कुठे बियरचा पूर तर कुठे चिखलात अंघोळ – जगातील “१० भन्नाट” सण…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
जगात जितके धर्म तितके त्यांचे सण आणि उत्सव आणि उत्सव म्हणजे उत्साहाला उधाण..!
कुटुंबातील सदस्य घरापासून लांब जरी रहात असतील तरी ते सणासुदीला एकत्र येतात. मित्रमंडळींच्या भेटी होतात. मिठाई, भेटवस्तू आणि शुभेच्छांची देवाण घेवाण करण्याचे निमित्त म्हणजे सणवार.
नवीन वस्तू खरेदी करणे, चविष्ट पदार्थ बनवणे, नटणे मुरडणे, दानधर्म करणे अशा कार्यक्रमांची रेलचेल आणि आनंदी आनंद उत्सवाच्या रूपाने सगळ्यांचा आयुष्यात येतो.
जगभर वेगवेगळे सणवार साजरे होताना आपण बघतो. प्रत्येकाची खासियत निराळी. भारत हा रंगीबेरंगी सणांचा देश आहे. जितके सणवार आणि उत्सव भारतात साजरे होतात तितके जगाच्या पाठीवर कुठेही नसतील.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
तरी भारतात आणि इतरत्र साजरे होणारे १० अतिशय रंजक, उत्साहपूर्ण सण तुम्हाला महितीदाखल आम्ही आणले आहेत. बघूया कोणकोणते आहेत हे सण.
१. बोरीयोंग मड फेस्टिवल, दक्षिण कोरिया
ह्या सणाला चिखलाची होळी देखील म्हणू शकतो. हा काही पारंपरिक सण नाही. हा एका कोरियन सौंदर्य प्रसाधनाच्या कंपनीने सुरू केलेला उत्सव आहे.
ही कंपनी मड म्हणजेच मऊसर मातीच्या चिखलाचा वापर करून सौंदर्य प्रसाधने बनवते. जी आपल्या त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. ह्या कंपनीने कुठलीही जाहिरातबाजी न करता आपल्या ग्राहकांसाठी एक सण सुरू केला.
वॉटर पार्क सारखे मड पार्क सुरू केले. जिथे त्वचेसाठी उपयुक्त अशा चिखलाची तळी, डबके, पूल, ओढे, घसरगुंड्या आणि मजेशीर खेळ बनवले. चिखलाच्या खेळामध्ये लोकांना खूप मजा येऊ लागली आणि हा एक सण म्हणून गणला जाऊ लागला.
ह्या चिखलाने त्वचेवर चांगला परिणाम तर होतोच आणि चिखलात खेळायची संधीही मिळते. ह्या चिखलातली कुस्ती देखील प्रसिद्ध आहे.
२. रिओ दि जनेरिओ चा कार्निवल, ब्राझील
१८२३ पासून सुरू झालेला हा अतिशय रंजक असा उत्सव आहे. जगभरातून लाखो लोक ह्यात सहभाग घेतात. ह्या कार्निवलची परेड फार प्रसिद्ध आहे.
ह्यात रंगीबेरंगी पोशाख करून स्त्रिया आणि पुरुष नृत्य करतात. फ्लोट, रेव्हलर्स, आडोर्नमेंट असे प्रकार परेडमध्ये दाखवले जातात. सांबा हा नृत्य प्रकार प्रामुख्याने केला जातो. सांबा नृत्य समूह ह्यात स्पर्धा करतात आणि परेड मध्ये हजारो प्रेक्षक त्याचा आनंद घेतात.
हा एक धार्मिक उत्सव आहे आणि कॅथॉलिक समुदायाचे लोक ह्यात उत्साहाने भाग घेतात. फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात २ दिवस हा सण साजरा होतो.
–
- पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नागपुरात साजरा होणारा अनोखा सण : “मारबत” प्रथा
- मुघलांनी ख्रिसमस साजरा केला होता का? उत्तर वाचा…
–
३. ला टोमॅटिना, स्पेन
टोमॅटोची होळी म्हणता येईल असा हा सण आहे. १९४५ सालापासून हा सण स्पेन मध्ये सुरू झाला.
टोमॅटो एकमेकांना मारून टोमॅटोच्या रसात न्हाऊन निघणे म्हणजे टोमॅटिना फेस्टिवल. पाण्याचे फवारे, टोमॅटोचा चिखल आणि ट्रकभर टोमॅटो मध्ये उड्या मारून त्याचा रस काढून एकमेकांना तो रस लावणे अशा पद्धतीने हा सण साजरा होतो.
१९५० साली अन्नाची नासाडी नको म्हणून हा सण सरकार तर्फे बंद करण्यात आला होता. पण लोकांच्या अत्यंत आवडीचा हा सण लोकांनीच बंदी विरोधात मोर्चे, रॅली काढून पुन्हा सुरू करवून घेतला. ह्या सणामुळे स्पेनला पर्यटन क्षेत्रात चांगलीच उभारी लाभली आहे.
४. ऑक्टोबर फेस्ट, जर्मनी
बिअर ह्या मदिरेचे रसपान करण्यासाठी साजरा होणारा हा सण तब्बल १६ दिवस चालतो. जर्मनी मधील म्युनिक येथे हा सण उत्साहात साजरा होतो.
१६ दिवस सगळीकडे बिअर विक्री आणि खरेदी होते. हॉटेल, रोडसाईड स्नॅक्स हाऊस मध्ये सुंदर सुंदर ललना बिअर सर्व करतात. जगभरातून लोक ह्या उत्सव निमित्त जर्मनीत दाखल होतात.
नाच गाणी, रंगीबेरंगी परेड, बिअर, चिकन, खानपान अशा गोष्टीची मजा घ्यायला १६ दिवस सुद्धा कमी पडतात.
५. सॉंगक्रान वॉटर फेस्टिवल, थायलंड
थायलंड मध्ये त्यांच्या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतीय होळी सणाप्रमाणेच हा सण साजरा केला जातो. ह्या सणाला रंगांची उधळण केली जाते. जागो जागी हत्ती सोंडेच्या साहाय्याने लोकांवर पाण्याचे फवारे मारतात. पाण्यात खेळणे हा ह्या सणाचा मुख्य क्षण.
परेड, ब्युटी काँटेस्ट अशाही स्पर्धा त्यावेळी चालतात. रात्री फटाक्यांची आतषबाजी करून नवीन वर्षाची शुभ सुरुवात थायलंडवासी करतात.
६. पिंगस्की लँटर्न फेस्टिवल, तैवान
चायनामध्ये क्विंग डायनास्टीच्या काळात तेथील कंदील लावायचा हा सण तैवानच्या पिंगस्की मध्ये आला. इडा पीडा टाळण्यासाठी आकाशात कागदी कंदील सोडणे हे ह्या सणाचे वैशिष्ट्य.
डिजनीच्या टॅन्गल्ड ह्या सिनेमात दाखवल्या प्रमाणे सुंदर सुंदर कंदील आकाशात सोडले जातात आणि आकाशही उजळून निघते. पूर्वी फक्त पिंगस्की मध्ये साजरा होणारा हा सण आता मात्र संपूर्ण तैवान मध्ये साजरा होतो.
७. कार्निवल ऑफ व्हेनिस, इटली
९०० वर्षांपासून इटलीच्या व्हेनिस शहरात हा कार्निवल साजरा होत आला आहे. चेहऱ्यावर मास्क घालून नृत्य करणे हे ह्या सणाचे खास वैशिष्ट्य.
–
- जगभरात विविध रंगात साजरी होणारी कृष्ण जन्माष्टमीची ही रुपं पाहून तुमच्याही डोळ्यांचं पारणं फिटेल
- जगातील सर्वात वादग्रस्त आणि क्रूर परंपरा: स्पेनमधील ‘रनिंग ऑफ द बुल’ उत्सव!
–
ह्या सणाला रस्ता माणसांनी फुलून निघतो. चौका चौकात विविध खेळ दाखवणारे, जादू दाखवणारे कलाकार दिसतात. रंगीत मलमलच्या कपडे आणि चेहऱ्यावर मास्क घालूनच माणसे वावरतात.
ह्या सगळ्यामुळे पाण्यावर तरंगणारे हे व्हेनिस शहर फारच सुंदर वाटते. रात्री सगळीकडे पार्ट्या आणि नृत्य सुरू होते. ह्या सगळ्या झगमगाटामुळे व्हेनिस शहर अगदी जिवंत भासू लागते.
८. डे ऑफ डेड, मेक्सिको
३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेम्बर असा ३ दिवस चालणार हा उत्सव मेक्सिको मध्ये साजरा होतो. हा सण भारतात होणाऱ्या पितृ पंधरवड्या प्रमाणेच असतो. ह्या ३ दिवसात आपापल्या मृत पूर्वजांना श्रद्धांजली वाहिली जाते.
त्यांच्या थडग्यांसामोर फुले, मेणबत्त्या, रोषणाई केली जाते. त्यांच्या आवडीचे पदार्थ आणि सरबते त्यांच्या थडग्यांसामोर ठेवली जातात. आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी सगळीकडे प्रार्थनाही केल्या जातात.
९. व्हाइट नाईट फेस्टिवल, रशिया
जगातला अतिशय रोमांचक उत्सव मानला जाणारा व्हाइट नाईट फेस्टिवल रशियात साजरा होतो.
ऑपेरा सिंगिंग, संगीत आणि नृत्य प्रकार ह्या सगळ्या अलंकारांनी हा सण नटतो. शाळकरी, कॉलेज कुमार, कुमारिका सगळ्या स्पर्धात भाग घेतात. रशियन नृत्य कला सगळ्यांसमोर सादर केली जाते.
लाखो लोक ह्या उत्सवात सहभागी होण्याकरता आणि त्यातील रोमांच अनुभवन्याकरिता रशिया मध्ये जातात.
१०. होळी, भारत
भारतात तर खरं कोणत्या सणाचे वर्णन करावे ह्याचा प्रश्नच पडत असेल लोकांना.
हिंदू धर्मातील होळी हा देखील एक असाच सण. थंडीच्या ऋतूच्या समाप्तीची आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीची चाहूल देणारा सण. ह्यात होलिकेचे दहन आणि रंगांची उधळण हे दोन महत्वाचे कार्यक्रम असतात.
होळी पेटवून तिला गोडधोडाचा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बोंबा मारायचे काम उत्साहात केले जाते. तर दुसऱ्या दिवशी होळीची राख, गुलाल आणि असंख्य रंगांची उधळण होते.
नाच गाणी, मिठाई, पक्वान्नाचा स्वयंपाक ह्यात भारतीय माणसे गुंगून जातात. रंगीत पाणी, फुगे, पिचकाऱ्या ह्या सगळ्यांच्या साहाय्याने एकमेकांना रंगात रंगवणे हा सणाचा मुख्य हेतू.
परदेशातील पर्यटक देखील ह्या सणाने आकर्षित होऊन भारतात मुक्कामाला येतात. खरोखरीच आयुष्यात रंग भरणारा हा सण प्रचंड उत्साहात साजरा होतो.
असे आहेत जगभरातील अत्यंत सुंदर सण. तुम्हाला शक्य होत असल्यास हे अनुभवून बघाच. सगळे नाही जमले तर जितके जमतील तितके. पण अशा सणांची मजा आयुष्यात एकदा तरी नक्कीच घेतली पाहिजे.
–
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.