आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले, त्यांच्याकडून आपण पाश्चात्य संस्कृतीतील अनेक गोष्टी आत्मसात केल्या. प्रत्येक देशाची एक वेगळी संस्कृती असते, काही विशिष्ट परंपरा असतात. त्या त्या परंपरा व संस्कृतीमुळे देशाची ओळख निर्माण होते.
आपल्या भारताची सुद्धा आपल्या प्राचीन विविधरंगी विविधढंगी संस्कृतीमुळे तसेच विविध भाषा, कला, साहित्य, भारतीय खाद्यसंस्कृती ह्यामुळे जगात एक वेगळी ओळख आहे.
हीच रंगेबेरंगी संस्कृती, इथले उत्साहपूर्ण वातावरण बघण्यासाठी आवर्जून देशविदेशातील लोक भारताला भेट देतात.
अनेक लोकांना भारत देश हा रंगेबेरंगी, भरपूर गर्दी असलेला, भरपूर विविधता असलेला, बेशिस्त वाटतो तर, अनेकांना लक्षवेधक, असामान्य व आकर्षक वाटतो. अनेकांना आपल्या देशातील काही गोष्टी बघून कल्चरल शॉक बसतो. तर काही लोक आपल्या देशातील लोकांकडून अनेक गोष्टी शिकून जातात.
१. बशीतून चहा पिणे
आपल्याकडे चहा देताना कपबरोबर बशी देण्याचीही पद्धत आहे. अनेक लोकांना कपातून बशीमध्ये चहा ओतून गार करून मग प्यायला आवडतो. गरम चहा पटापट संपवायचा असेल तर तो बशीत ओतून पिणे सोयीचे पडते.
शिवाय लहानपणापासून बशीतून चहा पिणे ही अनेकांची सवय असते. भारतात राहून गेल्यानंतर अनेक परदेशी लोक ही सवय कायम ठेवतात. त्यांनाही बशीतून चहा पिणे सोयीचे आणि मजेदार वाटते.
सॉमर शिल्ड नावाची महिला म्हणते,
“भारतात येण्याआधी चहा बशीत घालून गार करून पिणे हे कधी माझ्या कल्पनेत सुद्धा नव्हते. पण मला हे अतिशय आवडले. गरम चहाने लोक आपले तोंड भाजून घेत असतात तेव्हा मी मात्र बशीमध्ये चहा ओतून छानपैकी त्या चहाचा आस्वाद घेत असते. चहा पिण्याची ही पद्धत मी गुजरातमधील काही स्थानिक लोकांकडून शिकले.”
२. काट्याचमच्यांचा वापर न करता हाताने जेवणे
आपल्याकडे जेवताना आपण सुरी काट्यांचा वापर करत नाही. किंबहुना एक भात सोडल्यास आपल्याकडील जेवण हे सुरी काट्यांनी खाताच येत नाही. त्यासाठी हाताचाच वापर करावा लागतो.
आपल्याकडची मोठी माणसे सांगतात की हाताने जेवल्याने फक्त पोटच नाही तर मन सुद्धा तृप्त होते. भारतात येणाऱ्या अनेक परदेशी पर्यटकांना ह्या गोष्टीचे आकर्षण वाटते. किंवा कुतूहलही वाटते. काही लोकांना हे अनहायजिनिक सुद्धा वाटते.
परंतु बहुतांश विदेशी हाताने जेवण्याचा अनुभव घेतात आणि त्यांना ही पद्धत आवडते. विदेशींच्या मते ह्याने ताट अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करता येते. तसेच जेवणातील चवींचा देखील अधिक चांगल्या प्रकारे आस्वाद घेता येतो.
अनेक लोकांनी भारतातून परत गेल्यानंतर सुद्धा हातानेच जेवणे कायम ठेवले आहे.
३. घरात जाताना चप्पल बूट बाहेर काढून ठेवणे
आपल्याकडे घरात चप्पल घालून आले की घरातल्या आई-आज्जी भूत बघितल्यासारखे ओरडतात. आपल्या किंवा कुणाच्याही घरात जाताना आपले चप्पल शूज बाहेर काढून ठेवणे हे आपल्याकडे सक्तीचे आहे.
ह्यात सोवळ्यापेक्षा स्वच्छतेचा मुद्दा अधिक आहे. बाहेरून घालून आलेल्या चप्पलांबरोबर घरात जंतू, घाण व धूळ सुद्धा येते.
बाहेरून आल्यानंतर आधी चप्पल बाहेरच काढून मग हात पाय धुवूनच इतर कामे करायची हा बहुतांश घरात दंडक घालून दिलेला असतो. सर्व भारतीय लोक ह्याचे नकळतपणे पालन करतात. यामागील कारण जाणून घेतल्यानंतर परदेशी लोकांना सुद्धा ही पद्धत आवडते व ते सुद्धा ही पद्धत पाळतात.
४. भारतीय पद्धतीचे शौचालय
भारतीय पद्धतीने दोन पायांवर उकिडवे बसून शौच करणे ही सर्वात नैसर्गिक पद्धत आहे. ह्याने पोटावर सुद्धा व्यवस्थित नैसर्गिकपणे प्रेशर येते व क्रिया योग्य प्रकारे उरकली जाते. भारतीय पद्धतीच्या शौचालयांचा तसेच क्रिया झाल्यावर पाण्याने स्वच्छता करण्याची खिल्ली उडवली जाते.
–
- भारतीयांनी रोजच्या जीवनात आत्मसात केलेल्या ह्या ७ गोष्टी चक्क पाश्चात्यांच्या कॉपी आहेत!
- भारतीयांच्या मनातील अमेरिकेबद्दलचे ३ सर्वात मोठे गैरसमज
–
अनेक लोकांना (परदेशी सुद्धा) हे आता पटू लागले आहे की कमोडचा तसेच टिश्यू पेपरचा वापर हा कितीही हायजिनिक वाटत असला तरी प्रत्यक्षात तो अनहायजिनिक आहे. भारतीय शौचालये स्वच्छ करण्यास सोपी असतात.
तसेच शरीराचा कुठलाही स्पर्श टॉयलेट सीटला होत नसल्याने इन्फेक्शनचा धोका कमी असतो. स्वच्छतेसाठी पाणीही कमी लागते. तसेच क्रिया झाल्यानंतर शरीराची पाण्याने स्वच्छता केल्याने अधिक फ्रेश व स्वच्छ वाटते असे अनेक विदेशी लोकांना पटले आहे.
अनेक लोक आता भारतीय पद्धतीचा अवलंब करीत आहेत.
५. रंगेबेरंगी ब्राईट रंगांचे कपडे
आपल्याकडे अनेक सण समारंभाच्या प्रसंगी आपण रंगेबेरंगी पारंपरिक कपडे घालतो. आपले पारंपरिक कपडे हे सहसा ब्राईट रंगांचे असतात. लाल, पिवळा, केशरी, निळा, जांभळा, गुलाबी अश्या विविध रंगांचे कपडे आपण सहज वापरतो.
साड्या, कुर्ते, परकर पोलके, प्रत्येक प्रदेशातील पारंपरिक वेशभूषा ह्या सहसा अतिशय ब्राईट रंगांच्या असतात. अनेक विदेशींना हे ब्राईट रंग घालायची हिम्मत होत नाही. परंतु त्यांनाही आता पटले आहे की ब्राईट रंग खुलून दिसतात आणि हे असे कलरफुल व ब्राईट रंगांचे कपडे घातले की माणसाला कॉन्फिडन्ट वाटते.
भारतीयांचे पारंपरिक कपडे आता विदेशी लोकांनाही आवडू लागले आहेत. इकडे आले की ते परत जाताना पारंपरिक भारतीय वेशभूषेचा एकतरी नमुना आपल्याबरोबर घेऊन जातात. तसेच ब्राईट रंगांचे कपडे वापरण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा घेऊन जातात.
६. गोष्टी टाकून न देता जुगाड करणे
एखादी गोष्ट बिघडली असेल तर ती टाकून न देता जुगाड करणे हे आपल्या रक्तातच आहे. कारण कुठलीही गोष्ट फुकटात येत नाही, पैसे झाडाला लागत नाहीत आणि गोष्टी वाया घालवायच्या नाहीत ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळालेली असते.
म्हणूनच आपले डोके अत्यंत क्रिएटिव्हपणे चालवून थोड्या गोष्टीत ऍडजेस्ट करणे, जुगाड करून गरज भागवणे ह्या गोष्टी आपण रोजच्या आयुष्यात लीलया करतो. म्हणूनच कॉस्ट कटिंग आपल्याला जड जात नाही.
एखादी गोष्ट संपूर्णपणे बंद पडल्याशिवाय ती फेकायची नाही. ती दुरुस्त करून वापरायची आणि शक्य असल्यास टाकाऊतुन टिकाऊ बनवायचे अशी आपल्याकडून प्रेरणा घेऊन अनेक विदेशी लोक सुद्धा जुगाड करायला शिकले आहेत.
ह्याखेरीज हात जोडून नमस्ते किंवा नमस्कार करणे हे सुद्धा विदेशींना आवडते. ह्याने समोरच्याच्या प्रति असलेली आदराची भावना आपल्याला त्याच्यापर्यंत पोचवता येते असे त्यांना वाटते.
योग व आयुर्वेद ह्याचे तर महत्व आपल्यापेक्षा लोकांनाच जास्त वाटते की काय अशी शंका यावी इतकी योग व आयुर्वेदाची क्रेझ विदेशात बघायला मिळते.
विदेशी लोकांना आता आर्टीफिशियल गोष्टी सोडून नैसर्गिक आयुष्य जगण्याचे महत्व हळूहळू पटते आहे म्हणूनच अधिकाधिक लोक व्हेगन डाएट फॉलो करतात, योग करतात. संस्कृत भाषेचेही आकर्षण अनेकांना वाटत असल्याने अनेक परदेशी लोक संस्कृत भाषेकडे वळू लागले आहेत.
भारतीय संस्कृतीमध्ये अतिथी देवो भव असे मानतात. एखाद्या भारतीय व्यक्तीच्या घरी गेल्यास मनमोकळेपणाने व प्रेमाने होणारे स्वागत तसेच आदरातिथ्य परदेशातील लोकांना आवडून जाते. ही शिकवण ते परत जाताना आपल्याबरोबर घेऊन जातात व तिकडे पाळतात.
भारतीय कुटुंबात असलेले एकमेकांविषयीचे प्रेम, आपुलकी, लहानांवर असणारा मोठ्यांचा स्नेह, मोठ्यांचा आदर, नात्यांचा आदर ह्याचे महत्व सुद्धा परदेशात पटू लागले आहे.
भारतीय संस्कृतीतून प्रेरणा घेऊन ते लोक सुद्धा त्यांच्या फ्री कल्चरमध्ये आता नात्यांचा आदर, प्रेम व आपुलकी ठेवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
भारतात असलेला हा खजिना आपल्याला विनासायास मिळाला आहे. पण आपल्याला त्याचे महत्व वाटणे हळूहळू कमी होऊ लागले आहे ही मात्र खेदाची बाब आहे.
प्रगती करताना ह्या संस्कृतीचा विसर न पडता दोन्हीत बॅलन्स साधल्यास आपण जगापुढे आणखी चांगला आदर्श निर्माण करून शकू.
–
- पाश्चात्य कमोडच्या फ्लशला पाणी सोडण्यासाठी दोन वेगळी बटणे का असतात? समजून घ्या..
- या विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.