आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
महिलांच्या निरनिराळ्या क्षेत्रातल्या यशोगाथा सातत्याने समोर येत असतात. त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट एका बाजूला तर स्त्री असण्याचे समाजाने लादलेले ओझे एका बाजूला अशी परिस्थिती असते.
काही क्षेत्र तर असे असतात की जणू काही त्या क्षेत्रात महिलांना संधी निषिद्धच आहे. मात्र आता काळ बदलतो आहे. म्हणून आता असेही अनेक व्यवसाय/नोकरीचे क्षेत्र आहेत जिथे आजपर्यंत महिलांना स्थान नव्हते.
परंतु आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी आपली जागा निर्माण केली आहे.
भारतीय सीमेचे सदैव रक्षण करणारे सीमा सुरक्षा दल हे प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी नेहमीच करत आले आहे. त्यांनी गाजवलेले शौर्य पाहून अनेक तरुणांना प्रेरणा मिळते.
पण याच सीमा सुरक्षा दलात महिलांना प्रवेश नव्हता. आतापर्यंत सैन्य आणि अर्धसैनिक दलात महिलांना युद्धभूमीवर नियुक्त केले जात नसे. परंतु गेल्या काही वर्षांपासून नियम बदलून महिलांना देखील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे.
त्यानुसार २०१६ मध्ये भारतीय वायुसेनेने तीन महिलांना लढाऊ जेट पायलट म्हणून निवडले.
काळाची पावलं ओळखून हाच कित्ता गिरवत सीमा सुरक्षा दलात महिलांना स्थान मिळू लागले आहे.
तनुश्री पारीक या सीमा सुरक्षा दलातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. आज त्या भारत – पाकिस्तानतील पंजाब मधील वाघा सीमेवर आपले कर्तव्य बजावत आहेत. म्हणजे आता त्या थेट “ऑपेरेशनल ड्युटी” करण्यास सज्ज आहेत.
शत्रूशी दोन हात करावे लागल्यास त्या अधिकारी म्हणून जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडतील. १९६५ साली भारत – पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्ध आणि शांतता काळात सीमेचे रक्षण करण्यासाठी सीमा सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत सीमा सुरक्षा दल काम करते. १९६५ पूर्वी सीमेची सुरक्षा करण्याची जबाबदारी इतर देशांशी सीमा असलेल्या राज्यांची होती.
सीमेवर चालणारा अवैध व्यापार रोखण्याची जबाबदारीही सीमा सुरक्षा दलाची आहे. अजून नक्षलवादाचे आव्हान असो वा घुसखोरांचा प्रश्न, त्यांच्याशी सीमा सुरक्षा दलाला सामना करावा लागतो. अशा आव्हानात्मक वातावरणात काम करण्यास तनुश्री पारीक सज्ज आहेत.
सीमा सुरक्षा दलाकडे २ लाख ५० हजार इतके मोठे मनुष्यबळ आहे. भारताचे सीमा सुरक्षा दल हे जगातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. १९६५ साली स्थापन झालेल्या सीमा सुरक्षा दलात २०१७ मध्ये पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती म्हणूनच विशेष ठरते.
तनुश्री पारीक यांचा इथवरचा प्रवास हा निश्चितच प्रेरणादायी आहे. राजस्थानमधील बिकानेर येथील त्यांचा जन्म आहे. त्यांनी बिकानेरच्या सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियंत्याची पदवी मिळविली.
त्यानंतर त्यांनी ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ’ (इग्नू) मधील ‘ग्रामीण विकास’ मध्ये पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. त्यांनी नागरी सेवांची तयारी देखील केली आणि सुरुवातीच्या परीक्षेत यश मिळविले, मुख्य परीक्षेतील अपयश मात्र त्यांना रोखू शकले नाही.
–
- पुरुषी वर्चस्व झुगारून देत ‘ती’ बनली बॉलीवूडची पहिली महिला गॅफर !
- २०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला!
–
त्या महाविद्यालयीन जीवनात एनसीसीत होत्या, त्यावेळेसच त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरविले होते. जरी त्यांनी सुरुवातीला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचं ठरवलं असलं तरी एनसीसी मुळे आपल्याला या गणवेशाचे आकर्षण निर्माण झाल्याचे त्या सांगतात.
२०१३ मध्ये नियम बदलून महिलांना सैन्यात लढाऊ अधिकारी म्हणून नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आणि त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ‘असिस्टंट कमांडंट’ ही परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.
२०१४ मध्ये चार टप्प्यात असणाऱ्या कठीण प्रक्रियेचा सामना केल्यानंतर तनुश्री यांना बीएसएफच्या पहिल्या महिला सहायक कमांडंट म्हणून निवडण्यात आले.
हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. कारण फक्त अभ्यास करून चालणार नव्हता तर शारीरिक क्षमता देखील सिद्ध करावी लागणार होती. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्यांनी या यशाला गवसणी घातली. हे यश त्यांनी साजरे केले मात्र परीक्षा अजून काही संपली नव्हती.
पुढे १३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षणच त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करणार होते. प्रशिक्षणात त्यांनी युद्ध कौशल्य, गुप्त माहिती गोळा करणे आणि सीमा सुरक्षा संबंधित इतर प्रक्रियांचे प्रशिक्षण घेतले.
आपल्या प्रशिक्षणादरम्यान, त्यांनी ‘ड्रिल’, सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी, आणि वक्तृत्व असे तीन पुरस्कारही जिंकले. अशा या विलक्षण यशाबद्दल त्यांचा यथोचित सन्मान झाला नाही तरच नवल !
प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर होंणाऱ्या अंतिम परेडचे नेतृत्व त्यांनी केले. “या परेडसाठी मी खूप उत्सुक होते, त्यासाठी मी खूप तयारी केली” असं त्या सांगतात. तनुश्री असा विश्वास व्यक्त करतात की,
जर तुम्ही आयुष्यामध्ये ध्येय ठेवला आणि साध्य करण्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल तर अशक्य काहीच नाही. तरुणींना त्या सल्ला देतात की ‘कोणावरही अवलंबून राहू नका. एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील यश आनंद मिळवून देतो, त्यामुळे निर्माण होणारा आत्मविश्वास एक वेगळ्याच प्रकारचा असतो.
त्यांचा असा विश्वास आहे की सैन्यात जाण्याने जीवनात शिस्त लावली जाते. जी आयुष्य भरभरून जगण्यासाठी खूप आवश्यक आहे.
इतिहासात पहिल्या पाऊलांचं महत्व निश्चित मोठं आहे. तनुश्री पारीक यांनी आपले नाव असेच इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले आहे.
पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे अनेक तरुणींना यामुळे एक नवी दिशा गवसली आहे. अशा लाखो मुलींमध्ये जर या घटनेने आत्मविश्वास निर्माण होणार असेल तर त्याचे मोल करता येणार नाही.
तेव्हा या यशोगाथा महिलांना पर्यायाने समाजाला दिशा दाखवण्याचं काम करत असतात. तनुश्री पारीक यांच्या यशाने आता फक्त तरुणांनाच नव्हे तर तरुणींनाही सीमा सुरक्षा दलामार्फत देशसेवा करण्याची स्फूर्ती मिळेल.
–
- ...जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते!
- २०२२ मध्ये भारतातील माणसांना अंतराळात पाठवण्याची तयारी करतेय एक भारतीय महिला!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.