मोदींच्या राज्यात मुस्लीम असुरक्षित असल्यामुळे मी “घरवापसी” केली!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशभरातील अल्पसंख्याक समुदायावर होणाऱ्या हल्ल्यात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय मानव अधिकार संघटनेने याबाबतीत भारत सरकार जवळ नाराजी व्यक्त केली आहे.
तसेच भारताचा मानव अधिकारांच उल्लंघन करणाऱ्या देशांच्या यादीत दिवसेंदिवस भारताचे स्थान वर जात आहे जे निश्चितच चिंताजनक आहे.
हे असून सुद्धा भारत सरकार मात्र या आरोपांना फेटाळून लावत असून भारतात शांतता नांदत आहे असं चित्र उभ करत आहे.
भारतातील विरोधी पक्ष मात्र सरकार वर सडकून टीका करत असून दलित, मुस्लिम धर्मीयांवर होणाऱ्या हल्ल्याना सरकारला व सरकारच्या धार्मिक ध्रुवीकरणच्या धोरणाला जबाबदार धरले आहे. परंतु मोदींची प्रतिमा खराब करण्यासाठी विरोधक हे षडयंत्र रचत आहेत असा आरोप सत्ताधारी पक्ष व त्यांचा समर्थकांकडून विरोधकांवर केला जातो आहे.
परंतु अखलाक तसेच उना प्रकरणानंतर मात्र सरकारच्या दाव्यात बऱ्यापैकी खोटारडे पणा असल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे मोदी सरकारच्या राज्यात अल्पसंख्याक असुरक्षित आहेत ही भावना बळकट होत चालली आहे.
हिंदू असल्यावर सुरक्षितता मिळते तसेच न्याय देखील मिळतो ही असं अनेकांना वाटू लागलं आहे.
ह्याच भावनेतून २ ऑक्टोबर रोजी बागपत जिल्ह्यातील एका १३ सदस्यांच्या मुस्लीम कुटुंबीयाने इस्लाम सोडून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. हिंदू झाल्यावर त्यांना न्याय मिळेल अशी त्यांची धारणा आहे. त्यांचं धर्म परिवर्तन करण्यात एका हिंदुत्ववादी समूहाने योगदान दिले आहे.
“घर वापसी” द्वारे त्यांनी १३ मुस्लिम कुटुंबीयांच धर्मांतरण करून त्यांना हिंदू धर्मात सामील केलं आहे. पण त्या मुस्लिम कुटुंबियाने हिंदू धर्माचा स्वीकार का केला, हे ऐकणं हादरवून सोडणारं आहे.
गुलशन नावाचा तरुण मुलगा जो त्या मुस्लिम कुटुंबाचा सदस्य होता. तो एक बिझनेस चालवायचा, बिझनेस मध्ये त्याचं अनेक लोकांशी शत्रुत्व निर्माण झालं होतं. त्या शत्रुत्वातून त्याला मनःस्ताप भोगावा लागत होता, एके दिवशी तो त्याचा घरच्यांना घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
प्रथमदर्शनी ती आत्महत्या वाटत असली तरी त्याची बिझनेस मधील शत्रुत्वातून हत्या करण्यात आल्याचा दावा त्याचाच कुटुंबियांनी केला.
त्या संदर्भात कायदेशीर लढा देण्याचे ठरवले परंतु त्यांना बऱ्याच तिरस्काराचा सामना करावा लागला.
त्यांचा धर्म मुस्लिम आहे म्हणून त्यांचा प्रति प्रत्येक ठिकाणी दुजाभाव बाळगला जात असल्याची जाणीव त्यांना होत होती. त्यांना मुस्लीम समाजाचा देखील पाठिंबा मिळाला नाही. मग शेवटी कंटाळून त्यांनी मुलाला न्याय मिळावा यासाठी हिंदू धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला. त्या साठी त्यांनी स्थलांतर केले.
हिंदू युवा वाहिनी ह्या संघटनेशी संपर्क साधून धर्म परिवर्तन करण्याची इच्छा बोलून दाखवली, त्यांना प्रतिसाद देत हिंदू युवा वाहिनी ने त्यांचे धर्म परिवर्तन केले.
त्या कटुंबाचे प्रमुख असलेल्या अख्तर अली यांचे नामकरण धर्मपाल सिंग करण्यात आले तसेच इतर सदस्यांचे देखील नामकरण करण्यात आले. यासाठी त्यांनी यज्ञ विधी केला. ह्या सर्व कामात हिंदू युवा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली.
हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्त्यांचा म्हणण्यानुसार त्यांना स्वधर्मात आणनं हे त्यांचं कर्तव्य होतं जे त्यांनी पार पाडलं होतं. पण अख्तर अली यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा गुलशन ह्याची हत्या झाली जिला पोलिसांनी आत्महत्येचा रंग दिला आहे.
आम्ही न्यायाची मागणी केली तेव्हा आमची मुस्लिम म्हणून हेटाळणी करण्यात आली.
त्यामुळे आम्ही सहकुटुंब हिंदू धर्माचा स्वीकार करतो आहोत. सत्तेतील हिंदुत्ववादी सरकार हिंदूंच्या बाबतीत अनुकूल असते तशे ते आमच्या बाबतीत अनुकूल होतील आणि आम्हाला न्याय मिळेल.
या संपूर्ण वर्णनातून एका सेक्युलर देशात एका अल्पसंख्याक समुदायाच्या भारतीय नागरिकाला न्याय मिळवण्यासाठी धर्म परिवर्तनाचा निर्णय घ्यावा लागणे योग्य आहे का?
जर व्यक्ती मुस्लीम असेल तर तिला न्याय मिळणार नाही का? हिंदू धर्म स्वीकारला तर त्याला न्याय मिळेल का? असे अनेक प्रश्न आज निर्माण झाले आहेत.
त्याची उत्तर काळ देईलच पण सामान्य नागरिकाला न्यायासाठी त्याचा श्रद्धेचा सौदा करावा लागतो हे निश्चितच लज्जास्पद आहे.
सोबतच मोदी सरकारच्या अल्पसंख्याक विषयक धोरणामुळे त्यांचा मनात जी भिती निर्माण झाली आहे, त्यामुळे भारतीय समाजाच्या मूल्याना आणि अस्मितेला ठेच पोहचत असून या देशातील विविधतेने नटलेल्या लोकशाही वादि परंपरेवर यामुळे आघात होत आहेत.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.