गुरुदत्त…!!! (भाग १)
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page
===
तुमच्या मते हिंदी सिनेसृष्टीतले आतापर्यंत झालेले ५ सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणते? मला वाटते, कधीही-कुठेही, म्हणजे कॉलेज कॅन्टीन, हॉटेल, मित्रांचे गप्पांचे अड्डे, पेन्शनरांची शिळोप्याच्या गप्पा मारायची ठिकाणं, हा प्रश्न विचारला तर २ मिनिटात रणधुमाळी सुरु होईल. कोणी ‘शोले’ म्हणेल, कोणी ‘मुघल-ए-आजम’ कडे बोट दाखवेल. कोणी ‘मदर इंडिया’ म्हणेल तर कोणी अगदी ‘तेजाब’ किंवा ‘हम आपके है कोन’ (आपण दचकायाचं नाही, त्याला “फक्त सर्वोत्कृष्ट चित्रपट विचारलाय, लग्न समारंभाची विडीयो कॅसेट नाही” असं म्हणून गप्प करायचं…) सुद्धा म्हणेल.
या पाच पैकी पहिला कोण ह्यावर तर कधीच एकवाक्यता होणार नाही. पण एक चित्रपट असा आहे कि ज्याच्या या पाच चित्रपटांच्या यादीत समावेश असण्यावर कुणाचाही आक्षेप असणार नाही आणि जो कोणी आक्षेप घेईल त्याला लगेच एका मुखाने निषेध करून ( थोडक्यात ढोस देऊन) गप्प करण्यात येईल. तो चित्रपट म्हणजे १९५७ साली आलेला आणि प्रचंड गाजलेला गुरुदत्तचा ‘प्यासा’.
त्याकाळी जेव्हा लोक आज पेक्षा सर्वच बाबतीत जरा जास्तच सनातनी होते (म्हणजे असं म्हणतात बुवा आपल्याला काय खरं-खोट माहित नाही.).
त्याकाळी ह्या हटके सिनेमाने जे अभूतपूर्व यश मिळवलं (कस काय कोण जाणे?) त्याची पूर्ण कल्पना आज आपल्याला येणं तसं अवघड आहे. पण या सिनेमाने इतिहास घडवला हे खरं. त्याकाळी ‘प्यासा’ वर उसासून बोलणे हि फ्याशन झाली होती.गुरुदत्त, ह्या काळाच्या खूप पुढे असणाऱ्या एका संवेदनशील माणसाने काढलेला, दिग्दर्शित केलेला, स्वतः काम केलेला असा हा भावनोत्कट काव्यपट.
गुरुदत्त म्हटलं कि ज्यांना त्याच्याबद्दल फारसं काही माहिती नसते असे लोक त्याने आत्महत्या का केली असावी? यावर गप्पा मारू लागतात. आत्महत्या करणे हा भ्याडपणा कि नैराश्याचा अतिरेक? तुम्ही गुरुदत्तच्या आत्महत्येला काय वाटेल ते नाव द्या. मुळात ती आत्महत्या होती कि अपघात यावरच एकमत नाही.
राज खोसला म्हणतो –
तो अपघात होता, त्याला दारू बरोबरच झोपेच्या गोळ्या घ्यायची सवय होती आणि त्या रात्री नशेच्या अंमलाखाली आपण किती गोळ्या घेत आहोत याच त्याला भान राहिलं नाही. त्याची दुसऱ्या दिवशी राज कपूरशी भेट ठरलेली होती, अगदी वेळ घेऊन. मग तो आत्महत्या कशी करेल? तो अपघातच होता.
तर आदल्या रात्री त्याच्या बरोबर प्यायला बसलेला अबरार अल्वी (त्याच्या आरपार, सी. आय.डी., प्यासा वगैरे चित्रपटांचा संवाद लेखक) म्हणतो –
नाही ती आत्महत्याच होती.’कागज के फुल’चं अपयश, गीता दत्त बरोबरचे वाद, वहिदा प्रकरणाचे ताण तो सहन करू शकला नाही. त्याने या पूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैफल्य, निराशा या मनस्वी कलावंताला वारंवार ग्रासे. त्याच्याच प्यासा मधल्या साहिरच्या गाण्याप्रमाणे ‘तुम्हारी है, तुम् ही संभालो ये दुनिया’ म्हणत तो या जगातून निघून घेला.
गुरुदत्त पदुकोन (कानडी उच्चार पदुकोने)हा कारवारचा चित्रपूर सरस्वत ब्राह्मण (CSB) – आपल्या कडे जसे मासेखाऊ गौड सरस्वत ब्राह्मण असतात ज्यांना आपण(खरतर ते स्वतःच) GSB म्हणतो तसेच हे कारवारचे. आता विषय निघाला म्हणून सांगायला हरकत नाही कि सध्याच्या आघाडीच्या दीपिका पदुकोनशी व्यवसाय, नाव आणि जात सोडली तर गुरुदत्तचा काहीही संबंध नाही (हो! नाहीतर त्याला स्वर्गात परत एकदा नैराश्याचा झटका यायचा आणि मेल्यावर परत मरायची काय सोय?) याचं मूळ नाव वसंतकुमार शिवशंकर पदुकोन. पण लहानपणी काहीतरी अपघात का आजारपणातून वाचल्याने माता पित्यांनी गुरुदत्त हे नाव दत्ताचा आशीर्वाद म्हणून ठेवलं.
सुरुवातीच्या काळात त्याने पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनी मध्ये उमेदवारी, नोकरी केली.विश्राम बेडेकर यांचा ‘लाखाराणी’ या पिक्चरचा तो सहाय्यक दिग्दर्शक होता. त्याने याच चित्रपटात नायिकेच्या भावाची छोटी आणि फुटकळ भूमिका ही केली होती. इथेच तो आणि प्रभात मध्ये उमेदवारी करणारा देव आनंद यांची भेट आणि दोस्ती झाली.(त्यांच्या बरोबर ‘रेहमान’ हि असे )स्ट्रगल करणाऱ्या दोघांनी एकमेकांना असं वचन दिलं कि दोघांपैकी जो कोणी आधी निर्माता होईल तो दुसऱ्याला आपलं पिक्चर दिग्दर्शित करायला देईल. हे वचन देताना दोघेही किती गंभीर होते, ते माहित नाही पण देव आनंद हा आधी ‘नवकेतन’ चा मालक झाला आणि त्याच्या ‘नवकेतन फिल्म्स’ चा दुसरा चित्रपट (पहिला चित्रपट ‘अफसर’ देव च्या मोठ्या भावाने चेतन आनंदने दिग्दर्शित केला होता) ‘बाजी’ हा त्याने ‘वादे के मुताबिक’ गुरुदत्तला डीरेक्ट करायला दिला. देव त्याच्या वचनाला जागला आणि गुरुदात्तने या संधीचं सोनं केलं.
१९५१ साली आलेला ‘बाजी’ हा अनेक अर्थाने ट्रेंड सेटर चित्रपट होता. त्याआधी चित्रपट बहुतांश ऐतिहासिक, सामजिक, पौराणिक, कौटुंबिक वगैरे असत आणि त्यातली पात्र बटबटीत असत. म्हणजे नायक हा नेहमी सज्जन, अगदी साधू नसला तरी सत्प्रवृत्त असे तर खलनायक पूर्णपणे वाईट. त्यांना मानवी कंगोरे नसत. चित्रपटात खलनायक असले तरी गुन्हेगारी जगताची झलक फारशी नसे.
‘बाजी’ने गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर आधारलेल्या चित्रपटची मुहूर्तमेढ रचली. आज जसा ‘सत्या’ हा चित्रपट एक ट्रेंड सेटर म्हणून आपण मानतो किंवा जंजीरला अंग्री यंग मन टाईप नायक प्रथम पुढे आणणारा मानतो तसं बाजी हा त्याकाळातला ट्रेंड सेटर चित्रपट होता. एस. डी. बर्मनची गाणीहि बरीच गाजली. मुख्य म्हणजे गुरुदत्तचं नाव झालं. बाजीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे राज खोसलाचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट. (तोच तो घोडे आणि घोडेस्वारी अत्यंत आवडणारा आणि जवळपास प्रत्येक चित्रपटामध्ये जमेल तिथे घोडेस्वारी चे प्रसंग घुसडणारा) राज खोसला हा देव आनंद चा लंगोटीयार आणि त्यांच्या आधीच्या पिढीत हि घरोबा होता त्यामुळे गायक बनण्याचं वेड घेऊन आलेल्या ह्या मित्राला देवने गुरुदत्त कडे सहाय्यक म्हणून घ्यायची विनंती केली.
गुरुदत्तने त्याला विचारलं
या आधी कधी सहाय्यक दिग्दर्शकाच काम केलय का?
तो म्हणाला, “नाही.”
गुरुदत्तने विचारलं
तुला सिनेमातलं काय माहित आहे ?
तो म्हटला, “कुंदनलाल सैगल.”
गुरुदत्त हसला आणि त्याला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ठेऊन घेतलं. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.
(क्रमशः)
—
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.