आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
ऍसिडिटी किंवा मराठीत आपण ज्याला आम्लपित्त असे म्हणतो ह्याचा त्रास प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा होतोच!
हल्ली तर निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे, फास्ट फूडमुळे, कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा न पाळता आल्यामुळे किंवा अपुरी झोप झाल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आम्लपित्ताचा त्रास होतो.
कधी कधी तर टेन्शन किंवा स्ट्रेसमुळे सुद्धा ऍसिडिटी वाढते. छातीत जळजळ, पोटात तीव्र वेदना, ओकारी येणे, मळमळ, डोके दुखणे असा त्रास आम्लपित्त वाढल्याने होतो. अनेक माणसांना नेहमी ह्याचा त्रास होतो.
असा हा ऍसिडिटीचा त्रास म्हणजे आपल्या जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होते. हे आम्ल जठरात गॅस्ट्रिक ग्लॅन्डसमधून स्रवले जाते व ह्यामुळे अन्नाचे पचन होते.
हे हायड्रोक्लोरिक आम्ल अन्नाच्या पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंतु हे जास्त प्रमाणात स्रवले गेले तर ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
नेहमी बाहेरचे मसालेदार तिखट अन्न खाणे, तळलेले अन्न वारंवार खाणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखू खाणे, सततची काळजी व ताण घेणे ह्याने ऍसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा –
===
तसेच जर काही वेदनाशामक किंवा प्रतिजैविके घेतली किंवा ऍस्पिरिन व सांधेदुखीची औषधे सुरू असली तरीही ऍसिडिटी वाढू शकते. आपल्या पोटात जेव्हा हे ऍसिड स्रवलेले असते तेव्हा आपल्या पोटाची पीएच लेव्हल २ किंवा ३ असते.
जठर, अन्ननलिका व ड्युओडेनम ह्यांचे ह्या ऍसिडपासून रक्षण व्हावे म्हणून आपल्या शरीरात ह्या अवयवांमध्ये एक इनर लायनिंग असते. जेव्हा हे लायनिंग जास्त प्रमाणात ऍसिड स्रवल्यामुळे नष्ट होते किंवा खराब होते तेव्हा अल्सरचा त्रास होऊ शकतो.
छातीत किंवा घशात जळजळणे, पोटात आग पडणे, वारंवार कडू-आंबट पाणी घशाशी येणे, अस्वस्थ वाटणे, हातापायांच्या तळव्यांची आग होणे, करपट ढेकर येणे, अंगावर लाल रंगाच्या रॅशेस येणे, अंगाला खाज सुटणे, चक्कर येणे, आंबट उलटी झाल्यानंतर बरे वाटणे ही ऍसिडिटी वाढण्याची प्रमुख लक्षणे आहेत.
हायपरऍसिडिटी असल्यास व त्याकडे चुकून दुर्लक्ष झाल्यास ह्या त्रासामुळे पोटात अल्सर सुद्धा होऊ शकतात. तसेच पित्ताशयात खडे होऊन ते काढून टाकावे लागू शकते.
कधी कधी तर ऍसिडीटीचे यकृतावर सुद्धा गंभीर परिणाम होऊ शकतात. यकृताचे गंभीर आजार होऊ शकतात.
ऍसिडिटीवर तात्पुरता उपाय करून उपयोगाचे नाही. नेहमी नेहमी सोडा पिणे, इनो घेणे, किंवा अँटासिड घेणे ह्याचेही शरीरावर गंभीर परिणाम होतात.
अँटासिड्स घेतल्यावर शरीरातील ऍसिड न्यूट्रलाइझ होते, व जठरातील ऍसिडिटी कमी होते. अन्ननलिकेत जे ऍसिड रिफ्लक्स होते ते कमी होते. परंतु अँटासिडमुळे पेप्सीन (एक पचनासाठी आवश्यक असलेले एन्झाईम )चे कार्य सुद्दा कमी होते.
हे पेप्सीस जठरात जेव्हा ऍसिड प्रमाणात असेल तेव्हाच तयार होते. हे पेप्सीन सुद्धा जठर, अन्ननलिका व ड्युओडेनमच्या इनर लायनिंग खराब करू शकते.
जेव्हा आपण उपाशीपोटी अँटासिड घेतो, तेव्हा फक्त २० ते ४० मिनिटांसाठी ऍसिड कमी होते कारण अँटासिड ड्युओडेनममध्ये वेगाने रिते होते.
आपण जेवल्यानंतर (साधारणपणे १ तासाने)अँटासिड घेतो तेव्हा अँटासिड किमान तासांसाठी ऍसिड कमी करते कारण आपल्या पोटातील अन्नामुळे अँटासिड ड्युओडेनममध्ये हळूहळू रिते होते.
म्हणूनच अँटासिड घेताना ते आपल्या मानाने न घेता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत कारण जर त्यांचे इतर औषधांबरोबर चुकीचे कॉम्बिनेशन झाले तर त्याचे गंभीर परिणाम शरीराला भोगावे लागू शकतात.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला ऍसिड पेप्सीन अल्सरमुळे छातीत खूप जळजळ होते. पोटात वेदना होतात आणि मळमळ व उलटी होते तेव्हा डॉक्टर अँटासिड घ्यायचा सल्ला देतात.
हे अँटासिड्स सुद्धा अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे आपल्यासाठी कुठले योग्य आहे व त्याचा किती डोस घ्यायचा व किती दिवस घ्यायचे ह्याबाबत डॉक्टरांचाच सल्ला घेणे आवश्यक आहे. सेल्फ मेडिकेशन कुठल्याही परिस्थितीत घातकच आहे.
कॅल्शियम कार्बोनेट असलेल्या अँटासिडचा जास्त प्रमाणात व अनेक दिवस डोस घेतला तर ऍसिड रिबाउंड होऊ शकते. म्हणजेच जेवणानंतर जास्त प्रमाणात ऍसिड तयार होते. सोडियम बायकार्बोनेट व कॅल्शियम कार्बोनेटचा एकत्रित हाय डोस घेतला तर मिल्क अल्कली सिंड्रोम होऊ शकतो.
ह्याची लक्षणे म्हणजे डोकेदुखी, मळमळ, चिडचिड, अशक्तपणा ही आहेत. तसेच ह्याने रक्तात कॅल्शियमचे प्रमाण वाढते आणि किडनीची कार्यक्षमता कमी होते. तसेच ऍल्युमिनिअम असलेले अँटासिड जास्त प्रमाणात घेतले तर रक्तातील फॉस्फेट कमी होते.
ह्याने स्नायूंमध्ये अशक्तपणा, एनोरेक्सिया म्हणजेच अग्निमांद्य, हाडांची झीज होऊन त्यांची बळकटी कमी होणे हे परिणाम होऊ शकतात. तसेच ज्या लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टिनल ब्लीडींग (पोटात रक्तस्त्राव) चा त्रास आहे त्यांनी ऍल्युमिनियम हायड्रॉक्साइड असलेले अँटासिड डॉक्टरांना विचारल्याशिवाय अजिबात घेऊ नये.
ज्या लोकांना उच्चरक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचा त्रास आहे किंवा ज्यांना खाण्यात मीठ व सोडियमची पथ्ये आहेत त्यांनी सोडियम असलेले किंवा सोडियम बायकार्बोनेट असलेले अँटासिड घेताना काळजी घ्यावी.
तसेच सहा वर्षाखालील लहान मुलांना तर अँटासिड्स अजिबात देऊ नयेत. खरे म्हणजे कुणीच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या मनाने औषधे घेऊ नयेत.
ऍसिडिटीचा त्रास जर थोडा असेल आजीबाईच्या बटव्यातील घरगुती औषधे घेऊन हा त्रास थांबू शकतो. थोडीशी ऍसिडिटी असेल तर घरगुती उपायाने बरे वाटू शकते.
हे ही वाचा –
===
१. तुळशीची पाने
तुळशीच्या पानांमध्ये पोटाला आराम वाटावे असे गुणधर्म असतात. त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास थोड्याच वेळात कमी होतो. तुम्हाला थोडीही जळजळ जाणवत असेल तर लगेच तुळशीची पाने चावून चावून खा किंवा ३-४ पाने कपभर पाण्यात उकळून त्याचा काढा करून प्या.
तुळस शरीरासाठी अत्यंत उपकारक आहे. नियमित सेवन केल्यास ह्याने इतर शारीरिक त्रास सुद्धा कमी होतात.
२. बडीशेप
जेवणानंतर बडीशेप खाणे ही सवय अत्यंत चांगली आहे. ह्याने अन्नपचन चांगले होण्यास मदत होते. ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो.
बडीशेपेचा काढा किंवा फेनेल टी प्यायल्यास आपली पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. अपचन आणि पोट फुगत असेल तर बडीशेप हा त्यावरचा सोपा व प्रभावी उपाय आहे.
३. दालचिनी
दालचिनी हे नैसर्गिक अँटासिड आहे. ह्याने बिघडलेले पोट ठीक होण्यास मदत होते.
अन्नपचन सुधारते आणि शरीरात पोषणमूल्ये शोषण्याचे कार्य सुरळीत होते. गॅस्ट्रोइंटेस्टीनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन असेल किंवा ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर दालचिनीचा काढा उपयुक्त आहे. दालचिनीमध्ये अनेक पोषणमूल्ये आहेत.
४. ताजे ताक
ताजे ताक म्हणजे पृथ्वीवरील अमृत आहे. छातीत जळजळत असेल तर ताजे गोड ताक नुसतेच किंवा सैंधव मीठ, किंवा कोथिंबीर बारीक चिरून त्यात घालून प्यायल्यास ताबडतोब आराम मिळतो.
मसालेदार किंवा तिखट पदार्थ खाल्ल्याने जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ताक हा त्यावरचा रामबाण उपाय आहे. ताक पोटातील ऍसिडिटी शमवण्याचे काम करते.
५. गूळ
गुळामध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते. त्यामुळे आतड्यांची शक्ती वाढते. तसेच जेवण संपवताना एक गुळाचा खडा खाल्यास अन्नपचन चांगले होते.
गुळामुळे आपली पचनसंस्था अल्कलाईन राहते व ऍसिडिटी कमी होऊन समतोल साधला जातो. उन्हाळ्यात तर गुळाचे सरबत प्यायल्याने शरीराचे तापमान नियमित राखण्यास मदत होते.
६. लवंग
आयुर्वेद व पारंपारिक चायजीन औषधांमध्ये लवंगीला महत्वाचे स्थान आहे. पोटाच्या विकारांसाठी लवंग गुणकारी आहे. लवंगीत कार्मीनेटीव्ह गुणधर्म म्हणजेच वात तयार न होण्याचे गुणधर्म असल्याने लवंग खाल्ल्यास गॅसेसचा त्रास होत नाही.
वातूळ पदार्थ खाताना किंवा तयार करतानाच त्यात लवंग घातली तर गॅसेस होत नाहीत.
लवंग व वेलची जेवणानंतर खाल्ल्यास ऍसिडिटीचा त्रास सुद्धा कमी होतो तसेच तोंडाला वास येत असल्यास त्यावर सुद्धा गुणकारी आहे.
७. जिरे
पोट दुखले की ओवा व जिऱ्याचा काढा देणाऱ्या आपल्या आज्या जिऱ्याचे गुण जाणून होत्या. जिरे हे फार चांगले ऍसिड न्यूट्रलायझर आहे. ह्याने अन्नपचन सुधारते तसेच पोटातल्या वेदना सुद्धा कमी होतात.
पोटात दुखत असताना जिऱ्याची पूड कोमट पाण्यात घालून प्यायल्यास किंवा जेवणानंतर जिऱ्याचा काढा घेतल्यास पोटाचा त्रास कमी होतो.
८. आलं
आल्यामध्ये तर अनेक औषधी गुण आहेत. आल्यामध्ये अन्नपचनासाठी आवश्यक तसेच दाहशामक गुणधर्म आहेत. पोटातील ऍसिड न्यूट्रलाइज करण्यासाठी आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यास किंवा आल्याचा रस घेतल्यास फायदा होतो.
मळमळ, उलटी, पित्त वाढणे ह्यावर आल्याचे पाचक हे तर सर्वोत्तम औषध आहे.
९. थंड दूध
ऍसिडिटी झाल्यावर गार दूध घेणे हा उपाय सोपा आणि गुणकारी आहे. दुधाने पोटातील ऍसिड कमी होते. दुधात कॅल्शियम असते. कॅल्शियम अल्कलाईन असल्याने त्याने ऍसिड न्यूट्रलाइज होते. ज्यांना दुधाची ऍलर्जी नाही ते हा सोपा उपाय नक्कीच करू शकतात.
१०. ऍपल सीडार व्हिनेगर
कधी कधी पोटात पुरेसे ऍसिड तयार न झाल्याने ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी ऍपल सीडार व्हिनेगर घेतल्याने फायदा होतो.
ज्यांना हा त्रास आहे त्यांनी १-२ टीस्पून ऍपल सीडार व्हिनेगर १ कप पाण्यात घालून प्यायले तर ते ऍसिड कमी तयार होण्याच्या परिस्थितीत फायद्याचे ठरते.
हे ही वाचा –
===
११. शहाळ्याचे पाणी
शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील ऍसिडिक लेव्हल कमी होऊन अल्कलाईन होते. ह्याने पोटात आवश्यक असलेले म्युकस सुद्धा तयार होते.
यामुळे अतिरिक्त प्रमाणात ऍसिड तयार झाल्यास पोटाचे रक्षण होते. शहाळ्याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते व ऍसिडिटी वाढणे कमी होते.
१२. केळी
केळ्यामध्ये नैसर्गिक अँटासिड्स असतात. ऍसिड रिफ्लक्समध्ये केळी बफरचे काम करतात. तसेच अन्नपचन सुरळीत होण्यासाठी सुद्धा केळी गुणकारी आहेत. थोड्या प्रमाणात ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर केळी खाणे हा त्यावरील सोपा उपाय आहे.
ऍसिडिटी वाढली असताना कलिंगड खाल्ल्याने सुद्धा आराम मिळतो. कलिंगडाने ऍसिडिटी कमी होते तसेच ऍसिड रिफ्लक्स सुद्धा कमी होतो. ह्याशिवाय सफरचंद तसेच डाळिंब सुद्धा ऍसिडिटीवर उपकारक आहेत.
पुढच्या वेळी जर ऍसिडिटीचा थोड्या प्रमाणात त्रास झाला तर लगेच औषधे घेण्यापेक्षा हे घरगुती उपाय करून बघा आणि औषधांचे साईड इफेक्ट्स टाळण्याचा प्रयत्न करा.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.