Site icon InMarathi

सरदार पटेलांचा पुतळा : भयसापळा, मोहसापळा आणि हौदातील थयथयाट : जोशींची तासिका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

सरदार वल्लभभाई पटेलांच्या १८२ मीटर उंचीच्या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी केले. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून आपल्या सर्वांना अभिमान हवा.

 

indiatoday.inmarathi

मात्र, या घटनेबद्दल प्रतिक्रीया देताना काँग्रेस, भाजपसहीत प्रसारमाध्यमं संभ्रमीत आहेत असे म्हणावे लागेल. या सर्व घटनेवर लहानपणी ऐकलेली “भयसापळा, मोहसापळा आणि हौदातील थयथयाट” अशी गोष्ट आठवली.

काँग्रेससाठी भयसापळा

सरदार वल्लभभाई पटेल काँग्रेसचे नेते होते हे निर्विवाद सत्य आहे. काँग्रेसने या स्मारकाचे स्वागत करणे अपेक्षित होते. पण, ह्या पुतळ्याबाबत बोलताना काँग्रेसी प्रवक्ते आणि समर्थक आगपाखड करताना दिसले.

कोणी म्हणत आहे “भाजप काँग्रेसचे नेते आणि प्रतिकं पळवण्याच काम करतंय”, तर कोणी म्हणतंय “६० वर्षात काँग्रेसने काय केलंय ह्याचं उत्तर म्हणजे हा पुतळा आहे. भाजपला त्यांचा किंवा संघाचा एकही नेता इतका मोठ्या उंचीच्या पुतळ्यासाठी सापडला नाही का?” काही काँग्रेसजनांच्या मते “मोदी-भाजप यांचे सरदार प्रेम बेगडी आहे.”

आपण नको त्या गोष्टीत का अडकून पडतो, याचा उत्कृष्ट उलगडा करणारा हा दृष्टांत आहे. पोपट पकडण्याची एक खास पद्धत आहे. एका आडव्या टांगलेल्या दोरीत बऱ्याच नळ्या ओवलेल्या असतात. या प्रत्येक नळीला पोपटाला आकर्षीत करेल असे काहीतरी खाद्य चिकटवलेले असते.

जेव्हा पोपट नळीवर बसतो, तेव्हा त्याच्या वजनाने नळी गोल फिरते व पोपट उलटा लटकतो. उलटे लटकताच पोपट स्वाभाविकपणे पायात नळी गच्च पकडतो. ही अवस्था पोपटाने कधीच अनुभवलेली नसते. नळी सोडली की आपण पडू, असेच त्याला वाटत राहते.

खरे तर नळी सोडल्यानंतर पडू लागताच पंखांचा वापर करून एक गिरकी घेऊन तो सहज उडू शकणार असतो. पण हे ज्ञान त्याला होत नाही व तो नळी अधिकच गच्च पकडून लटकलेला राहतो व पकडणाऱ्याच्या हाती पडतो. याला भयसापळा असे म्हणता येईल.

जेव्हा आपला पोपट झाला आहे असे वाटते व तरीही आपण त्या परिस्थितीतून सुटूच शकत नाही, तेव्हा आपण कशाला भीत आहोत ते नेमके पाहावे. “हा आधार गेला तर,” अशी भीती असते तेव्हा. जर काही काळ निराधार व्हायची तयारी दाखवली, तर आपणही उडून जाऊ शकत असतो. पडायची शक्यता ज्याला जराही नको वाटते, तो उडू शकत नाही.

सरदार वल्लभभाई पटेल, हे काँग्रेसचे नेते होते हे १००% खरे आहे, पण नरेंद्र मोदी यांनी त्यांचा पुतळा उभारल्यावर काँग्रेसी मंडळींना का त्रास होतो आहे? हेच कळत नाही. खरं तर त्यांना आनंद व्हायला पाहिजे.

 

india.com

मोनोपॉली वाटणारे महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधीच मोदींनी खुबीने आपलेसे केले असे काँग्रेसींना वाटतंय. पाठोपाठ आता सरदार पटेलांवर भाजप हक्क सांगतंय असं त्यांच मत आहे त्यामुळे काँग्रेसजन चलबिचल झालेत. नेमका हाच मुद्दा काँग्रेससाठी भयसापळा ठरतोय.

भाजपसाठी मोहसापळा

माकडे पकडायचीदेखील एक खास पद्धत आहे. एक मडके मातीत पुरून ठेवतात. मडक्यात एक फळ असते माकड ते फळ काढण्यासाठी मडक्यात हात घालते. मडक्याचे तोंड हे अगदी नेमक्या आकाराचे बनविलेले असते; असे की फळ सोडून दिले तर माकडाचा हात बाहेर निघू शकेल. फळासकट हात बाहेर काढायला जावे, तर हाताचा आकार वाढल्याने हात अडकेल.

माकडाच्याने फळ सोडवतही नाही आणि त्यामुळे हात बाहेर काढता येत नाही. निर्णय न घेता येण्याच्या या अवस्थेत माकड मनाने अडकते व शरीराने मडक्यापाशी. या सापळ्याला मोहसापळा असे म्हणता येईल.

आपले ज्या परिस्थितीत माकड झाले असेल, तीत असे काय आहे की ज्याचा मोह आपल्याच्याने सोडवत नाहीये, हे जर बघता आले तर कदाचित ती गमावणूक वाटते तेवढी मोलाची नसेलसुद्धा.

नेमकी हीच अवस्था भाजप नेते, प्रवक्ते आणि समर्थकांची झालेली आहे. पुतळा ऊभा करून झाला आहे पण कायम नेहरु-गांधी कुटुंबीयांचा विरोध करणे हाच कार्यक्रम सध्या भाजपेयींकडून सुरु आहे. “सरदार पटेल यांच्या मृत्यूनंतर तब्बल ४१ वर्षांनी त्यांना भारतरत्न दिला कारण काँग्रेसवाल्यांना पटेलांचा राग होता” असा आरोप भाजपवाले करत आहेत.

 

nationaljanmat.com

“देशातील अनेक योजना, शिष्यवृत्ती, खेळाची मैदाने, रस्ते, विमानतळ, बंदर, पुरस्कार आदींनी केवळ नेहरू-गांधी परिवाराचीच नावे देऊन काँग्रेसने इतर महापुरुषांवर अन्याय केला आहे” ही कॅसेट वाजवतानाच भाजपवाले सगळीकडे दिसले.

सोबतच नेहरू हे पटेलांचा दुस्वास करायचे असा आरोप भाजपवाले करत होते. पटेलांच्या कार्याबाबत बोलण्याऐवजी भाजपेयी लोक्स “नेहरु-गांधी” कुटुंबीयांवर टीका करण्याचा मोह टाळू शकले नाहीत. थोडेसे सोडून देऊन संपूर्ण सुटता आले तर वाईट काय? निदान या मर्यादित अर्थाने “फलत्याग’ नक्कीच मुक्तिदायक नाही काय?

समाजवादी आणि प्रसार माध्यमांचा हौदातील थयथयाट 

स्मारकं ही भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी असतात. आपला दैदिप्यमान वारसा जगाला पुतळे, स्मारकं या माध्यमांतून कळतं असतो.

मात्र नेहमीप्रमाणे सरदार पटेलांच्या पुतळ्याच्या लोकार्पण प्रसंगी डावे, तथाकथित पुरोगामी, समाजवादी मंडळी आणि खासकरून प्रसार माध्यमे मुहूर्तालाच अपशकुन करण्यास इमानेइतबारे आघाडीवर आहेत.

त्यांचा दावा असा आहे की “ह्या प्रकल्पासाठी खर्च झालेल्या सुमारे तीन हजार करोड रुपयांमधून शेतकरी कर्जमाफी, गरजूंवर वैद्यकीय उपचार, शेकडो शाळा, ग्रंथालय आदी सामाजिक उपक्रम राबवता येऊ शकले असते. स्मारकाची गरजच काय?”

मुळात या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले ते ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी तेव्हा यातले बहुतांश जण गप्प बसले होते. कदाचित त्यांना वाटतं असावे हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नाही. पण, मोदींनी विरोधकांच्या धारणेला ऊभा छेद देत पुतळा ठरलेल्या दिवशीच लोकार्पित केला. मग सुरु झाला या मंडळीचा थयथयाट.

यावरून एक गोष्ट आठवली. एक जण हौदात कमरेइतका उतरून बराच थयथयाट करतोय, हातांनी पाणी खळबळवत असतो. या हौदानं माझी काहीतरी मूल्यवान वस्तू गिळलीय म्हणून मी संतापलोय, असं त्याचं म्हणणं असतं.

“अरे तू शांत हो म्हणजे पाणी स्थिर होईल आणि मग तुला तळ दिसेल व वस्तूही सापडेल” असं कोणीतरी समजावत आहे. पण, हा ऐकूनच घ्यायला तयार नाही. हौदाचा तळ रिकामाच आहे आणि मी केलेला थयथयाट व्यर्थ होता, हे स्वतःला कळू न देण्यासाठी तो पाणी फेसाळलेलं ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहतो.

अगदी अशीच अवस्था या मंडळींची पटेलांच्या पुतळ्यामुळे झालीये असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे परदेशात कशी सुंदर स्मारकं आहेत आणि आपण कसे याबाबत मागे आहोत असे स्वतःचे सेल्फी टाकत हेच महाभाग एरवी बोलताना आपण बघितले असतीलचं.

 

edwiseinternational.com

जस उगाचं विरोधासाठी विरोध करत गेलं तर स्वतःचचं हसू होतं; तसच कोणत्याही गोष्टीचा वृथा अभिमान बाळगण्यातही भूषण नाही. पोपटानं एकदा तरी आधार सोडून पाहावा. माकडानं एकदा तरी फळ सोडून पाहावं. थयथयाट करणाऱ्यानं एकदा तरी खळबळ थांबवून तळ पाहावा. हे जमायला अवघड नसतं. पटायलाच अवघड असतं.

भयसापळा, मोहसापळा हे माणसाच्या मनातूनच तयार झालेले असतात. त्यामुळे त्यातून बाहेर पडणे अवघड नसते; पण सुटकेचा हा मार्ग सोपा असला तरी पटायला अवघड असतो.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version