण्यांना म्हणत गान अथवा खार
४. ज्या जागेवर सगळे ठग एकत्र येत त्या जागेला म्हणत बाग अथवा फूर
५. सावजाच्या आसपास घिरट्या घालणाऱ्याला म्हणत सोथा
६. जो ठग सोथाची मदत करत असे त्याला म्हणत दक्ष
७. पोलीसांना म्हणत डानकी
८. जो ठग सावजाला फाशी देत असे त्याला म्हणत फाशीगीर
९. ज्या ठिकाणी सावजाला पुरुन टाकत असत त्या जागेला म्हणत तपोनी
स्लिमनने हरतर्हेने प्रयत्न करून अखेर ठगांच्या एका प्रमुखा बरोबर संधान बांधले आणि त्याला स्वतःला ठग म्हणुन प्रवेश देण्याबाबत विनवले.
एखाद्याला ठग म्हणून प्रवेश देण्याचा विधी म्हणजे “तपोनि”वर ठगांबरोबर एकत्र बसून गुळ खाणे. तपोनि म्हणजे थडगे.
त्यांचे असे मानने होते की ज्याने थडग्यावर बसून गुळ खाल्ला त्याची दुनिया वेगळी होऊन जाते. अशारीतीने स्वतः स्लिमन ठग बनला व त्यांची भाषा-चालीरीती शिकला, त्यांच्या खाचाखोचा, श्रद्धा-अंधश्रद्धा माहिती करून घेतल्या. आणि त्यानंतर त्याला उलगडले आजवरचे असंख्य क्रुर गुन्हे.
या ठगांचा एक महत्त्वाचा टोळीप्रमुख होता बेहराम( बेरहम). त्याच्या टोळीत अंदाजे २०० लोक सामील होते. ते अत्यंत उत्तम प्रकारचे गाणी बजावणी करणारे आणि दगडाच्या काळजाचे म्हणावे लागेल असे जातभाई होते. डाकू हत्यारांच्या मदतीने दरोडा घालुन लोकांना लुटत असत तर ठगांची लुटमारीची पद्धत वेगळी होती.
ठग लांबुनच प्रवास करणाऱ्या लोकांचा जथ्था हेरत आणि विविध बहाण्याने ५०/१०० ठग त्या प्रवासी जथ्थ्यात सामील होत. प्रवाशांचा विश्वास संपादन करून मौल्यवान चीजवस्तू कुठे कुठे लपवली आहे याची माहिती करून घेत.
प्रवास करताना तो तांडा विश्रांतीसाठी कुठेतरी थांबला की मनोरंजनासाठी गाण्या बजावण्याचा कार्यक्रम सुरु होई. त्याच वेळी कुणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने टोळीचे सदस्य एकेका व्यापारी किंवा यात्रेकरू मागे जाऊन बसत.
लोक गाण्यात रंगुन गेले की योग्य वेळ पाहून ठगांच्या टोळीचा प्रमुख मोठ्याने “तंबाखू खा लो “म्हणून इशारा करी.
त्याबरोबर टोळीचे सदस्य एक रुमाल आपल्या समोर असलेल्या सावजाच्या गळ्याला पाठिमागून आवळत आणि जोरात लाथ मारून पाठीचा मणका मोडुन टाकत. लुळ्या पांगळ्या झालेल्या सावजाची प्रत्येक चीजवस्तू लुटून झाल्यावर हे लोक निर्दयीपणे त्या सावजाचे सगळे जोडसांधे मोडत.
मेलेले किंवा अर्धमेलेले ते दुर्दैवी जीव आधीच खणून ठेवलेल्या खड्ड्यांमध्ये तसेच पुरून टाकत. त्या काळात विज्ञान तंत्रज्ञान आजच्या सारखे प्रगत नसल्यामुळे अशा पुरुन टाकलेल्या लोकांचा कुणालाही मागमूस देखील लागत नसे.
स्वतः बेहराम हा आजवर ९३१ लोकांच्या मृत्युला कारणीभूत होता. त्यातील १५० खून त्याने स्वतःच्या हाताने, त्याच्या पिवळ्या रुमालाने केलेले होते. गुन्हेगारी इतिहासातील आघाडीचा सिरियल किलर म्हणुन त्याचे नाव नोंद आहे .
विलीयम स्लीमनने त्या ठगांशीं यासंदर्भात बातचीत केली तेव्हा त्या ठगांना या कृत्यांबद्दल अजिबात पश्चाताप वाटत नसल्याचे त्याला जाणवले.
कारण ते ठग असे मानत होते की फार पूर्वी रक्तबीज नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी कालीमाता युद्ध करत होती तेव्हा तिच्या घामातून दोन पुरुष जन्माला आले. त्या दोन पुरुषांना देवीने त्या राक्षसाला मारण्याची आज्ञा केली. ते काम पुर्ण झाल्यावर ते पुरुष देवीजवळ गेले व हत्या करण्यासाठीच आमचा जन्म झाला आहे त्यामुळे आता कुणाची हत्या करू असे विचारले.
यावर कालीमातेने त्या दोघांना त्यांच्या जातीचे असतील त्यांना सोडून इतर सर्वांना मारून टाकण्याची आज्ञा केली. ते दोन पुरुष म्हणजे ठगांचे आदिपुरुष असे हे लोक समजत असत व आपण करतोय ते धार्मिक काम आहे अशी त्यांची श्रद्धा होती.
स्लीमनने त्यानंतर कायद्यानुसार माफीचे साक्षीदार गोळा करून, तसेच परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून सर्व केस उभ्या केल्या. न्यायालयासमोर सगळा साक्षीपुरावा झाल्यानंतर जवळपास १५०० ठगांना कठोर शिक्षा ठोठावली गेली. त्यातील ८००/९०० ठगांना थेट फाशीची शिक्षा सुनावली गेली.
या कामगिरी बद्दल स्लीमनला अनेक सरकारी मानमरातब प्राप्त झाले. तर भारतीय लोकांनी जबलपुर येथे त्याचे मंदिर उभारले. मध्यप्रदेशातील एका तालुक्याचे नाव स्लीमनाबाद असल्याचे आजही तुम्हाला आढळून येईल.
ठग प्रमुख बेहरामचा पिवळा रुमाल ईंग्लंडमधे त्याच्या वंशजांकडे अजूनही आहे असे म्हणतात.
सर स्लीमन यांचे इतर कार्य म्हणजे त्यांनीच आशियातला पहिला डायनॉसॉरचा सांगाडा नर्मदेच्या खोऱ्यात शोधला. तसेच जंगल बुक या सुप्रसिद्ध कथानका मधिल मोगलीचे पात्र स्लीमन यांच्या एका पुस्तकातील त्यांनी पाहिलेल्या जंगलातील मुलाच्या पात्रावरुन बेतलेले आहे.
अधिक कुतूहल असलेल्या वाचकांनी “Confessions of a Thug” नावाचे पुस्तक जरूर वाचावे.
ता.क.: साधारणपणे पाच एक वर्षांपूर्वी हा लेख लिहिला होता. चित्रपटाच्या निमित्ताने पुनः प्रकाशित.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.