Site icon InMarathi

चॅटिंगमध्ये भावनांचे रंग भरणाऱ्या “स्मायली”च्या जन्माची रोचक कथा!

emoticon creator

worcesterhistory.org

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

लेखक : सर्वेश शरद जोशी

===

स्मायली (😃) ही आजच्या युथ जेनची भाषा आहे. व्हॉट्सॅप/फेसबुकवरची आजच्या पिढीची चॅटिंग बघितली तर ती अनेक smilies नी भरलेली दिसतात. म्हणूनच ‘A picture is worth a thousand words’ या सुप्रसिद्ध वाक्याच्या धर्तीवर ‘A smiley is worth a thousand words’ असं म्हटलं तरीही ते वावगं ठरणार नाही.

पण या smiley चा इतिहास आपल्याला माहिती आहे का ? म्हणूनच आजचा हा लेख खास आपल्या टेक्नोसॅव्ही जनरेशनसाठी !

 

britannica

 

इसवी सन २०१७ दरम्यान, बोलोग्ना युनिव्हर्सिटीतील इतिहास आणि संस्कृती विभागातील प्राध्यापक निकोलो मार्चेटी यांच्या नेतृत्वाखाली जगभरातील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात तुर्कस्थानातील कारकामिस येथे एक इसवीसनपूर्व १७०० दरम्यानचे हिटाइट (एक ऍनाटोलियन राजवंश) कालीन पात्र भग्न अवस्थेत सापडले.

जेव्हा ते तुकडे एकमेकांना जोडून त्या पात्राची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा त्यावर एक मोठा हसरा चेहरा (smiley/happy face) चितारला असल्याचे पुरातत्त्वज्ञांना दिसले.

याबद्दल बोलताना निकोलो मार्चेटी म्हणतात की, “त्या’(पात्रा) वर निश्चितच एक हसरा चेहरा रेखाटण्यात आला आहे. त्याव्यतिरिक्त त्या flask वर कुठलेही रेखांकन नाही. आणि त्या भागातील इतर पुरातन मृत्तिका(ceramic) कलाकृतींवर अशा प्रकारची रेखाटने आढळत नाहीत.”

 

indiatoday.in

 

‘झ्दार नाद साझाऊ’ या झेक रिपब्लिकमधील शहरात असणाऱ्या ख्रिस्ती आश्रमाचे इसवीसन १७४१ साल दरम्यानचे मठाधिपती (Abbot) फादर बर्नार्ड हेनेट यांच्या स्वाक्षरीतही त्यांनी ‘happy face’ रेखाटल्याचे दिसते.

सुप्रसिद्ध डॅनिश लेखक-कवी जोहान्स व्ही. जेन्सन याला आपल्या स्वाक्षरीत प्रयोग करत राहण्याची सवय होती आणि त्या सवयीसाठीही तो जगप्रसिद्ध होता.

अशाच डिसेंबर १९००दरम्यान प्रकाशक अर्न्स्ट बोजेसन याला पाठवलेल्या पत्रात स्वाक्षरीच्या जोडीला त्याने एक happy face आणि एक sad face वापरला होता.

या ‘smiley-face’ चा सर्वप्रथम व्यावसायिक वापर १९१४ साली करण्यात आला. अमेरिकेच्या न्यूयॉर्क प्रांतातील बफेलो शहरात असणाऱ्या बफेलो स्टीम रोलर कंपनीने जारी केलेल्या रिसीटवरती “THANKS” या शब्दासोबत एक स्मायली-फेस असलेला एक स्टिकर लावण्यात आले होते.

यातील स्मायली फेस हे यापूर्वीच्या सगळ्या वापरांपेक्षा अधिक अचूक आणि विस्तृत अशा स्वरूपाचे होते. त्यात गोल चेहऱ्याला भुवया, डोळे नाक, दात, हनुवटी, चेहऱ्यावरील आठ्या आणि इतर रेषा आणि त्यांच्यावर पडणाऱ्या छाया असं विस्तृत विश्लेषण होतं; आणि हा smiley face ‘मॅन-इन-द-मून’ या चित्रप्रकाराची आठवण करून देतो.

स्विडिश लेखक-दिग्दर्शक-निर्माता इंगमर बर्गमॅन यांच्या १९४८ साली आलेल्या ‘पोर्ट ऑफ कॉल’ या चित्रपटामध्ये बेरीट हे मध्यवर्ती स्त्रीपात्र दुःखी असताना ड्रेसिंग टेबलच्या आरशावर लीपस्टीकने, आत्ता sad face emoji/frown सारखा दिसणारा एक दुःखी चेहरा काढते.

आणि त्यात ती नाकासाठी केवळ एक टिम्ब काढते. असा एक सिन आहे.

 

 

अनुक्रमे १९५३ आणि १९५८ साली आलेल्या ‘लिली’ आणि ‘गिगी’ या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी काढण्यात आलेल्या पोस्टर्सवर अशाप्रकारचे emojis वापरण्यात आलेले होते.

“सध्या प्रचलित असलेली पिवळी स्मायलीचा पहिल्यांदा वापर १९९६ साली न्यूयॉर्कमधील am रेडिओ स्टेशन ‘डब्ल्युएमसीए’ने प्रमोशनल स्ट्रॅटेजी म्हणून केला होता. त्यांच्या फोनला “डब्ल्यूएमसीए गुड गाईज!”

असे प्रत्युत्तर देणाऱ्यांना पिवळे sweatshirt दिले, या sweatshirt वर ‘WMCA GOOD GUY” असे लिहिले होते आणि त्याचजोडीने त्यावर काळ्या रंगात एक HAPPY FACE काढण्यात आला होता. असे हजारो टीशर्ट वाटले गेले, पण त्यात चेहऱ्यावर ओठांच्या बाजूला CREASES/सुरकुत्या दाखवल्या नव्हत्या.

आता आपण ज्या SIMILES वापरतो, त्या पहिल्यांदा सर हार्वे रॉस बॉल या अमेरिकन ग्राफिक डिझायनरने काढलेल्या होत्या.

मॅसाचुसेट्स येथील स्टेट म्युच्युअल लाइफ अॅश्युरन्स कंपनी ऑफ वॉर्सस्टर (आताची ‘हॅनोव्हर इन्शुरन्स’) ने ‘ओहियो गॅरंटी म्युच्युअल कंपनी’ विकत घेतली होती. याचा विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल खचत होते.

ही समस्या सोडविण्यासाठी, इ.स. १९६३ मध्ये हार्वे रॉस बॉल यांना फ्रीलान्स कलाकार म्हणून नियुक्त केले.

त्यावेळी दहा मिनिटांपेक्षा कमी वेळात बॉल एक अशी कल्पना घेऊन आले जी प्रचंड परिणामकारक, यशस्वी कालातीत ठरली.

ती कल्पना म्हणजे पिवळ्या कागदाच्या पार्श्वभूमीवर काळ्या रंगात गडद आणि अंडाकृती डोळे, पूर्ण हास्य झळकणारे ओठ आणि ओठांच्या दोन्ही बाजूंना दंड/creases असा एक मानवी चेहऱ्याशी साधर्म्य सांगणारे रेखाचित्र होते.

इतकी साधीसोपी आणि तरीही प्रचंड परिणामकारक कल्पना बघून कंपनीतील अधिकाऱ्यांना आनंद झाला आणि त्यांनी बॉल याना त्यांच्या निर्मितीसाठी $45 दिले.

 

roastbrief.com.mx

 

स्माइली फेसचा वापर कंपनीच्या फ्रेंडशिप कॅम्पेनचा एक महत्त्वपूर्ण आणि यशस्वी भाग ठरला. काम करताना कर्मचार्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू राहावे यासाठी स्टेट म्युच्युअलने कर्मचार्यांना १०० स्माइली पिन वाटले. हे ‘स्मायली बटन’ फार प्रसिद्ध झाले आणि १९७१ पर्यंत ५० मिलियन पेक्षा अधिक नग विकले गेले होते.

या बटणाच्या यशामुळे ‘स्मायली’ हे आंतरराष्ट्रीय चिन्ह झाले, पण बॉलनी आपल्या निर्मितीचे ट्रेडमार्क कधीच करून घेतले नाही. याविषयी टेलीग्राम अँड गॅझेटला सांगताना हार्वे बॉल यांचा सुपुत्र, चार्ल्स बॉल असे सांगतो की “ते(हार्वे रॉस बोल) पैशावर चालणारा माणूस नव्हते.

ते असे म्हणत असत की ‘अरे, मी एका वेळी एक स्टीक खाऊ शकतो, एका वेळी एक कार चालवू शकतो.’ पण तरीही आज हार्वे रॉस बॉल हे ‘स्मायलीचे जनक’ म्हटले जातात.

बॉलनी ट्रेडमार्क न घेतल्याने, १९६३पर्यंत या स्मायलीच्या अनेक कलाकारांनी या स्मायलीच्या आवृत्त्या काढल्या, पण तरीही बॉल यांच्या रेखाचित्राला कोणीच धक्का लावू शकले नव्हते.

१९६७ साली, सिएटल कलाकार जॉर्ज टेनगी याने आपला जाहिरात एजंट डेव्हिड स्टर्नच्या विनंतीवरून आपले स्वतःची आवृत्ती काढली. टेनगीच्या डिझाइनचा वापर सिएटलस्थित युनिव्हर्सिटी फेडरल सेव्हिंग्ज अँड लोनच्या जाहिरात अभियानात केला गेला.

हे ऍड कॅम्पेन ‘बाय बर्ड बर्डी‘ या सांगीतीकेतील “पुट ऑन अ हॅपी फेस” या ली ऍडम्सच्या गीतांवरून प्रेरित (inspired) होते.

या मोहिमेचा जनक असणाऱ्या डेव्हिड स्टर्नने नंतर १९९३ मध्ये सिएटल महापौरांच्या निवडणुकीत आपल्या प्रचारासाठीही हॅपी फेसचा समावेश केला.

फिलाडेल्फियात सप्टेंबर १९७० मध्ये नवनवीन वस्तू विकण्याची मोहीम सुरू करणाऱ्या बर्नार्ड आणि मरे स्पेन यांनी हे ग्राफिक अधिक प्रसिद्ध केले.

दोनप्रकारच्या स्मायली बटणांसोबतच कॉफी मग्ज, टी-शर्ट, बम्पर स्टिकर्स आणि इतर अनेक वस्तू त्यांनी डिझाईन केल्या ज्यात स्मायलीसोबत चिन्हासोबतच जुला बोगारने तयार केलेला “Have a happy day” हा वाक्प्रचार रेखाटला होता.

 

pintrest.com

 

यानंतर स्पेन बंधूंनी न्यूयॉर्क बटनचा संस्थापक निर्माता एनजी स्लेटरसोबत मिळून १९७२ पर्यंत, सुमारे ५ कोटी happy face badges तयार केले. स्मायली हे चिन्ह जगभर पोचू लागले होते, पण तरीही त्यावर कोणी ट्रेडमार्क घेतला नव्हता आणि त्याचे अधिकृत नामकरणही झाले नव्हते.

निकोलस लोफ्रानी :

१९७२ साली, फ्रान्समधील फ्रॅंकलिन लोफ्रानी यांनी स्मायलीचा ट्रेडमार्क स्वतःच्या नावावर करून घेतला. ते ‘फ्रांस सोयर’ या वृत्तपत्रातील चांगल्या बातम्या हायलाईट व्हाव्यात म्हणून त्याभोवती स्मायली रेखाटत. या स्मायलींचे ‘स्मायली’ असे नामकरण त्यांनीच केले आणि ‘द स्मायली कंपनी’ नावाची कंपनी स्थापन केली.

१९९६ मध्ये लोफ्रानी यांचा सुपुत्र, निकोलस लोफ्रानीने आपल्या वडिलांच्या व्यवसायाची सूत्रं आपल्या हाती घेतली आणि ‘द स्मायली कंपनी’ला बहुराष्ट्रीय कॉरपोरेशनमध्ये विकसित केले.

निकोलस लोफ्रानीच्या मनात अशी भीती होती कि हार्वे रॉस बॉल त्यांनी स्मायली डिझाईन केल्याचे सिद्ध करून त्यावर अधिकार सांगू शकतील आणि म्हणूनच आपल्या वडिलांच्या आणि हार्वे रॉस बॉल यांच्या स्मायलीच्या डिझाईनमध्ये असणारे साधर्म्य लक्षात येताच त्याने असा दावा केला की

“हे डिझाईन इतके सोपे आहे, की कोणीही त्यावर आपला हक्क सांगू शकत नाही.”

हे सांगण्यासाठी त्याने आपल्या वेबसाईटवर फ्रान्समधील इसवीसनपूर्व २५०० मध्ये चितारल्या गेलेल्या एका गुंफाचित्रावर लक्ष वेधतो, त्याला तो सर्वप्रथम चितारलेली स्मायली म्हणतो.

 

pinterest.com

 

पुढे तो १९६० सालच्या रेडियोच्या जाहिरातीकडेही लक्ष वेधतो.

अशा प्रकारे आपल्या सगळ्यांच्या वापरात असलेल्या स्मायलीचं ‘बारसं’ झालं होतं आणि त्याचा ट्रेडमार्क आजही द स्मायली कंपनीकडेच आहे.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved

Exit mobile version