चक्रीवादळांची नावं ठरवतांना नेमकं काय लॉजिक असतं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
लेखक – विशाल दळवी
===
काही वर्षांपुर्वी “चेन्नईला वरदा चक्रीवादळाचा तडाखा”..! बातमी ऐकून अनेकांच्या मनाला प्रश्न पडला असेल की ‘वरदा’ चक्रीवादळ? असं का?
चक्रीवादळाला नाव का बरं देतात? आणि जरी नाव देत असतील तर ती ठरवली कशी जातात?
जगभरात अशी अनेक चक्रीवादळे येतात आणि त्यापैकी प्रत्येकाला नावे देखील वेगवेगळी असतात. कतरिना, डेव्हिड, ग्लोरिया, केथ ही काही प्रसिद्ध चक्रीवादळांची उदाहरणे आहेत.
१९ व्या शतकामध्ये हवामानतज्ञांच्या असे लक्षात आले की चक्रीवादळांना नावे दिल्याने ती घटना लोकांच्या लक्षात राहते. त्यामुळे ठराविक चक्रीवादळाबद्दल अधिक प्रभावीपणे संवाद साधला जाऊ शकतो.
त्यामुळे जेव्हा कधी एखादे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकणार आहे असे लक्षात येते तेव्हा त्याच्या नावासह सूचना देऊन येणाऱ्या संकटाबद्दल लोकांना सूचित केले जाते.
हवामानशास्त्रामध्ये चक्रीवादळ हंगाम नावाचं एक प्रकरण असतं. दरवर्षी हा चक्रीवादळ हंगाम एका ठराविक वेळी सुरु होतो.
प्रत्येक चक्रीवादळ हंगाम सुरु होण्यापूर्वी हवामानतज्ञांमार्फत चक्रीवादळाच्या नावांची यादी तयार केली जाते. या यादीतील क्रमानुसार चक्रीवादळांना नावे दिली जातात. सध्या ही यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक हवामान संस्थेकडे आहे.
कित्येक शतकांपासून लोक केवळ प्रमुख सागरी वादळांनाच नावे देत असत. तर बहुसंख्य चक्रीवादळांची ओळख त्यांच्या अक्षांश आणि रेखांश स्थितीवरून व्हायची. ज्यामुळे हवामानतज्ञांना या वादळांचा मागोवा घेणे सोपे जायचे.
परंतु किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना मात्र हवामानशास्त्राच्या भाषेतील ही माहिती समजणे कठीण जायचे.
त्यांना अक्षांश आणि रेखांशबद्दल काहीही कळायचे नाही. त्यामुळे हवामान खात्याला किनाऱ्यावरील लोकांशी संवाद साधणे कठीण होऊन बसायचे.
१९५० मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय चक्रीवादळ केंद्राने सर्वप्रथम अटलांटिक महासागरातील वादळांना नावे देण्याची योजना अंमलात आणली. त्यावेळेस वादळांना इंग्रजी भाषेतील मुळाक्षरांनुसार नावे दिली जायची. (उदा. एबल, बेकर, चार्ली)
आणि हीच नावे दरवर्षीच्या चक्रीवादळ हंगामावेळी वापरली जायची.
त्यामुळे बहुतांश चक्रीवादळांना एकसारखीच नावे मिळायची. म्हणजे चक्रीवादळ हंगामावेळी आलेल्या पहिल्या चक्रीवादळाला जर एबल नाव दिले तर दुसऱ्या चक्रीवादळ हंगामावेळी आलेल्या पहिल्या चक्रीवादळाला देखील एबल नावच दिले जायचे.
१९५३ मध्ये एकसारखी नावे टाळण्यासाठी चक्रीवादळांना स्त्रियांची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रीय हवामान सेवेचा हा निर्णय नौदल हवामानतज्ञांच्या पद्धतीपासून प्रेरित होता. नौदल हवामानतज्ञ वादळांना स्त्रियांची नावे द्यायचे, कारण त्यांच्या जहाजांची नावे देखील स्त्रियांच्याच नावाने असायची.
१९७९ मध्ये ही पद्धती देखील बदलण्यात आली आणि चक्रीवादळांना पुरुष आणि स्त्री दोहोंची नावे देण्याचा निर्णय घेण्यात आला.
चक्रीवादळांना नाव कधी दिले जाते?
जेव्हा समुद्रात गोलाकार आकाराची हालचाल सुरु दिसते आणि त्या जागी असणाऱ्या वाऱ्याचा वेग जेव्हा ताशी ३९ मैल इतका प्रचंड असतो, तेव्हा समुद्री वादळ येत असल्याचे हवामान खात्याच्या निदर्शनास येते.
जेव्हा वाऱ्याचा वेग हा ताशी ७४ मैल पर्यंत वाढतो तेव्हा समुद्री वादळाचे चक्रीवादळात रुपांतर होते. तेव्हा यादीनुसार येणाऱ्या चक्रीवादळाला नाव दिले जाते.
चक्रीवादळांच्या नावांच्या याद्या जगभरातील मुख्य महासागरांनुसार विभागण्यात आल्या आहेत. सध्या अटलांटिक महासागरासाठी सर्वात जास्त म्हणजे ६ याद्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्षी एका यादीचा वापर केला जातो.
अश्याप्रकारे दर ६ वर्षांनी या याद्या फिरत असतात. म्हणजेच २०१६ मध्ये वापरात आलेल्या नावांची यादी २०२१ मध्ये पुन्हा वापरण्यात येईल.
यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या चक्रीवादळामुळे संपत्तीचे आणि जीवांचे काही नुकसान झाले तर त्या चक्रीवादळाचे नाव यादीतून कायमचे हद्दपार करण्यात येते.
असे यासाठी करण्यात येते कारण त्या चक्रीवादळाचे नाव पुन्हा दुसऱ्या चक्रीवादळाला दिले गेले तर त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. दुसरे कारण म्हणजे चक्रीवादळाची घटना ठराविक नावाने जगाच्या इतिहासात नोंदवली जावी हा त्यामागचा उद्देश असतो.
उदा. २००५ मध्ये अमेरीकेच्या न्यू ऑरलेन्समध्ये आलेल्या चाक्रीवादळाला ‘कतरिना’ नाव देण्यात आले. या चक्रीवादळामुळे भयंकर नुकसान झाले होते. आता हे नाव पुन्हा कधीही कोणत्याच चक्रीवादळासाठी वापरण्यात येणार नाही.
सध्या २०२१ सालापर्यंतची चक्रीवादळांच्या नावांची यादी तयार आहे. जर तुम्हाला ह्या याद्या पहायच्या असतील तर खालील लिंकवर क्लिक करा:
जागतिक हवामान संस्थेकडून जारी करण्यात आलेल्या चक्रीवादळांच्या नावांची यादी
या यादीमध्ये तुम्हाला चेन्नई मध्ये आलेल्या चक्रीवादळाचे ‘वारदह’ हे नाव देखील पाहायला मिळेल !
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.