' तुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ! – InMarathi

तुंबाड : भय, लालसा, वासना, कामभावना यांचा एक सुंदर मिलाफ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

लेखक: सर्वेश शरद जोशी

साधारण १४-१५ वर्षांचा असताना नारायण धारप वाचू लागलो होतो. त्यांच्या कथा वाचताना आपण नकळत कधी त्या कथाविश्वातील मध्यवर्ती पात्राची जागा घेतो हे आपल्यालाच कळत नाही.

यामुळेच धारपांच्या कथा वाचल्यावर रात्री झोप लागायची नाही आणि लागलीच तर चित्रविचित्र स्वप्नांनी रात्री-अपरात्री दचकून उठायचो. आणि हेच कथाविश्व जर कोणी अत्युत्तमरित्या पडद्यावर चितारलं तर… ? तर तयार होतो ‘तुंबाड’ !

 

tumbbad-inmarathi

 

कोकणाला स्वर्गीय निसर्गसौंदर्याचं वरदान लाभलं आहे. वरदान म्हटलं की त्याचजोडीने शापही येतो. हा शाप आहे भुताटकीचा, भयकथांचा आणि त्याहीपेक्षा तिथल्या अनेक प्रथांभोवती असलेल्या गूढतेचा !

असंच एक गाव, ‘तुंबाड’ ! या गावाला एक शाप आहे, या शापाचं कारण असा एक शापित देव ज्याचं नाव वेदांमध्येही नाही. त्याचं नाव उच्चारणं हे हि निषिद्ध मानलं गेलेलं आहे. पण जसं वरदानासोबत शाप येतो, तसंच शापासोबत येतं वरदान!

त्या देवाचा हस्तरचा शाप हे या कथेतल्या मध्यवर्ती पात्रांसाठी एक वरदान आहे. कारण त्यांच्या वाड्यात याची पूजा केली जाते आणि त्या वाड्यात खजिना आहे. इथेच कथेचं वेगळेपण आकाराला येतं.

खरंतर निव्वळ भयपट म्हणून सुरुवात झाल्यानंतर, सुरुवातीची काही मिनिटं काहीच कळत नाही आणि कथानक या खजिन्यावर भर देऊ लागतं.

‘खजिन्याचा शोध’ हा खरंतर साहसकथांचा मुख्य विषय ! पण इथे साहसकथा, गूढकथा, भयकथा असे वेगवेगळे जॉनर एकमेकांत बेमालूमपणे मिसळले जातात. पण तरीही कथा इतकीच मर्यादित नाही.

लहान असताना आपल्याला एखादी आजी रात्री झोपताना प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, राजकुमाराच्या, राजकुमारीच्या अशा अनेक प्रकारच्या छान छान गोष्टी सांगत असते, या कथांपेक्षा त्यातून येणारं तात्पर्य हे फार महत्त्वाचं असतं.

‘तुंबाड’ मध्ये अनेक ठिकाणी छुपी रुपके आहेत, ज्याचा अर्थ ज्याने त्याने लावायचा आहे. पण तसं बघायला गेलं तर हस्तर आणि माणसं यांच्यातला सामायिक दुवा असलेली लालसा हेच या कथेचे तात्पर्य आहे.

त्याहीपेक्षा कथेची मांडणी, त्यातील वातावरणाची निर्मिती आणि त्यातून उत्पन्न होणारी आदिम भयाची निर्मिती यावर दिग्दर्शकाचा मुख्य भर आहे. पण हे करत असताना उगाच अनावश्यक ठिकाणी हॉरर सीन्स न ठेवता अत्यावश्यक तिथेच हॉरर सिक्वेन्स ठेवल्याने त्यातलं भय अधिकच अंडरलाईन होतंय.

गंमत म्हणजे भयपट असला तरीही त्यात काही मोक्याच्या ठिकाणी विनोदनिर्मिती करण्यात आली आहे. अगदी पुणे म्हटल्यावर ओघानेच येणारी एक पुणेरी पाटी सुद्धा त्यात आहे.

खरंतर हा चित्रपट एक भयपट असण्यापेक्षा अधिक एक साहसीपट आहे. पण त्यातलं कथानक सांगण्यासाठी दिग्दर्शकाने वापरलेलं वातावरण आणि त्या वातावरणाला पोषक करण्यासाठी वापरलेल्या काही टेक्निक्स या भीतीदायी आहेत.

 

tumbbad-sohum-shaha-inmarathi

 

म्हणूनच हा एक भयपट वाटत राहतो आणि चित्रपट जसाजसा शेवटाकडे येत जातो, तसेतसे त्यातले गूढ कमीकमी होत जाते. याउलट विनायक, त्याचा लहान मुलगा आणि हस्तर यांच्यातील अखेरचा सिन तुम्हाला सुन्न करून टाकतो.

हृषीकेश गुप्ते त्यांच्या ‘दंशकाल’ मध्ये ज्या दंशाचा उल्लेख करतात तो अंगभर भयाचा कल्लोळ माजवणारा आदिम भीतीचा दंश कसा असतो याची जाणीव मला ‘तुंबाड’ पाहताना झाली.

ही जाणीव होण्याचं मुख्य कारण म्हणजे यात जागोजागी करण्यात आलेलं vfx! हे अशा प्रकारचं अचूक vfx मी तरी भारतीय सिनेमात पहिल्यांदाच पाहिलं. उगाच भयाचा भडीमार न करता आवश्यक तिथेच vfx असणं हे फार महत्त्वाचं असतं हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं.

त्यानंतर ह्या vfx ला जोडूनच येतं ते म्हणजे सिनेमॅटोग्राफी! दिग्दर्शक राही बर्वे आणि सिनेमॅटोग्राफर पंकज कुमार या दोघांचंही काम दृश्य स्वरूपाचा विचार करता थक्क करणारं आहे.

सुरुवातीचं कोकण, तिथलं डोंगरांवरचं निसर्गसौंदर्य, तो सरकारचा चौसोपी वाडा, त्या वाड्यातील छोटेछोटे बोळ, विनायकच्या लहानपणचं डोंगरावरचं एकाकी घर, त्यातलं ते दैन्य भरलेलं वास्तव आणि त्यानंतर मानवी वस्ती पूर्णपणे बंद झाल्यावर तिथे वाढलेलं जंगल.

अशा छोट्या छोट्या जागांचं आर्ट डिरेक्शन उत्तम आहेच पण, सिनेमात घेतलेली अगदी प्रत्येक फ्रेम ही नितांत आवश्यक आणि अर्थपूर्ण आहे. प्रत्येक फ्रेम नीट विचार करून घेतलेली आहे आणि तितकंच विचारपूर्वक करण्यात आलेलं लायटिंग त्या फ्रेमला चार चाँद लावतं.

फार कमी वेळा स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. इतर वेळी जिथे अत्यावश्यक आहे तिथेच प्रकाश पाडून संपूर्ण चित्रपटभर पेरलेल्या महत्त्वाच्या अशा कितीतरी घटनांपैकी एकही सुटू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे असं वाटतं. (काही जणांना हेच रटाळ वाटू शकतं.)

कोकणातला पाऊस, त्याकाळातलं आभाळ हे ही फार अर्थपूर्णरित्या कॅप्चर केलंय. पावसाचे सगळे सिन खऱ्या पावसात शूट केले गेले आहेत असं ऐकून आहे. हा पाऊस हे चित्रपटातलंच एक कॅरॅक्टर आहे असं म्हटलं तरीही वावगं ठरू नये.

 

tumbbad-movie-inmarathi

 

हा चित्रपट तीन भागात मांडला जात असला तरीही चित्रपटातल्या कथेचा काळ फार मोठा आहे.१९१८ ते १९४७ च्या त्या काळात भारतात एक राजकीय क्रांती घडून आलेली आहे. सुरुवातीला दारिद्र्य आणि सावकारी असा एक त्याकाळातील आर्थिक भेदही आहे.

असे अनेक संदर्भ देत असताना ते देण्यासाठी केलेलं प्रॉडक्शन डिझायनिंग हे बहुतांशी अचूक आहे. अगदी छोट्यातली छोटी वस्तूही साधारण काळ घेऊनच दिसते.

त्यानंतर चित्रपटभर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कुणाल शर्माच्या साउंडचीही महत्त्वाची भूमिका आहे. तितकंच महत्त्वपूर्ण काम जेस्पर किडच्या बॅकग्राऊंड स्कोरचं आहे. कुठेही चित्रपटापेक्षा वेगळं न वाटणारं आणि तरीही चित्रपटाचा फील कैक पटींनी वाढवणारं असं पार्श्वसंगीत बऱ्याच दिवसांनी ऐकायला मिळालंय.

अजय-अतुलची गाणीही अगदी मोक्याच्या ठिकाणी आपलं सामर्थ्य दाखवून देतात, पण तरीही त्यांना स्वतंत्र मूल्य फारसं नाही, तर ती चित्रपटाचाच एक अविभाज्य भाग झालीयत.

यानंतर चित्रपटातील व्यक्तिरेखांविषयी बोलायचं तर, मुळात आपण अनेक बॉलिवूड फिल्म्समधून आखून घेतलेले आडाखे मोडीत काढत, एक अँटी-हिरो मेल लीड असलेलं विनायकचं पात्र सोहम शाहने समरसून केलंय.

त्याचे घारे, गहिरे डोळे फार खोलवर भिडतात आणि त्याचा विशिष्ट धाटणीचा खर्जातला आवाज सिनेमाभर अनुकूल फील देत राहतो. विशेषतः सुरुवातीच्या नरेशनला हा आवाज अधिकच खोलवर घुमत राहतो.

त्यानंतर ज्योती मालशेची विधवा आई, अनिता दातेची बायको आणि रोंजीनी चक्रवर्ती यांची विधवा कामवाली या व्यक्तिरेखा छोट्या असल्या तरीही आपापली छाप पाडण्यात यशस्वी झाल्यात. धुंडिराज प्रभाकर जोगळेकर, महंमद समद या छोट्या मुलांनी धिंगाणा घातलाय.

 

tumbbad1-inmarathi

 

या सगळ्यांसोबतच दोन पात्रं विशेष लक्षात राहिली ती म्हणजे घाऱ्या डोळ्यांचे ‘सावकार’ आणि स्वार्थी सावकार ‘राघव’(दीपक दामले). या सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे.

चित्रपट उभा करण्यासाठी सहा वर्षांचा लागलेला काळ, त्या पाठची प्रत्येक सेक्शनची मेहनत ही क्षणाक्षणाला जाणवते.

विशेष कौतुक करावंसं वाटतं ते राही अनिल बर्वे या दिग्दर्शकाचं ! साधारण दहा वर्षांची अथक मेहनत, ते झपाटलेलं वेड, ती पॅशन याशिवाय हा सिनेमा बनणं अशक्य होतं. त्याने जे स्वप्न पूर्वी पाहिलेलं होतं, ते आता पूर्ण झालंय असं म्हणायला हरकत नाही.

पण या निमित्ताने माझंही एक स्वप्न पूर्ण झालंय, अनावश्यक हॉरर सिन न वापरता केलेला भारतीय सिनेमा बघण्याचं.

अर्थात राही अनिल बर्वे हा एक सक्षम आणि समर्थ दिग्दर्शक आहे हे ‘तुंबाड’ बघितल्यावर कळेलच; पण तो तांत्रिकदृष्ट्याही सजग आहे. आणि म्हणूनच आता यापुढे राही काय घेऊन येणार अशी उत्सुकता आत्तापासूनच या वेड्या मनाला लागली आहे.

तर एकंदर लालसा, हव्यास, वासना आणि फार कमी प्रमाणात पण तीन पिढ्यांमध्ये सामायिक असणारी कामभावना या सगळ्यांचा एक उत्तम मिलाफ म्हणजे ‘तुंबाड’ !

काही चुका असतीलही, पण त्या लक्षात येण्याजोग्या मोठ्या नाहीत. एकंदरच फार समर्थ चित्रपट आहे. वेगळं काही बघायला आवडत असेल, तर चुकवू नका’च’.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?