आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
डॉक्टर म्हटले की डोळ्यापुढे उभे राहतात पांढरा कोट घातलेले, गळ्यात स्टेथोस्कोप घातलेले लोक! डॉक्टर व स्टेथोस्कोप ह्यांचे नाते इतके अतूट आहे की स्टेथोस्कोप शिवाय डॉक्टर आपल्या कल्पनेत सुद्धा येत नाहीत.
डॉक्टर म्हणजे स्टेथोस्कोप अडकवलेली व्यक्ती हे समीकरण इतके घट्ट आहे की जाहिरातींमध्ये डेन्सिस्टच्या गळ्यात सुद्धा स्टेथोस्कोप अडकवलेला दिसतो. लहान मुले सुद्धा डॉक्टर डॉक्टर खेळताना खोट्या खोट्या स्टेथोस्कोपने पेशण्टची छाती व पोट तपासतात.
डॉक्टरांना डायग्नोसिस करण्यास अत्यंत उपयुक्त अश्या स्टेथोस्कोपचा शोध कुणी लावला व कधी लागला हे आज आपण बघूया.
स्टेथोस्कोपच्या शोधामागे एक रंजक कथा आहे. डॉक्टरांच्या ह्या प्रमुख आयुधाचा शोध लावण्याचे श्रेय जाते एका फ्रेंच डॉक्टरला! हे डॉक्टर अतिशय दयाळू आणि परोपकारी होते. त्यांनी क्षयरोगावर अत्याधुनिक उपचार शोधून काढले.
स्टेथोस्कोपचा शोध लागण्याआधी डॉक्टर पेशण्टच्या छातीला कान लावून त्याचे हृदयाचे ठोके किंवा छातीतील कफाचा अंदाज घेत असत. ह्या पद्धतीला इमिजिएट किंवा डायरेक्ट auscultation असे म्हणतात.
ही पद्धत स्त्रियांसाठी जरा ऑकवर्ड होती कारण पूर्वी बहुतांश डॉक्टर हे पुरुष असत. स्त्री पेशन्ट व डॉक्टर ह्या दोघांनाही पेचात टाकणारा प्रश्न ह्या पस्तीस वर्षीय फ्रेंच डॉक्टरांनी सोडवला. २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेली auscultation ही तपासण्याची पद्धत बदलून टाकली.
रेने थिओफाईल हायसिंथ लेनेक (René-Théophile-Hyacinthe Laennec ) ह्या फ्रेंच डॉक्टरांनी १८१६ साली स्टेथोस्कोपचा शोध लावला.
रेने लेनेक ह्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १७८१ रोजी झाला. त्यांचे वडील प्रख्यात वकील होते. त्यांच्या वडिलांची इच्छा त्यांनी डॉक्टर होऊ नये अशी होती. परंतु लेनेक ह्यांनी मात्र वैद्यकीय व्यवसायच निवडला.
एकदा लेनेक त्यांच्या एका स्त्री पेशन्टला तपासत होते. तिच्या तब्येतीची सर्व लक्षणे बघून डॉक्टर लेनेक ह्यांना त्या स्त्रीला हृदयविकार असावा अशी शंका आली.
१८१९ साली लेनेक ह्यांनी De l’Auscultation Médiate हा प्रबंध लिहिताना असे नमूद केले की,
“१८१६ साली माझा सल्ला घ्यायला एक स्त्री आली होती जिच्यात मला हृदयविकाराची सामान्य लक्षणे आढळून आली. तिच्या शरीरात मांसाचे प्रमाण जास्त असल्याने तिचे निदान हाताने तपासून करणे शक्य नव्हते.
तपासण्याची दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट auscultation वापरणे त्या पेशन्टच्या वयामुळे व ती स्त्री असल्याने शक्य नव्हते. तेव्हाच ध्वनीविज्ञानातील एक सोपी व सुप्रसिद्ध गोष्ट मला आठवली की लाकडाच्या एका टोकावर जर पिन घासली तर त्याचा आवाज दुसऱ्या टोकाला लाकडाला कान लावला तर ऐकायला येतो.
ही कल्पना सुचल्याने मी एका कागदाची सुरळी केली. ती हृदयाच्या ठिकाणी ठेवली व दुसऱ्या बाजूने मी कान लावला व माझा अंदाज बरोबर ठरला. मला आनंद झाला कारण मला आता हृदयाची स्पंदने व्यवस्थित ऐकायला येत होती. छातीला कान लावून देखील हृदयाची स्पंदने इतकी स्पष्ट ऐकायला येत नाहीत.”
आज लेनेक ह्यांना फादर ऑफ मॉडर्न पल्मनरी डिसीज रिसर्च मानले जाते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्राला मेलॅनोमा (ग्रीकमध्ये मॅलस म्हणजे काळे व ओमा म्हणजे एखाद्या कृतीचा परिणाम) व सिऱ्होसिस ( ग्रीकमध्ये कीरॉस म्हणजे ऑरेंज ब्राऊन किंवा पिवळसर ब्राऊन रंगाचा व ओसिस म्हणजे कंडिशन) ह्या दोन महत्वाच्या संज्ञा दिल्या.
१८०४ साली लेनेक ह्यांनी स्किन कॅन्सर मेलॅनोमावर व्याख्यान दिले. ह्या विषयावर बोलणारे ते पहिले डॉक्टर होते. तेव्हा ते पूर्ण डॉक्टर झाले नव्हते तर फक्त मेडिकलचे विद्यार्थी होते.
त्यांनी पेरिटोनायटिस म्हणजे ओटीपोटावरील सूज ह्या आजाराच्या डायग्नोसिसमध्ये सुद्धा महत्वाचे योगदान दिले. दम्याच्या रोग्यांमध्ये छातीत जे म्युकस तयार होते त्याला लेनेक्स पर्ल्स असे नाव लेनेक ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून दिले आहे.
त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातील आणखी महत्वाचे योगदान म्हणजे क्षयरोगावरील उपचार होय. ते केवळ पाच वर्षांचे असताना त्यांची आई क्षयरोगाने गेली. त्यानंतर लेनेक ह्यांना त्यांच्या काका आजोबांकडे म्हणजे ऍबे लेनेक ह्यांच्याकडे राहण्यास पाठवण्यात आले. ऍबे लेनेक हे प्रिस्ट होते.
रेने लहान असताना बऱ्याचदा आजारी पडायचे. त्यांना बऱ्याचदा ताप, थकवा व दम्याचा त्रास होत असे. तरीही वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे काका Guillaime-François Laennec ह्यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्लिश, जर्मन व मेडिकलच्या अभ्यासाला सुरुवात केली.
त्यांना फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी मेडिकल कॅडेट म्हणून बोलवण्यात आले. ते अतिशय हुशार व कष्टाळू विद्यार्थी होते. १८०१ साली पॅरिसमध्ये त्यांनी परत मेडिकलचा अभ्यास सुरु केला . १८१५ साली सत्ता स्थापन झाल्यानंतर नेकर हॉस्पिटलमध्ये काम करणे सुरु केले.
१८१६ साली एक तरुण स्त्री हृदयाच्या तक्रारींनी ग्रस्त होती. वर सांगितल्याप्रमाणे त्या काळात डॉक्टरांना पेशण्टच्या छातीला कान लावून तपासावे लागे. लेनेक ह्यांना एखाद्या स्त्रीला असे तपासणे योग्य वाटले नाही आणि ती स्त्री लठ्ठ असल्याने इतर प्रकारे तिला तपासून निदान करणे शक्य नव्हते.
–
- जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती!
- ह्या १० महान शास्त्रज्ञांचे जगभर गाजलेले प्रसिद्ध शोध खरंतर दुसऱ्यांनीच लावले होते…!
–
म्हणूनच त्यांनी कागदाची सुरळी करून त्या स्त्रीच्या हृदयाची स्पंदने ऐकण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी ठरले. अनेक लोक असे सांगतात की लेनेक ह्यांना स्टेथोस्कोपची प्रेरणा बासरीतुन मिळाली. ते उत्तम बासरी वाजवत असत.
कागदाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तशीच पोकळ लाकडी नळी तयार केली. तिच्या एका बाजूला एक मायक्रोफोन जोडला व दुसऱ्या बाजूला इयरपीस जोडला.
सुरुवातीला लेनेक ह्यांनी त्यांच्या उपकरणाला “Le Cylindre” असे नाव दिले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या उपकरणाला अनेक नावे दिली ती ऐकून लेनेक वैतागले. अखेर लेनेक ह्यांनी त्यांच्या उपकरणाचे नामकरण स्टेथोस्कोप असे केले. ग्रीक भाषेत स्टेथोज म्हणजे छाती व स्कोपोज म्हणजे तपासणे.
ब्रिटनीचे रहिवासी असलेले लेनेक हे अत्यंत धार्मिक कॅथलिक होते. तसेच ते अत्यंत दयाळू वृत्तीचे व परोपकारी सुद्धा होते. त्यांनी गरीब लोकांसाठी अनेक दानधर्म केले.
क्षसर्चयरोगावर रिसर्च करत असताना दुर्दैवाने त्यांनाही क्षयरोगाची लागण झाली आणि स्टेथोस्कोप शोधून काढल्यानंतर केवळ दहाच वर्षांत त्यांचे निधन झाले.
त्यांचे पुतणे Mériadec Laennec ह्यांनी रेने लेनेक ह्यांना क्षयरोग झाल्याचे लेनेक ह्यांनीच शोधून काढलेल्या स्टेथोस्कोपच्या मदतीने निदान केले. लेनेक ह्यांनी लिहून ठेवले आहे की,
“मला माहितेय की ह्या रोगाचा अभ्यास करण्यासाठी मी माझा जीव धोक्यात घातला आहे. परंतु ह्या रोगावर मी जे पुस्तक लिहितोय त्याचा सर्वांना उपयोग होईल. माझ्या आयुष्यापेक्षा हे पुस्तक जास्त मौल्यवान आहे.”
लेनेक ह्यांचा वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी क्षयरोगाने मृत्यू झाला.
लेनेक ह्यांचे हे उपकरण फ्रांसमध्ये सर्वत्र प्रसिद्ध झाले तसेच संपूर्ण युरोप खंडात डॉक्टर लोक हे उपकरण वापरू लागले. त्यानंतर अमेरिकेत सुद्धा हे उपकरण वापरण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर १८५१ साली एक आयरिश डॉक्टर आर्थर लिरेड ह्यांनी दोन्ही कानांत घालता येईल असा स्टेथोस्कोप तयार केला. हा स्टेथोस्कोप त्यांनी gutta-percha ह्या टिकाऊ प्लास्टिक पासून तयार केला होता.
त्याच वर्षी सिनसिनाटी येथील डॉक्टर नॅथन मार्श ह्यांनी भारतीय लाकूड व रबर वापरून स्टेथोस्कोप तयार केला व त्याचे पेटन्ट सुद्धा घेतले. परंतु हा स्टेथोस्कोप वापरण्यास अत्यंत नाजूक होता.
त्यानंतरच्या वर्षी न्यूयॉर्कच्या डॉक्टर जॉर्ज कॅमन ह्यांनी एक स्टेथोस्कोप तयार केला. हे डिझाईन मोठ्या कमर्शियल उत्पादनासाठी स्वीकारले. ह्या स्टेथोस्कोपला कॅमन्स स्टेथोस्कोप असे म्हणतात. तेव्हापासून ह्याचेच विविध डिझाइन्स व प्रकार डॉक्टर वापरतात.
कॅमन ह्यांनी हे डिझाईन पेटन्ट केले नाही कारण त्यांची अशी इच्छा होती की हे उपकरण सर्व डॉक्टरांना वापरता यावे.
आता तर हृदयाच्या तपासणीसाठी ईसीजी वगैरे काढण्यात येतात. तसेच डिजिटल स्टेथोस्कोप सुद्धा आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात रोज नवनवे शोध लागत आहेत जे डॉक्टर व पेशन्ट दोघांनाही उपयुक्त ठरत आहेत.
परंतु पहिल्या स्टेथोस्कोपचा शोध हा वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय महत्वाचा शोध होता त्यामुळेच डॉक्टरांना पेशन्टचे अचूक निदान करण्यात मदत झाली. हा शोध लावण्यासाठी डॉक्टर रेने लेनेक ह्यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहेत.
–
- स्त्रीयांनी लावलेल्या या शोधांमुळे आपलं आयुष्य सुखकर झालं आहे
- धोकादायक ते सुरक्षित : आगपेटीच्या शोधाची रंजक कथा
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.