लाळघोट्या पुरुषांसमोर उभे ठाकण्यासाठी, मुलींना माहीत पाहिजेत या १३ टिप्स! वाचा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
स्त्रियांवर होणारे अत्याचार, हा काही नवा मुद्दा नाही. रोजच अशा बातम्या टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून आपण ऐकत किंवा वाचत असतो.
मध्यंतरी सगळीकडे “मी टू ” ह्या चळवळीने जोर धरला होता. ह्या चळवळीत स्त्रिया अनेक वर्ष आपल्या मनात दडवून ठेवलेल्या दु:खाला वाचा फोडत होत्या.
सोशल मीडिया, व्हॉट्सऍप ह्यावर अनेक स्त्रियांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला, घाणेरड्या अनुभवांना, मनस्तापाला वाचा फोडली होती.
तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर ह्यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अनेक स्त्रियांनी “मी टू” म्हणत आपल्यावर झालेला अन्याय जगापुढे आणला होता.
ह्या चळवळीत अनेक नामवंत, दिग्गज लोकांवर सुद्धा आरोप झाले. अनेकांचे “संस्कारी” असल्याचे मुखवटे टराटरा फाटून त्यांचा खरा चेहरा जगापुढे आला.
अर्थात अनेक लोकांनी या महत्वाच्या नाजूक विषयावर सुद्धा जोक्स, मिम्स फॉरवर्ड करून आपल्या संवेदनाहीन मनाचे प्रदर्शन सुद्धा मांडले होते. ह्या चळवळीची खिल्ली उडवण्यात स्त्रिया सुद्धा मागे नाहीत.
ह्या स्त्रिया खोटेच आरोप करत आहेत असे गृहीत धरून हे लोक अन्याय झालेल्यांवरच टीका करण्यात मग्न होते. गर्दीच्या ठिकाणी नकोसे स्पर्श, घाणेरडी नजर, विचित्र हावभाव, द्विअर्थी कमेंट्स ह्या अशा गोष्टी दहा पैकी नऊ स्त्रियांना सहन कराव्या लागतात.
यापेक्षाही भयानक म्हणजे एखाद्याने केलेली जबरदस्ती, लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न हा त्रास सुद्धा अनेकींना सहन करावा लागतो.
ह्याविषयी आवाज उठवला तर लोक विश्वास ठेवत नाहीत आणि जर अत्याचार करणारी आसामी मोठी असेल तर मग ह्या स्त्रियांचा आवाजच दाबला जातो. आज अशाच मोठ मोठ्या असामींविरुद्ध अनेक स्त्रिया उभ्या ठाकल्या आहेत.
ह्या स्त्रियांनी दाखवलेल्या हिमतीमुळे अनेक जणींना आपण एकटेच सहन करणारे नाही तर, अनेकांवर ही परिस्थिती ओढवली आहे हे कळून चुकले आहे. त्याही हिम्मत करून आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहेत.
ह्या चळवळीच्या निमित्ताने अनेक स्त्रियांच्या अनुभवातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत. सर्व मुलींनी तसेच मुलांनी सुद्धा काही धडे लक्षात ठेवायला हवेत.
कारण लैंगिक अत्याचार फक्त स्त्रियांवरच होतात असे नाही तर, अनेक पुरुषांना सुद्धा ह्या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागते. ज्या अनुभवामुळे मनावर ओरखडे उमटतात व त्याची जखम आयुष्यभर मनात भळभळत असते.
हे अनुभव असे असतात जे सहन ही होत नाहीत व कुणाला सांगताही येत नाहीत. पुरुषांना तर हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार असतो तर स्त्रियांबाबतीत हे कुणी फार सिरियसली घेतच नाहीत. स्त्री म्हणून जन्माला आल्यावर हे चालायचेच अशीच शिकवण घराघरातून दिली जाते.
लहान सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे व मोठी गोष्ट घडल्यास “चारित्र्य”, “इज्जत” वगैरे सारख्या गोष्टींसाठी आपल्यावर झालेला अन्याय कुणाला सांगायचा नाही असाच बहुतांश लोकांचा ऍटिट्यूड आहे.
या दृष्टीने स्त्रियांनी काही गोष्टी विचारात घ्यायलाच हव्यात. या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.
१. “मी टू” सारख्या चळवळीमुळे अनेक स्त्रियांना आपल्यावर झालेला अन्याय जगाला सांगण्याची हिंमत मिळायला हवी.
एन्टरटेनमेन्ट, सोशल सेक्टर आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या स्त्रियांच्या परिचयात रोज वेगवेगळी माणसे येत असतात.
त्या व्यक्ती कशा वागतील हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे ह्या स्त्रियांना अनेक वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जावे लागते. ह्या स्त्रियांनी मोकळेपणाने आपले अनुभव जगाशी शेअर करायला हवेत.
२. ह्या चळवळीमुळे जॉब देणाऱ्या कंपन्यांना “POSH” कायदा लागू करणे महत्वाचे वाटू लागले आहे. POSH ऍक्ट कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा लैंगिक छळ (प्रतिबंधात्मक व निवारण) ह्यासंबंधी आहे.
हा कायदा ९ डिसेम्बर २०१३ पासून देशात लागू झाला. अनेक कंपन्यांनी ह्या कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. परंतु ह्या चळवळीनंतर मात्र अनेक कंपन्यांनी स्त्री कर्मचाऱ्यांची सुरक्षा गांभीर्याने घेतली आहे.
३. ह्या चळवळीमुळे CINTAA म्हणजेच सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन, NCW म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर विमेन तसेच सरकार सुद्धा खडबडून जागे झाले आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाला गांभीर्याने घेतले जात आहे.
४. ह्या चळवळीमुळे घाबरून किंवा शरमेमुळे किंवा इज्जतीखातर गप्प राहून अन्याय सहन करणाऱ्या स्त्रियांना हे कळले की असा अन्याय होणाऱ्या त्या एकट्याच स्त्रिया नाहीत. अशा स्त्रियांनी अन्यायाविरुद्ध एकत्र येणे आवश्यक आहे.
तर अनेक प्रकारच्या व्यवसायांत स्त्री पुरुषांवर लैंगिक अत्याचार होतात आणि ह्याविषयी आवाज उठवणे गरजेचे आहे.
शांत राहून सहन करत राहिल्याने अत्याचार करणारी व्यक्ती निर्लज्जपणाने अत्याचार करतच राहते. म्हणूनच घाबरून तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्यात काहीच हशील नाही. तसेच ह्याविरोधात आवाज उठवण्यात सुद्धा काहीही चुकीचे नाही.
५. अनेक वर्षे गप्प राहून केवळ अन्याय सहन करणाऱ्या स्त्रिया पाहायला मिळतात. म्हणणे जगासमोर आणता आले तर त्यांची घुसमट कमी होईल. त्यांच्या मनावरचे ओझे उतरेल.
ज्यांना खरंच हा अत्याचार सहन करावा लागला आहे, त्या स्त्रियांच्या मनावर आयुष्यभरासाठी ओरखडे उमटतात. त्यांच्या मनावर ह्या सगळ्याचा वाईट परिणाम होतो.
अत्याचार करणाऱ्याला जगासमोर उघड केले, तर मनाला थोडे तरी समाधान लाभेल. म्हणजेच, आवाज उठवणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.
६. ह्या चळवळीत अनेक स्त्रियांनी अनेक वर्षांपूर्वी झालेल्या अत्याचाराबद्दल जगाला सांगितल्यामुळे बहुतांश वासनांध विकृत लोक चपापले असतीलच.
आपण केलेले कृष्णकृत्य केव्हाही जगासमोर येऊन सर्वांसमक्ष आपला मुखवटा फाटू शकतो ह्या कल्पनेने ते धास्तावले असतील. परत असे काही करण्याअगोदर ते विचार नक्की करतील.
७. स्त्रियांबरोबर पुरुषांनी देखील मोकळेपणाने आपल्यावर झालेला अत्याचार जगासमोर मांडले पाहिजेत.
अनेक पुरुषांना सुद्धा लहानपणी किंवा किशोरवयात असे अनुभव येण्याची शक्यता असते. पुरुष त्याविषयी कुणालाही सांगू शकत नाहीत आणि मनातल्या मनात कुढत राहतात. ह्याचा त्यांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो पण तरीही ते कुणाशीही हे शेअर करू शकत नाहीत.
८. ह्या चळवळीतून स्त्रियांना एक धडा घेणे आवश्यक आहे, तो म्हणजे, अन्यायाविरुद्ध तेव्हाच्या तेव्हाच उभे राहिले पाहिजे. आपल्यावर अत्याचार झाला असेल तर तो तातडीने जगाला सांगितला पाहिजे.
तुम्ही जर अनेक वर्षांनी ह्याविषयी सांगितले तर लोक तुम्हालाच दोषी समजून “तेव्हाच का नाही सांगितले! आता कशाला सांगतेय?” किंवा “तेव्हा एन्जॉय केले असेल, आता स्वार्थ संपला तर पुरुषावर आरोप करून मोकळी होतेय” असे आरोप तुमच्यावर करतील.
का नाही सांगितले? पेक्षा आता का सांगतेय? असे तुम्हालाच विचारले जाईल आणि तुमच्यावर फार कोणी विश्वास ठेवणार नाही.
९. सभ्य, सुसंस्कृतपणाचा मुखवटा घालून फिरणाऱ्या लोकांचा खरा चेहरा जगापुढे आला पाहिजे. अशा तथाकथित संस्कारी व सभ्य लोकांपासून स्त्रिया स्वतःला लांब ठेवतात. पण,
आपल्यावर ज्याने अन्याय केला त्याच्याबद्दल जगाला सांगितले तर आणखी लोक त्या व्यक्तीच्या जाळ्यात सापडण्यापासून वाचू शकतील. म्हणून वेळीच ह्याविषयी बोलायला हवे.
१०. कंपन्यांमधील HR लोकांनी जबाबदारीने काम करायला हवे. त्यांना स्त्री कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पावले उचलायला हवीत. कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
११. स्त्रियांची शैक्षणिक किंवा आर्थिक स्थिती सुधारली म्हणजेच स्त्री सबलीकरण झाले असे होत नाही. स्त्री सबलीकरण हा अत्यंत व्यापक विषय आहे व त्यासाठी आणखी प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी स्त्रियांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे.
१२. स्त्रियांनाच दोष देणारे तसेच ह्या विषयाची खिल्ली उडवणाऱ्या संवेदनाहीन लोकांची स्त्रियांबद्दलची मानसिकता अशा चळवळीमुळे उघड झाली आहे. ह्यात स्त्री व पुरुष हे दोघेही येतात.
स्त्रिया इतरांची दु:ख समजून न घेता खिल्ली उडवतात. काही सन्माननीय पुरुष मात्र आपल्या माता, भगिनी व मैत्रिणींच्या बाजूने खंबीरपणे उभे राहतात.
१३. फक्त बलात्कार आणि विनयभंग हेच लैंगिक अत्याचाराच्या व्याख्येत बसत नाहीत तर, अश्लील हावभाव, अश्लील शेरेबाजी करून मानसिक छळ करणे, इत्यादी गोष्टी सुद्धा यातच येतात.
द्विअर्थी सूचक संदेश पाठवणे, शरीरसंबंधांची थेट किंवा सूचक मागणी करणे ह्या गोष्टी सुद्धा मानसिक त्रासदायक असतात. त्या सुद्धा लैंगिक अत्याचारात येतात.
म्हणूनच स्त्री असो की पुरुष, तुम्ही बलात्कार किंवा विनयभंग होण्याची वाट बघू नका. तुमच्याबाबतीत असे काही घडत असेल ज्याने तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर मोकळेपणाने बोला, प्रतिकार करा. नाहीतर तुम्हाला त्रास देणाऱ्यांना धडा मिळणार नाही.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.