Site icon InMarathi

हॉकीत पहिलं गोल्डमेडल मिळवून देणाऱ्या आणि आदिवासींच्या रक्षणासाठी झटणाऱ्या अवलियाची कहाणी

jaypal singh munda inmarathi

adivasi resurgence

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

=== 

भारतात काहीतरी उत्तम कार्य केलेल्यांना दुर्लक्षित करण्याची किंवा त्यांना सपशेल विसरण्याची मोठी परंपरा आहे.

विशेषत: ज्यांच्या नावाचा वापर कुठल्याही प्रकारे राजकारण आणि निवडणुकासाठी केला जाऊ शकत नाही अशांबाबत तरी ही जरा जास्त आहे.

यामुळे आज आपल्याला अनेक व्यक्तीमत्वांचा विसर पडला आहे ज्यांनी या देशाच्या विकासात, अस्मितेत आणि प्रतिष्ठेत भर घातली आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची ओळख करून देणार आहोत ज्यांच्यामुळे भारत ऑलिम्पिकच्या इतिहासात हॉकीमधलं पहिलं सुवर्णपदक जिंकू शकला.

हा माणूस फक्त हॉकीपटूच नव्हे तर उत्कृष्ट संसदपटू होता.

त्याचं नाव आहे जयपाल सिंग मुंडा.

जयपाल रांची जिल्ह्यातील खुंती या विभागाचे आहेत जे आता झारखंडचा वेगळा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

जयपाल यांचा जन्म ३ जानेवारी १९०३ रोजी तपकारा जवळच्या मुंडा गावात झाला. जयपालच्या आधी सुद्धा त्यांच्या घराण्यात बिरसा मुंडा यांच्या आदिवासी हक्काच्या संघर्षामुळे त्यांनी इतिहासात जागा मिळवली होती.

 

jharnet.com

तत्कालीन अनेक आदिवासी घरांप्रमाणे जयपालच्या कुटुंबाने सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. एसपीजी मिशन, चर्च ऑफ इंग्लंडने सुरुवातीला त्यांच्यात लपलेली प्रतिभा आणि नेतृत्व क्षमता ओळखली.

गावातल्या सुरुवातीच्या शिक्षणानंतर जयपालला रांचीमधील सेंट पॉल स्कूलमध्ये दाखल करण्यात आले होते.

तेथे आपला स्वभाव आणि अंगभूत असलेल्या अनेक क्षमतांनी त्यांनी शिक्षकांना आणि इतरांना आपलेसे करूंन घेतले होते.

याच काळात त्यांच्या हॉकीला नीट आकार मिळू लागला.

शालेय शिक्षण संपल्यानंतर सेंट पॉलचे प्राचार्य त्यांचे मेंटॉर बनले आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठ, इंग्लंड येथे पाठवले.

येथे, जयपालला प्रतिभावान हॉकी खेळाडू म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी बराच वेळ लागला नाही आणि लवकरच त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठ हॉकी संघात समाविष्ट करण्यात आले.

हॉकीच्या क्षेत्रामध्ये त्यांची जागा डिफेंडर म्हणून होती. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी हॉकी संघाचे ते सर्वात प्रतिभावान खेळाडू होते.

विद्यापीठाच्या संघाचे सदस्य म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.

हॉकीमध्ये ऑक्सफर्ड ब्लू हे पदक पटकावणारे ते पहिले भारतीय विद्यार्थी ठरले.

ऑक्सफर्डमध्ये असताना, हॉकी व्यतिरिक्त अन्य बाजूंनी विशेषतः पत्रकार आणि लेखक म्हणून आकार मिळत होता.

याच काळात ब्रिटीश पेपर जर्नल्समध्ये त्यांनी नियमितपणे लेखन सुरू केले.

त्याच्या लेखांमधून ते वाचकांचे आवडते बनले आणि त्यांची खूप प्रशंसा झाली. दरम्यान आपल्या शैक्षणिक कार्यात चुणूक दाखवत जयपाल यांनी चांगल्या गुणांसह अर्थशास्त्र (हॉनर्स) परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण केली.

 

inkhabar.com

 

त्यानंतर त्यांनी भारतीय सिव्हिल सर्व्हिस (आयसीएस) परीक्षा द्यायचा निर्णय घेतला. त्या काळात, ब्रिटीश सरकारने अशाच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा निर्माण केली होती जी नोकरशाहीचा भाग बनण्यासाठी उत्सुक होती.

जयपाल च्या आधी, या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या लोकांमध्ये श्रीमंत आणि जमीनधारकांच्या वर्गातून आलेल्यांची संख्या मोठी होती ,परंतु जयपाल एक विशिष्ट अपवाद ठरले.

विशेष प्राविण्यासह त्यांनी आयसीएस परीक्षा उत्तीर्ण केली.

इंग्लंडमध्ये आयसीएस प्रोबेशनर म्हणून प्रशिक्षण घेत असताना त्यांना अॅम्स्टरडॅममधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे हॉकी साठी प्रतिनिधित्व करण्याचे आमंत्रण मिळाले.

लंडन स्थित भारतीय कार्यालयाशी संपर्क साधताना जयपाल यांनी अॅम्सटरडॅमला जाण्यासाठी एक सुट्टी मागितली. परंतु त्यांचा अर्ज नाकारण्यात आला, पण त्यांच्यासमोर एक भयंकर दुविधा आली.

त्यांना दोनपैकी एक निवडावा लागला – एकतर भारतात खेळायला नकार देणे किंवा भारतीय सिव्हिल सर्व्हिसमधून बाहेर पडणे.

पण त्यांनी हॉकीला प्राधान्य दिले आणि नेदरलँड साठी रवाना झाले. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा हॉकीमधले सुवर्णपदक मिळवले.

ऑलंपिकनंतर १९२८ मध्ये जयपाल इंग्लंडला परतले. भारताचे तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड इरविन यांनी त्यांचे उत्कृष्ट कप्तानी आणि संघाच्या विजयासाठी अभिनंदन केले.

 

nanaimobulletin.com

 

इरविनच्या विनंतीवरून जयपाल यांना पुन्हा आईसीएस प्रबंधात सामील होण्यासाठी विचारले गेले पण त्यांनी ते नाकारले. ते भारतात परतले आणि बहुराष्ट्रीय तेल कंपनी बर्मा शेल येथे नोकरी मिळाली.

या सगळ्यात, प्रवास करत असताना त्यांना त्यांच्या लोकांसाठी काहीतरी करावे असे वाटू लागले.

बिहारमधील छोटानागपूरचे दुर्लक्षित आणि शोषित आदिवासी हे त्यांचे लोक होते. यांच्यासाठी काम करण्याची गरज त्यांना भासली आणि ते बिहारला परतले.

पटनातील सदाकट आश्रम येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

प्रसाद त्यावेळी बिहारच्या प्रांतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांची भेट नाकारली गेली. हा त्यांना स्वतःचा अपमान वाटला आणि त्यांनी काँग्रेसशिवाय हे कार्य सुरु करण्याचा निश्चय केला.

पण नियतीने चक्रे अशी फिरवली की, बिहार आणि उडीसाचे तात्कालिक राज्यपाल सर मॉरीस होलेट यांनी त्यांना बिहार आणि उडीसा विधान परिषद (विधान परिषदेचे सदस्य) बनण्याचे आवाहन केले.

त्यानंतर राज्यपाल आणि मुख्य सचिव रॉबर्ट रसेल यांनी त्यांना आदिवासींच्या फायद्यासाठी काम करण्यास सांगितले.

याच प्रकारे त्यांची सक्रिय राजकारणात नंदी झाली आणि पुढे त्यांनी भारतीय संविधान सभेसाठी निवडणूक लढवली.

१९४६ मध्ये बिहारच्या सर्वसाधारण मतदार संघातून ते विधानसभेसाठी निवडून आले. त्यातूनच त्यांची निवड भारतीय संविधान सभेसाठी झाली.

या सभेला उद्देशून त्यांनी पहिल्यांदा केलेल्या भाषणात ‘आदिवासी गटांना दिलेली वागणूक’ यावर आपली मते व्यक्त केली.

 

thebetterindia.com

 

२९६ सभासद असलेल्या या सभेत एकूण तीन समित्यांची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पडली. १९५० साली भारतीय संविधान मान्य झालं आणि त्यांनी पुन्हा सक्रिय राजकारणात सहभाग घेतला.

आदिवासी वर्गाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी जयपाल सिंग यांनी लढा सुरू केला. त्यासाठी त्यांनी आदिवासी महासभा तयार केली जिचं नंतर नाव ‘झारखंड पार्टी’ मध्ये बदललं.

१९५२ मध्ये बिहार विधानसभेत या पक्षाने ३२ जागा जिंकल्या. जेव्हा नागाची समस्या वाढू लागली तेव्हा नेहरूंनी नागा नेत्यांना सांगितले की स्वायत्तता प्राप्त होऊ शकते, परंतु स्वातंत्र्य नव्हे.

पण नागा नेत्यांना शांत करण्याचं श्रेय जयपाल यांना जातं. त्यांनी नागा नेत्यांची भेट घेऊन त्यांच्यातली फुटीरता शमवली आणि पूर्वांचल शांत झाला.

या पक्षाद्वारे त्यांनी सलग पाच लोकसभा निवडणुका जिंकल्या. १९५२ पासून त्यांनी आदिवासी आरक्षण या मुद्द्यावर लोक संघर्ष सुरु केला आणि त्यांच्या या संघर्षामुळे आदिवासींना काही वर्षांनी आरक्षण मिळाले.

आज आपण झारखंडकडे स्वतंत्र राज्य म्हणून पाहत असलो तरी त्या बाबतची कल्पना जयपाल यांनीच सर्वप्रथम मांडली होती.

लोकसभेचे सदस्य असतानाच त्याचं दीर्घ आजारानं दिल्लीत २० मार्च १९७० रोजी निधन झालं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

Exit mobile version